सरदारांचे वाडे, पंढरपूर.

सरदारांचे वाडे, पंढरपूर.

सरदारांचे वाडे, पंढरपूर.

श्रीविठ्ठल आणि पंढरपूर म्हणजे समस्त भक्तांचे माहेर. सकल तिर्थाचे सार. त्यामुळे अनादी कालापासून विद्वान आणि राजसत्ताधारी यांनी पंढरीत वास केला. देवाला दाने दिली. पूजा अर्चा केली. ज्यात शिलाहार, होयसळ, चालुक्य, यादव राजांपासून पेशवाई पर्यंत सर्वांनी देवतार्चन केल्याच्या नोंदी सापडतात. अगदी शहाजीराज्यांनी जिजाऊसाहेबांसह विठोबाला पूजा केल्याचे इतिहास अभ्यासक आदरणीय वै. निनादराव बेडेकर यांनी आमचे भेटीत एकदा  सांगितले होते. त्याबाबतचा पुरावाही ते देतो म्हणाले होते. पण त्याआधीच दुर्दैव आडवे आले. आणि एका महत्वाच्या दाखल्याला आपण मुकलो. मात्र कर्नाटकातून शहाजीराजे पुत्रभेटीसाठी ये देशी आले. धर्मशास्त्राप्रमाणे अनेक दिवसांनी, वर्षांनी आप्तांची भेट होत असल्यास ती भेट देवद्वारी, क्षेत्री करावी असे रूढ असल्याने जेजूरीला पितापुत्राची भेट झाली. त्यापूर्वी शहाजीराजे पंढरीक्षेत्री येवून देवतार्चन करून गेलेच्या नोंदी आहेत. शिवाय मंदिरात देवास अर्पण आलेला घोड्याचे, वाहनाचे मालकी बाबतचा वादचा शहाजीराजांनी केलेला निर्णयही एेतिहासिक नोंदीत आपणास पहायवा मिळतो.सरदारांचे वाडे.

शिवकाळात पंढरपूराचे उल्लेख आहेत पण ते म्हणावे एवढे नसून तुरळक आहेत. ते तुरळक असले तरी इतिहास दृष्ट्या मोलाचे आहेत. सन १६५९ मधे अफजलखानाने पंढरीत येवून थैमान घातले होते. मात्र त्याला देव मिळाला नाही. पुढे मिर्झाराजांच्या सोबत केलेल्या तहाप्रमाणे स्वत: शिवाजी महाराज सन १६६५ मधे पुरंदर, फलटण, भाळवणी, मंगळवेढा मार्गे विजापूरावर चालून गेले. ते पंढरपूराजवळून गेले. मात्र पंढरीत आले कि नाही याबाबत कागदपत्रात नोंद सापडत नाही तोवर इतिहास मुका आहे. पुढे तर औरंगशहाने पंढरपूर जवळच्या माचणूर गावी सुमारे ६ वर्षे तळ देवून हिंदुस्थानचा राज्यशकट येथून हाकला. त्याकाळी पंढरीवर हल्लेही केले. याकाळी यवनभयाचे विचारांने विठ्ठलमूर्ती प्रल्हाद महाराज बडवे यांनी नदीपलिकडे देगांवचे पाटीलाकडे १६९५ ते १६९९ पर्यंत सुरक्षित ठेवली. मराठी लष्करही या धामधुमीत पंढरपूरजवळून जाई त्यावेळी येथील देव, आणि ब्राह्मण यांना त्रास देवू नये म्हणून छत्रपती राजाराम महाराजांची सन १६९४ मधे आज्ञा होती. छत्रपती राजारामांनी जिंजीचे मुक्कामामुळे नविन पद योजून ज्यांची पहिली नियुक्ती केली ते पंतप्रतिनिधी प्रल्हाद निराजींनी जे शिवरायांपासून स्वराज्याचे सेवेत होते, त्यांनी सन १६९७ मधे पंढरपूरात नदिला पुंडलिक मंदिराजवळ जीव दिला.

केवल मुसलमानी अमलात सुलतानांकडूनच पंढरीवर धाड पडली असे नाही तर मराठा सरदारांनीही पंढरीची लूटालूट केली आहे. देव, देश आणि धर्मासाठी जीव तळहाती घेवून शिवरायांसोबत स्वराज्यासाठी लढलेल्या सेनापती धनाजी जाधवाच्या नातवाने, रामचंद्र जाधवाने निजामासाठी सन १७६२ क्षेत्रास कहर मांला. मोगलाई मांडली. हिंदूधर्म सोडून यवनांचा धर्म प्रारंभ मांडला. त्याशिवाय देवपरायण अहिल्यादेवींचे वारस यशवंतराव होळकरांचे सरदार फत्तेसिंग माने यानेही सन १८०२ मधे नवरात्रात पंढरपूरावर धाड टाकल्याची नोंद सापडते.  आसपासचा मुलुख लुटला. पंढरीत मात्र त्याने पाय टाकला नाही. अशीही नोंद पंढरपूर बाबत सापडते.

शंभुछत्रपतींचा पुत्र २ रा शिवाजी तथा शाहु महाराज सातारा यांचे अभयपत्राने देवाची रानावनातली  वणवण थांबली आणि देव सिंहासनी कायमचे विराजमान झाले. कारण पराक्रमी मराठ्यांनी दिल्लीवर आपला धाक बसविला. या धामधुमीत थोरले बाजीराव, त्यांचे पुत्र नानासाहेब, माधवराव पेशवे यांचे मुक्काम अनेकवार पंढरीत पडले होते.  दुसरा बाजीराव तर विविध वेळी मिळून सुमारे २७० दिवस पंढरीत राहिला आहे. त्याने सन १८०९ साली पालखीतून आलेल्या माऊलींसोबत वाखरी ते पंढरी अशी आषाढ शु|| १० ला पायी वारीही केली आहे. माऊलींसोबत पायी वारी करणारा हा पहिला पंतप्रधान. सोबत अर्थातच ढमढेरे, आवटी, विंचूरकर, पुरंदरे, बापू गोखले, त्रिंबकजी डेंगळे, शेलूकर आदि सरदार होते. त्याची अनेक राजकारणे पंढरीत शिजली. काही पुर्णत्वालाही नेण्यात आली.

१८१२ सनात ब्रिटिशांनी मराठी सत्ता संपविण्यासाठी म्हणून केलेल्या चाली चा परिपाक म्हणून दुबळ्या बाजीरावा बरोबर करार केला तो पंढरीतच. बडोदेकर गायकवाडांचा वकिल गंगाधर शास्त्री बाजीरावाचे भेटीला पंढरीत आला. त्यातच त्याचा मुडदा पडला. राजकारणी इंग्रजांनी आण मात्र डेंगळ्यावर  घेतला. पुढे मराठी सत्तेच्या पतनाची अखेरची लढाईही पंढरी जवळचे आष्टीत जाली. ज्यात सेनापती बापू गोखले पडले आणि मराठी सत्ता संपुष्टात आली.  अशाप्रकारे पेशवाईच्या काळी पंढरपूर म्हणजे महत्वपूर्ण ठिकाण झाले होते. कारण वर वर्णित अशा अनेक महत्वपूर्ण घडामोडी पंढरपूरात घडत होत्या. अशा अनेक घटना पंढरीने पाहिल्या.

अध्यात्माने रंगलेल्या पंढरीत तीर्थक्षेत्र म्हणून पेशवाईत अनेक सरदार, दरकदार आणि  मान्यवरांचे मुक्काम असत. कधी पेशवाच पेशवे सरदारांना पंढरीत भेटीसाठी बोलावे. टाळ पखवाजाच्या आवाजाने गरजणारे पंढरपूर याकाळी तलवारीच्या खणखणाटाने गरजत होते. कीर्तन, प्रवचनाच्या आवाजा एेवजी राजकारणी डावपेचाचे आवाज त्यामुळे इथे घुमत होते. वारकरी बांधवाच्या ऐवजी लढवय्या हत्यारबंद शिपायांच्या गडबजाटाने पंढरपूर वहात होते. वाळवंटात वारकरी खेळीयासोबत हत्तीची साठमारीही होत होती. पहायला पंतप्रधान पेशवे अवतरत होते. मराठ मुलुखाची अध्यात्मिक राजधानी असणारे पंढरपूर जणू राजकारण्यांची राजधानी बनली. दुसरं पुणं झाले होतं. त्यामुळेच सततच्या वास्तव्यासाठीची गरज म्हणून अनेकांनी पंढरीत आपलेसाठी वाडेच बांधले.

खासा पेशवे माधवरावांच्या आज्ञेने बांधलेला सरकार वाडा, तसेच महाद्वार घाटाचे दोन्ही बाजूचे अहिल्याबाईंनी बांधलेला राम मंदिराचा होळकर वाडा, बायजाबाईंनी बांधलेला द्वारकाधिश मंदिराचा शिंदे सरकार वाडा आपण मागे विस्ताराने पाहिला. पण त्याहून अनेकांनी आपले मर्जीनुरूप, जागा अन् गरजेचा विचार करून पंढरीत सरदारांचे वाडे ही बांधले. बहुधा हे सारे वाडे तेथील हत्ती, घोडे, माणसे याच्या राबत्याचा विचार करता पाणी पाहुन नदीकाठी आहेत. वा नदिचे जवळ आहेत.

पंढरपूरातून गोपाळपूरा कडे जाताना डाव्या बाजूला थोडे गावाबाहेर पडले की सरदार घाडगेंनी वाडा बांधला. त्यात आपली पुजेची देवी म्हणून अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची स्थापना केली. काळच्या उदरात वाडा गेला त्याची अर्धीमुर्धी दगडी तटबंदी प्रमाणेची भिंत अन प्रवेशद्वार शिल्लक आहे. बाकी पडझड झालीय. मात्र देवी स्थान शिल्लक आहे तेही घाडग्यांची देवी या नावे. आजही इथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होतो. नुकतेच या देवी मंदिराचा जिर्णोद्धार मदन विश्वनाथ बडवे अन् त्यांचे बंधूंनी केला आहे.

त्यालगत पंचमुखी मारूती जवळ होळकरांनी श्रीविठ्ठल आणि श्रीरामासाठी लागणार म्हणून तुळशीबागेची निर्मिती केली. ज्यात आज अश्विनिता गॅस कंपनीचे गोडावून आहे. पंढरीत आजचे सरकारकडून पहिल्यांदा नव्हे तर पूर्वीपासून तुळशीबागेची निर्मिती होती. असे हे स्थान. बहुधा ते पाहूनच नवे सरकार पंढरीत तुळशीवन निर्मू पाहतेय.

गोपाळपूर रस्त्यावर जाताना पेशव्यांचे मामा सरदार रास्ते यांचा मोठ्या पटांगणाचा भव्य वाडा होता. आमचे पितामहांचे मामा तळघट्टी रास्तांचे कारभारी होते. ते तिथेच रहात. रास्त्यांनीच थोरली तालिमीसाठी जागा बक्षीसपत्राने दिली. तालमीची उभारणी केली. आज वाड्याचे ठिकाणी खर्डेकर आणि वासाडे महाराज मठ आहे.

चंद्रभागा घाटाजवळ सरकार वाडा. त्याचे उत्तरेला एेन नदी तीरावर चंद्रभागा घाटावरच बडोदेकर गायकवाडांचा दोनमजली वाडा होता. तिथेच आता सारडा भवन उभारले आहे. तेथून उत्तरेकडे येता कासार घाटावर माणकेश्वर सरदारांचा वाडा होता. तोच आता वै. पुज्य गंगुकाका शिरवळकरांचा वाडा आहे.

शेजारीच महाद्वार घाटाचे दक्षिणेला भव्य दोन चौकी शिंदे सरकार यांचा वाडा त्यात द्वारकाधिशाचे मंदिर आहे. घाटाचे दुसरे बाजूला होळकरांचा वाडा आणि राममंदिर. त्याचे उत्तरेला होळरकांचे दिवाण पळशीकरांचा वाडा. बहुधा हाच आता देहुकर महाराजांचे फडाचा वाडा आहे. या दोन्हीचे मधे होळकरांचे रथ पालक्या ठेवणे साठी ची अन् घोड्याची पागा होती तिथे आता महाद्वार पोस्ट अन् गोसावी समाजाची जागा आहे.

पेशव्यांचे खाजगीकडचे कारभारी सरदार खासगीवाले यांचा भव्य टोलेजंग वाडा कुंभारघाट ते दत्त घाट परिसरात होता. या वाड्यात पेशव्यांनी भोजन केले होते. अन् त्या भोजनात खासगीवाल्यांनी ज्वारीच्या कण्याचे भोजन घातले होते. जे पेशव्यांनां नवखे होते म्हणून त्यांनी या पदार्थाची चौकशी हि केली. खाजगीवाल्यांनी आपल्या पांडुरंगाला हाच नैवेद्य असतो सांगितल्याने पेशव्यांनी देवाचे नैवेद्यासाठी कौठाळीच्या जमिनी लावून दिल्याचा मजेशीर दाखला या वाड्याबाबत आहे. पंढरपूर भेटीत तत्कालिन सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरूजी तेथेच निवासाला होते. खासगीवाल्यांनी इथेच आपले देवघर करून त्यातील विठोबाची रथयात्रा सुरू केली. त्याचे खर्चासाठी जमिनीच्या नेमणूकाही केल्या. त्या रथासाठी बडवे, देवधर, नातू, रानडे, कर्वे, जोशी, हरिदास, चातुर्मास्ये आदींच्या देवकामाची आणि मानापानाच्या व्यवस्था केली. त्याशिवाय गावच्या बारा बलुतेदारांनाही रथयात्रेत मान दिले. हि रथयात्रा पारंपारिक पद्धतीने आजही चालू आहे. या खाजगीवाल्यांनीच चातुर्मास्ये महाराजांना संतपूजा भावनेने जागा दिली ज्यात आजही महाराजांचा निवास आणि कीर्तनसेवा चालू आहे.

खासगीवालेंचे या वाड्या समोरच त्यांचाच अजून एक वाडा होता. ज्याला लिमयेचा वाडा म्हणत असत. जो आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने पंढरीत जळका वाडा नावाने तो ओळखला जाई. आता येथे नपा वाहनतळ आणि मुकबधिर शाळा चालते. त्याला लागून सरदार ताकभातेंचा वाडा आहे. त्या शेजारीच सरदार फडके यांचाही वाड होता. तिथेच हल्ली अमळनेरकर महाराजांचा मठ आहे.सरदारांचे वाडे.

१८१८ ला मराठेशाहीच्या रक्षणार्थ झालेल्या आष्टीच्या लढाईत हार झाल्याने सरदार अत्रे आणि सरदेशमुख आपल्या मुळ गावी गेलेच नाहीत ते नाथचौक परिसरात वाडा बांधून राहिले. त्यांनीच काही जागा माउली चरणी अर्पिली. तेथे आता माऊलींचे पादुका मंदिर असून आषाढी वारीला आळंदीहून आलेल्या पालखीचा इथेच मुक्काम असतो. त्यापूर्वी माऊलींचा मुक्काम बडव्यांकडे असायचा. त्याची सारी व्यवस्था बडव्यांचे दिवाणजी नेर्लेकर पहायचे. त्यामुळेच माऊलींची पंडरी मुक्कामी आषाढ त्रयोदशीला पुजा करण्याचा मान बडव्यांचे वतिने आजही नेर्लेकर करतात. अन् आळंदीला प्रस्थानवेळीही नेर्लेकरांचाही मानपान केला जातो. या माऊली मंदिराचे समोरच सरदार शितोळे अंकलीकरांचा वाडा असून तिथे आषाढी यात्रेत सोहळ्याबरोबर आलेल्या अश्वांचा मुक्काम १० पासून १५ पर्यंत असतो. सरकार हि देवदर्शनार्थ अन् काळी पंढरीत आल्यास इथेच मुक्कामी असतात.

सरदार पटवर्धन तर पंढरपूरच्या आंबे गावचे रहिवासी झाले. तिथे त्यांनी गढी बांधली. तरी पंडरपूरता पटवर्धनाचे अनेक वाडे आहेत. त्यांच्या सांगली शाखेने बांधलेला वाडा म्हणजे आजचे आपटे उपलप प्रशाला आणि पद्मसाळी धर्मशाळा होय. तसेच जमखंडीकर पटवर्धनाचा वाडा म्हणजे आजचा लक्ष्मीनारायण भट्टडांचे निवासस्थान आणि महाद्वार शाॅपिंग सेंटर होय. आपल्या उपाध्याला वाडे देणारे दाते आपण पाहतो मात्र पटवर्धनाचे उपाध्ये असणाऱ्या बडवे यांनी ही जागा आपल्या यजमानाला दिल्याची वैशिष्ट्यपूर्ण  एेतिहासिक घटना घडल्याचे अनेक बुजुर्ग या वाड्याबाबत बोलताना सांगतात.

याशिवाय लोकमान्य टिळकांचे जीवनात गाजलेले ताई महाराज प्रकरणातील सरदार पंडितांचाहि पंढरीत वाडा होता. विणे गल्लितील गुळवाडा म्हणजे तो होय. आज इथे भावे महाराज मठ आहे. सरदार महिपतराव कवड्यांची गढी गुरसाळ्यात होती. पश्चिमद्वार ते चौफाळा रस्त्यावर सरदार कवडे यांचा वाडा होता. त्यांनी तो आपले बडवे म्हणून आमचे पूर्वजांना दिला होता. जो आमचे आजोबांचे आजारपणात निरूपायांने आम्हास विकावा लागला.  त्याचे आता ३ विभाग होवून १ रस्त्यात गेला १ मधे गवळी अलंकार राहतात. तर एकात बडवे आहेत.

याशिवाय स्वराज्याचे निष्ठावान, गंगाघर शास्त्री प्रकरणाचे मेरूमणी म्हटले जाणारे त्रिंबकजी डेंगळे, तसेच पेशवाईचे शेवटचे सेनापती बापू गोखले यांचेही पंढरीत वाडे होते असे म्हणतात. त्याशिवाय अजून कुणा कुणाचे वाडे पंढरीत होते ते आज आपल्याला फारसे ज्ञात नाही. उद्याच्या अभ्यासात ते ही अज्ञात सरदारांचे वाडे समोर यावेत. ज्यामुळे पंढरीचे जुने वैभव पुनश्च पंढरपूरकरांना अनुभवता येईल.

© आशुतोष अनिलराव बडवे पाटील, पंढरपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here