विष्णुचे शक्तीरूप, शांती

विष्णुचे शक्तीरूप, शांती

विष्णुचे शक्तीरूप, शांती –

अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना)  मंदिरावरील विष्णुची शक्तीरूपे विशेष आहेत.  मुर्तीशास्त्र अभ्यासकांत या मंदिराची ओळखच त्यामुळे आहे. या पूर्वी या सदरांत काही शक्तीरूपांचा परिचय दिला होता. सोबतच्या छायाचित्रात जे शक्तीरूप आहे त्याच्या हातातील आयुधांचा क्रम उजव्या खालच्या हातात चक्र, वरच्या हातात शंख, डाव्या वरच्या हातात पद्म आणि डाव्या खालच्या हातात गदा असा आहे. अशा विष्णुला मधुसूदन संबोधले जाते. मधुसूदन विष्णुच्या या शक्तीरूपाला शांती म्हणतात. विष्णुचे शक्तीरूप, शांती.(देगलुरकरांच्या पुस्तकांत santi असे लिहिले आहे. सांती असाही याचा उच्चार होतो. तज्ज्ञांनी यावर प्रकाश टाकावा)

शास्त्राप्रमाणे मुर्ती कोरल्यावर शिल्पकाराने पुढे जावून जो कलाविष्कार घडवला आहे तो विलक्षण आहे. चक्र असलेला हात आणि गदेवरचा हात यात नृत्याची मुद्रा वाटावी असा समतोल आहे. शंख व पद्म धारण केलेल्या हातांची बोटे विलक्षण कलात्मक अशी वळवलेली आहेत. दोन्ही पाय दूमडलेले वक्राकार आहेत. डाव्या पायाचा तळवा संपूर्ण मुडपून समोरच्या बाजूला दिसतो आहे. गदाही सरळ नसून तिरपी आहे. कानातील कुंडले चक्राच्या आकाराची आहेत. गळ्यात एक हार मानेजवळ तर दूसरा दोन वक्षांच्या मधुन कलात्मकरित्या खाली ओघळला आहे. ठाम सरळ रेषा शिल्पात कुठेच नाही. अगदी बाजूच्या नक्षीतही नाही. मुर्तीच्या बाजूचे दोन उभे भक्कम स्तंभ जन्म आणि मृत्युचे प्रतिक मानले तर बाकी सगळ्याच शिल्पात लालित्य भरून राहिले आहे. कदाचित जन्म आणि मृत्यु या दोन बिंदूमध्य लालित्यपूर्ण आयुष्य जगले तर “शांती” लाभते असंही शिल्पकाराला सुचवायचे असेल.

छायाचित्र सौजन्य Travel Baba Voyage

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

1 COMMENT

  1. चक्र, शंख, पद्म व गदा ह्या क्रमानुसार हा मधुसूदन नसून माधव आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here