राजा जयचंद्र आणि अपप्रचार

राजा जयचंद्र आणि अपप्रचार

राजा जयचंद्र आणि अपप्रचार –

इतिहासात एखादा व्यक्ती नायक पदाला प्राप्त झाला की त्याचे दोष, चुका, अपराध हेतुपुरस्सर दुर्लक्षित केले जाऊन इतिहास व्यक्तिनिष्ठ होतो. त्यामुळे कुठल्याही इतिहासाचा अभ्यास हा एकपक्षीय विचार न करता वस्तुनिष्ठपणे साधार आणि पुरावे लक्षात घेऊन करायला हवा. (राजा जयचंद्र आणि अपप्रचार)

काश्मीरचे अमात्य चंपक यांचे चिरंजीव आणि काश्मीरच्या इतिहासाचे लेखक कल्हणपंडित राजतरंगिणीत म्हणतात त्याप्रमाणे श्री श्लाघ्य: स एव गुणवान रागद्वेषबहिष्कृता । भुतार्थकथने यस्य स्थेयस्येव सरस्वती ।। म्हणजे जो मनुष्य राग, लोभ, द्वेष बाजूला ठेवून (इतिहासातील) जशी असेल तशी वस्तुस्थिती कथन करतो, तो मनुष्य प्रशंसनीय होय.

इतिहासात बरेचदा नायकही चुका करतात आणि त्यामुळे दुर्जन लोकांप्रमाणे सज्जन लोकांशीही त्यांचे वैर उद्भवते. याची अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे पृथ्वीराज चौहान आणि जयचंद गाहडवाल.

ख्रिस्ताब्द ११९१ मध्ये तराईच्या पहिल्या युद्धात मिळालेल्या विजयाने हुरळून जाऊन पृथ्वीराज स्वतःस अजेय समजू लागला. त्याने आपले सार्वभौमत्व सिद्ध करायला वेगवेगळ्या प्रदेशांवर हल्ले करायला आपल्या सैन्यास रवाना केले. यातच त्याचा सेनापती स्कंद गंगेच्या खोऱ्यात ससैन्य येऊन धडकला जिथे त्याची गाठ गाहडवाल सैन्याशी पडली. उपलब्ध स्रोतांच्या आधारावर असे म्हणता येईल की कदाचित् हीच या सैन्याची समोरासमोर प्रत्यक्षपणे येण्याची पहिली वेळ. यापूर्वी चौहान आणि गाहडवाल यांच्यात वैमनस्य दिसत नाही.

यावेळी काशी/कन्नौजवर गाहडवाल राजा जयचंद राज्य करीत होता जो स्वतः धर्मनिष्ठ, शूर, वीर आणि विद्वान गुणीजनांचा आश्रयदाता म्हणून विख्यात होता. जयचंदाने स्वतःहून पृथ्वीराजाविरुद्ध पाऊल उचलले नव्हते. उलटपक्षी पृथ्वीराजाच्या सैन्याने त्याच्या राज्यात नासधूस, लुटपाट केली होती ज्यामुळे दोष जयचंदास जात नाही.

याच विरोधामुळे त्याने तराईच्या ख्रिस्ताब्द ११९३ च्या दुसऱ्या युद्धामध्ये पृथ्वीराजास सहाय्य केले नाही. पण महत्वाची गोष्ट ही की तो शहाबुद्दीन मुहम्मद घोरीलाही सामील झाला नाही, घोरीस त्याने कुठलेच सहकार्य केले नाही. तो तटस्थ होता. किंबहुना पृथ्वीराजाच्या नंतर जयचंद गाहडवालानेसुद्धा घोरीस झुंज दिली. घोरीच्या ख्रिस्ताब्द ११९४ मध्ये केलेल्या स्वारीत राजा जयचंदाने त्यास प्रतिकार करत चंदावरच्या लढाईत वीरमरण पत्करले.

काही इतिहासकार पृथ्वीराजाने संयोगिता/तिलोत्तमा/कांतीमयी नामक जयचंदाची कन्या तराईच्या पहिल्या युद्धानंतर पळवून नेली आणि तिच्याशी विवाह केला असे म्हणतात. पण पृथ्वीराज याकाळी भटींड्यास १३ महिने वेढा घालून बसलेला असताना तो असे अपहरण करणे शक्यच नाही. शिवाय या नावाची कुठलीही कन्या जयचंदास नसल्याने ही कथा काल्पनिक असण्याची दाट शक्यता आहे.

संयोगितेच्या कथेचा उदोउदो करणाऱ्या पृथ्वीराज रासोत राजा जयचंदास राठौड म्हटले आहे. मुळात राठौड हे चंद्रवंशीय राष्ट्रकूट जे उत्तरेत बदायुन, हाथुंडी वगैरे ठिकाणी स्थायिक झाले. पण जयचंद हा वास्तविक सूर्यवंशीय गाहडवाल राजपूत होता ज्यांचा राठौड वंशाशी वांशिक संबंध नव्हता. इतकेच नाही तर जयचंदाचे पितामह गोविंदचंद्र गाहडवाल यांची एक राणी राठौड कुळातील होती आणि या वैवाहिक संबंधांवरून स्पष्ट होते की ही दोन्ही कुळे भिन्न होती. उत्तर काळात रचलेले कपोलकल्पित आणि चमत्कारिक कथांनी भरलेले पृथ्वीराज रासो विश्वसनीय नसल्याने त्याला इतिहासाच्या अभ्यासासाठी ग्राह्य धरणे घातक आहे.

जयचंद्राची प्रतिमा वास्तविकरित्या कुणी मलिन केली असेल तर ती ऐन-ए-अकबरीत मुघलांचा लेखक अबुल फजल याने. अबुल फजलला इस्लामचा विजय तर दाखवायचा होता परंतु पृथ्वीराजासारख्या राजपुतांमध्ये लोकप्रिय तथा शौर्याचे प्रतीक असलेल्या राजाविरुद्ध तो दाखवू शकत नव्हता या कारणाने त्याने कुठल्याही पुराव्यांच्या आधाराशिवाय जयचंद्रास फितूर आणि दोषी म्हणून ग्रंथात प्रस्तुत केले आणि त्याची प्रतिमा कलुषित करून ठेवली.

ख्रिस्ताब्द ११९४ मध्ये राजा जयचंद मारला गेल्यावर त्याचा मुलगा हरिश्चंद्र घोरीचा मांडलिक म्हणून राज्य करू लागला पण पुढे त्याने संधी बघून हे परकीय वर्चस्व झुगारून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या पदरी अपयश आले आणि कुतुबुद्दीन ऐबकाने त्याचा अंत केला.राजा जयचंद्र.

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या एका शूरवीर आणि धर्मपरायण राजाला इतिहासात असे कलंकित करून निंदेचा विषय बनवणे म्हणजे आपल्या मातृभूमीसाठी झिजणाऱ्या वीरांच्या गौरवमय इतिहासाचे विडंबन नाही तर काय म्हणावे ?

स्रोत आणि अतिरिक्त माहितीसाठी –

  • ◆ जयानक कृत पृथ्वीराजविजय
  • ◆ चंद बरदाई कृत पृथ्वीराज रासो
  • ◆ मिनहाज सिराज कृत तबकात-ए-नासिरी
  • ◆ अबुल फजल कृत ऐन-ए-अकबरी

– शुभम् जयंत सरनाईक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here