महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,64,799

रतनगड | Ratangad Fort

By Discover Maharashtra Views: 4442 11 Min Read

रतनगड | Ratangad Fort

नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर कळसुबाई डोंगररांग आहे. या डोंगररांगेत वसलेल्या दुर्गापैकी रतनगड(Ratangad Fort) हा घनचक्कर रांगेत प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला एक दुर्ग. प्रवरा नदीवरील भंडारदरा धरणामुळे सधन आणि सुपीक झालेला हा प्रदेश आहे. रतनगडाचा किल्ला भंडारदरा धरणाच्या मागे पश्चिमेला सह्याद्रीच्या मुख्य कण्यावर आहे. रतनगडाच्या उजवीकडे असलेला सुळका रतनगडाचा खुटा म्हणून ओळखला जातो.

रतनवाडी हे गडाच्या पायथ्याचे गाव असुन सांदण दरीसाठी प्रसिध्द असलेले साम्रद गाव देखील गडाच्या घेऱ्यातच आहे. इगतपूरी-घोटी–शेंडी-रतनवाडी किंवा साम्रद हे अंतर साधारणपणे ७० कि.मी. आहे. भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळील शेंडी गावातुन एक फाटा साम्रदकडे तर दुसरा फाटा रतनवाडीकडे जातो. रतनवाडी आणि साम्रद या दोनही गावातुन रतनगडावर जाता येते. रतनगडाची समुद्रसपाटीपासुन उंची साधारण ३५०० फुट आहे. रतनगड व आसपासचा परीसर संपुर्ण फिरायचा असल्यास रतनवाडी गावातुन चढुन साम्रद गावात उतरावे किंवा साम्रद गावातुन चढण्यास सुरवात करावी व रतनवाडीत उतरावे. साम्रद गावातुन जाताना पाणी भरुन वाटाडय़ा सोबतीला घेणे गरजेचे आहे कारण वाटेत कोठेही पाणी नाही.

गडावर जायची वाट जंगलातून जात असली तरी काही ठिकाणची खडी चढण मात्र दमवते. या वाटेने जाताना डावीकडे खोल दरीतील बाणचा सुळका आपले लक्ष वेधून घेतो. या वाटेने चढताना आपल्याला दोन छोटया शिड्या लागतात. दुसऱ्या शिडीने वर चढले की डावीकडची वाट रतनवाडीकडे तर उजवी वाट रतनगडावर जाते. साम्रदमधून आपण साधारण दीड ते दोन तासात रतनगडच्या खुटय़ाला वळसा मारुन आपण रतनगडाच्या कातळ भिंतीना भिडतो. कातळभिंतीच्या कडेने आडवे चालत गेल्यावर ५० ते ६० कातळात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या कातळकोरीव पायऱ्या व कातळात कोरलेल्या त्र्यंबक दरवाजाने आपण गडामधे प्रवेश करतो. या प्रवेशद्वारातच पहारेकऱ्याच्या दगडात कोरलेल्या देवडय़ा आहेत.

दरवाजातुन वर आल्यावर येथुन अलंग, मदन, कुलंग, कळसुबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, खुट्टा, माहुली हा परिसर दिसतो. या माचीवर उध्वस्त मंदिर असुन घराचे काही अवशेष आढळतात. येथुन वर गेल्यावर गडाच्या कातळभिंतीत सहा-सात माणसे सहज बसु शकतील असे निसर्गनिर्मीत नेढे आढळते. या नेढ्यातून चहुबाजुंचा परिसर दिसतो. नेढ्याच्या दुसऱ्या बाजुस खालच्या अंगाला पाण्याचे एक टाके असुन थोडे पुढे गेल्यावर दोन विस्तीर्ण टाके लागतात. येथून पुढे गेल्यावर सहासात टाक्यांची रांग आढळते. या टाक्यावर एका ठिकाणी शिवलिंग कोरलेले आहे. याच्या पुढे आपल्याला एक वेगळीच रचना दिसून येते. येथे जमिनीला समांतर असे एक टाके असुन या टाक्याच्या आत शिरण्यासाठी एक छोटासा दरवाजा आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आत दगडात कोरलेल्या दोन मोठया खोल्या आहेत. यातील एक खोली अर्धवट खोदलेली असुन दुसरी खोली २०x३० आकाराची आहे पण या खोलीत पाणी साठलेले आहे. या टाक्याच्या दुस्त्या बाजुस चर खोदलेला असुन चराच्या सुरवातीच्या तोंडास दरवाज्यासारखे बांधकाम आहे.

काही लोकांच्या मते येथे तळघर किंवा भुयार असावे. येथुन साधारणत: ५ मिनिटे चालल्यावर उजवीकडील बाजुस उध्वस्त स्थितीत कोकण दरवाजा लागतो. येथुन खाली उतरणारी वाट मात्र वापरात नसल्याने धोकादायक आहे. येथुन थोडे पुढे गेल्यावर आपण गडाच्या रतनवाडीकडील भागात येतो. या भागात गडावरील सर्वाधिक अवशेष आहेत. येथे वाड्याचे अथवा सदरेचे अवशेष असुन जवळच एक सुटा टेहळणीचा भग्नावस्थेतील मनोऱ्यासारखा गोल बुरुज आहे. याला राणीचा हुडा म्हणतात. तो कुठल्याही तटाला लागुन नसल्याने बहुधा गडाच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवण्यासाठी याची रचना असावी. या बुरुजाला लागुन पाण्याचे एक टाके असुन पुढील बाजुस पाण्याची अजुन तीन मोठी टाकी आहेत. यात पिण्यायोग्य पाण्याचे एक टाके आहे. इथे एका टाक्यात नंदी आणि शिवलींग पहायला मिळते. या भागातील गडाची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक आहे.

डावीकडची वाट आपल्याला गडाच्या दुसऱ्या प्रवेशदाराकडे नेते. या दरवाज्यावर मत्स्यावतारातील विष्णू, गणेश-रिद्धी-सिद्धी आणि हनुमानाचे शिल्प कोरलेले आहे. या दरवाजाच्या समोर डाव्या बाजूस कडय़ात कोरलेल्या दोन प्रशस्त गुहा आहेत. यात २० ते २५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. यातील एका गुहेत गडाची देवता रत्नादेवीचा तांदळा आहे. इथे जवळच पाण्याचे टाकेही असल्याने इथुनच प्रवरा नदीचा उगम झाल्याचे म्हटले जाते. समोर भंडारदरा धरणाचा जलाशय, प्रवरा नदी, पाबरगड आणि घनचक्करचे पठार दिसते. गुहेच्या खालील बाजुस गणेशाचे शिल्प कोरलेला गणेश दरवाजा आहे. रतनवाडीत जाण्यासाठी या गणेश दरवाजातुन खाली उतरावे लागते. वाटेमध्ये असलेला २५ ते ३० फुटाचा कातळकडा पार करण्यासाठी दोन ठिकाणी लोखंडी शिड्या लावल्या आहेत. येथेच पुर्वीच्या कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या खुणा दिसुन येतात.

ब्रिटिशांनी १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे या गडावरसुद्धा तोफा डागून वर जाण्याचे सगळे मार्ग बंद केले होते. त्याच्यानंतर अगदी निमुळत्या दगडात खोदलेल्या पायऱ्या पुढे थोडी सपाटी व नंतर काही पायऱ्या असा प्रवास करुन आपण खाली उतरतो. खाली वाटेत एका ठिकाणी कात्राबाई-हरिश्चंद्रकडे जाणारा पुर्वीचा राजमार्ग असुन येथे एक दगडी चौथरा बांधला आहे. पुर्वी येथे मोठया प्रमाणावर वस्ती असावी कारण कारण या जंगलात घरांचे अवशेष मोठया प्रमाणात आढळून येतात शिवाय येथे पाण्याची दगडात बांधलेली दोन मोठी टाकी आहेत. हि टाकी आजही भरलेली जवळचे पाणी संपले असल्यास येथील पाणी भरून घेण्यास हरकत नाही.

साम्रत गावातुन निघुन रतनगड फिरून येथे येण्यास पाच तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. येथुन पुढे पायवाटेने घनदाट जंगलातून आपण दीड तासात आपण रतनवाडीत पोहोचतो. या वाटेने जाताना प्रवरा नदीचे पात्र आपल्या बरोबरच वाहत असते. रतनवाडीत अमृतेश्वर महादेवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. साधारण १० व्या ११व्या शतकात झांज राजांनी १२ नद्यांच्या उगमाजवळ जी बारा मंदिरे बांधली त्यातील हे प्रवरेच्या उगमाजवळील अमृतेश्वर मंदिर. भुमिज पद्धतीचे हे मंदिर शिल्पकलेने नटलेले असुन मंदिराच्या गर्भगृहाला दोन्ही बाजुला दरवाजे ही रचना वैशिष्ठपुर्ण आहे. मंदिराच्या दरवाज्यावर व छतावर यक्षकिन्नरच्या मूर्ती, पुराणातील प्रसंग, समुद्रमंथन, मुक्त शिल्पे यांचा समावेश आहे. मंदिराच्या शेजारी विष्णुतीर्थ नावाची प्रशस्त अशी पुष्करणी आहे. यात अनेक कोनाडे असुन विष्णु आणि गणपती यांनी शस्त्रे धारण केलेल्या मुर्त्या आहेत. पेशवेकाळात या मंदिराचा उल्लेख आढळतो तो असा:-श्री महादेव रतनगडी किल्ल्याखाली आहे, त्यास बालाजी कराळे यांनी किल्ले रतनगड समयी नवस केला, त्याप्रमाणे रतनगड देविले सदरहून सामान श्रीच्या गुरवाजवळ देऊन नित्य नैवेद्य व नंदादीप ताकीद करुन चालविणे म्हणून मोरो महादेव यास सनद दिली. येथून साम्रद गाव साधारण ७ कि.मी. आहे तर शेंडी २० कि.मी.वर आहे.

सह्याद्रीचे रांगड रुप, सह्याद्रीचा राकटपणा, सह्याद्रीचे कातळकडे आणि त्याचा कणखरपणा अनुभवायचा असेल तर आपल्याला रतनगडाला भेट द्यायलाच हवी. गडाच्या इतिहासात डोकावले असता थेट पुराणापर्यंत संदर्भ मिळतात. पुराणात असा उल्लेख आहे की समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले. त्यात राहु नावाचा एक दानव शिरला व त्याने अमृत प्राशन केले हे पाहुन विष्णुने त्या दानवाचा शिरच्चछेद केला. त्याचे धड राहुरी या ठिकाणी पडले तर शीर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरुन वाहू लागली त्या धारेचे नदीमध्ये रुपांतर झाले व या नदीस अमृतवाहीनी असे नाव पडले. परंतु शिवकाळात या गडाची फारशी माहिती मिळत नाही.

१७६३ साली हा किल्ला महादेव कोळी सरदार जावजी याने ताब्यात घेतल्याची नोंद गॅझेटमध्ये आढळते. नानासाहेब पेशव्याच्या काळात रतनवाडीच्या मंदिरासाठी काही रक्कम दिल्याचे कळते. त्यावेळी बाळाजी कारळेने हा किल्ला घेतला होता. रतनगडाच्या भौगोलिक स्थानामुळे १८१८ सालापर्यंत रतनगड पाच विभागांचे मुख्यालय होते. यात सह्याद्रीच्या वरची राजुरची ३६ खेडी, अलंगची २२ खेडी व सह्याद्रीच्या खालची सोकुर्ली परगण्याची ६० खेडी, वाडी परगण्याची २२ खेडी, जुरुस्त्रोशि परगण्याची ६० खेडी होती. इ.स.१८२० मधे इंग्रज कॅप्टन गोड्डार्डने हा किल्ला घेतला पण नंतर आधीचा किल्लेदार गोविंदराव ह्याने १८२४ साली किल्ला परत हस्तगत केला. त्याला रामजी भांगरे याचा पाठिंबा होता. हा प्रतिकार फार वेळ टिकला नाही व रतनगड पुन्हा इंग्रजांकडे गेला. इथे परत ह्या प्रकारचे उठाव होऊ नयेत यासाठी इंग्रजांनी वरती जाणाऱ्या कातळवाटा सुरुंगाने उडवल्या.

१७९८ ते १८४८ या ५० वर्षांच्या काळात डोंगराळ भागात राहणा-या कोळी, भिल्ल, व ठाकर या पराक्रमी वीरांनी इंग्रजांना कडवा संघर्ष करून सळोपळो केले. अकोल्याच्या कोळी बांधवांनी, रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, गोविंदराव खाडे इत्यादींनी इंग्रज सरकार विरोधात प्रखर लढा दिला. रामजी भांगरे यांची इंग्रजांनी पोलीस जमादार म्हणून नेमणूक केली होती तरीही त्यांनी इंग्रजांच्या अनेक जाचक अटींविरोधात आवाज उठविला. भिल्ल कोळी जमातीतील लोकांच्या मदतीने रामजीने अनेक जुलमी सावकारांवर दरोडे टाकले. रामजीचे बंड मोडण्यासाठी कॅप्टन मॅकींटोष याने सर्व बाजूंनी नाकाबंदी करून त्याच्या काही साथीदारांना पकडले. रामजीचा कडवा साथीदार रामा किरवा त्यांच्या हातून निसटला. त्याने पुढे आपल्या चपळ हालचालीने इंग्रजांना बेजार केले. अखेरीस कॅ.लेफ्टनंट फोर्बस् याने रामा किरवाला त्याच्या साथीदारांसह पकडले. राजद्रोहाच्या आरोपाखाली त्याला नगरच्या किल्ल्यात १८३०मध्ये फाशी दिले.

रामजीलाही काळ्या पाण्याची शिक्षा झाली. इंग्रजांच्या व सावकारशाहीच्या विरोधात लढून फाशी गेलेला रामा किरवा हा महाराष्ट्रातील पहिला हुतात्मा ठरला. पुढे रामजीचा मुलगा राघोजी यानेही इंग्रजांविरुद्धचा असंतोष धगधगता ठेवला. तो आपल्या कुटुंबासह देवगावला रहात होता. राघोजी हा उमदा, चपळ, शूर व धाडसी वीर होता. राघोजीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी इंग्रजांनी त्याच्या आईचा छळ सुरु केल्याने तो आणखीनच संतापून इंग्रजांविरुद्ध पेटून उठला. त्यातच त्याला पकडण्यात इंग्रजांना यश आले. त्याला हातपाय बांधून राजुरच्या कोठडीत टाकले. परंतु त्याच्या आईच्या कल्पकतेने व पहा-यावरील जावजी बांबळेच्या सहका-याने तो सुटला. आणि परत देवगावात जाऊन देवजी महार, पाडोशीचा खंडू साबळे, चिचोंडीचा भाऊ धनगर यांच्या साथीने टोळी उभारून १८४४-४५ या काळात त्याने इंग्रजांना व सावकारांना त्रस्त करून सोडले. १८४५च्या चकमकीत राघोजीचे गुरु देवजी महार ठार झाल्याने तो खचला. राघोजी धार्मिक वृत्तीचा असल्याने आंबिवलीच्या पाटलाने त्याला दिंडीत वारकरी म्हणुन सहभागी केले. लेफ्टनंट गेलने २ जानेवारी १८४८ रोजी संन्याशाच्या वेशातील राघोजीला पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात पकडले. त्याच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून २ मे १८४८ रोजी ठाण्याच्या तुरुंगात त्याला फाशी दिले. ठाण्याच्या तुरुंगात या आद्य क्रांतिकारकाचा पुतळा असुन दरवर्षी २ मे रोजी त्याचे पुण्यस्मरण केले जाते.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

2 Comments