महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,202

किल्ले तिकोना | Tikona Fort

By Discover Maharashtra Views: 4405 15 Min Read

किल्ले तिकोना | Tikona Fort

किल्ले तिकोना(Tikona Fort) ! माझ्या मनात घट्ट रुतून बसलेला असा एक किल्ला ज्याने मला भटकंतीचे वेड लावले. वयाच्या सातव्या वर्षी म्हणजेच १९७९ साली मी पहिल्यांदा माझ्या आजोबा बरोबर माझ्या आयुष्यातील पहिला किल्ला पहिला आणि तो म्हणजे किल्ले तिकोना उर्फ किल्ले वितंडगड उर्फ अमिनगड. या किल्ल्याने माझा किल्ले भटकंतीचा श्रीगणेशा झाला. मी या किल्ल्यावर कितीवेळा गेलो हे आज मलाच माहित नाही पण जर मी या किल्ल्यावर लिहित गेलो तर १०० पेक्षा जास्त पानांचे पुस्तक बनेल पण इथे ते इतके सर्व लिहिणे जागे अभावी शक्य नाही. माझ्या आजोबांनी जेव्हा मला हा गड दाखवला त्यावेळेस त्यांचे वय सत्तरच्या आसपास होते आणि त्यांच्या लहानपणापासून ते या गडावर येत होते. त्यांनी तिथे उभ्या असणाऱ्या बऱ्याच वास्तु देखील पहिल्या होत्या व त्यांची त्यांना माहिती देखील होती. चला तर मग सुरवात करूया.

सर्वात मुख्य म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी दिसणारी गेव्हंडे वस्ती आणि तिकोना पेठ ही गावे मुळात आज जिथे दिसतात तिथे १९७१ पूर्वी काहीही नव्हते. गेव्हंडे ही वस्ती आज जेथे दिसते त्या टेकडीखालील उतारावर पवना धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे त्या भागात गेव्हंडे हे गाव होते. माझा जन्म देखील या ठिकाणचाच. तिकोना किल्ला आणि समोरचा मांडवी डोंगर या दोघांमध्ये एक खिंड आहे, पुर्वी गडावर होणारा प्रवेश या खिंडीतुनच होत होता. या समोर दिसणाऱ्या मांडवी डोंगराच्या पायथ्याशी आणि खिंडीच्या तोंडावर आजही चार-पाच घरे दिसतात. मूळ तिकोना पेठ येथे आणि काही घरे आज आपण किल्ल्यावर प्रवेश करायच्या मार्गावर जेथे वाहनतळ आहे त्याच्या खालील बाजुस वसली होती. तिकोना पेठ ही गडाची पेठ.

१९८० साली वितंडगडाची पावसाळ्यात दरड कोसळुन बरीच तटबंदी ढासळली आणि ही कोसळलेली दरड या वस्तीवरच आली ज्यात तीन चार घरे पुर्णपणे नष्ट झाली आणि उरलेल्या घरांनी रस्त्याकडील बाजुस स्थलांतर केले. आता दिसणारी वस्ती ही अशाप्रकारे उदयाला आली. मी पहिल्यांदा किल्ला पहिला त्यावेळी आजोबा बरोबर येथेच जुन्या तिकोना पेठेत एका घरातील पूजेसाठी आलो होतो. इथेच मला आजोबांकडून टहाळदेवाच्या जन्माची कथा ऐकायला मिळाली. या खिंडीत एक दगड होता त्याला येताजाता प्रत्येक वाटसरू झाडाची टहाळी(डहाळी) अर्पण करायचा. या देवाबाबत सांगताना आजोबा म्हणाले कि घाटातील पायवाटा खिंडीत ज्या ठिकाणी अरुंद असतात त्या सर्व वाटेवर आपल्याला टहाळदेव दिसुन येतो याचे कारण असे कि या अरुंद वाटेच्या बाजुला वाढत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या जाऊन वाट मोकळी रहावी हा टहाळदेवाच्या स्थापने मागचा मुख्य उद्देश होता याशिवाय एकटे दुकटे प्रवास करणाऱ्या वाटसरूला खिंडीसारख्या भयाण ठिकाणी देव आपल्या रक्षणासाठी आहे या कल्पनेने त्याचा आत्मविश्वास वाढतो.

आज खिंडीत गाडीरस्ता झालेला असुन टहाळदेवाच्या जागी भैरवाचे मंदीर झालेले आहे. वितंडगड आणि त्याच्या समोरचा मांडवी डोंगर यामुळेच मावळ खोरे आणि पौड खोरे एकमेकापासून विभक्त झाले आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला मावळ खोरे तर दक्षिणेला पौड खोरे आहे. सध्याच्या द्रुतगति महामार्गावरून हा किल्ला सहज दृष्टीक्षेपात येतो. बोरघाट चढून गेल्यावर माथ्यावर कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा आणि शेलारवाडी ही लेणी आहेत. या लेण्यांच्या सुरक्षिततेसाठी उभारलेले किल्ले म्हणजे लोहगड, विसापूर, तुंग ,तिकोना आणि मोरगिरी. प्राचीन बंदराना घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनेक घाटवाटा या परिसरात आहेत त्यामुळे यावर वचक ठेवण्यासाठी या दुर्गांची निर्मीती केली होती. या परिसरातील लेणी ही बौद्ध आणि हिनयान पद्धतीची असल्यामुळे हे सर्व किल्ले साधरणतः ८०० ते १००० या काळात बांधलेले असावेत.

पवना नदीवरील धरणाजवळ मुंबई पासून १२६ तर पुण्याच्या साधारण ६० कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे ३८५० फूट उंचावर आहे. किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने त्रिकोणी असल्याने याला तिकोना असे नाव पडले आहे. तिकोना किल्ल्याच्या त्रिकोणी आकारामुळे त्याला तीन सोंडा आहेत त्यातील दोन सोंडावरून आपल्याला गडावर जाता येते. या दोनही सोंडा दरवाजे व बुरुज बांधून बंदिस्त केल्या आहेत तर तिसऱ्या सोंडेवर थोड्या उंचीवर खंदक खोदुन त्यावर तटबंदी बांधलेली असुन त्यावर तोफा व बंदुकीसाठी जंग्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे त्या वाटेवरून गडात प्रवेश मिळवणे महाकठीण. गडाच्या माचीत प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार असुन एक गडाच्या पूर्वेला तर दुसरे गडाच्या उत्तरेला आहे. गडावर जाण्यासाठी गेव्हंडे आणि पायथ्याची तिकोना पेठ या वस्त्यांमधून वाट आहे. यापैकी कुठल्याही वाटेने आलो तरी प्रथम गडाच्या माचीत दाखल होतो.

चढायला हा किल्ला अतिशय सोपा आहे. मुख्य रस्त्याहुन आत पुढे कच्च्या रस्त्यावर आल्यावर पुढे एका ठिकाणाहुन वर सोंडेवर जाणारी पायवाट दिसते. ही पायवाट दरड कोसळल्याने आणि पडझडीने जरा अवघड बनली आहे. त्यामुळे इथे कोणाचा वावर नसुन कारवीचे रान वाढलेले आहे. ही वाट झाडीत लपलेली असुन या वाटेने किल्ल्याच्या एका दरवाज्याकडे जाणे मर्यादित साहस आहे आणि यामुळे हा दरवाजा किल्ल्यापासून थोडा वेगळा पडलाय. या वाटेने आपला प्रवेश उभ्या कड्यावरुन थेट गडाच्या दरवाज्यात होतो. कड्याच्या या भागात खडकात पायऱ्या खोदलेल्या आहेत. साहस म्हणुन या वाटेने जाण्यास काहीच हरकत नाही पण लहान मुले असल्यास मात्र या वाटेचा वापर करू नये. हा दरवाजा वेताळ दरवाजा म्हणुन ओळखला जातो. आधीपासूनच पडक्या अवस्थेत असणारा हा भाग आता वापरात राहिला नाही तर लवकरच दुर्लक्षामुळे नामशेष होइल.

दुसरी वाट थोडे पुढे गेल्यावर लागते. सुरवातीचा थोडा चढाचा टप्पा झाला की मग मस्त मळलेली पायवाट आपल्याला वर किल्ल्यावर घेऊन जाते. साधारण ४५ मिनीटांची चढाई केल्यानंतर आपण गडाच्या पहिल्या पालथा दरवाजातून माचीवर प्रवेश करतो. येथे बुरुजाच्या पोटात एक बोगद्या सारखा भाग आहे आणि त्यात लांब रुंद गुहा आहे. हेच किल्ल्याचे प्रबेशद्वार व त्यातुनच पुढे जावे लागते. या दरवाज्याच्या पुढे एक मातीने बुजलेला खंदक दिसतो व निट पाहिल्यास तो पूर्वी बराच खोलवर असल्याचे जाणवते. या भुयारी दरवाजाच्या वरील भागात एक बुरुज दिसतो. ह्या दोन्ही गोष्टीमुळे या दरवाजाचे नाव पालथा दरवाजा आहे कारण या भुयारी दारावर असणारा दरवाजा या खंदकावर उलटा म्हणजेच पालथा पडत असे. याला बुरुजावरून खंदकावर सोडण्याची वा खेचण्याची सोय होती.

खंदकावर हा दरवाजा पालथा (उलटा) पडल्यावर त्याचा पूल म्हणुन वापर करत किल्ल्यावर प्रवेश करता येत होता. या दरवाजाच्या आत पहारेकऱ्यासाठी देवड्या आहेत. येथुन पुढे किल्ल्याचा नीटपणे बांधलेला राजमार्ग चालू होतो. पुढील टप्प्यात दुसरा दरवाजा असुन याच्या दोन्ही बाजुस दोन बुरुज आहेत. या दरवाजाची कमान पुर्णपणे कोसळलेली असुन या भागात बरेचसे अवशेष पाहायला मिळतात. हा संपुर्ण भाग पुर्णपणे बालेकिल्ल्याहून निरीक्षणाच्या आणि तोफेच्या माऱ्याच्या टप्प्यात आहे. याच वाटेने थोडे पुढे आल्यावर मारूतीराया उभे ठाकलेले दिसतात. ही मूर्ती अंदाजे ७-८ फूट उंचीची असुन एका अखंड दगडात घडवलेली आहे. हि मूर्ती इतर मुर्तीप्रमाणे हातात पर्वत घेतलेली नसुन पायाखाली पनवती दैत्याला मारलेले असुन आवेशपूर्ण विजयी मुद्रेतील आहे. अशा प्रकारच्या मारुती मुर्तीला चपेटदान मारुती म्हणतात.

महाराष्ट्रातील बहुतेक गडांच्या परिसरात हनुमानाच्या मूर्ती हमखास दिसतात. मारुती ही शक्तीची, शत्रूचा नाश करणारी देवता. तेव्हा अशा ठिकाणी तिची स्थापना होणे हे अत्यंत स्वाभाविक! पुढे आल्यावर उभ्या कडय़ातील एक प्राचीन लेणे खुणावते. या लेण्यासमोर असलेले अवशेष म्हणजे गडाची सदर आहे. गड भोर संस्थानाच्या ताब्यात असेपर्यंत ही सदर अस्तित्वात होती. समोरच मंदिर असलेले लेणे हे सातवाहनोत्तरकालीन असावे. तळजाई मंदिर म्हणून स्थानिक लोकांमध्ये ही गुंफा परिचयाची आहे. पाच खोल्यांमध्ये विभागलेल्या या लेण्याच्या एका दालनात तळजाईची स्थापना केलेली आहे. गुहेत देवीचा नाक, डोळे असलेला तांदळा आहे तर छतावर कमळाची सुरेख शिल्पाकृती कोरली आहे. गुंफेशेजारी पाण्याचं कोरीव टाके असून समोरच एक तळे आहे. यातील पाणी मात्र पिण्याजोगे नाही. या गुहेत १० ते १५ जणांची राहण्याची सोय होते. मात्र पावसाळ्यात गुहा राहण्यास अयोग्य असतात. हे लेणे पाहात तिकोन्याच्या बालेकिल्ल्याकडे निघावे.

वाटेवरच त्या काळी बांधकामासाठी वापरली जाणारी चुन्याची घाणी व काही घरांचे अवशेष दिसतात. याशिवाय बालेकिल्ल्याच्या दक्षिणेकडील कड्याच्या पायथ्याला दीड किलोमीटरवर अजून एक लेणीही आहे. या उपेक्षीत लेणीमध्ये स्थानिक लोकही जात नाहीत. त्यामुळे अनेकांना ही लेणी माहीत नाही आणि वाचनात आलेल्या लेण्यांचा अनुषंगाने दोन्ही लेण्यांच्या माहितीत चूक करतात. पण ही दोन्ही लेणी पुर्णपणे वेगळी आहेत. अडगळीत पडलेली ही तीन-चार खोल्यांची गुहा, चिखलाने आणि वासाने भरलेली असली तरी मावळ परिसरात असलेल्या बौद्धकालीन गुहांचा एक उत्तम नमुना आहे. आडबाजूला पण तिथून एक मोठा भूभाग नजरेला पडेल अशी ही जागा बांधतानाच पाण्यासाठी काही नियोजन केल्याच्या खुणाही दिसतात. ह्या गुहेचा शोध डेक्कन कॉलेजच्या डॉ. सांकलीया, प्रभाकर कुलकर्णी व डॉ. शोभना गोखले ह्यांच्या गटाने केला होता. त्या वेळी त्यांना या परिसरात सातवाहनकालीन जात्याची एक तळीही मिळाली होती. त्यांच्या अहवालानुसार ह्या गुहेची ओळख सातवाहनांच्या काळापर्यंत मागे जाते.

गडाच्या पश्चिमेकडील भागात कातळात खोदलेले टाके आहे. ह्यात माथ्यावरून येणारे पावसाचे पाणी साठते व ते कातळाच्या आत असल्याने त्याचे पटकन बाष्पिकरण होत नाही. ह्या गुहेसमोर सतीची शिळा आहे. ह्यावरील शिल्पाचे दोन भाग आहेत. पहिल्यात एक पुरुष व त्याच्या पायाशी बसलेली स्त्री दाखवली आहे. त्या पुरुषाच्या कमरेखाली गुंडाळलेले वस्त्रही इथे दिसते. दुसऱ्या व खालच्या भागात दोन स्त्रिया हातात पुष्पहार घेऊन उभ्या असलेल्या दाखवल्या आहेत. म्हणजे हे खोदकामही प्राचीन असणार. या गडाच्या पुढय़ातच बेडसे लेणीचा डोंगर आहे. बेडसे लेणी खूपच प्राचीन. बहुधा यातूनच इथल्या या खोदकामाने प्रेरणा घेतलेली असावी.

बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे ओलांडावे लागतात. बालेकिल्ल्याची ही वाट उभ्या चढणीची व अरुंद अशी आहे. पायऱ्या उंचीने जास्त असल्याने चांगलीच दमछाक होते. कातळात खोदलेल्या एक ते दीड फूट उंचीच्या पन्नास पायऱ्या चढल्यावर बालेकिल्ल्याचा पहिला दरवाजा येतो. आत प्रवेश करताच उजव्या हातास पाण्याचे एक खोदीव टाके दिसते. याचे पाणी चवीस फारच सुंदर आहे. प्रत्येक गडावरच्या पाण्याची चव निराळी. बालेकिल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून ते दुसऱ्यापर्यंतची वाट अक्षरश: उभा कातळ फोडून तयार केली आहे. दहा ते पंधरा फूट उंची-खोलीच्या या नाळेतून ही दोन ते तीन फूट रुंदीची वाट वर चढते. अरुंद वाट, उंच पायऱ्या आणि भोवतीने अंगावर येणाऱ्या उभ्या कातळभिंती. या अरुंद वाटेवरून या बालेकिल्ल्यात एका वेळी एकच जण शिरावा त्या उंच पायऱ्यांवरून चढतानाच त्याचा जीव मेटाकुटीला यावा आणि मग असा हा थकलेला शत्रू सहज हाती यावा.

इतिहासातील किल्ल्यांचे लढाऊ सामर्थ्य हे त्याच्या अशाच जागांमधून प्रगट होत असते. बालेकिल्ल्याचा दुसरा दरवाजा हा पहिल्यापेक्षा प्रशस्त, आखीवरेखीव आहे. दरवाजासमोरच अर्धवर्तुळाकार बुरूज बांधून तो अधिक सुरक्षित केला आहे. या बुरुजाला आतील बाजूस बसण्यासाठी एक ओटाही बांधलेला आहे. या दरवाजाच्या आतही उजव्या हाताच्या कड्यात पाण्याच्या सलग चार खोदीव टाक्या आहेत खरतर या पाण्याच्या टाक्या नसुन साठवणीच्या खोल्या आहेत पण छत आणि भिंतीतून पाझरणाऱ्या पाण्याने त्याचे टाक्यात रुपांतर झाले आहे. याशिवाय डावीकडे वर येणाऱ्या वाटेवर टेहळणीचा सुटावलेला एकटा बुरूज आहे. यानंतर गडाचा तिसरा दरवाजा ओलांडतच आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करतो.

बालेकिल्ल्यात गेल्यावर समोरच थोडी अंगणासारखी जागा आहे. राहायचे असल्यास ही जागा उत्तम. इथून वर जायला अलीकडेच दुरुस्ती केलेल्या पायऱ्या आहेत. त्या थेट आपल्याला किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातात. माथ्यावरच्या प्रवेशद्वाराचे कसलेही अवशेष उरलेले नाहीत. माथ्यावर जागा तशी कमीच आहे पण या जागेत महादेवाचे मंदिर असून आतमधे सुबक आकाराची पिंड आहे. मंदिराच्या खालील भागात एक खांब असलेले पाण्याचे टाके असून डावीकडे दोन भुयाराची तोंडे आहेत. मंदिरा समोरच जुने भग्न झालेले दोन नंदी व एक शिवपिंडी आहे. यातील शंभु महादेवाचे नाव माहित नसूनही आपल्याच गिरीमित्रांनी स्वतःच्या मनाने त्याचे त्र्यंबकेश्वर/वितंडेश्वर असे नामकरण केले आहे. मंदिरामागे वाड्याचे जोत्याचे अवशेष असुन त्यावर आता आपला भगवा ध्वज फडकत असतो.

मंदिराशेजारी पाण्याचा मोठा तलाव आहे. मी सुरुवातीला १९७९ व १९८१ला दोन वेळा या तळ्याला भेट दिली तेव्हा या तळ्याच्या मध्यभागी लाकडाचा खांब होता जो नंतर कोसळुन गेला आणि दुसरे म्हणजे या पाण्याचा रंग नेहमीच पिवळा असल्याने याला वरणतळे असे नाव आहे. उजव्या कड्यावर ध्वजस्तंभाच्या खांबाच्या जागी सौरदिव्यांचा खांब उभा दिसतो. गडाचा हा सर्वात उंच भाग. येथुन समोरच उभा असणारा तुंग, लोहगड, विसापूर, भातराशीचा डोंगर, मोर्वे डोंगर, जांभुळीचा डोंगर, पवना धरण हा सर्व परिसर न्याहळता येतो. गडावरून संपूर्ण मावळप्रांत आपल्या नजरेत येतो. अशा प्रकारे ४ तासात संपूर्ण गड पाहून परतीच्या प्रवासाला लागु शकतो.

तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस मलिक अहमद निजामशहा याने इ.स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नरचा बराचसा प्रांत व त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपला मोर्चा तुंग व तिकोना गडांकडे वळविला. इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला तो निजामशाहीच्या अस्तापर्यंत त्यांच्याच ताब्यात होता. इ.स.१६३६ मधील मुघल बादशाह शहाजहान आणि विजापुरचा मुहम्मद आदिलशाह यांच्यातील तहानुसार पवनमावळातील तिकोना आदिलशहाच्या ताब्यात आला. ४ सप्टेंबर १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकुन स्वराज्यात आणला व किल्ल्याचे वितंडगड असे नामकरण केले. या किल्ल्याचा उपयोग संपूर्ण पवनमावळावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे.

सन १६६० या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. पुढे ११ जून १६६५ साली झालेल्या इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तहात’ शिवाजी महाराजांनी जयसिंगाला दिलेल्या २३ किल्ल्यांपैकी तिकोना हा एक किल्ला. १२ जून १६६५ पुरंदर तहानुसार १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. पण काही दिवसांतच मराठय़ांनी तो इ.स.१६७० मध्ये परत मिळवला. इ.स. १६८२ च्या ऑगस्ट महिन्यात संभाजी व अकबर याची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्याला जैतापूर येथे धाडण्यात आले. यानंतर औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीवेळी मुघलांनी तिकोन्याभोवती पुन्हा पाश टाकले. मोगल सरदार अमानुल्लाखानने इ.स.१७०२ मध्ये हा गड जिंकून निशानी म्हणून औरंगजेबाकडे सोन्याच्या किल्ल्या पाठविल्या. तिकोना हाती येताच औरंगजेबाने त्याचे नाव ठेवले ‘अमनगड ! पण अमनगडाचा हा प्रवासही अल्पकाळचाच ठरला. नंतर औरंगजेबाचा मृत्यु झाल्यानंतर तिकोना पुन्हा मराठ्यांनी जिंकून घेतला.

मराठय़ांची सत्ता पुढे १८१८ च्या इंग्रज-मराठे शेवटच्या लढाईपर्यंत अबाधित राहिली. इ.स. १८१८ मध्ये किल्ल्यावर थोड्याफार प्रमाणात लढाई झाली यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणावर नुकसान झाले. या लढाईत कर्नल प्रॉथरने हा गड जिंकला पण तो पुढे पुन्हा भोर संस्थानकडे सोपवल्याने एकप्रकारे तिकोन्यावरचा जरीपटका अबाधितच राहिला. या संस्थान काळातच असणारे तिकोन्याचे शेवटचे किल्लेदार शिंदे सरनाईक यांचा वाडा आजही गडाच्या दक्षिण पायथ्याशी काशिग गावात आहे. आजमितिस किल्ल्याची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment