महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,02,321

माझा बाटलीचा नाद | Rare Antique Bottles

By Discover Maharashtra Views: 3551 4 Min Read

माझा बाटलीचा नाद | Rare Antique Bottles

माणसाला पदोपदी बाटलीची गरज पडत असली तरी बाटली हा शब्द तसा बदनामच (Rare Antique Bottles) ! आणि त्याला ‘ नाद ‘ हा शब्द जोडला तर आणखीनच वाईट. पण माझा बाटल्यांचा नाद म्हणजे छंद हा जरा वेगळाच आहे. अनेक वस्तूंचे संग्रह करता करता काही खास बाटल्या मिळत गेल्या आणि माझा बाटल्यांचा एक वेगळाच संग्रह तयार झाला. पूर्वापार मद्य म्हणजे रसिकता आणि सेंट, अत्तरे म्हणजे खानदानी अभिरुची असे संकेत रूढ झाले आहेत. त्यामुळे जगभरात या दोन गोष्टींच्या विविध बाटल्या जमा करणारे लाखो संग्राहक आहेत. मग या असल्या बाटल्यांच्या नादी कोण लागणार ? म्हणून बहुदा या बाटल्याच माझ्या नादी लागल्या असाव्यात.
पूर्वी बाटलीचा संबंध लहान वयापासूनच येत असे. तान्ह्या मुलांना दूध पाजण्यासाठी होडीच्या आकाराची, दोन्हीकडून रबरी चोखणे असलेली चपटी बाटली फारच प्रसिद्ध होती. गावाकडे मुलांना दूध पाजायला चमचा -वाटी, बोंडले, शिंपले इ. चा वापर होई. पण शहरांमधून मात्र अशा बाटल्या वापरात होत्या. अशा बाटल्या फुटणे, गरम पाण्याने तडकणे, उंदीर – घुशीने रबरी बुचे कुरतडणे असे प्रकार मात्र फार होत असत. प्लॅस्टिकच्या आगमनानंतर याचा वापर वेगाने कमी होत गेला.

मुंबईत घरोघरी आढळणारी दुसरी परिचित बाटली म्हणजे दुधाची बाटली. १९५१ मध्ये तत्कालीन मुंबई गव्हर्नमेंटने आरे कॉलनीत ५०,००० दुभती जनावरे घेऊन आशियातील सर्वात मोठी डेअरी सुरु केली. घरोघरी दूध पोचविण्यासाठी काचेच्या विशेष बाटल्या अस्तित्वात आल्या.सोबतच्या चित्रात Government of Bombay चा उल्लेख असलेली १ शेराची दुर्मिळ बाटली पाहायला मिळते. १९६० ला महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर मग याचे ” महाराष्ट्र शासन ” झाले. आता त्याची जागा प्लॅस्टिक आणि टेट्रापॅक यांनी घेतली आहे.
तिसरी अत्यंत गरजेची बाटली म्हणजे औषधाची बाटली ! ही विशिष्ट आकाराची अष्टकोनी बाटली असायची. त्याला भेंडाचे ( cork ) बूच आणि त्यावर कागदी पट्टी कापून बनविलेली डोसपट्टी असायची. बाटलीवर जरी मूळच्या खुणा असल्या तरी ही कागदी पट्टीच लोकांना सहज कळत असे. डॉक्टरांकडे गेल्यावर सर्वसाधारणतः औषधाच्या गोळ्या / पावडर आणि हे पातळ औषध ( mixture ) एवढीच ‘ ट्रीटमेंट ‘ असायची.

अगदी छोट्या गावांमध्ये जत्रेत प्यायला मिळणारा सोडा हे मोठे आकर्षण असायचे. सोड्याची बाटली ही जाड काचेची असायची. आत सोडा भरल्यावर त्या सोड्याच्याच दाबाने बाटलीचे तोंड बंद करणारी एक काचेची गोटी असायची. एका विशिष्ट ओपनरने बाटली उघडताना मोठ्याने फस्स असा आवाज येत असे. छायाचित्रात ही जुनी गोटीसोड्याची बाटली पाहायला मिळते. आजसुद्धा काही आडगावातून क्वचित अशा बाटल्या पाहायला मिळतात.

पूर्वी लाकडी फर्निचरला पॉलिश करायला स्पिरिटची गरज भासत असे. तसेच घरातील स्टोव्ह पेटविताना खूप काजळी धरू नये म्हणून याच डीनेचर्ड स्पिरीटचा वापर केला जाई. त्यासाठी वापरली जाणारी लालसर तपकिरी रंगाची मोठी बाटली आपल्याला खालील चित्रात पाहता येईल. यामध्ये अल्कोहोल असल्याने ही बाटली विकत घेण्यासाठी परमिट लागे. हे डीनेचर्ड स्पिरीट विषारी असूनही दारूच्या नशेच्या पूर्ण आहारी गेलेली काही मंडळी हे स्पिरीटच दारू म्हणून पीत असत. याच्या सेवनामुळे अंधत्व, अर्धांगवायू ते मृत्यूपर्यंत काहीही होत असे. म्हणून यावर ४ भाषांमध्ये तसा इशारा आणि कवटीचे चित्र छापलेले असे. हे स्पिरिट अत्यंत ज्वलनशील असे. या दोन्हीही गोष्टींमुळे आणि सरकारी कडक नियंत्रणामुळे ही बाटली आता दुर्मिळ झाली.

छायाचित्रातील पुढील बाटली ही आधुनिक काळातील आहे. सचिन तेंडुलकर कारकिर्दीच्या अत्युच्च पदावर असताना, त्याच्या नावाचे रेस्टॉरंट सुरु करण्यात आले होते. त्यात जेवणाबरोबरच सचिनचे फोटो, त्याने वापरलेल्या बॅट्स, बॉल्स, कॅप्स अशा वस्तू पाहायला मिळत असत. त्या हॉटेलात मिनरल वॉटर, तेंडुलकरची सही असलेल्या विशेष बाटलीतून मिळत असे. या पाण्याचे नावही Tendulkar H 2 O ( पाण्याची वैज्ञानिक संज्ञा ) असे होते. या पाण्याची दुर्मिळ बाटली माझ्याकडे आहे.
तसा बाटलीचा नाद हा शब्द रूढार्थाने जरी वाईट असला तरी अशा छंदाच्या संदर्भात तो एक वेगळाच नाद करणारा आहे.
छायाचित्रातील सर्व बाटल्या माझ्या संग्रहातील आहेत. होडीच्या आकाराच्या बाटलीचे छायाचित्र गुगल माहिती जालाच्या सौजन्याने.माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर | [email protected]

Leave a comment