महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,581

राधानगरी

By Discover Maharashtra Views: 2095 5 Min Read

राधानगरी –

राधानगरी हे एक शाहूकालीन गाव असून ते खुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या (जनक माता-राधाबाई) आईंच्या नावाने वसवले आहे, त्याच बरोबर शाहू महाराजांनी प्रसिद्ध स्थापत्य अभियंते विश्वेश्वरय्या, सर मोक्षगुंडम याना कोल्हापूर येथे निमंत्रित करून त्यांचे सोबत राधानगरी व कालमवाडी ह्या दोन पाणलोट क्षेत्राची पाहणी करून तलाव बांधण्याचा निश्चय केला त्यातील राधानगरी येथील लक्ष्मी तलाव हा आपल्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई  यांचे नावे उभारला. आणि कालमवाडी प्रकल्प हा संस्थान निधी कमी पडल्या कारणाने राहिला तो कालान्तराने राज्य शासना व्दारे बांधण्यात आला.

राधानगरी अभयारण्य हे शाहू महाराजांचे शिकारी करीता फार आवडते ठिकाण याठिकाणी त्यांनी जंगल सफारी करीता हत्ती ठेवलेले त्यासाठी त्यांनी स्वतंत्र हत्ती महाल बांधून घेतला तसेच साठमारी हा हत्तींचा खेळ हि राधानगरी येथे चालू केला. तसेच राधानगरी तलावा सोबत तलावाच्या मध्यभागी बेटामध्ये बेन्झी व्हिला  इत्यादी ऐतिहासिक इमारती उभारल्या.

राधानगरीत शाहू महाराजांनी 100 वर्षांपूर्वी धरण बांधलं. पण आजही ते भक्कमपणे उभा आहे.कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील लक्ष्मी तलाव म्हणजेच राधानगरी धरण. बरोबर 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर शहराची तहान ओळखून राजर्षी शाहू महाराजांनी भोगावती नदीवर या धरणाची निर्मिती केली. देशात कोणत्याही धरणाला स्वयंचलीत दरवाजांची सुविधा नसेल असं तंत्र इथं वापरण्यात आलं. तब्बल 7 टी.एम.सी क्षमता असलेल्या धरणाच्या या भिंती आजही भक्कमपणे उभ्या आहेत. या धरणाचं बांधकाम हे दगडांमध्ये करण्यात आलंय. या विशिष्ट बांधकाम प्रकारावरुनच या धरणाचं बांधकाम किती भक्कम आहे याची प्रचिती येते. चुना आणि शिसे यांचं मिश्रण करुन या धरणाची बांधणी केली. ती इतकी भक्कम आहे की100 वर्षानंतरही धरण डामडौलात उभं आहे.

हे त्यांचे दूरदृष्टी कार्य कोल्हापूर शहर व जिल्ह्याला किती उपयुक्त आहे हे आजही आपण पाहतो आहे.

धरणाचा तालुका अशी राधानगरीची ओळख आहे. तालुक्यात राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी जलाशय आहेत. राऊतवाडी धबाधब्याबरोबर, रामणवाडी, हसणे दरम्यान असणाऱ्या छोट्या-छोट्या धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी असते. हिरवाईने नटलेले डोंगर आणि पावसाच्या धारा अंगावर झेलण्याचा मनमुराद आनंद घेता येता.

तसेच राधानगरी हे अभयारण्य पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला आहे. राधानगरी अभयारण्य रानगव्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य आहे. याची स्थापना १९५८ साली करण्यात आली आणि त्यावेळी याला दाजीपूर अभयारण्य असे नाव देण्यात आले . या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीही आढळतात. त्यापैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत तर ३०० औषधी वनस्पती आहेत.

युनेस्कोने २०१२मध्ये राधानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे.

आजच्या धावत्या झगमगाटी दुनियेत काजव्यांची मनमोहक दुनिया हरवली आहे. मात्र, राधानगरीतील बायसन नेचर क्लब व राधानगरी नेचर क्लबच्या वतीने मे महिन्याच्या दुसऱ्यार पंधरवड्यात स्वतंत्रपणे काजवा महोत्सवाचे आयोजन केले आहे.त्यामुळे पर्यटकांना काजव्यांची मनमोहक दुनिया अनुभवता येणार आहे.जैवविविधतेने नटलेल्या दाजीपूर अभयारण्यात गवारेड्यांसह विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, सर्प, फुलपाखरे आढळतात. या अभयारण्यात उन्हाळ्याच्या अखेरीस शेकडो प्रकारचे काजव्यांचे थवे रंगीबेरंगी प्रकाशाची उधळण करतात. गेल्यावर्षी बायसन नेचर क्लबने काजवा महोत्सव आयोजित करून काजव्यांचा मनमोहक जीवनपट उलगडला होता. बालपणी तिन्हीसांजेला हवेत उडणार्या् काजव्यांमागे धावून पकडलेला काजवा खिशात चमकताना पाहण्याची मजा औरच होती. मात्र, सध्याच्या धावत्या युगातील झगमगाटात काजव्यांचा प्रकाश हरवला आहे. भावी पिढ्यांना काजवा म्हणजे काय, हे सांगावे लागणार आहे.

दाजीपूर अभयारण्यातील जैवविविधतेत काजवा हा महत्त्वाचा कीटक आहे. मे महिन्यात वळीव पाऊस लागला की, अभयारण्यातील वृक्षराजीवर काजव्यांची मोहमयी दुनिया अवतरते. आंबा, जांभूळ,हुंबर, अंजनी, हिरडा व बेहडा अशा निवडक वृक्षांवर काजव्यांची वस्ती असते. काळ्याकुट्ट रात्री हजारो काजवे पांढरा पिवळा, निळा, तांबडा, हिरवा, नारंगी अशा नाना रंगांची उधळण करतात. जगात काजव्यांच्या दोन हजारांवर प्रजाती आहेत. काजव्यांच्या शरीरात ल्युसीफेरीन नावाचे द्रव्य असते त्याची ऑक्सिजनशी विक्रिया झाली की, काजवे प्रकाशतात. अंडी, अळी,कोश असा जीवन प्रवास करणार्या् काजव्यांच्या अळीचे दोन आठवड्यात प्रौढावस्थेत रूपांतर होते. बेडूक व कोळ्यांसह अनेक पक्ष्यांचे काजवा हे खाद्य असून, मे व जून हा काजव्यांचा प्रजनन काळ असतो.काजव्यांची वाढती संख्या पावसाच्या आगमनाची वर्दी देते. मोसमी पावसाचा जोर वाढला की, काजव्यांचे जीवनचक्र संपुष्टात येते. अवघ्या काही आठवड्यांचे आयुष्य लाभलेला काजवा रंगांची मुक्तू उधळण करतो. त्याच्या प्रकाशाचा वेग510ते 670 नॅनोमीटर असतो.दरवर्शि राधानगरीतील बायसन नेचर क्लब तर्फे दिनांक 19 ते 31 मेअखेर पर्यटकांसाठी काळम्मावाडी रोडवर मोफत काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. ‘’आडवाटेवरचे कोल्हापूर’’ यांतर्गत हा महोत्सव होणार असून, तज्ज्ञांची व्याख्याने, राममेवा प्रदर्शन, जंगली चित्रपट व पर्यटकांना विविध प्रकारची माहितीही दिली जाणार आहे, असे क्लबचे उपाध्यक्ष सम्राट केरकर यांनी सांगितले. तर राधानगरी नेचर क्लबतर्फे फराळे-राजापूरनजीक काजवा महोत्सव आयोजित केला जातो.

घनदाट दाजीपूर अभयारण्याचा परिसर देखील हिरवाईने नटलेला आहे. राधानगरी ते दाजीपूर या मार्गावरील पदभ्रमंती करताना जंगली प्राण्यांचे हमखास दर्शन होते. साप, कीटक व विविध प्रकारची फुलपाखरे, दुर्मीळ, फुले, काजवे आदी पर्यटकांचे लक्ष वेधित आहेत. दाजीपूर अभयारण्यावरील कोकण पॉर्इंटवरून दिसणारे सौंदर्य, दाट धुके, ढग जमिनीवर उतरल्याचा भास होणारे दृश्य पर्यटकांना भुरळ पाडते. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या भोजनाची, निवासस्थानाची व्यवस्था आहे. राधानगरीत शासकीय विश्रामगृह आहे. तसेच खासगी हॉटेल्सही आहेत.

Suresh Patil

Leave a comment