शोध : शीतला देवीचा

शोध : शीतला देवीचा

शोध : शीतला देवी चा –

माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते.

जगातील प्राचीन उपासनेत शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व दिसून येते. मानवी जीवनात स्त्रीचे असलेले महत्त्व याचे मुख्य कारण असू शकते. मातेच्या रूपात प्रजनन आणि संगोपन या दोन्ही गोष्टी स्त्रीकडे असल्यामुळे मातृ उपासना जगामध्ये सुरू झाली असावी. भारतात आणि भारताबाहेर कित्येक ठिकाणी मातृ देवतेच्या मूर्ती आढळून येतात. बलुचिस्थान, इराण, मेसोपोटेमिया, तुर्कस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, इजिप्त येथेही स्त्री अथवा मातृ देवतेच्या मूर्ती आढळून आलेले आहेत. निरनिराळ्या मूर्तीचा अभ्यास केल्यानंतर असे लक्षात येते की, शक्तीची उपासना तीन प्रकारे केल्या जाते. एक म्हणजे दिगंबर रूपा मध्ये,  दुसरे रूप म्हणजे लहान मुलासह आणि तिसरा भाग म्हणजे दिग्वसना स्त्री दाखवितात पण मुखाच्या ठिकाणी कमलासारखी फुले, पशु किंवा पक्षाचे तोंड असते.

नांदेड जिल्ह्यातील तालुका मुखेड येथे दशरथेश्वर मंदिर असून हे शिवमंदिर आहे. मंदिराच्या बाह्य अंगावर अप्रतिम असे शिल्पांकन असून त्यात नृत्य मग्न सप्तमातृका ही आहेत. जे की इतर कुठल्याही मंदिरावर आढळून येत नाहीत. याच बाह्य भागावरील मूर्तीत उत्तरेकडील शिल्पपटात पश्चिमाभिमुख एक मूर्ती असून ही मूर्ती शितला देवीची आहे. या मूर्तीस अनेक अभ्यासकांनी ज्येष्ठा देवी असल्याचे म्हटले आहे. मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये ही मूर्ती असून ही देवी स्थानक आणि चतुर्भुज आहे. तिने उजव्या खालील हातात सुरा, उजव्या वरील हातात केरसुनी, डाव्या वरील हातात सूप आणि डाव्या खालील हातात कपाल पत्र घेतले आहे. ही सारी लक्षणे मूर्ती शास्त्रा नुसार शितला देवीची ठरतात. परंतु काही अभ्यासक ही मूर्ती लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असल्याचे प्रतिपादन केले आहे.

देवीने डोक्यावर मुकुट घातला असून त्यावर एक असुर मुंड आहे.  कानात कुंडले आणि डाव्या खांद्यावरून मुंडमाला धारण केलेली आहे. देवीची प्रतिमा नग्न असून पादपिठावर तिचे वाहन गाढव कोरण्यात आलेले आहे. स्कन्द पुराणातील शितलाष्टकानुसार सदर देवीचे वर्णन पाहता ही मूर्ती शितला देवीची मूर्ती ठरावी. या अनुषंगाने आपण काही बाबींचा मागोवा घेऊयात.

स्कन्द पुराणातील भगवान शिव रचित शितलाष्टका नुसार, “गाढवावर विराजमान, दिगंबरा, हातात झाडू अथवा कलश धरण करणारी, सुप अलंकृत मस्तकवाली, भगवती शितलास मी वंदन करतो.” असे पहिल्या चरणात म्हटले आहे. सदर मूर्ती ही दिगंबरा असून हाती झाडू, सूप, कपाळ पात्र आणि सुरा आहे. स्कन्द पुराणातील वर्णना प्रमाणे हाती कलश नसून सुरा दाखवण्यात आलेला आहे. कारण ही मूर्ती संहार मूर्ती असून ती ज्वरासूर अर्थात ज्वर दैत्याचा अंत करीत आहे. बाकी सारी लक्षणे शीतला देवींचीच आहेत. त्यासोबतच गळ्यात असलेली मुंड माला ही लक्षणे ही शिवाशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे किरीट मुकुटावर ही एक मुंड कोरण्यात आलेला आहे.

देवीच्या बाजूला तिचे गण वेताळ आणि पिशाच्य दाखविलेली आहेत. सदरील मूर्ती आकाराने 106 cm बाय 52 cm आहे. मूर्तीतील प्रत्येक आयुधांचा आपण प्रथमतः विचार करु. सुरा अथवा छुरीका हे संहार शास्त्र आहे. या मूर्ती मध्ये कलश नसून ती ज्वर दैत्याचा नाश करीत असल्याने सुरा दाखविलेला आहे. तर झाडू हे स्वच्छता दर्शक लक्षण आहे. तर सूप हे थंड हवा देण्यासाठी वापरण्यात येते. कपाल पात्र हे दैत्य रक्त प्राशन करण्यासाठी उपयोगात आणले जाते. ही देवी वैज्ञानिक दृष्टीने महत्वपूर्ण आहे. दाहज्वर, पीतज्वर, कांजण्या, दुर्गंधी युक्त फोडे, नेत्र विकार हे रोग दूर करणारी देवता म्हणून शितला देवी ओळखली जाते. सदरील देवी जवळ लिंबाचे डहाले ठेवली जातात कारण त्या मुळे शीतलता निर्माण होते. हाती असलेला झाडू हे स्वच्छता आणि सुरक्षितता राखण्यास प्रेरणा देणारे आहे.

ऋतू परिवर्तनाणे वातावरणात अनेक बदल होतात. त्या साठी सफाई वर भर दिला गेला पाहिजे. कांजण्या झाल्यावर शरीर दाह कमी करण्यासाठी सुपाने वारे देऊन रोग्याला आराम मिळून देता येते. तर गाढव हे वाहन दाखविण्यामागे ही वैज्ञानिक करणे आहे. गाढवाची लिद रोग्याच्या अंगास लावल्याने त्याचा शरीरा वरील फोडचे डाग कमी होतात. कांजण्या झाल्यामुळे अंगावरील फोडे  फोडण्याचे काम झाडूने अथवा फडा घेऊन करता येते. लिंबाची पाने ही फोडे सडू नयेत किंवा त्याचे संक्रमण होऊ नये यासाठी उपयोगी येतात. अशा रोग्यांना थंड पाणी प्यावे असे वाटत असल्याने, शितला देवीच्या हाती कलश दाखविला जातो. कांजण्या हा आजार खूप जुना असून ग्रीक मध्ये इसवी सन पूर्व बाराशे मधील एका ममीचा मृत्यू कांजण्या आजाराने झाल्याचे मानले जाते.

सदरील मूर्तीच्या गळ्यात यज्ञोपवीत प्रमाणे डाव्या खांद्यावरून रुळणारी मुंडमाला ज्यामध्ये एकूण 18 मुंडांची माळ स्पष्ट दिसून येते. ही मुंड माला पाहता शिव परिवारातील देवता शितलादेवी असल्याचेच सिद्ध होते. ज्येष्ठा ही विष्णू परिवारातील देवता असल्याने तिच्या गळ्यात मुंड माला येणे आणि कपाल पात्र धारण करणे कदापी ही शक्य नाही. पूर्वाश्रमीच्या अभ्यासकांकडे  असलेली अपुरी साधने,  संशोधकांची मर्यादा आणि ही शीतला माता असू शकते असे कदाचित वाटलीच नसावे. त्यामुळे या शीतला देवीच्या मूर्तीस अनावधानाने अलक्ष्मी किंवा ज्येष्ठा असे संबोधले असावे. असेही पौराणिक कथेनुसार अलक्ष्मी ही संहार रूपात दाखविली जात नाही. म्हणूनच मुखेड स्थित दशरथेश्वर मंदिरावरील मूर्ती ही ज्येष्ठा किंवा अलक्ष्मी ची नसून ती शीतला मातेची मूर्ती असल्याचे ठामपणे म्हणता येईल. माता शितलादेवी स्वच्छतेची जाणीव करून देते. देवी शीतला ही संक्रमना पासून बचाव करण्याची शिकवण देणारी वैज्ञानिक देवी आहे.

आभार –  श्री Gajendra Birajdar,  प्रा. डॉ. Sanjeev Doibale, श्री Aditya Phadke आणि श्री Laxmikant Sonwatkar

प्रा. डॉ. अरविंद सोनटक्के

(अधिक माहिती साठी अभ्यासकांनी रिसर्च जर्नल B Aadhar अंक 263 अ. क्र.21 पहावे)

ता. क. –

1) शीतला देवी (मरिआई, पोचम्मा, खरजू आई ई.) प्रमाणे ज्या देवता प्राचीन व पूर्व मध्ययुगीन काळात निर्माण झाल्या, त्यांचे पूजन गावा बाहेर होत असे. आज काही जणांचा असा गैरसमज आहे की, या देवता विशिष्ट जातीच्या आहेत म्हणून गावा बाहेर ठेऊन पूजन केले जाते. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, या संक्रमन काळात आयुर्वेदतील उपचारास अनुसरून तयार झालेल्या देवता असून संक्रमन आजार गावा बाहेर असावा या हेतू मुळे बाहेर ठेवलेल्या आहेत. त्यास विशिष्ट जाती अथवा धर्माचा संबंध नाही.

2) आज संपूर्ण जग covid-19 या आजाराशी लढत आहे. आपणही मागील सहा-सात महिन्यापासून स्वतःला कोंडून घेतलेले आहे, इतरांपासून स्वतःला अलिप्त करून घेतले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे वातावरण निवळेल. परंतु समस्त मानव जातीला निसर्गाने आपला प्रकोप दाखविला आहे. यापासून जोपर्यंत बोध घेणार नाही. तोपर्यंत मानव समाज कधीही सुरक्षित असणे शक्य नाही. आमच्या पूर्वजांनी अशा अनेक संक्रमित आजारांना तोंड दिलेले आहे. त्यांच्याशी लढता लढता आयुर्वेदिक उपचार ही सांगितलेली आहेत. हे आयुर्वेदिक उपचार सर्वसामान्य माणसाला समजावेत, त्याचा सहज अर्थबोध व्हावा यासाठी संबंधित आजार आणि त्यावरील उपचार या अनुषंगाने काही देवता आणि त्यांच्या पौराणिक कथा निर्माण झाल्या आहेत. या देवता आजच्या आधुनिक युगातही आपले वैज्ञानिकत्व टिकून आहे. भारतीय पौराणिक कथेमध्ये ज्या अनेक देवी देवता आहेत. त्यातीलच एक देवी म्हणजे चामुंडा, ही प्रेतासनावर  विराजमान असते.  हिचे वाहन प्रेत दाखवण्या पाठीमागे कदाचित असे कारण असावे की, चामुंडा ही संहार देवी असून तिच्या भयंकर संहार सत्रा नंतर असेच संक्रमित आजार पसरत असावेत आणि असे संक्रमित आजार जेव्हा निर्माण होतात. तेव्हाचा चामुंडेच्या पायाखाली असलेल्या प्रेताप्रमाणे निपचित पडून राहावे. अन्यथा मानव समूहाला कायमचे निपचित व्हावे लागेल. हाच जणू संदेश त्या मूर्तीतून दिला गेला असावा. चामुंडा देवी प्रमाणेच संक्रमित आजाराच्या वेळी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षितता तसेच स्वच्छते संदर्भाने संदेश देणारी एक देवी म्हणजे ती माता शीतला होय. या माता शीतला देवीची मूर्ती नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात दशरथेश्वर मंदिराच्या बाह्यांगावर पाहावयास मिळते. ही देवी आयुर्वेद आणि आध्यात्म यांची यथायोग्य सांगड घालताना दिसून येते.

3) मंदिर दशरथेश्वेर या नावाने ओळखले जाते. दशरथ यांचा ईश्वर म्हणजे दशरथेश्वेर असा अर्थ होतो. विशेषतः ईश्वर हा शब्द केवळ शिवा सोबतच जोडला जातो. जसे गुप्तेश्वर, केदारेश्वर, काळेश्वर, घृषणेश्वेर, सोमेश्वेर ई. मुखेडचे मंदिर एक तर दशरथ नावाच्या कोणीतरी दाणी व्यक्तीने निर्माण कार्यात सहकार्य केले असावे असेही म्हणता येईल. परंतु प्राचीन भारतीयांची मानसिकता पाहता असे घडले नसावे. माझा निष्कर्ष असा आहे की, राम पिता दशरथ यांचे दैवत / ईश्वर या अर्थाने दशरथेश्वर असे नामाभिधान मिळाले असावे.

ठिकाण – मुखेड, महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवर वसलेले तालुक्याचे गाव.
स्थळ – दशरथेश्वेर मंदिर.

Dr. Arvind Pandurangrao Sontakke

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here