श्री नृसिंह मंदिर, धोम, ता.वाई

By Discover Maharashtra Views: 2256 5 Min Read

श्री नृसिंह मंदिर, धोम, ता.वाई, जि.सातारा –

देशभरात मंदिरांचे शहर म्हणून वाईची ओळख आहे.कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या वाईला दक्षिण काशी म्हणूनही ओळखले जाते.याच दक्षिण काशी पासून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या धोम गावात श्री नृसिंह मंदिर आणि महादेव मंदिर आहे.वाई आणि आजूबाजूच्या या प्रदेशाला महाभारतामध्ये फार महत्त्व होते असे सांगतात. विराट राजाची विराट नगरी म्हणून वाई आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये अनेक वेगवेगळ्या आख्यायिका प्रसिद्ध आहेत. वाळकी(कमंडलू) आणि कृष्णा या दोन नद्यांचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या संगमावर हे धोम गाव धोम धरणाच्या भिंती खालील बाजूस वसलेले आहे.

धौम्य ऋषींचे वास्तव्य या भागात होते म्हणून या गावाला धोम हे नाव पडले आहे.याच धोम गावामध्ये कृष्णा नदीकाठावर श्री सिद्धेश्वर महादेवाचे सुंदर मंदिर आहे. मुळातच बंदिस्त आवार लाभलेले हे मंदिर खरे तसे पाहायला गेले तर शिवपंचायतन आहे. निसर्गरम्य आणि शांत परिसरात वसलेल्या या शिवपंचायतनामध्ये प्रदक्षिणा मार्गावर सूर्य, गणपती, महालक्ष्मी आणि विष्णू या देवतांची छोटी छोटी सुंदर रेखीव मंदिरे उभारली आहेत.मंदिरात शिवलिंग सोबत पार्वतीची मुर्ती आहे.महादेव मंदिरामध्ये जाताना पायर्यान खाली धौम्य ऋषींची समाधी आहे.

मंदिराच्या पाठिमागे नागदेवता आहे.एकसंध पाषाणामध्ये उभारलेले हे मंदिर पाहत असतानाच आपली नजर पडते ती समोर असलेल्या पुष्करणीवर.पाषाणात कोरलेली सुबक आणि रेखीव पुष्करणी अक्षरशः अवाक करते.कमळाच्या आकारात ताशिव दगडामध्ये हि पुष्करणी बनवलेली आहे. त्यामध्ये बरोबर मध्यभागी दगडी कासवाची निर्मिती करून त्या कूर्माच्या (कासवाच्या) पाठीवर नंदी बसलेला आहे. ऊन आणि पावसापासून संरक्षण होण्यासाठी नंदीच्या डोक्यावर एक सुंदर नंदी मंडप उभारलेला आहे. या नंदी मंडपाचे वैशिष्ट म्हणजे जेव्हा या पुष्करणीमध्ये पाणी सोडले जाते तेव्हा आपल्या पाठीवर नंदी घेऊन कासव पाण्यावर तरंगत आहे की काय असा भास आपल्याला होतो.

इतकी सुबकरीत्या ही कल्पना येथे कारागीराने मांडलेली आहे असे आपल्या लक्षात येते. परंतु आता या पुष्करणी मध्ये पाणी सोडले जात नाही. पुष्करणीच्याच बाजूला उजव्या हाताला एका उंच अष्टकोनी जोत्यामध्ये साधारण आठ ते दहा फुट उंचीवर श्री नरहर – नृसिंह मंदिर उभारलेले आहे. मंदिरात वर जायला पायऱ्या आहेत. पायर्या चढून वर गेल्यावर पूर्व आणि पश्चिम अशा विरुद्ध दिशांना नरसिंहाच्या दोन स्थापन केलेल्या सुंदर आणि रेखीव मूर्ती बघायला मिळतात. त्यापैकी पूर्वेकडे जी मूर्ती आहे ती मूर्ती हिरण्यकश्यपू याचा वध करणारी मूर्ती असून पश्चिमेकडे असलेली मूर्ती ही नरसिंह मूर्ती असून त्या मूर्तीच्या मांडीवर साक्षात श्री लक्ष्मी बसलेली आहे. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे, नृसिंहाचे दोन्ही हात हे गुडघ्यावर टेकलेले आहेत. वरच्या उजव्या हातामध्ये कमळ असून वरच्या डाव्या हातामध्ये शंख धारण केलेला आपल्याला दिसतो.

वटारलेले डोळे, गर्जनेसाठी उघडलेले विशाल मुख, त्यातून दिसणारे वरच्या आणि खालच्या जबडय़ातील आठ-आठ दात तसेच दातांमधून बाहेर आलेली जीभ यामुळे संपूर्ण मूर्ती आणि तिचे भाव अक्षरशः जिवंत वाटतात.या नृसिंह मंदिरामध्ये आपल्याला प्रल्हादाचीदेखील मूर्ती आढळून येते. नृसिंह जयंतीचा उत्सव मोठय़ा प्रमाणात येथे केला जातो. वैशाख शुद्ध दशमीला मोठय़ा थाटात येथे उत्सव साजरा केला जातो. या उत्सवाचा रथदेखील आपल्याला मंदिराच्या इथे पाहायला मिळतो.वाई पंचक्रोशीमध्ये हे मंदिर फार जागृत आहे असे मानले जाते.

मंदिर परिसरामध्ये उत्तरेकडील प्रवेशद्वाराजवळ श्री गणपतीचे मंदिर असून त्याच्या समोर एका संगमरवरी शिलास्तंभावर एक सुंदर पंचमुखी शिवलिंग आपले लक्ष वेधून घेते. चार दिशांना चार मुखे आपल्याला दिसतात. त्यातील एक मुख हे वरच्या बाजूस आहे. या मुखांची नावे पुराणानुसार तत्पुरुष, वामदेव, अघोर, सद्योजात आणि ईशान अशी आहेत. ही सगळी पंचमुखं शंकराची विविध रूपे आहेत. अशी ही सुंदर मूर्ती फार देखणी आहे. मंदिराच्या सभोवताली पेशवे कालीन तटबंदी आहे तसेच भले मोठे प्रवेशद्वार आहे.बाहेरून बघितल्यास एखादी घडी असल्यासारखा भास होतो. प्रवेशव्दारावर कमळपुष्प, गणपती, किर्ती मुख कोरलेले आहेत.मंदिरात इतर देवतांच्या लहान-मोठ्या मुर्त्या बघायला मिळतात तसेच एक विरगळ सुद्धा आहे.

मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्याकडे मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यालयाच्या पाठिमागे (under ground) एक पाण्याची विहीर आहे.विहीरीत जाण्यासाठी दगडी जिना आहे.त्याच बाजूच्या दरवाजातून घाटावर जाता येते.धोम हे तिर्थक्षेत्र असल्यामुळे घाटावर अस्थी विसर्जन केले जाते.घाटावरील गोमुखातून येणार्या पाण्याखाली कृष्णास्नान केले जाते. परंतु शासनाने कृष्णा नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्या मुळे पुर्ण नदी पात्र लहान झाडांनी भरलेले आहे.अस्थी विसर्जनातील साहित्यमुळे पुर्ण घाटावर कचरा साठून दुषित झालेला आहे.

ग्रामपंचायत,स्थानिक लोकप्रतिनिधी, पुरातत्व विभाग,शासनाने मंदिर व परिसरातील स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा.अन्यता काही वर्षांत पुर्ण कचर्याचे साम्राज्य मंदिराभोवती असेल.महाबळेश्वर, पांचगणी येथे फिरायला अनेक पर्यटक वाईतूनच जातात.काहीजण वाईचा महागणपती,मेनवलीचा घाट आणि नाना फडणवीस वाडा बघायला येतात.त्याच बरोबर तिथून पुढे ६-७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरात आवर्जून भेट द्या ‌.

माहिती संकलन :- श्री नृसिंह सिध्देश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ,धोम. शैलेश ज्ञानदेव तुपे

Leave a comment