साल्हेर | Salher Fort

साल्हेर | Salher Fort | सालोटा | Salota Fort

साल्हेर | Salher Fort

महाराष्ट्रात भटकंतीसाठी प्रसिध्द असलेल्या दुर्गजोडीमध्ये नाशीक जिल्ह्यातील डोलबारी डोंगररांगेत असलेले साल्हेर-सालोटा या किल्ल्यांचा सर्वात वरचा क्रमांक आहे. यातील साल्हेर(Salher Fort) हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असुन गुजरातमधील डांग आणि महाराष्ट्रातील बागलाण या प्रांतांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर असलेला हा एक महत्वाचा किल्ला होता. सहा घाटवाटेवर लक्ष ठेवणारा हेर तो साल्हेर अशी या किल्ल्याची ओळख असली तरी महाराष्ट्रात याची खरी ओळख आहे ती शिवकाळात या किल्ल्याखाली झालेल्या लढाईमुळे. महाराजांचा बालपणीचा सोबती सुर्याजी काकडे याला गोळी लागुन या लढाईत वीरमरण आले व हा किल्ला शिवचरित्रात अमर झाला. गुजरात महाराष्ट्र यांच्या सीमेवर साल्हेर-सालोटा हे दोन्ही किल्ले वसलेले असुन केवळ एका खिंडीने एकमेकापासुन वेगळे झाले आहेत.

साल्हेर किल्ल्यावर जाण्यासाठी साल्हेरवाडी व वाघांबे खिंड अशा दोन स्वतंत्र वाटा आहेत. साल्हेरवाडी या वाटेने सहा दरवाजे पार करून तीन तासांनी आपण गडावर पोहोचतो तर वाघांबे या वाटेने चार दरवाजे पार करून अडीच तासात आपण गडावर पोहोचतो. वाघांबे खिंडीत जाण्यासाठी वाघांबे,कोपमाळ,साल्हेर, अशा तीन गावातुन वाटा आहेत. आपण एका वाटेने चढुन दुसऱ्या वाटेने गड खाली उतरल्यास संपुर्ण किल्ला व्यवस्थित पाहुन होतो. साल्हेर-सालोटा हि भटकंती एकत्र करावयाची असल्यास वाघांबे गावातुन येणारी वाट सोयीची ठरते. या वाटेने आधी सालोटा करून खिंडीतील दरवाजाने साल्हेरवर जाता येते व साल्हेर किल्ला पाहुन साल्हेरवाडीत उतरता येते. या वाटेने सकाळी लवकर सुरुवात केल्यास कमी श्रमात व कमी वेळात दोन्ही किल्ले एका दिवसात संपुर्णपणे पाहुन होतात.

सालोटा किल्ल्याच्या उत्तर पायथ्याशी असलेले वाघांबे गाव नाशिकपासुन १३४ कि.मी.वर तर सटाणा या तालुक्याच्या ठिकाणापासुन ताहराबादमार्गे ४५ कि.मी. अंतरावर आहे. साल्हेरवाडी हे गाव वाघांबे गावापुढे ७ कि.मी.अंतरावर आहे. वाघांबे गावात रस्त्याच्या डाव्या बाजुस असलेल्या लहानशा सप्तशृंगी मंदिरामागुन साल्हेर-सालोटा मधील खिंडीत जाण्यासाठी वाट असुन गडमाथ्याशिवाय वाटेत पाणी नसल्याने गाडी थांबते तेथील टाकीतुन पाणी भरून घ्यावे. वाघांबे गावातुन खिंडीत जाण्यास दिड तास तर गडावर जाण्यास साधारण अडीच तास लागतात. वाघांबे गावातुन खिंडीकडे पाहिल्यास सालोटा किल्ल्याची उजवीकडील डोंगरसोंड गावाकडे उतरताना दिसते. या सोंडेवरूनच खिंडीत जाण्यासाठी वाट आहे. साल्हेरवर जाणारे बहुतेक भटके या वाटेचा वापर करत असल्याने वाट बऱ्यापैकी रुळलेली आहे.

डोंगरसोंडेच्या वरील पठारावर काही उध्वस्त अवशेष दिसुन येतात. या ठिकाणी बहुदा खिंडीतून गडावर जाणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी गडाचे मेट असावे. या वाटेच्या पुढील भागात काही ठिकाणी खडकात कोरलेल्या पायऱ्या दिसुन येतात. खिंडीच्या थोडे अलीकडे वाटेच्या उजव्या बाजुस झऱ्याचे पाणी साठविण्यासाठी खडकात कोरलेले लहानसे पाण्याचे टाके असुन या झऱ्यात जानेवारी पर्यंत पाणी असते. खिंडीत आल्यावर डावीकडील वाट सालोटा किल्ल्याच्या डोंगराला डावीकडे ठेवत वर जाते तर उजवीकडील वाट खिंडीत उतरून साल्हेर किल्ल्यावर जाते. येथुन साल्हेर डोंगराकडे पाहीले असता उजवीकडील सोंडेवर कातळात कोरलेल्या पायऱ्या व दरवाजा दिसतो. पण तेथे जाण्यासाठी थेट वाट नाही. येथुन मळलेल्या वाटेने साल्हेर डोंगराच्या धारेवरून काही अंतर सरळ चालत गेल्यावर हि वाट पुन्हा मागे वळते. या वाटेच्या पुढील भागात सोंडेच्या दिशेला जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. कातळात कोरलेल्या या पायऱ्या चढुन दरीच्या काठाने आपण गडाच्या पहील्या दक्षिणाभिमुख दरवाजात पोहोचतो.

कातळ कोरून थोडीशी सपाटी करून त्यावर हा दरवाजा बांधलेला असुन या दरवाजाच्या एका बाजुस उंच कातळकडा तर दुसऱ्या बाजुस खोल दरी आहे. हा दरवाजा थेट वाटेसमोर बांधलेला नसुन दरीच्या दिशेने बांधलेला असल्याने समोरून दिसत नाही. या दरवाजाने आत प्रवेश केल्यावर गडावर जाण्यासाठी सोंडेवर कातळात कोरलेला पायरीमार्ग सुरु होतो. पायऱ्या चढुन वर गेल्यावर आपण गडाच्या दुसऱ्या उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजा समोरील कातळात देवनागरी लिपीत गुजराती मराठी संमीश्र भाषेत शिलालेख कोरलेला आहे. थोडयाफार प्रमाणात कोरीवकामाने सजवलेला हा दरवाजा दोन्ही बाजुस कातळ कोरून त्यामध्ये बांधलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजुस डावीकडे पहारेकऱ्यासाठी देवडी कोरलेली असुन दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. हा दरवाजा पार करून काही पायऱ्या चढल्यावर आपण गडाच्या तिसऱ्या कमानीदार उत्तराभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या कमानीवर दोन्ही बाजुस फुलांची नक्षी कोरलेली आहे. या दरवाजाची रचना पहील्या दरवाजा प्रमाणे असुन एका बाजुस दरी तर दुसऱ्या बाजुस किल्ल्याचा कातळकडा आहे. येथुन पुढे गडावर जाणारा मार्ग पुर्णपणे कडयामध्ये कोरलेला असुन काही ठिकाणी दरीच्या दिशेने २-३ फुटाची भिंत कोरली आहे. या वाटेवर कडयाच्या पोटात २०-२२ गुहा कोरलेल्या असुन ८-१० पाण्याची टाकी आहेत. या गुहांची मोठया प्रमाणात पडझड झाली असुन काही गुहांमध्ये पाणी साठले आहे. यातील एका गुहेबाहेर कातळकडयावर काही शिल्प कोरलेली आहेत. टाक्यांची देखील हीच अवस्था असुन एक टाके वगळता कोठेही पिण्यायोग्य पाणी नाही. या वाटेवरून मागे पहिले असता सालोटा किल्ल्याचे सुंदर दर्शन होते.

कडयाखालील या वाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तर टोकावरील गोलाकार बुरुजावर पोहोचतो. बुरुजाच्या डाव्या बाजुस असलेल्या पायऱ्यांनी आपण गडाच्या चौथ्या पुर्वाभिमुख दरवाजात पोहोचतो. या दरवाजातील कातळकोरीव पायऱ्या चढुन आपण साल्हेर किल्ल्याच्या गादीपठारावर पोहोचतो. दरवाजातुन थोडे पुढे आल्यावर वाटेवरच उजवीकडे कोरडे पडलेले पाण्याचे टाके आहे. या पठारावर गायकवाडांची गादी म्हणजेच सदर असल्याने हे पठार गादीपठार म्हणुन ओळखले जाते. पठारावर आल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस डोंगराच्या उतारावर एक भलामोठा चौथरा असुन त्यावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. हि गडाची सदर आहे. वाटेने पुढे जाताना दोन्ही बाजुस घरांची जोती व चौथरे पहायला मिळतात. हे अवशेष पाहुन पुढे आल्यावर गडावरील ११० x १७५ फुट आकाराचा घडीव दगडात बांधलेला गंगासागर नावाचा मोठा तलाव पहायला मिळतो. तलावाच्या मध्यभागी पाण्याची पातळी मोजण्याकरता दगडी खांब रोवलेला आहे.

तलावाच्या अलीकडे काठावर कातळात कोरलेली आयताकार आकाराची दोन मोठी टाकी असुन या टाक्यांना गंगा-यमुना नाव आहे. तलाव बहुतांशी गाळाने भरलेला असुन त्यातील व या दोन्ही टाक्यातील हिरवेगार पाणी पिण्यायोग्य नाही. तलावाला लागुनच १०० x १०० आकाराचा एक मोठा चौथरा आहे. तलावाच्या डाव्या काठावर घडीव दगडात बांधलेले रेणुका मातेचे उध्वस्त मंदिर आहे. मंदिराचे गर्भगृह आजही शिल्लक असुन सभामंडपाच्या कोसळलेल्या भिंतीत असलेले कोरीव खांब या मंदीराच्या पूर्वीच्या सौंदर्याची जाणीव करून देतात. गाभाऱ्यात रेणुका मातेची मुर्ती असुन डावीकडे कोनाड्यात गणेशाची मुर्ती आहे. या मंदिराजवळ असलेल्या लहानशा भुमिगत टाक्यात पाण्याचा जिवंत झरा असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याला संजीवन टाके नाव असुन यातील पाणी फक्त मार्च महिन्यापर्यंत उपलब्ध असते. मंदिराकडून डावीकडील टेकडीकडे पहिले असता टेकडीच्या माथ्यावर एक मंदीर दिसते. मंदिराकडून या टेकडीकडे निघाल्यावर टेकडीच्या पायथ्याशी रांगेत खोदलेल्या तीन गुहा नजरेस पडतात. यातील दोन गुहांमध्ये रहाण्याची सोय होऊ शकते. यातील उजवीकडील गुहेत एक चौथरा बांधुन त्यावर मारुतीची व दत्ताची मुर्ती स्थापन केलेली आहे.

एका गुहेतुन दुसऱ्या गुहेत जाण्यासाठी मधील भिंतीत लहान दरवाजा कोरलेला असुन त्यावर काही कोनाडे बांधले आहेत. दुसऱ्या गुहेतील एक खांब अतीशय सुंदर रीतीने कोरलेला असुन उरलेले खांब कोरण्याचे काम अर्धवट राहिले असावे. गुहेकडून मळलेल्या वाटेने टेकडीच्या माथ्यावरील मंदीराकडे निघाल्यावर आपण मंदिराच्या उंचवट्याखाली असलेल्या पठारावर येतो. पठारावरून फेरी मारली असता साल्हेरवाडीतुन गडाच्या खालील माचीवर येणारा संपुर्ण मार्ग तसेच साल्हेरचा अर्धवर्तुळाकार कडा नजरेस पडतो. पठारावरील उंचवट्यावर मुळ चौथऱ्यावर नव्याने बांधलेले परशुरामाचे मंदीर असुन या मंदिरात त्यांच्या दगडी पादुका व दोन अनघड मुर्तींची स्थापना केलेली आहे. गडाचा हा सर्वात उंच भाग असुन येथुन संपुर्ण गादीपठार नजरेस पडते. पठाराच्या चारही बाजुस उंच कातळकडे असल्याने कोठेही तटबंदी बांधल्याचे दिसुन येत नाही. गादीपठाराचा परीसर पुर्वपश्चिम ११२ एकरवर पसरलेला असुन यावर मोठया प्रमाणात असलेले बांधकाम व पाण्याची टाकी पहाता येथे एखादे नगरच वसलेले दिसते. साल्हेरचा हा माथा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर असुन या ठिकाणी त्याची समुद्रसपाटीपासुन उंची ५१४१ फुट आहे.

साल्हेर गडाचे स्थान आणि उंची यामुळे येथुन अचला, अहिवंत,मार्कंडेय, सप्तशृंगी, रवळा-जवळा, धोडप, कांचन, राजदेहेर, चौल्हेर, भिलाई, मुल्हेर, मोरा,हरगड,मांगी-तुंगी, रतनगड यासारखे जवळपास २०-२२ किल्ले दिसतात पण ओळखता यायला हवे. माथ्यावरून सालोटा किल्ला व टकारा सुळका यांचे अप्रतिम दर्शन होते. मंदीराच्या टेकडीवरून खाली उतरल्यावर गुहेकडे न जाता सरळ जाणाऱ्या वाटेने आपल्या पुढील गडफेरीस सुरवात करावी. गडाच्या दुसऱ्या टोकाकडे जाताना वाटेवर कातळात कोरून वर घडीव दगडात बांधलेले यज्ञकुंड दिसते. या दगडाशेजारी लहान दगडी ढोणी आहे. पुढे गेल्यावर वाटेच्या डाव्या बाजुस कातळात कोरलेले पाण्याचे टाके असुन यात पिण्यायोग्य पाणी वर्षभर असते. टाके पाहुन पुढे जाताना डाव्या बाजुस मोठया प्रमाणात वास्तु अवशेष असुन यात कातळात कोरलेली पाण्याची दोन टाकी आहेत. यातील एका टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. पाण्याची टाकी व त्याच्या आसपास असलेले अवशेष पाहुन पुन्हा आपल्या वाटेवर यावे. या वाटेने आपण किल्ल्याच्या पश्चिम टोकावर उभ्या कडयात बांधलेल्या पाश्चिमाभिमुख दरवाजात पोहोचतो. दरवाजाचा वरील भाग तटबंदीने बंदिस्त केलेला असुन या दरवाजाने आपली गड उतरण्यास सुरवात होते.

दरवाजा बाहेरील कातळात कोरलेल्या पायऱ्या उतरून आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या आतील भागात पहारेकऱ्यासाठी देवडी बांधलेली आहे. हा दरवाजा पार करून आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजातून पायऱ्या उतरताना वाटेवर कातळात कोरलेले एक कोठार पहायला मिळते. हा संपुर्ण मार्ग कातळात कोरून काढलेला असुन यात संरक्षणासाठी एकामागे एक अशी तीन दरवाजांची साखळी उभी केलेली आहे. हे सर्व दरवाजे पार करून आपण गडमाथ्याखाली असलेल्या माचीवर येतो. आपण आता उतरलो हा साल्हेर वाडीतून येणारा मार्ग आहे. या माचीवर मोठया प्रमाणात घरांचे अवशेष असुन या माचीवरील वस्ती पाण्याअभावी अलीकडील काळात साल्हेरवाडीत वसली आहे. वाटेने पुढे जाताना उजव्या बाजुस ५० x २० फुट आकाराचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके असुन यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याच्या पुढील भागात घरांचे काही चौथरे व जोती असुन त्यात अखंड दगडात कोरलेला एक समाधी चौथरा आहे. या चौथऱ्यावर पाउले कोरलेली असुन समोर तोफगोळा मांडलेला आहे. या चौथऱ्या शेजारी पाउले कोरलेला दुसरा लहान चौथरा आहे. या भागात दरी काठावर रचीव दगडांची तटबंदी आहे.

वाटेने पुढे गेल्यावर माचीवर प्रवेश करणाऱ्या तीन दरवाजांची साखळी सुरु होते. बाहेर पडताना पहिला दरवाजा उत्तराभिमुख असुन दरवाजाच्या कमानीवर फुलांची नक्षी व कोरीवकाम केलेले आहे. दरवाजासमोर रुंद पायऱ्या व कठडा बांधलेला आहे. हा साल्हेर माचीचा महादरवाजा असावा. या दरवाजाच्या डाव्या बाजुस कमानीच्या चौकटीवर देवनागरी लिपीत गुजराती भाषेतील शिलालेख असुन कुणा तंबाखूछापने त्यावर चुन्याने रंगकाम केलेले आहे. गडाच्या दुसऱ्या पुर्वाभिमुख दरवाजाच्या चौकटीवर काही प्रमाणात कोरीवकाम केलेले असुन समोरील बाजुस पाण्याचे उध्वस्त टाके आहे. या दोन्ही दरवाजामध्ये रणमंडळाची रचना असुन हे दोन्ही दरवाजे पार करून आपण गडाच्या पुर्वाभिमुख असलेल्या तिसऱ्या मुख्य दरवाजात येतो. साल्हेर गावातून चढताना लागणारा हा पहिला दरवाजा. साध्या बांधणीच्या हा दरवाजा दोन बुरुजात बांधलेला आहे.

साल्हेरवाडीतून आल्यास आपला गडफेरीचा क्रम पुर्णपणे उलट होतो. गडातून बाहेर पडल्यावर कातळात कोरलेल्या पायरीमार्गाने आपण गडाखालील जंगलात येतो. या जंगलात एक साधे पण जुने मंदिर असुन या मंदिरात सिद्धिविनायक तसेच भवानी देवीची मुर्ती आहे. मंदिराच्या मागील भागात एक विहीर असुन जवळच एका झाडाखाली कोनाडयात गणपतीची मुर्ती ठेवलेली आहे. जंगलात फेरी मारताना बरीच विखुरलेली शिल्प पहायला मिळतात. याशिवाय जंगलात नव्याने बांधलेले साल्हेर निवासिनी गडकलिका देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या मागील बाजुस दोन हनुमान शिल्प असुन या शिल्पाजवळ चार विरगळ,दोन नंदी, काही कोरीव मुर्ती तसेच पाच तोफगोळे ठेवलेले आहे. जंगलातुन बाहेर पडुन साल्हेरवाडीत जाताना उजवीकडे कातळात कोरलेले पाण्याचे टाके दिसते. या टाक्याच्या वरील बाजुस असलेल्या झाडीत काही विरगळ पडलेल्या आहेत. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते.

वाघांबे गावातुन सुरवात करून संपुर्ण किल्ला पाहुन गडपायथ्याशी येण्यास आठ तास लागतात. गडावरील गुहाशिवाय किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मंदिरात तसेच पूर्वनोंदणी केल्यास साल्हेर गावातील वनविभागाच्या गेस्ट हाऊस मध्ये रहाण्याची सोय होते. साल्हेर किल्ल्याचा संबंध थेट पुराणाशी जोडला जातो. परशुरामाची तपोभूमी असलेल्या या किल्ल्यावरून पृथ्वीदान केल्यावर स्वत:साठी भुमी निर्माण करताना परशुरामाने येथुन बाण सोडुन समुद्राला मागे हटवले अशी कथा आहे. याला पुरावा म्हणुन समोर छिद्र पडलेला कंडाणा किल्ल्याचा डोंगर दाखवला जातो. किल्ल्यावरीळ कातळात कोरलेल्या गुहा व पाण्याची टाकी पहाता सातवाहनकाळात हा किल्ला अस्तित्वात असावा. नंतरच्या काळात राष्ट्रकुटांची सत्ता असलेला हा भाग यादवांच्या ताब्यात व त्यानंतर गवळीवंशीय अहीर राजांच्या ताब्यात आला. इ.स. १३०८ मध्ये बागुलराजा नानदेव याने गवळीराजा महेश याचा पराभव केला व साल्हेर-मुल्हेर किल्ले जिंकुन येथील सत्ता काबीज केली. त्यानंतर ३५० वर्ष या भागावर बागुलांचे राज्य होते.

इ.स.१३४० मध्ये तारिख-इ-फीरोझशाही या ग्रंथात नानदेव या बागुल राजाच्या ताब्यात मुल्हेर व साल्हेर हे किल्ले असल्याचे उल्लेख येतात. अबुल फजल लिखित अकबरनामा या ग्रंथाच्या आईन-इ-अकबरी (१५९०) या ग्रंथात मुल्हेर-साल्हेर हे बळकट किल्ले बागलाणात असल्याचे उल्लेख येतात. अकबराने खानदेश जिंकला त्यावेळे येथे असलेल्या प्रतापशहा बहिर्जी राजाने मुघलांशी मैत्रीचे संबंध निर्माण केले. इ.स.१६१० मध्ये इंग्रज प्रवासी फिंच मुल्हेर व साल्हेर यांचा उत्तम शहरे म्हणुन उल्लेख करताना येथे महमुदी नाण्यांची टांकसाळ असल्याचा उल्लेख येतो. औरंगजेब दक्षिणेचा सुभेदार असताना सय्यद अब्दुल वहाब याने फेब्रुवारी १६३८ मध्ये साल्हेर किल्ला काबीज केला. बागलाणचा राजा बहिर्जी मोगलांना शरण गेला व त्याने साल्हेर- मुल्हेर किल्ले व इतर ठाणी औरंगजेबाच्या हवाली केली. पुढे इ.स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी काढलेल्या बागलाण मोहिमेत मराठयांनी मुल्हेरगडाची पेठ लुटून मोरोपंत पेशव्यांनी साल्हेरला वेढा दिला. मराठे व मोगल सैन्यात झटापट होऊन किल्लेदार फतेउल्लाखान ठार झाला. ५ जानेवारी १६७१ रोजी गडावर भगवे निशाण फडकले. साल्हेर मराठयांनी घेतल्याचे कळताच चिडलेल्या औरंगजेबने बहादुरखान,दिलेरखान,महाबतखान व जसवंतसिंह या चार सरदारांना ४० ते ५० हजारांची फौज देऊन बागलाण मोहीमेवर रवाना केले.

बहादूरखानाने दक्षिणेत आल्याबरोबर साल्हेरच्या किल्ल्याकडे कूच केले व बहादुरखानचा सरदार इखलासखान मियान याने साल्हेरला वेढा घातला. इ.स. १६७१ ला मोगलांचा साल्हेरला प्रचंड वेढा पडला. महाराजांना या वेढय़ाची बातमी कळताच त्यांनी मोगल मुलखात असणारे सेनापती प्रतापराव गुजर व उत्तर कोकणातून मोरोपंत पिंगळे यांना साल्हेरचा वेढा फोडण्यास पाठवले. या दोघांची मोगल सैन्याशी खुल्या मैदानावर समोरासमोर झालेली लढाई साल्हेरची लढाई म्हणुन ओळखली जाते. गनिमी कावा हि मराठयांची युद्धनीती होती पण भर मैदानात लढाई करून आपण मोगलांपेक्षा कमी नाही हे मराठ्यांनी सिद्ध केले व म्हणूनच साल्हेरच्या लढाईला मराठ्यांच्या इतिहासात महत्वाचे स्थान आहे. या लढाईत मोगलांची धूळदाण उडून मराठयांचा विजय झाला. या युद्धाचे सभासदाने मोठे रंजक वर्णन केलेले आहे. या युद्धात महाराजांचे बालपणाचे सवंगडी व पंचहजारी सरदार सूर्याजी काकडे हे तोफगोळा लागुन धारातीर्थी पडले. सभासदाने सुर्याजीला महाभारतातील कर्णाची उपमा दिली आहे. या लढाईत मोगलातर्फे इखलासखान, बहादूरखान, रामअमरसिंग चंदावत, त्याचा मुलगा मुकमसिंग हे लढत होते तर मराठ्यांच्या बाजुने सेनापती प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे, आनंदराव मोहीते, व्यंकाजी दत्ता, रुपाजी भोसले, सूर्यराव काकडे, शिदोजी निंबाळकर, खंडोजी जगताप व गोदोजी जगताप, मानाजी मोरे, विसाजी बल्लाळ, मोरो नागनाथ, मुकुंद बल्लाळ इत्यादी अनेक बिनीचे सरदार लढत होते.

युध्दात प्रचंड प्रमाणात हानी होउन मराठ्यांनी इखलासखान आणि बहादुरखानचा पूर्ण पराभव केला. दिलेरखान हे युद्ध झाले तेव्हां साल्हेरपासून काही अंतरावर होता पण पराजयाची वार्ता कळताच त्याने मागच्या मागे पळ काढला. सहा हजार घोडे, सहा हजार उंट, सव्वाशे हत्ती तसेच खजिना ,जडजवाहीर ,कापड अशी अफाट मालमत्ता मराठयांच्या हातात आली. या लढाईत मोगलांचे खूप मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले व ते शिवाजी अजिंक्य आहे असे मानू लागले. तर खुल्या मैदानात मोगलांच्या प्रचंड सैन्याचा धुव्वा उडवल्याने मराठयांचा आत्मविश्वास वाढला. या लढाईच्या विजयाबद्दल लिहिताना कवी भुषण आपल्या शिवबावनी मध्ये म्हणतात ‘शिवाजीने सालेरीचे युद्ध जिंकल्याची बातमी ऐकून शत्रूच्या काळजात धडकी भरली. स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे तिन्ही लोक महाराजांची कीर्ती गाऊ लागले आहेत. साल्हेर जिंकल्यावर लवकरच मराठयांनी मुल्हेर किल्ला जिंकला व बागलाण प्रांतावर मराठयांचा जम बसवला. या युद्धाची वार्ता कळताच बहादूरखान मोठ्या तातडीने बागलाणाकडे रवाना झाला. परंतु तो येण्यापुर्वीच साल्हेरवर जय मिळवून मराठे कोकणात उतरले होते. बहादूरखान मराठ्यांच्या मागे निघाला. त्याची हिंमत महाराज जाणून असल्याने ते म्हणतात बहादूरखान पेंडीचे गुरू आहे त्याचा गुमान काय आहे? शिवाजी महाराज असेपर्यंत हा गड स्वराज्यातच होता.

संभाजीराजांच्या काळात औरंगजेब स्वराज्यावर चालून आला तेव्हा त्याने शहाजादा आजमला साल्हेर घेण्याची कामगिरी सोपवली. इ.स.१६८२ मध्ये मोगलांनी साल्हेर घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण त्यांना तो जिंकता आला नाही. तेव्हा मुल्हेरचा किल्लेदार नेकनामखान याने साल्हेरच्या किल्लेदाराला लाच देऊन किल्ला सोडण्यासाठी खटपट केली. त्यावेळचा मोगल इतिहासकार खाफीखान म्हणतो. साल्हेरचा किल्लेदार असाजी कृष्णाजी याने काही रुपयांसाठी व इतर बक्षिसासाठी साल्हेर मोगलांना देऊन टाकला. यावेळी मिर्झा फारूक बेग याची किल्लेदार म्हणुन नेमणुक करण्यात आली व किल्ल्याचे नाव सुलतानगड ठेवण्यात आले. इ.स.१६९४ साली मिर्झा फारूक बेग याच्या जागी सुरतसिंह याची किल्लेदार म्हणुन नेमणुक करण्यात आली. यानंतर मुहम्मद ताहीर,पिसर महमद यांच्यानंतर १६९९ साली बहरोजखान याची किल्लेदार म्हणुन नेमणुक करण्यात आली.

इ.स.१७२४ साली हैद्राबाद निजामशाहीच्या स्थापनेनंतर हा किल्ला निजामाच्या ताब्यात गेला. इ.स.१७६८ साली धोडपच्या लढाईनंतर साल्हेरचा किल्ला व आसपासचा ६५००० रुपये उत्पन्नाचा मुलुख पेशव्यांनी बडोद्याच्या गोविंदराव गायकवाडांच्या पत्नी गहीनाबाई गायकवाड यांना दिला पण हा ताबा निजामाने हा ताबा बहुदा दिला नसावा कारण १७९५ साली निजामाने हा किल्ला पेशव्यांना दिल्याचा उल्लेख येतो. सन १८१८ च्या शेवटच्या इंग्रज मराठा युद्धानंतर १५ जुलै १८१८ रोजी इंग्रजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला पण बडोद्याचे दिवाण श्रीसमर्थ यांनी साल्हेरची सर्व कागदपत्रे ब्रिटीशाना दाखवली तेव्जा त्यांनी हा किल्ला बडोद्याच्या गायकवाडांच्या ताब्यात दिला.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here