तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली, सातारा

तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली, सातारा

तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली, सातारा.

सातारा शहराच्या पूर्वेला साधारण पाच कि.मी. अंतरावरून कृष्णा नदी वहाते. या ठिकाणाला आपण तिथक्षेञ दक्षिण काशी संगम माहुली या नावाने ओळखतो .खरतर प्रत्येक सातारकरांच्या मनामध्ये माहुली या नावाचा एक हळवा कोपरा दडलेला आहे. कारण माहुली सारख नितांत सुंदर ठिकाण चालू घडीला मृत्यूपश्चात होणार्या संस्कारासाठीच जास्त ओळखले जाते. कृष्णेनदीचा उगम महाबळेश्वरच्या पर्वत रांगात होतो ,तर तीन राज्ये सुजलाम सुफलाम करीत ती आंध्रप्रदेशात बंगालच्या उपासागरास जाऊन मिळते .या साधारण आठशे मैलाच्या प्रवासात तीचा काही छोट्या मोठ्या नद्या बरोबर संगम होतो.त्या त्या ठिकाणी मोठी तिर्थक्षेत्रे आहेत. त्यातील प्रमूख ठिकाण म्हणजे सातार्यातील कृष्णा-वेण्णा संगम .अगदी प्राचीन काळापासून हे ठिकाण सुप्रसिध्द असावे कारण वाल्मिकी रामायणातही या ठिकाणचा उल्लेख आहे .

नदीच्या पूर्व तीरावर तिथक्षेञ दक्षिण काशी क्षेत्र माहूली आहे तर पश्चिमेचा काठ संगम माहूली या नावाने ओळखला जातो . छ ऱाजाराम महाराजांच्या काळात कोथा प्रभूणे यांनी क्षेत्र माहुली हे गाव वसवीले अशी एक नोंद गॅझेटीअर मध्ये आहे. असे असले तरी त्याहूनही प्राचीन वसाहतीचे पुरावे या गावात आहेत . संगम माहुलीची स्थापना शाहू महाराजांच्या काळात झाली. शाहू महाराज काही धार्मीक विधी करण्यासाठी माहुलीस आले असता त्यांना ब्राम्हण उपलब्ध झाला नाही .मग ते विधी त्यांच्या बरोबर आलेले श्रीपतराव पंतप्रतीनीधीनी केले .त्याबद्द्ल शाहू महाराजांनी त्यांना एक चाहुर म्हणजे जवळ पास शंभर एकर इतकी जमीन दान दिली .पंतप्रतीनीधींनी देखिल या संधीचे सोन केल .कृष्णा-वेण्णेच्या पश्चिम काठावर गाव वसवून संस्कृत वेद अध्ययनास प्रोत्साहन दिले ,नदीच्या काठावर अतिशय देखणे घाट, मंदिरे बांधली .

माहूलीच्या दोन्ही काठावर मिळून दहा-बारा मंदिरे आहेत .यातील संगम माहुली गावात आत शिरताना कमानीतून उजव्या बाजूस जे मंदिर व घाट दिसतो ते सगुणेश्वराचे मंदिर .1865 च्या सुमारास सातारच्या राजघराण्यातील छ. शहाजीराजे यांच्या पत्नी सगुणाबाई ऊर्फ़ आईसाहेब यांनी हा घाट व मंदिर बांधले. 150 वर्षे नंतरही इथला घाट , ओवर्या आजही खुप चांगल्या स्थितीत आहे .

मराठा स्थापत्य शैलीत संपूर्ण दगडात बांधलेले मंदिर त्यापूढचा लाकडी मंडप सातारच्या राजघराण्याच्या उत्तम देखरेखीत असल्याने खुप चांगल्या स्थितीत पहावयास मिळतो .या मंदिरापासून थोड पुढे गेल्यास रस्त्याच्या डाव्या बाजूस काही जिर्ण समाध्या पहायला मिळतात .त्यावरील कोरीवकामातील राजचिन्हे या समाध्या राजघराण्यातील व्यक्तींच्या असाव्यात याची साक्ष देतात .यांच्या समोरच रस्त्याच्या उजव्या बाजूला एक श्वानाचे शिल्प बसवलेली चौथरा दिसते .उपलब्ध माहिती नुसार ही *छ.शाहूमहाराजांचा “खंडया*” नावाचा एक श्वान होता त्यांची समाधी आहे .याच खंड्याने वाघापासून छ. शाहू महाराजांचे प्राण वाचवले असा इतिहास आहे .

नदीकडे जाणार्या याच रस्त्यावर अतिशय प्रशस्त अशी राजचिन्हांकीत समाधी आहे .ही समाधी *छ. शहाजी ऊर्फ आप्पासाहेब महाराजांची* आहे . या समाधीच्या बाजूला रथखाना आहे . कृष्णा वेण्णामाईच्या यात्रेच्या वेळी हाच रथ वापरला जातो .या रथोत्सवासही सुमारे 300 वर्षाची परंपरा आहे .याच परीसरात सन 1730 ते 1790 या काळात बांधलेली *भैरवनाथ मंदिर,कृष्णाबाई मंदिर, कृष्णेश्वर मंदिर* अशी लहान मोठी मंदीरे आहे. इथूनच पुढे गेल्यास अतिशय सुंदर अशी दिपमाळ दृष्टिस पडते .या दिपमाळी कडे चालत गेल्यास आपण पोहोचतो *श्री काशी विश्वेश्वर* मंदिराच्या प्रशस्त प्रांगणात . माहूलीतील हे एकमेव मंदिरास राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा आहे.अतिशय देखणे असे हे मंदिर 1734 साली श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी बांधले .

मंदिराचा आवार साधारण पंचकोनी असून मंदिराच्या पश्चिमोत्तर बाजूस ओवर्या आहेत तर लागूनच पूर्व बाजूला अष्टकोनी नगारखान्याची वास्तू आहे . मुख्यमंदिराचे बांधकाम काळ्या पाषाणात केले असून शिखर चूनेगच्ची बांधकामाने सजवले आहे .मंदिराच्या गर्भगृहाचे बाह्यांग तारकाकृती असून मंदिराचा मुखमंडप ,स्तंभ रचना पाहीली असता 12-13 व्या शतकातील यादव कालीन मंदिराची आठवण होते .मंदिराच्या समोर स्वतंत्र नंदी मंडप आहे .यातील नंदी सुध्दा अतीशय सुबक आहे. नंदी मंडपाच्या पुढे काही अंतरावर नदीकडे उतरत जाणाऱ्या पायऱ्या व त्या पुढे वाळू खाली दडलेला घाट आहे . या *घाटास राजघाट* असे म्हणतात .या घाटाला लागूनच उजव्या बाजूस नदीपात्रात दोन शिवलींग स्थापन केलेली एक समाधी दिसते.ही समाधी आहे शाहू नगर म्हणजे आपला सातार्याच्या निर्माते छ. संभाजी महाराजांचे पुत्र *छ. शाहू महाराजांची* . या समाधीची जागा नदीपात्रात असल्याने वेळोवेळी डागडूजी करुनही तीचा फारसा उपयोग़ होत नाही .

इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रे यांच्या मते याच परीसरात छ. संभाजी महाराजांच्या पत्नी *छञपती महाराणी येसूबाई साहेब* यांची समाधी होती .परंतू खुप प्रयत्न करूनही तीचा ठावठीकाणा लागला नाही .याच वाळवंटात राजघराण्यातील आणखी काही समाध्या आहेत .पावसाळ्यात नदीला येणार्या पूरा मूळे बर्याचदा या समाध्या वाळू खाली लुप्त होतात .2005 च्या सुमारास सातारच्या जिज्ञासा मंच या संस्थेने राजघराण्यातील जेष्ठ व्यक्ती माजी नगराध्यक्ष छ. शिवाजीराजे भोसलेस यांच्या सहकार्याने व माजी संग्रहालय अभिरक्षक प.ना.पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली अशाच लूप्त झालेल्या *छञपती महाराणी ताराराणी व रामराजे* यांच्या समाध्याचा शोध घेतला होता. *श्री आमुतेश्वर मंदिर* हे स्वयंभू जागृत देवस्थान आहे. *श्री हरिनारायण मंदिर* *श्री व्यंकटेश मंदिर*. *श्री राम मंदिर*. *श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर* *श्री परशुराम मंदिर* अशी अनेक जागृत मंदिरे संगम माहुली आहेत.

वरती सांगितल्या प्रमाणे नदीच्या पलीकडे पूर्व काठावरील गावास क्षेत्र माहुली असे म्हणतात ऩदीला पाणी कामी असल्यास त्याबाजूला नदी ओलांडून जाऊ शकतो पण पाणी जास्त असल्यास बाहेरून सातारा कोरेगाव रस्त्याने ब्रिटीश कालीन पूल ओलांडूनच जावे लागते .इथे पूर्व काठावर जो प्रशस्त घाट दिसतो तो *पेशवेकालीन सावकार अनगळांचा घाट* म्हणून प्रसिध्द आहे .हा घाट व त्यावरील *रामेश्वराचे मंदीर* परशुराम नारायण अनगळ यांनी सन 1708 मध्ये बांधले . हे मंदिर छोटेखानी असले तरी अतिशय सूबक आणि मजबूत बांधणीचे आहे . मंदीराच्या समोर दोन्ही बाजूस दोन दिपमाळा होत्या सध्याला त्यातील एकच शिल्लक आहे .इथला नंदीमंडपही स्वतंत्र असून आतील नंदी अतिशय देखणा आहे. ऩंदीच्या अंगावरील साज ,घूंगूरमाळा अगदी खर्या वाटाव्यात इतक्या रेखिव आहेत .

नंदीवरील शिल्पकारी पहाता इतका देखणा नंदी सातारा जिल्ह्यात दुसरा नसावा .मंदिराच्या मागील बाजूस पाच कमानींचा मठ असून आतमध्ये राम पंचायतनाच्या काळ्या पाषाणातील सुंदर मुर्ती आहेत .या मंदिराचे निर्माते सावकार अनगळ हे पेशवाईतील फार मोठे प्रस्त होते .त्यांना अचानक धनलाभ झाल्याने त्यांनी त्या पैशातून अनेक मंदीरे बांधली, जिर्णोध्दार केले अशी मान्यता आहे. अनगळाच्या घाटाशेजारीच नदीपात्रात पुढे पर्यंत आलेला एक अपूर्ण घाट दिसतो .हा घाट *दुसरे बाजीराव पेशव्यानी* बांधला अशी माहीती मिळते .त्या वेळच्या राजकीय धामधूमीत या घाटाचे बांधकाम पुर्ण होऊ शकले नसावे .या घाटाच्या उजव्या बाजुस *बिल्वेश्वराचे मंदिर* आहे . हे मंदीर श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी 1742 चा सुमारास म्हणजे पावणे तीनशे वर्षा पुर्वी बांधले अशी माहीती मिळते .

इथून थोड्या अंतरावर नदीलगतच *राधाशंकराचे* अगदी छोटेखानी बांधणीचे मंदिर आहे .हे मंदिर भोरच्या सचिव घराण्यातील ताईसाहेबांनी 1825 च्या सुमारास बांधले .याच्या समोरच कृष्णेच्या पश्चिम काठावर *संगमेश्वराचे मंदिर* आहे .याच्या समोरच कृष्णा व वेण्णा नद्यांचा संगम होतो. या मंदिराचा जिर्णोध्दार श्रीपतराव पंतप्रतिनीधीनी 1742 मध्ये केला अशी माहीती मिळते .या मंदीराची रचना माहुलीतील इतर मंदिरांच्या मानाने थोडी वेगळी आहे .विशेषत: नंदी मंडपाच्या पायास असलेला कुर्म पदाचा आकार व कळसाच्या आमलकास आधार देणारी शृंग हे या मंदीराचे वेगळेपण आहे .या मंदिराच्या शिवलींगावर दुर्मीळ अशी सुवर्ण शलाका असल्याने यास सुवर्णेश्वर असेही नाव आहे. या मंदीराच्या घाटाजवळच बनशापूरी नावाच्या एका साधूची व त्याच्या शिष्याची समाधी आहे .या समाध्या देखिल अतिशय प्रेक्षणीय आहेत .

पुराण काथांनूसार सूर्यवंशातील राजा भगीरथाने आपल्या पुर्वजांच्या उध्दारासाठी घोर तप करुन गंगेला स्वर्गलोकातून पृथ्वीवर आणले . तिच्या पाण्याच्या स्पर्शाने पुर्वजाना मुक्ती दिली .भगीरथाच्या या पापक्षालन किंवा गंगावतरण या मिथकाचा जनमानसावर पगडा होता की गंगेच्या बरोबरीने जेवढ्या म्हणून नद्या होत्या त्यांचे काठ समाध्या ,स्मृती मंदिरे वा चिरेबंदी घाटाच्या कशिदाकारीने सजून गेले. आदिम काळी मानवी जीवनाचा पाया रचणारे नदी काठ त्याच्या वैराग्य वृत्तीची घाटांनी ,सांस्कृतीक संमृध्दीच्या मंदिरांनी अन कला वैभवाच्या शिखरांनी बहरून गेले .पण आज मितीला मात्र हे सांस्कृतीक वैभव निस्तेज होऊ लागलय. आपल्याच अनास्थेने, प्रदुषणाने हा कला वारसा बकाल होऊ लागलाय . पण जमेची बाजू अशी की इतर ठिकाणांच्या मानाने आपली माहुलीची परिस्थीती अजून तरी चांगलीच आहे आणि तीचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या मंदिरात व परिसरात अनेक चित्रपटांचे शुटिंग झाले आहे.तिथक्षेञ दक्षिण काशी.

सौजन्य – वाडे गढी गडकोट ऐतिहासिक वास्तू इतिहासाचे मूक साक्षीदार

फोटो – केविन स्टैंडेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here