महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छत्रपतींना आश्रय देणाऱ्या राणी चेन्नम्मा

By Discover Maharashtra Views: 3607 6 Min Read

छत्रपतींना आश्रय देणाऱ्या राणी चेन्नम्मा –

11 मार्च 1689 ला औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजांची क्रूर हत्या केल्यानंतर मराठी मुलूखावर आभाळ कोसळले, रायगड ताब्यातून गेला, येसूबाई आणि बाल शाहुंना औरंगजेबाने अटक केल्याने स्वराज्य धोक्यात आले. अशावेळी सर्वांनी धीर धरत एक बैठक घेवून आबासाहेबांनी निर्माण केलेले स्वराज्य टिकविण्यासाठी राजारामांना छत्रपतीपदी बसविले. याचवेळी लाखोच्या फौजेचा मुकाबला करणे सध्यस्थितीत शक्य नसल्याने सर्वानुमते स्वराज्याची गादी दक्षिणेत जिंजीला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. तंजावरचे राजे दुसरे शहाजी यांनीही याला समंती दिली. त्यानुसार छत्रपती राजारामानी 5 एप्रिल 1689 ला रायगड सोडून प्रतापगड, पन्हाळा असा प्रवास सुरू केला.(छत्रपतींना आश्रय देणाऱ्या राणी चेन्नम्मा)

मोगलांची फौज पाठलाग करायला लागली. राजेंच्या सोबत संताजी आणि बहिर्जी घोरपडे, कान्होजी नाईक पानसंबळ, प्रल्हाद निराजी, नीलकंठ मोरेश्वर, कृष्णाजी अनंत सभासद, बाजी खंडोजी कदम, तानाजी डुरे, मानाजी मोरे, रूपाजी भोसले, खंडो बल्लाळ इत्यादि मंडळी होती. पन्हाळ्यावरून गोकाक, सौदंत्ती, गदग, लक्ष्मीमेश्वर असा मार्ग सुरू झाला. रणमस्तखान आणि अब्दुल्लाखान त्यांच्या मागावर लांडग्यासारखे लागले होते. जिंजीचा सर्व मार्ग मोगलांच्या ताब्यातला, त्यामुळे बादशहाने हुक्केरीच्या देसायासह फ्रेंच आणि डचांना पत्र पाठवून राजारामाला मदत न करण्याची तंबी दिली होती.

कानडी  मुलूख, घनदाट जंगल, सप्टेंबरचा महिना, जीवघेणा पाऊस आणि मागे लागलेले मोगल यामुळे काय करावं सुचत नव्हतं. म्हणून सर्वांनी अगोदर वाण्याचा पोशाख करून मजल दरमजल सुरू केली. राजेंची प्रकृती थोरल्या दोन्ही राजेंच्या मानाने क्षीण होती. वरदा, कृष्णा, तुंगभद्रा यासारख्या उग्र नद्या त्यांनी बहिर्जी घोरपडे , बाजी कदम यांच्या आधाराने पार केल्या. शिमोगा जिल्ह्याची हद्द सुरू झाली. घनदाट जंगल तुडवत ही मंडळी पुढे जात होती. मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यानंतर राजेंचे पाय धुणे, पुजा करणे, मुजरा करणे, ही वेगळी बडदास्त पाहून त्या प्रदेशातील राजाच्या गुप्तहेराला संशय आला.

हा प्रदेश होता, केळदीच्या नायकाचा आणि आता गादीवर होत्या सोमेश्वर नायकाच्या पत्नी राणी चेन्नमाजी. विजयनगर साम्राज्यातील जहागीरदार चौडाप्पाने इ. स. 1500 साली केळदी ( ता. सागर जि. शिमोगा ) येथे ‘केळदी नायक’ संस्थानची स्थापना केली. त्यानुसार या गादीवर सदाशिव नायक, चिक्कशंकर, रामराजा, व्यंकप्पा, विरभद्र, शिवप्पा, व्यंकटप्पा, भद्रप्पा आणि सोमशेखर नायक ( 1664 ते 1671 ) याप्रमाणे राजे झाले. याची राजधानी 1512 इक्केरीला तर 1639 ला बेदनूर ( नगर ) जिल्हा शिमोगा येथे हलविण्यात आलीतरी या राज्याला ‘केळदीच्या नायकाचे’ राज्य म्हटले जायचे. कोटेपूरचा रहिवाशी सिद्दप्पा शेट्टी यांची कन्या असलेल्या चेन्नमाचा विवाह सोमशेखर नायकाबरोबर झाला. थोड्याच दिवसात शोमशेखर नायकाचा खून झाला. निसंतान असलेल्या चेन्नमावर राज्याची जबाबदारी पडली. बसप्पाला दत्तक घेऊन 1677 ते 1697 अशी वीस वर्षे चन्नम्माने कारभार केला.

आदिलशाही, कुतुबशाही आणि मोगल तसेच शेजारील छोटे मोठे संस्थानिक आणि अंतर्गत विरोधाला तोंड देत चेन्नमाने नायकाची गादी नेटाने पुढे चालविली. अनेक किल्ले घेतले, मंदिरे बांधली, न्यायदान, प्रशासन, धर्म याबाबतीत  तर चेन्न्ममाची ख्याती होती. अशावेळी सप्टेंबर 1689 चे साल होते, एकेदिवशी गुप्तहेराने त्यांच्या कानावर खबर घातली की, ‘आपल्या राज्यात वाण्याच्या पोषाखातील काही मंडळी शिमोगा जिल्ह्यातील होन्नाली येथे मुक्कामाला असून त्यातील एकाची ते पुजा करतात, त्यामुळे ती व्यक्ति कोणी सामान्य वाटत नाही.’  ( Dr. satish kadam 9422650044 )

राणी चेन्नम्माने याची चौकशी केली तेव्हा त्यांना समजले, ‘ती व्यक्ति दुसरी तिसरी कोणी नसून पाच शाहया आणि मोगलांना भिडणार्याय हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा तो छावा आहे.’ शिवरायांच्या प्रतिभेवर सारा हिंदुस्तान त्यावेळी फिदा होता. मोगलांचा पाठलाग आणि पुढे तुंगभद्रेचे तुडूंब भरलेले पात्र असल्याने राजारामांना आता आश्रयाची गरज होती. तर बादशाहाने दक्षिणेतील सर्व राजांना तंबी दिल्याने चेन्नमा राणीची मोठी पंचाईत झाली. ईकडे आड आण तिकडे विहीर अशी राणीची अवस्था झाली. तरीपण होणार्या  परिणामाची चिंता न करता राणी चेन्नमाने छत्रपती राजारामाला आश्रय देण्याचा धाडसी  निर्णय घेतला.

यावेळी राजांची व्यवस्था ‘आरमाने कोप्पा’ ( ता. होसंगारा जि. शिमोगा ) येथे केली. अतिशय गुप्तपणे महाराज त्याठिकाणी निवास करत असताना रणमस्तखानाला याची खबर लागली. पोटचे द्यावे, पण पाटचे देऊ नये ही हिंदूची रीत असल्याने चेन्नमाने  मोगलांच्या प्रतिकाराला सुरुवात केली, ही संधी साधून राजारामांनी गाजनूर येथून बहिर्जी घोरपडेच्या खांद्यावर बसून तुंगभद्रा ओलांडून जिंजीकडे प्रयाण केले. आदिलशाहीत राहूनही शहाजीराजांनी दिलेला अभय, छोटे मोठ्या  हिंदू संस्थानिकांना दक्षिण दिग्विजयात छत्रपतींनी दिलेला धीर, याची जाण असलेल्या  चेन्नमाने छत्रपतीसाठी आपले राज्य पणाला लावले. परंतु त्याची त्यांना किंमत चुकवावी लागली. लढाईत त्यांना केळदी साम्राज्यातील होन्नाली, महादेवपुरा, आनंदपुरा आणि राजधानी बेदनूर गमवावे लागले. थोड्याच दिवसात मोगलांच्या सैन्याला पाण्यात दिसणारा सेनापती संताजी चेनम्माच्या मदतीला धावून आल्याने नव्याने केळदी राज्याची घडी बसली.

आपण फार मोठे काम केले याची चेन्नमाजीला जाणीव होतीच, म्हणून स्थिरस्थावर झाल्यावर मोगलांच्या सैन्यावर विजय मिळविल्याचे प्रतीक म्हणून राणीने केळदीच्या रामेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिवछत्रपतींचे शिल्प कोरून मंदिरापुढे  भलामोठा विजयस्तंभ उभा केला. या स्तंभावर वरच्या बाजूला गणपती आणि त्याखाली एक शिल्प कोरलेले आहे. आजही ते शिल्प सुस्थित असून त्यात स्वत: चेन्नमा व त्यांच्या डाव्या बाजूला छत्रपती राजाराम उभे असून  राणीच्या उजव्या बाजूला दोन स्त्री सेवक तर राजेंच्या डावीकडे धर्मदंड घेऊन एक सेवक उभा असल्याचे शिल्पात दाखविले आहे.

आपल्याला ज्ञात आहे की, स्वराज्याचा कारभार पुढे आठ दहा वर्षे तामिळनाडूतील जिंजी याचठिकाणाहून चालला. राजाराम महाराज तेथे स्थिर झाल्यानंतर त्यांनी राणी चेन्नमाला आभार पत्रतर पाठविलेच, परंतु साधनांच्याआधारे राजारामांनी बेदनूर ( नगर ) येथे निलकंठेश्वर मंदिराशेजारी एक पार्वतीचे मंदिर बांधले. ते  मातेसमान असणार्या  राणी चेन्नमाची उतराई आहे. शिवरायांनी योजिलेले स्वराज्य पुढे घेऊन जाण्यात कन्नड राणी चेन्नमाजी दिलेले योगदान महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.

Dr. Satish kadam

Leave a comment