आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्वोत्तम सेनानी

3669
छत्रपति शिवाजी महाराज

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्वोत्तम सेनानी

छत्रपती शिवाजी महाराज हे १७ व्या शतकातील जागतिक कीर्तीचे आंतरराष्ट्रीय सेनानी होते, ज्यांची तुलना जगात कोणाशीच होऊ शकत नाही, कोणाशीच नाही.

महाराजांच्या कारकिर्दीत त्यांच्यासमोर जेवढे शत्रू आले त्यांना प्रत्येकाला महाराजांनी अस्मान दाखवलं.

महाराजांच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत जेवढे शत्रू महाराजांसमोर आले त्यातील दोघेच फक्त भारतीय होते, फक्त दोघेच. बाकी सगळे परकीय, परदेशातील होते, त्यांच्या मुलखातील मानांकित सेनानी होते.

दोन भारतीय होते त्यात एक अफजलखान हा भारतीय होता, या मातीतला होता, अन दुसरे, मिर्झाराजा जयसिंग. हे दोघेच भारतीय होते.

लाल महालात ज्याची बोटे शिवरायांनी छाटली, तो अबुतालीम मिर्झा नवाब शाहिस्तेखान तुर्कस्तानचा नवाब होता. औरंग्याचा सख्खा मामा ज्याला सगळे प्रतिऔरंगजेब म्हणून ओळखायचे. ज्याने एका रात्रीत बंगाल जिंकून दिलेला असा बलाढ्य सेनानी जो लाल महालातून घाबरून गायब झाला तो परत स्वराज्याच्या वाटेला कधी आलाच नाही.

बेहलोलखान हा पठाण, हा अफगाणी पठाण होता, याला नेसरीत तुडवला होता.

तो दिलेरखान, मंगोलियन सरदार होता.

सिद्धी जौहर हा इराणचा एक मातब्बर सरदार होता ज्याला महाराजांनी पन्हाळ्यावर गुंगारा दिलेला.

उंबरीखिंडीत ज्याचा महाराजांनी सपशेल पराभव केला तो कारतालब खान उझबेकिस्तान म्हणजे आताच्या ताशकंदर चा आहे.

इंग्रजांना पाणी पाजलं, फ्रेंचांना पाणी पाजलं, पोर्तुगीज पराभूत, डच पराभूत सगळ्यांचा पराभव माझ्या राजाने केलेला.

त्यामुळे जागतिक कीर्तीचे आंतरराष्ट्रीय सेनानी ही उक्ती यावरून सिद्ध होते.

१७ व्या शतकात युरोप खंडात “लंडन गॅझेट” नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला !

सगळ्याच क्षेत्रात सर्वोत्तम असा एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

उंच डोंगरावरील दुर्गबांधणी असो, त्यात राजांनी अनेक आविष्कार घडवून आणले. राजगडावर बांधलेल्या संजीवनी आणि सुवेळा माच्या ज्या अद्भुत प्रकारे त्या काळात बांधल्या आहेत ज्याची आपण आजही कल्पना करू शकत नाही. दुहेरी तटबंदी अन चिलखती बुरुजांची रचना तर इतकी जबरदस्त आहे की बघून थक्क व्हाल.

महाराजांनी प्रत्येक गडाला एक चोरवाट ठेवली, जेणेकरून अडचणीच्या वेळी ती वाट गड उतरण्यास उपयोगी ठरेल. राजांनी देवगिरीच्या यादवांच्या साम्राज्याच्या अस्ताला कारणीभूत असणारी उणीव दूर केली. आणि याच वाघ दरवाजातून शिवरायांच्या दूरदृष्टीचा याची देही याची डोळा उपयोग करत राजाराम महाराज १६८९ साली जेव्हा झुल्फिकारखान ने रायगडाला वेढा दिला तेव्हा इथून गडउतार झाले अन जिंजीला पलायन केले व स्वराज्य वाचवले.

राजगडावरील चोर दरवाजा, रायगडावरील चोरदिंडी अन वाघ दरवाजा ही राजांच्या अगाध दूरदृष्टीची काही थक्क करणारी उदाहरणे आहेत.

शिवरायांनी अनेक किल्ले बांधले परंतु प्रत्येक गडावर, एवढ्या उंचीवर पाण्याची सोय आजही आहे. तुम्ही कधीही किल्ल्यार जा, उन्हाळा पावसाळा कधीही, तुम्हाला गडावर कायमच पाणी भेटेल. एवढा दूरचा विचार अन अद्भुत अभ्यास शिवरायांनी केलेला. राजगडाचा पद्मावती तलाव असो की रायगडाचा गंगासागर तलाव, त्यात तुम्हाला कायम पाणी भेटेल.

सिद्धी अन इंग्रजांना शह देण्यासाठी महाराजांनी समुद्रात अनेक जलदुर्गांची साखळी उभी केली जे आजही त्या समुद्राच्या लाटांचा सामना करत शिवरायांच्या शौर्याची अन दूरदृष्टीची साक्ष देत दिमाखात उभे आहेत. पद्मदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, उंदेरी, खांदेरी, कुलाबा प्रकारचे जलदुर्ग महाराजांनी उभे केले.

महाराजांनी स्वराज्या अगोदर च्या हिंदू राजांच्या पराभवाचा अभ्यास केला. राजांना ठाऊक होते की स्वराज्याला धोका हा दर्यापासून आहे, अन त्यांनी दौलतखान दर्यासारंग यांना आदेश दिला की दर्या राखला पाहिजे.

आधीच्या राज्यांत शौर्य होत, धैर्य होत पण धर्मशास्त्र आडवं यायचं म्हणून पराभव व्हायचा. शत्रू हे नेहमी दर्यातून यायचे अन हल्ला करून परत दर्यात परत जायचा. आमचं सैन्य पाठलाग करायचे पण सिंधूबंदी मुळे आम्हाला समुद्रात जायची बंदी होती, हिंदूंना समुद्र ओलांडायला परवानगी नव्हती.

शिवरायांनी ती सिंधूबंदी मोडली अन हिंदवी स्वराज्याचे आरमार उभे केले. हिंदवी आरमार उभं करणारा पहिला राजा म्हणून इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते. गुगलवर कधी Father Of Indian Navy सर्च केलं तर तुम्हाला शिवरायांचेच नाव सापडेल.

इंग्रजांच्या अन पोर्तुगीजांच्या जहाजांना शह देण्यासाठी शिवरायांनी कमी आकाराची, तोफांचे वजन अलगद पेलणारी, तोफगोळे सुटले तरी पाण्यात न डचमळणारी, पाण्यात अत्यंत जलदगतीने धावणारी संगमिरी जहाजे तयार केली.

स्वराज्यात तोफा नव्हत्या तर सुरुवातीला राजांनी लाकडाच्या तोफा तयार करवून घेतल्या, त्याला आतून जनावरांची कातडी लावून तोफगोळे लांबपर्यंत जातील अशी उपाययोजना केली. कुडाळ डिचोली भगत दारूगोळ्यांचे कारखाने काढले. स्वराज्य प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवले.

शिवरायांच्या एवढा निर्मितीक्षम राजा दुसरा कोणीही झाला नाही.

म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही, शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, हे फक्त व्यक्तित्व नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असाल त्यातील सर्वोच्चतेच परिमाण म्हणजे शिवाजी महाराज.

जर मी शेती करत असेल तर अशी शेती करून दाखवेल की अख्ख्या राज्याने म्हटलं पाहिजे, नाद नाही करायचा, हे शेतीतले शिवाजी आहेत. म्हणजे सर्वोत्तम परिमाण.

या अशा अखंड ऊर्जेचा प्रेरणास्रोत असलेल्या एकमेवाद्वितीय राजाला मानाचा मुजरा.

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here