महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 83,96,568

राघवेश्वर शिवमंदिर, चिंचोडी, ता. येवला

By Discover Maharashtra Views: 1231 2 Min Read

राघवेश्वर शिवमंदिर, चिंचोडी, ता. येवला –

महाराष्ट्रातील अनेक गावे अज्ञात इतिहासाने ओथंबून वाहताना दिसतात. हा वारसा नोंदविला न गेल्याने त्या गावांमधील अनेक वास्तू, शिल्प अन् अनोखा ठेवा अजूनही नजरेआडच आहे. येवला तालुक्यातील चिचोंडी गावात असणारे राघवेश्वराचे प्राचीन शिवमंदिर अशाच एखाद्या लेणीसारखे बारवेत आपले सौंदर्य जपून आहे.राघवेश्वर शिवमंदिर, चिंचोडी.

नाशिक-येवला मार्गावर येवल्याच्या अलीकडे उजव्या हाताला लागणारे पैठणी पार्क अन् तळ्यापासून आत पाच किलोमीटरवर गेल्यावर चिचोंडी गाव लागते. गावात गेल्यानंतर डाव्या हाताला चिचोंडी खुर्दमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर राघवेश्वर मंदिराचा फलक अन् आजूबाजूला पसरलेला दगडी कठडा आपल्याला दिसतो.

चिचोंडी गावचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध पुरातन राघवेश्‍वर मंदिर पूर्ण काळ्या पाषाणात कोरलेले असून या मंदिरात जाण्यासाठी पश्‍चिमेस व उत्तर दिशेला पायऱ्या असून, दोन्ही बाजूंनी पंचवीस पायऱ्या उतरून गेल्यावर प्रथम बारवेचे दर्शन होते अन् उजव्या हाताला मंदिराचे. बावीस खांबांवर पेललेले हे सुंदर मंदिर बारवेत असल्यासारखे आहे. मंदिराच्या सुरूवातीच्या खांबांवरील नक्षीकाम देखणे आहे तर खांबांवरील नर्तिकेंची शिल्पेही आकर्षक आहेत. येथील नर्तिकेने उंच टाचांचे सॅन्डल (खडावा) घातले आहेत. नर्तिकेच्या पायातील खडावा ही या मंदिराचे सौंदर्य वाढविताना दिसते.

मंदिराच्या बाहेर यज्ञ वराह शिल्प असून शिल्पाच्या अंगावर नक्षीकाम करण्यात आलेले आहे. वराह शिल्प असल्याने हे पूर्वी विष्णू मंदिर असावे, असा अंदाज आपण बांधू शकतो. मंदिराच्या गाभाऱ्यात पाषाणात कोरून केलेली पशू, पक्षी, स्त्री- पुरुषांची शिल्प, तसेच नक्षीकामाची बारीक कलाकृती भुरळ घालते. सभामंडपाच्या वितानावर सुंदर स्त्री शिल्पे आहेत तर आतील छोट्या गाभाऱ्यात राघवेश्‍वराचे ज्योतिर्लिंग असून, त्याच्या छतावरही नक्षीकाम आहे.

राघवेश्वराचे सौंदर्य अबाधित रहावे म्हणून ग्रामस्थ पुरातत्त्व विभागाचे उंबरे झिझवत आहेत. मात्र अजूनही पुरातत्त्व खात्याने मंदिराची दखल घेतलेली नाही. हे मंदिर जर संरक्षित झाले तर भारतीय संस्कृतीचा एक अनोखा ठेवा आपले वेगळेपण जगाला दाखवत राहील. गावोगावी विखुरलेली अशीच अनेक मंदिरे अपेक्षेने उद्विग्न होऊन आपले सौंदर्य जपावे म्हणून तग धरून उभी आहेत. पुरातत्त्व विभागाने या प्राचीन मंदिरांचे सर्व्हेक्षण करून ती मंदिरे जपण्यासाठी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले पाहिजे. अन्यथा ही मंदिरेही नाहीशी होतील.

Rohan Gadekar

Leave a comment