महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,677

श्री शहाजी छत्रपती म्युझियम, नवीन राजवाडा

By Discover Maharashtra Views: 3645 4 Min Read

श्री शहाजी छत्रपती म्युझियम, नवीन राजवाडा.

संस्थानांचे विलीनीकरण झाल्यानंतर भारतातील इतर राजेरजवाड्यांनी आपल्या राजवाड्यांमध्ये हॉटेल्स सुरु केली. साधारणतः १९७० च्या सुमारास अशी योजना छत्रपतिंपुढेही मांडण्यात आली पण  छत्रपतींच्या राजवाड्यात हॉटेल सुरु करण्याची कल्पनाही शहाजी महाराजांना सहन झाली नाही. राजवाड्याची काहीतरी चांगली व्यवस्था करण्याचा विचार महाराजांच्या मनात वारंवार घोळत होता. शिवाय आपल्याकडे असणाऱ्या मौल्यवान ऐतिहासिक दुर्मिळ वस्तू पडून राहण्यापेक्षा लोकांना पाहण्यासाठी ठेवाव्यात जेणेकरुन छत्रपतींचा इतिहास, त्यांचे वैभव व त्यांची आठवण जनतेमध्ये सदैव राहील, हाही एक विचार महाराजांच्या मनात होता.(श्री शहाजी छत्रपती म्युझियम, नवीन राजवाडा)

या सर्वांतून पूर्ण विचारांती महाराजांनी १९७१ साली “श्री शहाजी छत्रपती म्युझियम ट्रस्ट”ची स्थापना करुन नवीन राजवाड्याचा बराचसा भाग म्युझियममध्ये रुपांतरीत करण्याचा निर्धार केला. नंतर काही इमारती, शेअर्स व गुंतवणुकी वगैरे देऊन ट्रस्टच्या दैनंदिन खर्चाची तरतूदही केली. त्याचबरोबर छत्रपतींच्या संग्रही असलेल्या मौल्यवान ऐतिहासिक वस्तू, राजचिन्हे, दागिने, चांदीची अंबारी व हौदा, जुनी शस्त्रास्त्रे, पेंटींग्ज अशा कोट्यवधी रुपये किंमतीच्या वस्तू म्युझियममध्ये ठेवण्यासाठी देणगीस्वरुपात दिल्या. म्युझियमची मांडणी स्वतः महाराजांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे.

महाराज दररोज दोन-तीन तास म्युझियममध्ये खर्च करु लागले. म्युझियममध्ये असणारी चांदीची अंबारी बसलेल्या हत्तीवर ठेवण्याची कल्पना महाराजांचीच होती. शस्त्रास्त्र विभाग व शिकार दालनाच्या मांडणीमध्ये महाराजांनी विशेष लक्ष घातले होते. शस्त्रास्त्र दालनात लावण्यात आलेल्या तलवारी, बंदूकांचे डिझाईन स्वतः महाराजांनी केले होते. राजवाड्याचे कोणतेही आर्किटेक्चर न तोडता आहे त्या जागेचाच उपयोग झाला पाहिजे हा महाराजांचा आग्रह होता. त्यानुसार विना तोडफोड वस्तूंचे योग्यप्रकारे प्रदर्शन करण्यासाठी स्वतः महाराजांनी अनेक तज्ञांचा सल्ला घेतला. आपल्या व आपल्या सहकाऱ्यांच्या कल्पकतेचा पूर्ण कस लावून हे ऐतिहासिक म्युझियम इतर म्युझियम्सपेक्षा वेगळे असावे या हेतूने महाराज रात्रंदिवस त्याचा विचार करायचे व त्यात ते पूर्ण यशस्वी झाले.

छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून १९७४ साली म्युझियमचे उद्’घाटन करण्यात आले.

या म्युझियममध्ये राजघराण्यातील मेणा, चांदीची अंबारी, चांदीचा हौदा, हत्ती व घोड्यांचे दागिणे, वैशिष्टपूर्ण फर्निचर, छत्रपती घराण्याचा वंशपरंपरागत पाळणा, शाहू महाराजांच्या वापरातील वस्तू, राजघराण्यांच्या वंशावळी, छत्रपतींच्या जीवनावरील मौल्यवान ऐतिहासिक पेंटींग्ज, सोन्याच्या बंदुका, प्रिन्स अॉफ वेल्सची तलवार, वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रास्त्रे, साठमारीची हत्यारे, कलाकुसरीच्या वस्तू असे अनेक मौल्यवान वस्तू जनतेला पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.

राजवाड्याच्या मध्यभागी असणारा दरबार हॉल छत्रपतींच्या वैभवाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. दरबार हॉलच्या काचांवर छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र चित्ररुपांत रेखाटले आहे. दरबार हॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक पर्यटक अवाक् होतो.

म्युझियममधील सर्वात प्रेक्षणीय विभाग म्हणजे शिकार दालन ! छत्रपतींनी शिकार केलेले वेगवेगळे पशू पेंढा भरुन या दालनामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. सिंह, वाघ, गेंडा, अस्वल, काळा चित्ता, तरस हरीण अशा प्राण्यांच्या शरीरात पेंढा भरुन ते योग्यरित्या जतन करण्यात आले आहेत. याशिवाय, गवारेडा, वाघ, सिंह आशा प्राण्यांची शिल्डवर लावलेली डोकीसुद्धा पाहणाऱ्याला शिकाऱ्याचा “फील” देतात. पेंढा भरुन ठेवलेल्या प्राण्यांचे जतन करण्यासाठी काचेची कपाटे बनवून त्यामध्ये नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यात आले आहे त्यामुळे ते पशू सजीव वाटतात.

या म्युझियमची उभारणी करुन महाराजांनी खूप मोठे कार्य केले आहे. देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचे नवीन राजवाडा व म्युझियम प्रमुख आकर्षण आहे. महाराष्ट्रातून शालेय सहली राजवाड्यास व म्युझियमला भेट देत असतात. त्यामुळे मुलांना छत्रपतींच्या घराण्याचे व इतिहासाचे ज्ञान आपोआपच होते. या म्युझियमला कित्येक मान्यवरांनी भेट देऊन प्रशंसा केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या फिल्म डिव्हीजनने या म्युझियमची व राजवाड्याची डॉक्युमेंटरी तयार केली आहे. हे नाविन्यपूर्ण वस्तूंचे प्रेक्षणीय म्युझियम म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांचे चिरंतन स्मारकच होय.

Credit – KolhapurState

छायाचित्र – नवीन राजवाड्यातील शहाजी छत्रपती म्युझियमचे प्रवेशद्वार

Leave a comment