शिवनेरी किल्ला | Shivneri Fort

शिवनेरी किल्ला | Shivneri Fort

शिवनेरी किल्ला | Shivneri Fort

पुणे शहराच्या उत्तरेला जुन्नर तालुक्यामध्ये असणाऱ्या शिवनेरी किल्ला (Shivneri Fort) मराठी मनात रायगडाप्रमाणेच मानाचे स्थान आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांच्या जन्माच्या पुर्वीपासुन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर असलेला हा किल्ला शकांच्या राजधानीचे ठिकाण होता. त्यावेळी नाणेघाटमार्गे खुप मोठ्या प्रमाणात व्यापार चालत असल्याने या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता त्या काळच्या राज्यकर्त्यांनी या मार्गावर दुर्गांची निर्मिती केली. त्यात शिवनेरी देखील निर्माण करण्यात आला. शकांनंतर सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटीं या किल्ल्याने पहिल्या.

जुन्नर ही नाणेघाट मार्गावरील मोठी बाजारपेठ असल्यामुळे या किल्ल्यास विशेष महत्व होते. पुढे यादवांच्या काळात शिवनेरीस भव्य गडाचे स्वरूप प्राप्त झाले. खाली डोंगराच्या पोटात लेणी व वर किल्ला अशी याची रचना असुन सातवाहन काळापासुन असलेल्या या गडाच्या परिसरांत दुसऱ्या शतकांतील सुमारे ५० बौद्धलेणी आहेत. यात ७८ विहार आणि ३ चैत्यगृह असुन पाण्याची जवळपास ६० कुंडे आहेत. यातील ३ लेणी अपुर्ण असुन काही लेणी २ हजार वर्षापासुनची असल्याचे तेथे कोरलेल्या ९ शिलालेखांवरून लक्षात येते.

शिवनेरी किल्ला पुण्यापासून १०३ किमी अंतरावर तर जुन्नर गावापासुन ४ किमी अंतरावर आहे. जुन्नर शहरात शिरल्यावर समोरच हा किल्ला नजरेस पडतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासुन ३२०० फुट तर पायथ्यापासुन साधारण ९०० फुट असुन गड दक्षिणोत्तर दीड किमी पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती असुन उत्तरेकडे निमुळता होत जाणारा आहे. शिवनेरी फार उंच नसला तरी त्याला सर्व बाजुने १०० ते १२५ फुट उंचीचे कातळकड्यांचे नैसर्गिक संरक्षण लाभल्याने काही ठिकाणीच तटबंदी बांधलेली नजरेस पडते. गडाच्या पोटात असणाऱ्या अनेक लेण्यामुळे हा किल्ला लांबुनही सहज ओळखु येतो. त्यातील काही गुहांमध्ये सहजपणे तर काही गुहांत थोडयाफार परिश्रमाने जाता येते. गडावर जायला दोन मार्ग असुन पहिला डांबरी रस्त्याने मुख्य दरवाज्याने वर जाणारा आहे तर दुसरा मार्ग त्या मानाने जरा अवघड असा साखळीची वाट आहे.

साखळीची वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरातील शिवपुतळ्या कडून डाव्या बाजुस जाणा-या रस्त्याने साधारण एक किमी गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर आहे. या मंदिरासमोर जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या कातळभिंतीपाशी घेऊन जाते. पुर्वेकडून असलेली ही वाट गडाच्या लांबीच्या साधारण मध्यावरून सुरू होते व कातळ कड्यातील गुहांच्या दिशेने वर जाते. इथे कातळात खोदलेल्या निमुळत्या पायऱ्यांवरून काही अंतर कापावे लागते. हा भाग थोडा धोक्याचा आहे. भिंतीला लावलेल्या तारेच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या सहाय्याने येथुन वर जाता येते. इथे आधारासाठी पुर्वी साखळ्या लावल्या होत्या त्यामुळे ह्या वाटेला साखळीची वाट असे नाव पडले आहे. संकटकाळी वर किंवा खाली जाण्यासाठी ही वाट उपयुक्त असुन आक्रमणाच्या वेळी पळून जाण्यासाठी हा मार्ग वापरला जात असे.

डांबरी रस्त्याने गडाच्या उंचीच्या साधारण मध्यापर्यंत आपल्याला गाडीने जाता येते. इथून पुढे काही पायऱ्यां चढुन आपल्याला गडाचा माथा गाठता येतो. ह्या वाटेने किल्ल्यावर जाण्यास एका मागोमाग एक असे सात दरवाजे ओलांडावे लागतात. त्यातला पहिला दरवाजा महादरवाजा असुन दुसरा दरवाजा गणेश दरवाजा किंवा परवानही दरवाजा म्हणुन ओळखला जातो. या दरवाजाच्या वरील भागात दोन मिनार असुन दरवाजाच्या कमानीवर शरभ या सिंहासारख्या दिसणाऱ्या एका काल्पनिक प्राण्याची दोन शिल्पे आहेत. डाव्या बाजुच्या शरभाच्या पुढील उजव्या पंजात एक कुत्रा कोरलेला असुन उजव्या बाजुच्या शरभाने दोन हत्ती व एक गंडभेरुंड पंजात धरलेला दाखवला आहे. गंडभेरुंडही एक काल्पनिक दुतोंडी गरुडासारखा दिसणारा पक्षी आहे.

वाटेच्या पुढील भागात दोन दरवाजांचा चौक असुन या चौकातील पहिला दरवाजा ढासळलेला आहे या ढासळलेल्या दरवाजावर डावीकडे शरभ कोरलेला आहे. ढासळलेला हा तिसरा दरवाजा पीर दरवाजा म्हणुन ओळखला जातो. चौकाच्या पुढील चौथा दरवाजा हत्ती दरवाजा म्हणुन ओळखला जातो. ह्यावर काही विशेष चिन्हे किंवा शिल्पे दिसत नाहीत. हत्ती दरवाजा ओलांडल्यावर आपल्याला गडाचे अवशेष मोठ्या प्रमाणावर दिसायला सुरवात होते. येथुन पुढे जाण्यास बांधीव पायरी मार्ग तसेच खडकात खोदलेल्या पायऱ्या आहेत. या वाटेने आपण पाचव्या दरवाजासमोर अभे राहतो. या दरवाजाचे नाव आहे शिपाई दरवाजा. या दरवाजाचे मूळ लाकडी दार आजही शिल्लक असुन या दारांवर अणकुचीदार लोखंडी खिळे बसविण्यात आली आहे.

पाचव्या दरवाजाची संरक्षण रचना अभ्यासनीय असुन हा गडाचा प्राचीन मुख्य दरवाजा असावा असे वाटते. ह्या दरवाजाच्या चौकटीवर हाताचे पंजे कोरलेले दिसून येतात. शिपाई दरवाजातुन आत गेल्यावर डाव्या बाजुस गेल्यावर खडकात कोरलेली दोन लेणी व पाण्याची आठ-दहा टाकी दिसुन येतात तर उजवीकडची वाट शिवाई मंदिराकडे जाते. शिवाई मंदिराकडे जाताना वाटेत पाण्याची दोन खडकात खोदलेली टाकी असुन प्रत्यक्ष मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एक कोरीव काम केलेला आकर्षक लहानसा कमानी दरवाजा ओलांडावा लागतो. हा दरवाजादेखील अलीकडील काळातील असावा. या दरवाज्यातुन वाट शिवाई देवीच्या मंदीरात जाते. शिवाईचे मुळ मंदिर एका कोरलेल्या गुहेत असुन त्यात देवीचा मूळ स्वरूपातील तांदळा आहे. नंतर ह्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असुन आज त्याला बांधीव मंदिराचे स्वरुप आलेले आहे.महाराजांचे शिवाजी हे नाव ह्या शिवाई देवीवरुन ठेवण्यात आले असे मानले जाते.

मंदिरावरून सरळ पुढे गेले की डाव्या हाताच्या कातळात ६ ते ७ बौद्ध लेणी लागतात. यातील दोन लेण्यांच्या दारावर डाव्या हाताला एक शिलालेख आहे. काही गुहांच्या समोर कातळकड्यात खोदलेली पाण्याची टाकी आहेत. ह्या गुहा ख्रिस्तपूर्व दोनशे वर्ष इतक्या जुन्या आहेत. नाणे घाटाचा व्यापारी मार्ग इथून जवळ असल्याने व्यापारी व भिक्षुंसाठी हे विश्रांतीचे स्थान असावे. शिवाई मंदिर व परिसर पाहुन परत मुळ वाटेवर येऊन सरळ गेले तर आपण फाटक किंवा मेणा दरवाज्याकडे जातो. त्यापुढे गडाचा सातवा व शेवटचा दरवाजा कुलाबकर दरवाजा लागतो. ह्या सर्व प्रवेशद्वारात तीन दरवाज्यांस लाकडी प्रवेशद्वार असुन प्रवेशद्वाराच्या दारांवर लोखंडी खिळे बसविण्यात आली आहे. शेवटच्या कुलाबकर दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. गड वापरात असताना या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात होता. आजमितीस अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.

अंबरखान्याच्या मागील बाजुस गेल्यास गडाची खालपासुन वर आलेली तटबंदी व अभेद्य बुरुज यांचे दर्शन होते. अंबरखान्यापासून समोर जाणारा मार्ग शिवकुंजाकडे जातो. या मार्गाने जात असताना वाटेत गडाच्या उतारावर डाव्या बाजुला पाण्याची अनेक टाकी दिसतात. तर उजव्या बाजुस गंगा जमुना हि शिवनेरीवरील पाण्याची प्रसिद्ध टाकी दिसतात. या टाक्यांमध्ये बारमाही पिण्याचे पाणी उपलब्ध असते. गंगा जमुना हि टाकी सातवाहन काळातील बांधकामाचा उत्तम नमुना आहे. शिवकुंजात राजमाता जिजाउंच्या पुढे उभे असलेल्या बाल शिवाजीची हातात तलवार घेतलेली पंचधातूची मुर्ती आहे. शिवकुंजाच्या मागील बाजूस असणा-या व-हांडयामध्ये १० ते १२ जणांची राहण्याची सोय होते. किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती व्यवस्था आपण स्वत:च करावी.

शिवकुंजासमोर राजवाड्याच्या आधी उजव्या हाताला एक मोठी पांढरी कमान आहे व त्याच्या पाठीमागे सातवाहनकालीन पाण्याचे मोठे टाके आहे. ह्या टाक्याला कमानी टाके म्हणतात. ही कमान बऱ्यापैकी मोठी आहे व गडाखालूनही सहज ओळखता येते.या कमानीखालील इमारतीवर घुमट असुन त्यावर फारसी भाषेत कोरलेले दोन शिलालेख आहेत. कमानी मशिदीकडून पुढे चालत गेल्यास डाव्या हातास राजवाड्याचे अवशेष दिसून येतात. यात एक हमामखाना व कारंज्याचा हौद दिसुन येतो. तेथून पुढे शिवजन्म स्थानाची दुमजली दगडी इमारत असून इमारतीच्या खालच्या खोलीमध्ये शिवरायांचे जन्मस्थळ आहे. या खोलीत पाळणा आणि शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा ठेवलेला आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोरीव काम केलेला सज्जा असुन त्यातुन जुन्नर गाव आणि परिसर दिसतो.

शिवजन्म इमारतीकडून कडेलोट टोकाकडे जाताना वाटेत एक दगडी बांधकामाचे बांधीव तळे दिसते हे तळे बदामी टाके म्हणुन ओळखले जाते. या तळ्यात समोरील बाजुस दगडाचे खोलीवजा बांधकाम केलेले आहे. बदामी टाक्यापासुन पुढे जाणारा रस्ता किल्ल्याच्या उत्तरेस कडेलोट टोकाकडे जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीच्या या सरळसोट कडयाचा उपयोग हा गुन्हेगारांना कडेलोटाची शिक्षा देण्यासाठी केला जात असे. कडेलोट टोकावरून लेण्याद्री परिसर,वडूज धरणाचा जलाशय तसेच नाणेघाट आणि जीवधन परिसर दिसतो. कडेलोट टोकावरून परत आल्यावर एक वाट शिवकुंजाच्या मागील टेकाडावर जाताना दिसते. या टेकाडावर एक घुमटी बांधलेला चौथरा व त्याच्यापुढे इदगाह आहे.

निजामशाही अस्तानंतर आदिलशाही आणि मोगल यांचे या भागाकडे दुर्लक्ष झाले याचा फायदा घेऊन महादेव कोळ्यांनी या प्रांतावर अधिकार मिळवला तेव्हा मोगलांनी कोळ्यांवर आक्रमण करून शिवनेरीला वेढा दिला. महादेव कोळ्यांच्या सैन्याने मोगल सैन्यापुढे शरणागती पत्करली. गडाच्या माथ्यावरील चौथऱ्यावर कोळी सैन्याचा शिरच्छेद करण्यात आला. या नरसंहाराची आठवण म्हणून त्या चौथऱ्यास कोळी चौथरा अथवा काळा चौथरा म्हणतात. या चौथऱ्याच्या पुढील बाजुस इदगाह नजरेस येतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. गडावरील हा सर्वात उंच भाग असुन येथुन जीवधन, भैरवगड, चावंड , हडसर अन् नारायणगड या किल्ल्यांचे दर्शन होते. संपुर्ण गड डोळसपणे फिरण्यास पाच तास तरी हवेत.

जीर्णनगर, जुन्नीनगर, जुनेनगर, जुन्नेर व आताचे जुन्नर असे नामकरण झालेले हे शहर इ.स.पुर्व काळापासुन नांदते आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी याने शकांचा नाश करून जुन्नर परिसरावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाणेघाट ह्या पुरातन व्यापारी मार्गावरून फार मोठया प्रमाणावर चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या मार्गावर दुर्गांची निर्मिती करण्यात आली. नाणेघाटात आजही सातवाहन कालीन लेण्या व शिलालेख उपलब्ध आहेत. सातवाहनाची सत्ता स्थिरावल्यावर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली. सातवाहनांनंतर शिवनेरी चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटींच्या सत्तेखाली होता.

११७० ते १३०८ च्या सुमारास यादवांचे राज्य येथे स्थापन झाले आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ.सन १४४३ मधे बहमनी सरदार मलिक-उल-तुजार ह्याने यादवांच्या सैन्याचा पराभव करून हा किल्ला जिंकला. त्यानंतर सन १४८५ मधे मलिक-उल-तुजार चा प्रतिनिधी मलिक अहमद हा किल्ला घेण्यासाठी गेला पण किल्लेदाराने किल्ला देण्यास नकार दिला. मलिक अहमदने गडावर हल्ला करून गड जिंकला. पाच वर्षांच्या जमा केलेल्या करांची संपत्ती त्याला इथे मिळाली. ह्यानंतर एकाच वर्षात मलिक-उल-तुजार मारला गेला व ही संधी साधून मलिक अहमदने स्वतःला निजाम-उल-मुल्क भैरी असे घोषीत करून निजामशाहीची स्थापना केली. बहमनी सुलतान मुहम्मदशाह ह्याने मलिक अहमदला हरवण्यासाठी सैन्य पाठवले. चाकण किल्ल्याजवळ हे युद्ध झाले व त्यात बहमनी सैन्याचा पराभव होऊन चाकणचा किल्ला बहमनीकडून निजामाकडे गेला. अशा प्रकारे शिवनेरीवर निजामशाहीचा जन्म झाला. त्यानंतर १४९४ साली निजामशहाने अहमदनगर शहर वसवले व ते राजधानीचे ठिकाण केले.

इ.स. १५६५ मध्ये सुलतान मुर्तिजा निजामाने आपला भाऊ कासीम याला या गडावर कैदेत ठेवले होते. इ.स.१५९५ मध्ये जुन्नर प्रांत आणि शिवनेरी किल्ला मालोजीराजे भोसले यांना निजामशाहीकडून देण्यात आला. पुढे शहाजीराजे भोसले निजामशाहीत असताना शिवनेरी किल्ला शहाजी राजांच्या अधिकार क्षेत्रात आला. राणीसाहेब जिजामाता गरोदर असताना त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने ५०० स्वारासोबत शिवनेरी गडावर पाठवण्यात आले. शिवनेरी गडावर श्रीभवानी शिवाईस जिजाऊने नवस केला जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन. त्यानंतर शके १५५६ नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी तारीख १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवाजीराजे यांचा जन्म झाला. इ.स. १६३२ मध्ये बाल शिवरायांनी गड सोडला आणि १६३७ मध्ये गड मोगलांच्या ताब्यात गेला. १६५० मध्ये मोगलांविरुद्ध येथील कोळ्यांनी बंड केले.

काही महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ही गोष्ट मुघल बादशहाच्या कानी जाताच कोळ्यांना परास्त करण्यासाठी त्याने एक भली मोठी फौज पाठवली. शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे शरणागती पत्करली. सुमारे १५०० महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले व त्यांचे हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. हजारो मुंडक्यांचा ढीग करून त्यावर एक चबुतरा बांधला. खेमी क्षेम नावाचा एक पुढारी या कोळ्यांचे नेतृत्व करत होता त्यालाही ठार करुन या चबुतऱ्यात चिणले गेले. यानंतर इ.स. १६७३ मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखानला फितवून किल्ल्याला माळ लावून किल्ला सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अजीजखान याने शिवाजीराजांनी दिलेली लाच स्विकारली परंतु या गुप्त कटाची बातमी बहादुरखानाला कळवली. मोंघलांनी रचलेल्या सापळ्यात जवळपास तीनशे मराठा सैनिक ठार झाले. १६७३ मध्ये मध्ये इस्ट इंडिया कंपनीतील डॉ.जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली असता किल्ल्यावर हजार कुटुंबाना सात वर्ष पुरेल एवढे धनधान्य असल्याची नोंद त्याने केली आहे.

इ.स. १६७८ मध्ये शिवरायांनी जुन्नरला वेढा घातला व जुन्नर शहर लुटले. यावेळी घोडे दोनशें पाडाव केले, तीन लक्ष होनांची मत्ता, खेरीज कापड जिन्नस, जडजवाहीर हस्तगत करुन मराठे पुण्यास आले. मराठय़ांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले असा उल्लेख आढळतो. पुढे ४०वर्षांनी १७१६ मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरित करण्यात आला. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here