टाहाकारीची भवानी

टाहाकारीची भवानी | जगदंबामाता मंदिर, टाहाकारी, अकोले

टाहाकारीची भवानी.

नगर जिल्ह्यातला अकोले हा तालुका अगदी निसर्गसमृद्ध आहे. हरिश्चंद्रगड, कलाड, कुंजर, आड, औंढा, पट्टा, बितिंगा, रतनगड, अलंगमदनकुलंग हे एकापेक्षा एक दिग्गज असे किल्ले, कळसूबाई सारखे महाराष्ट्रातले सर्वोच्च शिखर, भंडारदरा धरण, घनदाट झाडी, घाटमाथ्याला अगदी लागून असल्यामुळे भरपूर पाउस आणि विविध सुंदर मंदिरे यांनी खरंच हा सगळा अकोले प्रदेश नटलेला आहे. रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर असो की अकोले गावामधले सिद्धेश्वर मंदिर असो. ही शिल्पजडित मंदिरे अत्यंत देखणी आहेत आणि त्यावरील पाषाणात केलेई कलाकुसर मुद्दाम पाहण्याजोगी आहे. याच देखण्या मंदिरांच्या पंक्तीमध्ये येते ते टाहाकारी इथले श्रीभवानी किंवा जगदंबा मंदिर. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेंव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी ‘टाहो’ फोडला. तिने जिथे टाहो केला किंवा टाहो फोडला ते ठिकाण ‘टाहोकारी’ अर्थात ‘टाहाकारी’ म्हणून प्रसिद्धीला आले अशी या नावामागची कथा सांगितली जाते.(टाहाकारीची भवानी)

अकोल्याच्या वायव्येला १६ कि.मी. अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे, शिल्पजडित यादवकालीन मंदिर आढळा किंवा आरदळा नदीच्या काठावर वसलेले आहे. तीन गाभारे असलेले हे काहीसे निराळे मंदिर आहे. तीनही गाभाऱ्यांना एक सामायिक सभामंडप आहे. मुख्य गाभाऱ्यात वाघावर आरूढ झालेल्या अठरा हाताच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. याच मूर्तीच्या पुढे देवीचा एक तांदळा असून त्यावर चांदीचा मुखवटा दिसतो. मुख्य गाभाऱ्याला असलेली दरवाज्याची चौकट (द्वारशाखा) अत्यंत देखणी आहे. इथे गणेशपट्टीवर देवीची मूर्ती कोरलेली दिसते. मंदिराच्या उर्वरित दोन गाभारयांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात. अंतराळावर असलेल्या छताला मध्यभागातून खाली लोंबणारे एक अप्रतिम दगडी झुंबर कोरलेले आहे. मंदिराचा सभामंडप अनेक खांबांनी नटलेला आहे. या सभागृहातसुद्धा छताला एक सुंदर दगडी झुंबर दिसते. या झुंबराला आठ पुतलिकांनी म्हणजेच स्त्रियांनी तोलून धरलेले दाखवले आहे. इतके सुंदर झुंबर आणि त्या पुतलिका फारशा पाहायला मिळत नाहीत. ते शिल्पांकन इथे टाहाकारीच्या भवानी मंदिरात आवर्जून पाहावे असे आहे.

मुख्य गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस तीन कोनाडे (देवकोष्ठे) आहेत. एका देवकोष्ठातील चामुंडेचे शिल्प खूपच प्रमाणबद्ध असे आहे. तर दुसऱ्या एका देवकोष्ठात शिव-पार्वतीची आलिंगनमूर्ती बघायला मिळते. मंदिराचे स्थापत्य फारच देखणे आहे. मुखमंडपात (पोर्चमध्ये) बसण्यासाठी कक्षासने केलेली आहेत. या कक्षासनांच्या बाहेरच्या बाजूने नर्तिका, वादक आणि विविध मिथुन शिल्पे कोरलेली आहेत. काही ठिकाणी विष्णू, वामन यांची शिल्पेही पाहायला मिळतात. देवतेला अभिषेक केल्यावर ते पाणी बाहेर वाहून जाण्यासाठी मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुरेख कलाकुसर केलेले मकरमुख बघायला मिळते. मगर हे गंगेचे वाहन समजले गेलेले आहे. त्यामुळे मगरीच्या मुखातून बाहेर येणारे पाणी म्हणजे प्रत्यक्ष ‘गंगा’च समजली जाते. कोकणातील संगमेश्वर इथे असलेल्या कर्णेश्वर मंदिरात सुद्धा असेच एक सुंदर मकरमुख बघायला मिळते.

टाहाकारी मंदिराच्या बाह्यभिंतीवर गणपती, भैरव, ब्रह्मदेव यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्याशिवाय इथ विविध अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. या अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असे म्हणतात त्यांचे मोठ्या प्रमाणावर अंकन इथे केलेले आहे. यामध्ये पत्रलेखिका, लहान मुलाला खेळवणारी ‘पुत्रवल्लभा’, केतकीभरणा, झाडाच्या फांदीला धरून उभी असलेली ‘डालमालिका’, केसातील पाणी झटकणारी कर्पूरमंजरी, बासरी वाजवणारी, नृत्य करणारी, कानात आभूषणे घालणारी अशा एकापेक्षा एक सुंदर आणि सुडौल सुरसुंदरींची शिल्पे इथे या एकाच मंदिरावर पाहायला मिळतात. एका अप्सरेच्या वस्त्राशी माकड खेळते आहे असेही शिल्प इथे दिसते. तर एकीच्या मांडीवर विंचू चढलेला दिसतो. या सगळ्या सुरसुंदरी या मानवी मनाच्या, मानवाच्या मनातील विविध भावनांच्या प्रातिनिधिक मूर्ती असतात. काही सुरसुंदरींच्या डोक्यावर छत्र दिसते तर एका सुंदरीच्या अंगामध्ये युरोपियन पद्धतीचा कोट घातलेला अगदी स्पष्टपणे दाखवलेला आहे. अत्यंत विलोभनीय अशा या सगळ्या प्रतिमा आहेत.

श्री भवानी मंदिराकडून नदीवर जायला पायऱ्या केलेल्या आहेत. त्या उतरून जात असताना वाटेत काही भग्न मूर्ती आढळतात. अजून खाली उतरून गेले की एक पडकं देऊळ आहे. आतमध्ये शेषशायी विष्णूची एक प्रतिमा ठेवलेली असून त्याच्या मंडपातील एका खांबावर संस्कृत शिलालेख दिसतो. त्या शिलालेखात शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. या मंदिराचे शिखर विटांचे केलेले आहे. ते आतल्या बाजूने फारच आकर्षक दिसते.

टाहाकारी इथे चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते. तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे मोठा उत्सव केला जातो, ज्यात वीणा भजन हा एक निराळा कार्यक्रम केला जातो. पर्यटक, श्रद्धाळू आणि मंदिर अभ्यासक या सर्वांसाठी पर्वणी असलेले अकोले तालुक्यातील टाहाकारी इथले हे शिल्पसमृद्ध मंदिर पुण्या-मुंबईहून एका दिवसात पाहून होते. हा सगळाच परिसर सुंदर आहे. गड-किल्ले पाहणारांसाठी इथे जवळच पट्टा किल्ला आहे. छत्रपती शिवरायांचा या किल्ल्यावर जवळजवळ महिनाभर मुक्काम होता. इथे आल्यावर या परिसरामध्ये मिळणारे फिके गोड अस्सल खव्याचे पेढे मुद्दाम खाल्ले पाहिजेत. अशी चव सहसा दुसरीकडे मिळत नाही. एकूणच टाहाकारीची भेट सर्वार्थाने समृद्ध होते.

आशुतोष बापट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here