मराठ्यांच्या इतिहासावर लेखन करणारा पहिला इतिहासकार

मराठ्यांच्या इतिहासावर लेखन करणारा पहिला इतिहासकार : रॉबर्ट ऑर्म

मराठ्यांच्या इतिहासावर लेखन करणारा पहिला इतिहासकार : रॉबर्ट ऑर्म –

मराठ्यांचा पहिला इतिहासकार कोण यावर अभ्यासकांचे उत्तर येते ‘ग्रँट डफ‘. मराठ्यांचा समग्र इतिहास उपलब्ध साधनांच्या आधारे लिहून काढणारा ग्रँट डफ यालाच रूढार्थाने मराठ्यांचा पहिला इतिहासकार म्हणता येईल. मात्र ग्रँट डफच्याही पूर्वी मराठ्यांचे राज्य अस्तित्वात असतानाच मराठ्यांच्या इतिहासावर लेखन करण्याचे प्रयत्न पाश्चिमात्य इतिहासकारांकडून झाले होते. मी तत्कालीन पाश्चिमात्य प्रवासी, व्यापारी, धर्मप्रसारक, अधिकारी इत्यादी लोकांनी लिहून ठेवलेल्या साधनांबद्दल बोलत नाहीये. ते सगळे लेखन साधनस्वरूप आहे; म्हणजे त्या समकालीन लोकांना जे दिसले, जे ऐकले ते त्यांनी लिहून ठेवलेले आहे. त्यांनी संदर्भ-साधने जमवून त्यांचा अभ्यास करून इतिहास लिहिलेला नाही. त्यांचे लेखन हेच इतिहासाची साधने होत. बंगालचे थोर इतिहासकार सुरेंद्रनाथ सेन यांनी शिवचरित्रविषयक अशा प्रमुख साधनांचा इंग्रजी अनुवाद त्यांच्या ‘Foreign Biographies of Shivaji’ या ग्रंथात समाविष्ट केला. प्रस्तुत माहिती त्याच्या वेगळी आहे.(रॉबर्ट ऑर्म)

ग्रँट डफच्या आधी उपलब्ध असतील ती साधनं घेऊन मराठ्यांच्या इतिहासावर लेखन करण्याचे प्रयत्न काही पाश्चिमात्य इतिहासकारांनी केलेले आहेत. अशा इतिहासकारांमध्ये ब्रिटिश इतिहासकार रॉबर्ट ऑर्म (१७२८ – १८०१) याचे नाव आद्य म्हणता येईल. रॉबर्ट ऑर्मचा जन्म २५ डिसेंबर १७२८ रोजी त्रावणकोरजवळ अँजेंगो येथे झाला. त्याचे वडील जॉन ऑर्म ईस्ट इंडिया कंपनीत वैद्य – शल्यविशारद म्हणून कामाला होते. शिक्षणासाठी तो १७३६ साली इंग्लंडला गेला आणि व्यापारात पडण्याच्या उद्देशाने १७४२ मध्ये बंगालमधल्या जॅक्सन अँड वेडरबर्न या ब्रिटिश व्यापारी कंपनीत कामाला लागला. १७४३ साली तो ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदी नोकरीत रुजू झाला. कंपनीच्या दहा वर्षांच्या सेवेच्या काळात त्याने हिंदुस्थानच्या इतिहासाविषयी बरीच साधनसामग्री जमवली. १७५३ मध्ये तो इंग्लंडला गेला, पण त्याच्या हिंदुस्थानाच्या इतिहासाविषयीच्या ज्ञानामुळे कंपनीने त्याला १७५४ मध्ये मद्रासच्या गव्हर्नरच्या कौन्सिलचा सभासद म्हणून पाठवले. इंग्रज-फ्रेंच यांच्यातील शेवटच्या कर्नाटक युद्धात एक राजकीय नेता म्हणून त्याने महत्त्वाची कामगिरी केली. त्यामुळे कंपनीने मद्रासच्या गव्हर्नरपदी त्याचे नाव निश्चित केले होते, पण १७६० मध्ये तो इंग्लंडला परतल्यामुळे त्याला हे मानपद स्वीकारता आले नाही.

१७६९ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आपला इतिहासकार म्हणून त्याची नेमणूक केली आणि इंडिया हाऊसमधील साधनसामग्रीचा मुक्तहस्ताने वापर करण्याची परवानगी दिली. १७६३ ते १७७८ या काळात रॉबर्ट ऑर्मने १७४५ सालापासूनच्या हिंदुस्थानातील ब्रिटिशांच्या लष्करी हालचालींचा इतिहास तीन खंडात लिहून प्रसिद्ध केला. या त्याच्या ग्रंथाचे नाव : ‘A History of the Military Transactions of the British Nation in Indostan from 1745’. पुढे अत्यंत परिश्रम घेऊन ऑर्मने ‘Historical Fragments of the Mogul Empire, of the Morattoes, and of the English Concerns in Indostan, from the year 1659’ हा ग्रंथ लिहून १७८२ साली तो लंडनमध्ये प्रसिद्ध केला. हा त्याचा शेवटचा ग्रंथ. याव्यतिरिक्तही त्याने इतिहासावर लेखन केलेले आहे. १३ जानेवारी १८०१ ला त्याचा मृत्यू झाला.

रॉबर्ट ऑर्मने त्याच्या ‘Historical Fragments of the Mogul Empire, of the Morattoes, and of the English Concerns in Indostan’ या ग्रंथात मोगल, मराठे आणि इंग्रज यांचा इतिहास उपलब्ध साधनांच्या आधारे लिहिला आहे. मराठ्यांच्या इतिहासावर असे साधनांच्या आधारे ग्रंथस्वरूपात लिहिलेले हे पहिलेच लिखाण. विशेष बाब म्हणजे ज्या वेळी हा ग्रंथ प्रसिद्ध झाला तेव्हा मराठ्यांचे राज्य हिंदुस्थानात पसरलेले होते. इंग्रज भारतात आपल्या सत्तेची पाळंमुळं रोवत होते. नुकतेच पहिल्या इंग्रज-मराठे युद्धात (१७७५ ते १७८२) मराठ्यांनी इंग्रजांना नमवले होते. अशा वेळी जे इंग्रजांचे प्रमुख शत्रू आहेत, ज्यांच्यापासून त्यांना हिंदुस्थानाची सत्ता बळकावयाची आहे त्या मराठ्यांचा पूर्वेतिहास पाश्चिमात्यांना माहीत झाला पाहिजे या उद्देशाने हा ग्रंथ लिहिला गेला असला पाहिजे. ग्रंथाचा लेखक रॉबर्ट ऑर्म जरी स्पष्ट तसे म्हणत नसला तरी कंपनीचा तरी हाच उद्देश असावा आणि मराठ्यांच्या इतिहासावर लेखन करणारे पुढचे जेवढे पाश्चिमात्य इतिहासकार आहेत तेही अप्रत्यक्षपणे हेच म्हणतात.

ग्रँट डफ तर म्हणतो, “आम्ही हिंदुस्थानची सत्ता मराठ्यांपासूनच घेतली.” असे असले तरी ह्या रॉबर्ट ऑर्मने प्रामाणिकपणे, साक्षेपी इतिहासकाराच्या भूमिकेतून हा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला आहे हे खरे. हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्याने प्रामुख्याने युरोपीय व फारसी साधनांचा उपयोग केलेला आहे. मराठ्यांच्या इतिहासाच्या मराठी साधनांचा मात्र त्याने वापर केला नाही. अर्थात याबद्दल त्याला दोष देणे योग्य नाही. कारण मराठी साधने त्याच्यापर्यंत पोहोचणारच कशी हा एक प्रश्न आहे. पोर्तुगीज, डच, स्पॅनिश इत्यादी भाषा त्याला येत होत्या आणि आवश्यक त्या फारसी साधनांची इंग्रजी भाषांतरे त्याला त्याचा मित्र रौफ याने करून दिली. मराठ्यांच्या इतिहासाची मराठी साधने परकीयांना उपलब्ध करून देण्याची सोय तेव्हा तितकी चांगली नव्हती आणि आजही ती तितकी चांगली नाहीये. प्रसिद्ध बंगाली इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी तर शिवचरित्र लिहिताना मराठी साधने उपलब्ध असतानाही मुद्दाम त्यांचा उपयोग करण्याचे टाळले. असो.

रॉबर्ट ऑर्मने आपल्या या ग्रंथाची सुरुवात १६५९ पासून म्हणजे छत्रपति शिवाजी महाराजांच्या इतिहासापासूनच केली आहे. त्याने प्रामुख्याने शिवछत्रपति आणि संभाजीराजे ह्यांच्या कारकिर्दींचा इतिहास त्याने मांडला आहे. शिवकाळासाठी त्याने आपल्या ग्रंथाची सुमारे अडीचशे पाने खर्ची घातली आहे. युरोपीय व फारसी म्हणजे मराठ्यांच्या शत्रूपक्षांकडच्या साधनांतून रॉबर्ट ऑर्मला शिवाजी महाराजांच्या चरित्राचे आणि कर्तृत्वाचे जे दर्शन झाले त्याने तो भारावून गेला. त्याच्या या ग्रंथात ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची वर्णनं वाचून अभिमान वाटतो. तो लिहितो, “शिवाजीराजा हा धार्मिक वृत्तीचा आणि हिंदु धर्माचा अभिमानी होता. त्याचे खाजगी जीवन साधे आणि त्याचे चारित्र्य स्वच्छ होते. राजा म्हणून त्याच्या वागण्यात कसलाही दांभिकपणा, दिखाऊपणा नव्हता. तो दयाळू होता आणि प्रजेच्या हिताशिवाय त्याने दुसरा कोणताही विचार केला नाही. एक युद्धनेता म्हणूनही त्याचा दर्जा समकालीनांत सर्वश्रेष्ठ होता. त्याच्याकडे सेनापतीचे सर्व गुण होते. ज्या श्रेष्ठ सेनापतींबद्दल आपल्याला माहिती आहे अशा सर्वांहूनही वैयक्तिकरीत्या तो वरचढ आहे. कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची त्याची सिद्धता होती. प्रत्येक आणीबाणीच्या कठीण परिस्थितीला तो खंबीरपणे आणि सूक्ष्म दृष्टीने तोंड देत असे. त्याचा सर्वोत्तम सेनापतीसुद्धा त्याच्या अलौकिक श्रेष्ठत्वाला मौन संमती देत असे. आणि सैनिक सुद्धा आपण शिवाजीमहाराजांना हाती तलवार घेऊन लढताना प्रत्यक्ष पाहिल्याचे गर्वाने सांगत.” रॉबर्ट ऑर्म म्हणतो, “शिवाजीराजा स्वतंत्र होता. ब्रह्मवृंदांकडून धर्मानुसार त्याने आपला राज्याभिषेक करून घेतला याचे मुख्य कारण, केवळ मुघलांचा अथवा मुसलमानी राजांचा अधिक्षेप करणे हे नसून आपल्या लोकांना जाहीर व्हावे, की आपण या मराठी राज्याचे सनदशीर छत्रपति आहोत, हे आहे.” राज्याभिषेक प्रसंग लिहिण्यासाठी ऑर्मने हेनरी ऑक्सिंडेनच्या डायरीचा त्याने संदर्भ घेतला आहे.

शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने त्यांच्यासंबंधी गौरवोद्गार काढलेत की “तो एक महान पुढारी होता आणि एकमेवाद्वितीय होता. हिंदुस्थानावर माझा एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यासाठी मी हिंदुस्थानचे प्राचीन सार्वभौमत्व नष्ट करत असताना त्याने सतत १९ वर्षे माझ्या सैन्याशी यशस्वी लढा दिला” असे रॉबर्ट ऑर्मने लिहून ठेवले आहे. (महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने त्यांच्यासंबंधी गौरवोद्गार काढलेत असे एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने लिहिलंय असं माझ्या वाचनात आलंय, पण याला अजून विश्वसनीय पुरावा नाही.) रॉबर्ट ऑर्मने शिवरायांचा मोठेपणा सांगताना पानच्या पानं खर्ची घातली आहेत. ते वाचताना मन भरून येते. शिवचरित्रातल्या अनेक घटनांचे बऱ्यापैकी सुसंगत, वस्तुनिष्ठ वर्णन त्याने केलेले आहे. मराठ्यांच्या इतिहासावर लिहिणाऱ्या इतर काही पाश्चिमात्य इतिहासलेखकांच्या तुलनेत त्याच्या लिखाणात कमी विसंगती आढळते. त्याचा हा ग्रंथ पहिल्या दर्जाचा संदर्भग्रंथ नसला तरी इतिहासप्रेमींस आणि अभ्यासकांस तो काही गोष्टींसाठी उपयुक्त आहे. अठराव्या शतकात मराठ्यांचे राज्य अस्तित्वात असताना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रमुख इतिहासकाराने प्रामाणिकपणे मराठ्यांचा वस्तुनिष्ठ इतिहास या ग्रंथात मांडलेला आहे, या ग्रंथाचे काही तरी महत्त्व आहेच. ह्या ग्रंथाची सॉफ्ट कॉपी – पीडीएफ गुगल बुक्सवर उपलब्ध आहे. तसेच रॉबर्ट ऑर्मची आणखी माहिती विकिपीडियावर आहे.

रॉबर्ट ऑर्मच्या ह्या ग्रंथाच्या १८०५ आणि १९०५ साली आणखी दोन आवृत्त्या निघाल्या. ऑर्मच्या या ग्रंथानंतर जर्मन इतिहासकार मॅथिअस ख्रिस्तीआ स्प्रेंगल याने लिहिलेला ‘History of the Marathas upto the Last Treaty with England : 17th May 1782’ हा तत्कालीन उत्तम ग्रंथ १७८५ साली प्रकाशित झाला. फक्त मराठ्यांच्याच इतिहास असणारा हा पहिला ग्रंथ. त्यानंतर पुण्याच्या रेसिडन्सीत कामाला असणाऱ्या एडवर्ड स्कॉट वेअरिंग याचा ‘A History of the Marathas’ हा मराठ्यांच्या इतिहासावरचा ग्रंथ १८१० साली लंडनमध्ये प्रसिद्ध झाला. १८१८ मध्ये मराठेशाहीचा अस्त झाल्यावर साताऱ्याचा पोलिटिकल एजंट ग्रँट डफ याने लिहिलेला मराठ्यांच्या समग्र इतिहासाचा पहिला ग्रंथ १८२६ साली प्रसिद्ध झाला. इथे एक गोष्ट सांगितली पाहिजे. मराठ्यांचा इतिहास दाबून वगैरे टाकण्याचे प्रयत्न विशेषतः मराठ्यांचे राज्य गेल्यानंतर – इंग्रजांचे राज्य आल्यानंतर झालेत. वर उल्लेखलेल्या इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहास पश्चिमात्यांना माहीत व्हावा या मुख्य उद्देशाने हे ग्रंथ लिहिले असे त्याचे ग्रंथ, त्यांचा इतिहास वाचल्यावर कळते.

आपण इंग्रजांना नुसतं नावं ठेवण्यापेक्षा त्यांच्याकडून बरेच काही शिकलं पाहिजे. त्यांनी आपल्याकडून काहीतरी शिकलं आणि आपल्यावर राज्य केलं. आपल्या प्रगतीसाठी, फायद्यासाठी इतिहासाचा उपयोग कसा केला पाहिजे – मग तो इतिहास आपला असो वा इतरांचा – इंग्रजांकडून ही गोष्ट तरी खचितच शिकण्यासारखी आहे. नाहीतरी इतिहासातून आपण काही शिकतच नाही, इतिहासाचा योग्य उपयोग करणे तर पुढची गोष्ट आहे.

– प्रणव कुलकर्णी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here