महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खान्देशांतील मंदिरे भाग 3

By Discover Maharashtra Views: 1223 17 Min Read

खान्देशांतील मंदिरे भाग 3 –

मागील भागात आपण शिल्पशास्त्र, मंदिराचे प्रकार,  उभारणीचा संकल्प याबाबतीत थोडक्यात जाणून घेतले. खान्देशांतील मंदिरे भाग 3, या भागात मंदिर वास्तूचे प्रमुख घटक कोणते ते  जाणून  घेऊया.

मंदिराचे प्रमुख घटक –

मंदिर पुर्वाभिमुखअसावे असा प्राचीन संकेत आहे. ‘नारदीय संहितेत’ पूर्वाभिमुख, पश्चिमाभिमुख, उत्तराभिमुख, दक्षिणाभिमुख हे मंदिरे अनुक्रमे उत्तम, मध्यम, कनिष्ठ आणि त्याज्य मानले आहे. आग्नेय दिशेला मंदिराचे द्वार कधीही असू नये.साधारणत: पूर्ण विकसित  मंदिर स्थाप्त्यामध्ये मंदिराचे  गर्भगृह/गाभारा, अंतराल, मंडप, अर्धमंडप/भोजमंडप , शिखर आणि प्रदक्षिणापथ, वितान ही प्रमुख भाग असतात.

1) गर्भगृह –

मुख्य देवतेच्या प्रतिष्ठापना असलेला गर्भगृह, यावरच मुख्य शिखर बनवले जाते. बहुतेक सर्वच गर्भगृहाची रचना चौकोनी वा चौरस असते. गर्भगृह आणि शिखर मिळून बनलेल्या संरचनेला ‘विमान’ म्हणते  जाते. या विमानांचे नागर, द्रविड़ व् वेसर या व्यतिरिक्त भवनविमान(वरच्या स्तूप पर्यंत चौकोनी रचना), योगविमान(षट्कोणी रचना), गेहविमान(आयताकृती रचना दक्षिणोत्तर विस्तार), वासविमान(सोळा बाजूंची रचना), मंदिरविमान(चौकोनी रचना पूर्वपश्चिम विस्तार), द्वात्रिंशविमान (३२बाजूंची रचना), निर्गमविमान(अष्टकोण रचना) ऐसे अनेक प्रकार आहेत. एकच प्रकारच्या साहित्यातून विमानाची निर्मिति केली तर त्याला ‘संचित'(शुद्ध), दोन प्रकारच्या साहित्याला ‘असंचित'(मिश्र), तीन प्रकारच्या साहित्याला ‘उपसंचित'(संकीर्ण) आणि चार प्रकारच्या साहित्यातून निर्माण झालेले विमान ‘व्यामिश्र’ म्हणून ओळखले जाते. गर्भग़ृहा जवळच जी अन्य पवित्र स्थाने असतात त्यांना अंग आलय (म्हणजे देवलयाचे उपांग) म्हणतात. उदा.- कांचीपुरम येथील कैलासनाथ मंदिराच्या गर्भगृहेजवळ अशी सात अंग आलये आहेत. ही स्थाने परिवार

देवतेच्या मंदिराहुन वेगळी असतात. मुख्य देवतेचे मंदिर संपूर्ण मंदिर संकुलाचे वैभव असले तरी उपदेवतांची मंदिर चार कोपऱ्यात असतात. पंचायतन पूजा (शिव-विष्णु-गणपति-देवी-सूर्य पंचायतन) असली तर मुख्य देवतेचे मंदिर मध्यभागी व उरलेली चार मंदिरे त्याभोवती चार कोपऱ्यात असतात (गोंदेश्वर मंदिर-सिन्नर).

2) मंडप –

गर्भगृह आणि मुखमंडप जोडणारी चिंचोळी जागा म्हणजे अंतराळ. याला जोडून बाहेर मुखमंडप असतो यालाच अर्धमंडप,द्वारमंडप वा शुकनासी म्हणतात. मुख्यमंडपात कलगुणांचा आस्वाद घेतल्यानंतर गर्भगृहाकडे जाताना मन परत देवतेच्याप्रति एकाग्र करण्यासाठी अंतराळ बनवण्याचे प्रयोजन असावे.याला जोडून जो विशालमंडप असतो त्याला सभामंडप म्हणतात. सभामंडपाचे मुख्य दोन प्रकार असतात, पहिला प्रकार हा रंगमंडप असतो याच्या उजव्या- डाव्याकडील बाजू उघड्या असतात. दुसऱ्या प्रकारात सभामंडपाच्या सर्व बाजू बंदिस्त असतात त्याला गूढ़ मंडप असे म्हणतात. यात उजेड आणि वाऱ्यासाठी जालवातायनची सोय केलेली असते.  यालाच नृत्यमंडप, नवरंग असे सुद्धा संबोधले जाते हा अनेक स्तंभावर तोललेला असतो.

काही मंदिरात सभामंडपाला लागूनच भोजमंडप बनवलेले असतात ते मंदिराच्या एक किवा दोन्ही बाजूला उभारलेले असतात.यांचा उपयोग पूजासाहित्ये, नैवेद्य, विविध सामग्रीचा भंडार करण्यासाठी केला जातो. सभामंडपात भाविकांसाठी भजन, कीर्तन, संगीत,नृत्य, गायन आदी कलांचा आस्वाद घेता यावा त्यासाठी गर्भगृहपेक्षा मंडपाचा आकार हा मोठा असतो. सभामंडपातच आयताकृत किवा चौरस रंगमंचाची व्ययवस्था केलेली असते. या रंगमंचाच्या चारही बिंदुंवर स्तंभ उभारून त्यावर छत किवा छतविरहित नक्षीदार जोड़पट्ट्या बनवलेल्या असतात. अर्धमंडपात कासवाची प्रतिमा जमिनीवर दगड़ात  कोरलेली पाहण्यास मिळते. गर्भगृहात जाताना कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियाना आवरून,  त्यांचा संयम करून प्रवेश करावा असा या मागचा भाव आहे. सभामंडपातील स्तंभसंख्या व मंडपाचा आकार यावरून त्याना यज्ञभद्र, जयावह, पुष्पक, सिद्धियोग अशी नावे आहेत. त्यातील स्तंभांची संख्या अनुक्रमे ४०, ५०, ६४ व १९२ अशी असते. मंडपाचा आकार चौरस, चौकोनी, वर्तुळाकार, त्रिकोणी, चंद्राकार, अष्टकोणी, वा षोडषकोणी असावा. सभामंडपापुढे त्या त्या देवतेच्या नि:स्सीम भक्ताची वा वाहनाची मूर्ती असते. उदा. शिवापुढे नंदी, विष्णुपुढे गरुड़, गणेशसमोर मूषक, देवीपुढे व्याघ्र किवा सिंह इत्यादी. या मुर्तीलाच जोडून पुढे ध्वजस्तंभ वा विजयस्तंभ असतो.

3) स्तंभ-

मंदिराच्या छताला तोललेल्या संरचनेला स्तंभ म्हटले जाते. मंदिराच्या मंडपातील खाबांची रचना पांच प्रकारची असते

१) चार बाजू असलेला ‘ब्रम्हाकांत’, यालाच ‘श्रीकर’ असे ही म्हंटले जाते.
२) पांच बाजू असलेला ‘शिवकांत’, याला ‘प्रियदर्शक’ म्हणून ही उल्लेखित केले जाते.
३) सहा बाजू असलेले ‘स्कंदकांत’, याला ‘सौमुख्य’ म्हणून ही ओळखले जाते.
४) आठ बाजू असलेला ‘विष्णुकांत’, यालाच ‘चंद्रकांत’ सुद्धा म्हंटले जाते.
५) गोल वा १६ बाजू असलेला ‘रुद्रकांत’ यालाच ‘शुभंकरी’ म्हणून सुद्धा ओळखले जाते.

याशिवाय ‘चित्रस्तंभ’  नावाचाही मूर्ती कोरलेला एक वेगळा स्तंभ असतो. पुष्पखंड, चित्रखंड, पदमवल्ली, लता, कुंभ, दर्पण, मूर्ती इत्यादि अनेक शिल्पे  या स्तम्भांवर कोरली जातात. स्तंभावर काहीच कोरलेले नसेल तर त्याला ‘निराश्रय’ म्हणतात. मुख्य वा सभामंडपात ४,८,१०,१२,१६,२०,२४, ३२,४०,५०, ५२,६४,८०,१००,१९२ स्तंभ असावेत असे शिल्पशास्त्र सांगते. मात्र ही संख्या सदैव सम असावी

4) शिखर-

सुरवतीचे मंदिरे हे शिखररहित सपाट छताचे होते कालांतराने मंदिराच्या गर्भगृहावर शिखर बनवण्याचा प्रघात पड़ला. काही प्राचीन मंदिरात सभामंडप, मुखमंडप, भोजमंडप यांच्यावरही मुख्य शिखर पेक्षा कमी उंचीचे शिखर बघायला मिळतात. पण मंदिरावर शिखर उभारण्याच्या कल्पनेचा मूळ कशात आहे, याविषयी विद्वान,अभ्यासकांमध्ये  एकवाक्यता नाही. काहींच्या मते  सुरवातीची मंदिरे किवा गुहामंदिरे पर्वताच्या कटिभागात खोदलेली असत व त्यावर उंच पर्वतशिखर दिसत असे. या पर्वतशिखरांवरूनच मंदिरावर शिखरांची कल्पना सुचली असावी. दुसऱ्या काहींच्या मते रथाच्या वरच्या भागावरून तर अन्य काहींच्यामते श्रीविष्णूंच्या किरीट मुकुटावरून ही शिखर संकल्पना जन्मली असावी.   नागर शैलीतील मंदिरांच्या शिखरांचे लतिन, फांसणा, शेखरी, वल्लभी असे प्रकार बघायला मिळतात.

5) प्रदक्षिणापथ –

प्राचीन मंदिरात प्रदक्षिणापथ हा मुख्य मंदिराच्या बाहेर बनवलेला दिसतो.  मंदिरात येण्यापूर्वी भाविकांनी आधी मंदिराचे चोहोबाजूनी बाह्यदर्शन घ्यावे. बाह्यभिंतीवरील शिल्पातून प्रसारित होणारे सन्देश आत्मसात करावे आणि मग मंदिरात प्रवेश करावा हे प्रदक्षिणापथ  बनवण्याचा मूळ उद्देश्य असावा.

प्रदक्षिणा पथानुसार पण काही प्रकार मंदिरात पडतात.

  • संधार-प्रदक्षिणा पथ असलेले
  • निरंधार-प्रदक्षिणा पथ नसलेले
  • सर्वतोभद्र-या शैलीत मंदिरात जायला चारही मुख्य दिशाना प्रवेशद्वार असत त्याला घेरूनच स्तंभयुक्त प्रदक्षिणा पथ असतो. प्रदक्षिणाचेही पांच प्रकार सांगितले गेले आहे. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा ‘अंतरमंडप’ होय. गर्भगृहबाहेरील ‘अंतरहार’ त्याबाहेरील ‘मध्यान्तहार’ तटाच्या आतील ‘मर्यादाहार’ तर तटाबाहेरील ‘महामर्यादा’ प्रदक्षिणा म्हणून ओळखल्या जातात.

6)ध्वजस्तंभ –

ध्वजस्तंभ म्हणजे मंदिराचे एक अत्यंत प्रधान अंग होय. विशेषत: उत्सवाचे वेळी ध्वजाची महती असते.सभामंडपापुढे त्या त्या देवतेच्या नि:स्सीम भक्ताची वा वाहनाची मूर्ती असते. उदा. शिवापुढे नंदी, विष्णुपुढे गरुड़, गणेशसमोर मूषक, देवीपुढे व्याघ्र किवा सिंह इत्यादी. या मुर्तीलाच जोडून पुढे ध्वजस्तंभ वा विजयस्तंभ असतो.त्यावर पितळ वा तांब्याचा ध्वज असतो. ध्वजावर एक बाजूला ॐ किवा स्वस्तिक तर दुसऱ्या बाजूला वाहनाची मुद्रा असते. ध्वजसाठीचा स्तंभ प्राचीन मंदिरात पूर्णपणे धातुचा तर सध्याच्या मंदिरात बांबूचा वा लाकडेचा व त्यावर पितळ, तांबे, चांदी याचे कवच असतो.अनेक ठिकाणी त्यावर सोन्याचे पाणी ही देतात. त्याची उंची बाहेरील गोपुर आणि आतील गर्भगृहेवरील विमान यांच्या उंचीशी समन्वय साधणारी असते.

७ पेराच्या स्तंभाला ‘संभव’, श्रीमुख(९), आनंद(११), श्रीदेव(१३), दिव्यशेखर(१५), कालदण्ड(१७), महोत्कट(१९), सूर्य(२१), कमळ(२३) अशी ध्वजस्तंभांची नावे त्यांच्या पेरांच्या संख्येवरून ठरते. जेथे ध्वज लावले जाते त्या वरील  टोकाला ‘मसरूक’ म्हणतात. हां खांब चौकोनी, षट्कोणी, अष्टकोणी वा गोल असतो. स्तंभाची किमान तीन पेरे भूमीत रोवतात. केवळ उत्सवापुरते उभारण्यात येणाऱ्या ध्वजस्तंभाना ‘जयंत’ या नावाने ओळखले जातात. ‘मानसार’ या ग्रंथात ध्वजस्तंभाचे बोधिक, मुष्टिबंध, फलक, ताटिका आणि घट असे पांच भाग सांगितले आहे. ध्वजस्तंभसमोर बलिपीठ वेदी पाहण्यास मिळते. त्यावर देवतेचे पवित्र चरणकमळ असतात. उपदेवतांचा नैवेद्य याठिकाणी अर्पण केला जातो. पूर्वी यास्थळी यूपस्तंभ वा बलिस्तंभ असे. आता ध्वजस्तंभ व बलिपीठ एकत्र पाहण्यास  मिळतात. बलिपीठाचे ५० प्रकार शिल्पशास्त्रात आढळतात जसे श्रीबंध, पद्मबंध, श्रीविजय, सर्वतोभद्र, श्रीभद्र, रुद्रपीठ इत्यादी.

7) प्राकार आणि गोपुर –

संपूर्ण मंदिराभोवती उंच भिंतीचे संरक्षण असते. त्या उंच भिंतीलाच ‘प्राकार’ म्हणण्याची रूढ़ी आहे. प्राकाराला एक मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच गोपुर असते. अन तीन अन्य (तुलनेने) लहान द्वारे ही असतात. प्राकारभिंतीची उंची गर्भगृहाच्या उंचीच्या दुप्पट  किवा आठपटही असू शकते.एकात एक असे एकूण ३२ प्रकारचे प्राकार शिल्पशास्त्र ग्रंथात वर्णिले आहेत. तथापि ५ ते ७ प्राकार मार्ग उत्तम समजले जातात. गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा ‘अंतरमंडप’ होय. गर्भगृहबाहेरील ‘अंतरहार’ त्याबाहेरील ‘मध्यान्तहार’ तटाच्या आतील ‘मर्यादाहार’ तर तटाबाहेरील ‘महामर्यादा’ प्रदक्षिणा म्हणून ओळखल्या जातात. प्रत्येक प्रकारच्या मध्यभागी प्रवेशद्वार असते. वरील पांच प्रकारच्या प्रवेशद्वाराना अनुक्रमे ‘द्वारशोभा’, ‘द्वारप्रसाद’, ‘द्वारविशाल’, ‘द्वारहर्म्य’, आणि ‘द्वारगोपुर’ म्हणतात.

8) कळस-

मंदिरावरील कळस याना धातूचे आवरण असते. कळसांची विविध नावे शिल्पशास्त्रात उद्धृत केलेली आहे जसे- श्रीकर, रतिकांत, विजयकांत, केशव, विजयविशाल, विशालालय, श्रीकांत, केशवविशाल, स्वस्तिक, दिशास्वस्तिक, मर्दल, मात्रकांड, श्रीविशाल, चतुर्मुख, विप्रकान्त इत्यादी.

9) वितान –

वितान  हा शब्द मंदिराच्या छत साठी वापरला जातो. canopy या अर्थाने हा शब्द आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये येतो. प्रत्येक प्राचीन मंदिराचे वितान हा एक अभ्यासण्याचा विषय आहे. सभा मंडपात गेल्यावर मान वर करून पाहिली असता आपल्याला जो छताचा भाग दिसतो त्याला वितान म्हणतात आणि अनेक प्राचीन मंदिरांमध्ये हे प्रचंड आकर्षक असलेले आढळून येते.

अपराजितपृच्छा या ग्रंथात 4 प्रकारच्या वितानांच्या जाती सांगितल्या आहेत

  1. पद्मक
  2. नाभिछंद
  3. सभामार्ग
  4. मंदारक

त्याच बरोबर समतल, क्षिप्त, उत्क्षिप्त असे तीन प्रकार सांगितले आहेत. यातील समतल वितान हे अगदी सपाट असते. उत्क्षिप्त वितानास बाहेरून उठाव असतो, नक्षी असते.  क्षिप्त वितान हे नक्षी खोदून केलेले असते.

इतकेच काय तर या ग्रंथात कोणत्या प्रकारचे वितान कोणत्या मंदिरासाठी असावे याची सुद्धा माहिती दिली आहे. पद्मक वितान हे शंकराच्या मंदिरांना, नाभिछंद विष्णुस,  सभामार्ग हे ब्रह्मदेवाच्या मंदिरांना तर मंदारक सूर्यमंदिर बांधताना वापरावे असे सांगितले आहे. मात्र ही विताने ओळखावी कशी हे या ग्रंथात दिले नाही. कदाचित यांची नक्षी इतकी जटील आहे की ते समजावून सांगणे अवघड गेले असावे. त्यामुळे ग्रंथकार असेही सांगतो की वितानांचे चित्रे व नक्षी यांमुळे होणारे प्रकार हे शिल्पी लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत तर त्यांच्याकडून माहिती करून घ्यावेत.

प्रासादमंडन या ग्रंथात सुद्धा वितानांच्या बद्दल बरीच सखोल माहिती दिलेली आढळते.

ग्रंथाकार लिहितो, _”रंगीत चित्रांनी शोभणारे वितान मध्यभागी करावे, निरनिराळ्या प्रसंगांचे, कथांचे चित्रण तेथे करावे व निरनिराळ्या आकरांनी ते सुशोभित करावे. वितानांचे शुद्ध, संघाट असे एकूण 1,113 प्रकार पडतात.

मंदिराच्या अंतरंगातील वितान हा विषयच इतका मोठा आहे की इंदिरा गांधी नॅशनलसेंटर फॉर आर्टस् ने यावर “The Ceilings of Indian Temples” या नावाने एक पुस्तक प्रकाशित केले आहे.

वितानांची ही  परंपरा आपल्याला प्रत्येक प्राचीन वास्तु मध्ये दिसते. अजिंठा, हंपी येथील छतावरील चित्रे असोत किंवा गुजरात, कर्नाटक मधील मंदिरांमधील अतिशय सुंदर विताने असोत. मंदिरांच्या अंतरंगातील प्रत्येक घटकांवर आपल्याकडे प्रचंड बारकाईने अभ्यास केलेला आढळून येतो.

10) देवमूर्तिची पीठिका –

गाभाऱ्यात देवमूर्ति जय ओट्यावर स्थापित करतात त्याला पीठिका म्हणतात. शास्त्रानुसार पीठिकेचे १६ भाग करावे. एक भाग जमिनीत पुरावा. चार भागाची जगती करावी. तीन भागांची गळपट्टी, दोन भागांची त्यावरची रुंदपट्टी व दोन भगत सर्वात वर्ची पट्टी करावी. अभिषेकसचे पाणी वाहन नेण्यासाठी पन्हाळी कोरावी. पीठिका फार उंच किवा फार ठेंगणी नसावी. गाभाऱ्याच्या दरवाजाच्या उंचीच्या  तीन-अष्टमांश पीठिका असणे हे आदर्श परिमाण समजले जाते.

11) प्रतिमा –

संपूर्ण देवालयाची संरचना इष्ट देवतेच्या प्रतिष्ठापनेसाठी असते. देहात आत्मा त्यप्रमाणे मंदिरात मूर्ती, आत्म्यामुळे देहाला अर्थ प्राप्त होतो त्याचप्रमाणे मंदिराला माहात्म्य प्राप्त होते ते केवल इष्टदेवतेमुळे. भारतीय मूर्तिशास्त्र हे अतिप्राचीन शास्त्र आहे. मूर्ती म्हणजे वस्तुत: शास्त्र आणि कला यांचा सुंदर संगम आहे. मूर्तीचा निर्देश ऋग्वेदात आलेला आहे. साधारणत: देवलयात स्थापित करण्यात येणारे विग्रह हे सोने, रुपे, तांबे, पंचधातु, पाषाण किवा लाकूड यांच्या पासून बनलेले असतात. मंदिरातील मूर्तींचे ‘चल’, ‘अचल’ आणि ‘चलाचल’ ऐसे प्रकार पडतात. अचल मूर्ती हे कायमस्वरूपी स्थापित केलेली असते. जी विशेष पाषणाची बनवलेली असते. चल मूर्ती ह्या काही प्रमुख मंदिरात अचल मूर्ती बरोबरच समोर स्थापित असते जी उत्सव काळात रथ-पालखी मध्ये मिरवली जाते. चलाचल मुर्तीचे उत्तम उदाहरण म्हणजे पूरी येथील जगन्नाथ ची मूर्ती कारण प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्तीच दरवर्षी आषाढ़ महिन्यात भव्य रथोत्सवात मिरवली जाते. ‘अगस्त्य संहितेत’ प्रतिमेचे ‘चित्र'(पूर्णकृती), ‘चित्रार्ध’ (शिर ते छाती) व ‘चित्राभास’ (फ़क्त चित्र)असे तीन प्रकार सांगितले आहे.

मूर्ती घडवण्यासाठी पुढील तीन आसन प्रमुख मानले गेले आहे १) स्थानक (उभी), २) आसन (बसलेली), व ३) शयन (पहुडलेली). मूर्ती घडवताना चिन्हवसन (वस्त्र) आणि आभरण (अलंकार) यांचाही विचार करावा लागतो. देवतांच्या प्रतिमा घडवताना ‘ताल’, ‘मान’, मुद्रा या शास्त्रोक्त संज्ञा पाळाव्या लागतात. येथे मुद्रा मुखाशी नव्हे तर हाताशी (पंजे व बोटे) निगडित आहे, जैसे अभयमुद्रा(संरक्षण), वरदमुद्रा(वरदान), पद्मासन(कमलासन), योगासन(ध्यानमुद्रा)  यांना विशेष महत्व आहे. मूर्तीच्या उंचीला ‘मान’ म्हणतात. रुंदी(प्रमाण), परिघ(परिमाण), जाडी(उन्मान), दोन बाहू मधील अंतर(उपमान), मूर्तीची प्रकटमात्रा(लंबमान) इत्यादी परिमाणे मूर्तिशास्त्रात निश्चित केलेली आहे. हाताच्या मध्यमेपासून(मधले बोट) ते मनगट यांची उंची, रुंदी ‘ताल’ मध्ये केला जातो. मान मध्ये मूर्तीच्या मुखाच्या नऊपट देहाची उंची असावी असा शास्त्रसंकेत आहे. पण प्रत्येक स्थळी या नियमांचे पालन केले जाते असे नाही. मूर्ती घडवण्याचे स्वातंत्र्य शिल्पकाराला आहे.प्रतिमा वा विग्रह (देवता मूर्ती) तसेच गाभारा आणि मूर्ती यांच्या उंचीचे प्रमाण ही शास्त्रात दिलेले आहे गाभाऱ्याच्या दरवाजाच्या दोन-अष्टमांश प्रतिमेची उंची असावी. मुख्य देवतेच्या मागे-पुढे तिच्या परिवारदेवतांच्या मूर्ति असाव्यात. देवताच्या सर्व आयुधे तिच्या हातात असावी. तिची खास लक्षणे तिच्या अंगी असावी. ती अतिपृष्ट किवा अतिकृश असू नये. तिचे सर्व अवयव शास्त्रात  सांगितल्याप्रमाणे असावे.

पूजेसाठी उत्सवमूर्ती उपयोगात आणतात, याचेही पाषाण, लाकूड, धातू, माती, चित्ररूप,वाळू, मनोमय, रत्नमय असे आठ प्रकार भागवत सांगते. सामान्यत: धातूची(तांबे,पितळ) मूर्ती पूजेसाठी वा उत्सवेसाठी प्रस्थापित करतात. मुख्य मूर्ती पाषणाची असते. पाषाणाचेही तीन प्रकार असतात-पुरुष, स्त्री व नपुंसक. जय दगडांच्या घर्षणातून अग्निकण येतात तो पुरुष पाषाण होय. अंगभूत विविध रंगाच्या छटा असणारा आणि नाद निर्माण करणारा पाषाण स्त्री जातीचा, तर अत्यंत टणक व जरा ही नाद नसणारा हा नपुंसक जातीचा होय. पुरुष पाषणापासून मुख्य देवतेची, स्त्री पाषणापासून देवीची आणि अधिष्ठानाची, पायाभूत आधारशीलेसाठी नपुंसक पाषाणाचा उपयोग करावा असे ‘पुरुषोत्तम संहिता’ सांगते.

पाषाणमूर्तीच्या आधी लाकडाच्या मूर्ती घडवल्या जात असत. त्यासाठी चंदन,अशोक,देवधर, बिल्व,शाल, कदंब,चंपक, बकुळ,औदुंबर,अर्जुन आणि शाल्मली या वृक्षांच्या लाकडाचा विशेष उपयोग केला जात असे. अशा झाडांपासून मूर्ती बनवण्या आधी पुजारीने त्याची आधी क्षमा मागावी नंतरच वृक्ष तोडला जावा असे ‘विश्वक्सेन संहिता’ सांगते. काही ठिकाणी सोने,चांदी, पीतळ, तांबे,शिसे या पांचधातूची मूर्ती घडवली जाते. सत्व-रज-तम या त्रिगुणांना अनुसरणही मूर्ती घडवल्या जातात. मूर्तीच्या वरद,अभय मुद्रा सात्विक गुण दर्शवतात. रजोगुणाच्या मूर्ती या पराक्रम वा वाहनारूढ़ अश्या आवेशपूर्ण असतात. क्रोधित मूर्ती (नृसिंह , महिषासुरमर्दिनी, कालियामर्दन कंसवध) या तमोगुणी असतात. विष्णूचे वासुदेव वा लक्ष्मीनारायण रूप, शिवाचे सदाशिव रूप, गणेश, दक्षिणामूर्ति इत्यादी रुपे सत्वयुक्त आहेत. विष्णूची त्रिविक्रम,जनार्दन,केशव ही रुपे; शिवाची नटराज विषहर रुपे: नृत्य करणारा गणेश हे राजस रुपे आहेत.नृसिंह , महिषासुरमर्दिनी, कालियामर्दन, कंसवध, वीरभद्र  या तमोगुणाची प्रतिमा आहे.

निर्गुण परब्रम्हाची ही सर्व सगुण प्रतिके आहेत. पण ध्यान आणि एकाग्रतेसाठी भक्तांना अपरिहार्य आहेत ‘आलंबनस्य प्राधान्येन ध्यानं प्रतीकोपास्ते:’ म्हणूनच विष्णूचे प्रतिक शाळीग्राम, देवीचे प्रतिक धातूखंड, शिवाचे प्रतिक स्फटिक, गणेशाचे प्रतीक लालखण्ड यांची सर्वमान्यता सगळीकडे आहे.मूर्तिशास्त्राचा विचार करता शिवाचे नटराज रूप आहे, तसेच बहुसंख्य स्थळी लिंगरूप आहे. लिंग म्हणजे चिन्ह. सर्व सृष्टीतील सर्व चिन्हे, प्रतीके लिंगरूपच आहे. लिंग याचा अर्थ लय वा प्रलय असाही आहे. शंकर प्रलयाचा स्वामी आहे. हे लक्षात घेता लिंग प्रतीकात्मक कसे ते सहज ध्यानात येते. शिवाची तीन रुपे आधिभौतिक(नटराज आदि-व्यक्त), आधिदैविक(लिंग-व्यक्ताव्यक्त) आणि आध्यात्मिक(सदाशिव वा परब्रम्ह) अशी आहेत. शिवलिंगाचे प्राधान्याने (शिरोवर्तन वा शिर ध्यानात घेता) पांच प्रकार आहेत ते असे-त्रपुष, छत्र-आकार, अर्धचंद्र, कुक्कुटाण्ड आणि बुदबुद. शिवाच्या प्रत्यक्ष मूर्तीत नटराज व अर्धनारीश्वर या प्रतिमा अत्यंत लोकप्रिय आहेत. याशिवाय हरिहर, कल्याणसुंदर, भिक्षाटन करणाऱ्या प्रतिमा ही भक्तांत लोकप्रिय आहेतच.विष्णूची प्रतिमा सामान्यत: चतुर्भुज-गदा,शंक चक्र, पद्मधारी असते,  याच चार गोष्टींचा हातात धरण्याच्या क्रमानुसार भागवत मध्ये २४ रुपे दिले आहे, जे बऱ्याच प्राचीन मंदिरांच्या गर्भगृहात किवा बाह्य भिंतीवर उकेरलेली असतात.

याशिवाय मंदिर वास्तुतील रचनेत तळापासून शिखरपर्यंत इतर भागाना वेगवेगळे नाव असून त्यांचे असे वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्व आहे कलश,गोपुरम, रथ,उरुशृंग, अर्धमंडप, जगति, स्तंभ, शुकनास, तोरण, , गवाक्ष, आमलक, अधिष्ठान, मंडोवर भागांचा समावेश होतो. उदा म्हणून मंडोवर म्हणजे मंदिराची तलापासून शिखरापर्यंत बाह्यभिंत. या मंडोवर सुद्धा सुद्धा १८ विविध रचना असतात. मुख्य गर्भगृह यावर सर्वात उंच शिखर असते. काही ठिकाणी मुख्य मंडप, अंतराल, आणि अर्धमंडपांवर छोटी उपशिखरे ही बघायला मिळतात.

पुढील भागात मंदिरांच्या शैली बद्दल जाणून घेऊया. वितान विषय सपरवानगी आणि साभार -पेशवे पेज.

धन्यवाद
टीम एक्सप्लोर खान्देश (Team Explore Khandesh)
आम्हना वारसा,आम्हना अभिमान

Leave a comment