महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पार्वतीबाई सदाशिवरावभाऊ पेशवे…

By Discover Maharashtra Views: 3102 7 Min Read

पार्वतीबाई सदाशिवरावभाऊ पेशवे…

पानिपतचे तिसरे युद्ध हे भारताच्या इतिहासात निर्णायक व दूरगामी परिणाम करणारे ठरले. इंग्रज इतिहासकार एल्फीस्टनच्या मते पानिपतमध्ये मराठ्यांचा जसा सर्वांगीण व पूर्ण पराभव झाला असा क्वचितच कोणाचा झाला असेल, त्यामुळे मराठ्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला. या पराभवाच्या धक्क्यातून पेशवा व त्यांचे मराठा राज्य हे कधीच सावरले गेले नाही. १४ जानेवारी १७६१ हा दिवस मराठ्यांच्या  दृष्टीने महाप्रलयात ठरला

पानिपतच्या रणसंग्रमावर जाताना भाऊसाहेबांचा संपूर्ण कुटुंबकबिला त्यांच्याबरोबर होता. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई त्यांच्याबरोबर पानिपतला निघाल्या होत्या .आपल्या पतीवर निस्सीम प्रेम करणारी , प्रेमळ , भाबडी  ,भावनाशील , प्रसंगावधानी , करारी व क्षत्रिय धर्माचे पालन करणारी पार्वतीबाई अंबारीत बसताना नंगी तलवार हाताशी धरूनच बसल्या होत्या.

पार्वतीबाई या सदाशिवराव भाऊ यांच्या दुसऱ्या पत्नी. पहिल्या पत्नी उमाबाई यांच्या निधनानंतर सदाशिवराव भाऊ यांनी पार्वतीबाई यांच्याशी विवाह केला.कोकणातील पार्वतीबाईंचे माहेर कोकणातील कोल्हटकर कुटुंबीयातील होते. पार्वतीबाईंनी आपली भाची राधिकाबाई यांचे लग्न पुतणे विश्वासरावांशी करून दिले होते.

पानिपतचा रणसंग्राम जोरदार चालू होता. विश्‍वासराव पडल्याचे कळतात रावसाहेब ,रावसाहेब  करून किंकाळ्या फोडीतच सदाशिवराव भाऊ पुढे धावले. सदाशिवराव भाऊंचे सर्वांग हेलावून गेले. मोठ्या त्वेषाने उठून भाऊसाहेब रणांगणावर धावले.भाऊने  हातात तलवार भाला घेऊन झुंजू लागले.एकाएकी जंबुर्याचा तडाखा भाऊंच्या मांडीवर बसला. आगीच्या ठिणग्या आणि मासाचे तुकडे बाजूला उडाले. मांडीवर तडाखा बसला .जखमा जिव्हारी लागल्या. उभ्या देहाचा लोळागोळा करणाऱ्या कळा येऊ लागल्या.असह्य वेदनेने भाऊसाहेब घोड्यावरून बाजूला कोसळले.’ हे ऽ भवानी श्रीमंत ऽऽ श्रीमंत ऽऽ ‘ असा शब्दोच्चार करीत भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडले. बाजुची माती रक्तात मिसळू लागली.भाऊंच्या डोळ्यावर अंधारी आली, भाऊंचे प्राणपाखरू भुरकन उडून गेले. हातातला भाला तसाच खाली गळून पडला. तालीमबाजीचा बळकट, चिवट देह ,जिद्दी जीवाला सोडून मुडद्यांच्या राशीत कोसळला.

आभाळात चांदण्या खिन्न होऊन वावरत होत्या. युद्धभूमीवर चांदण्याचा प्रकाश पडला होता.  आजूबाजूला पळून रानात दडलेल्या काही मराठी टोळ्या निसटून पानिपत गावाकडे चालल्या होत्या.या वेड्या पिराना भाऊ ठार झाले की जिवंत आहेत याची कल्पनाच नव्हती.”  “मुलामाणसांसाठी  माझा जीव गुंततो ”  असे भाऊंचे कंप भरल्या आवाजातील शब्द त्यांनी अनेकदा ऐकले होते. या शब्दांचाच भरोसा होता. भाऊ जिवंत असतील तर पानिपतच्या तळावर खडे राहून आपली वाट पाहत बसतील, या भाबड्या आशेने रानात लपलेले, दुसरी दिशा न गवसलेले मराठे पार्वतीबाईना घेऊन गावात चालले होते .

त्याच रात्रीच्या सोबतीने घोड्यावर मांड

ठोकलेल्या पार्वतीबाई दक्षिणेची वाट चालत होत्या. शेजारुन जानू भिंताड्याचे घोडे चालले होते . पार्वतीबाईंचे सर्वांग आक्रंदत होते. प्रत्येक श्वासोच्छवासाबरोबर अंतर्मनात ‘ श्रीमंत  ऽ श्रीमंत  ऽऽ ‘असा आर्जव चालला होता .दिवसभरात पोटात अन्नाचा कण नव्हता .त्याचे भानही त्यांना नव्हते. पुन्हा : पुन्हा आभाळातल्या खिन्न चांदण्या त्या बघत होत्या, आणि भाळावरच्या मळवटाच्या  रक्षणासाठी श्रीगजाननाला साकडे घालीत होत्या. कुठे गेला माझा दौलतीचा धनी ? कुठे लपला माझा पंचप्राण ? रस्त्याकडच्या झाडाझुडपांना त्यांचे आक्रंदते मन विचारणा करीत होते….. परमेश्वरा, माझ्या पदरात ही कसली संक्रांत बांधलीस ? श्रीमंतांचा  थांगपत्ता नाही.  सांगा वेलींनो ऽ सांगा झाडांनो? उजाड रानांनो ,तुम्ही तरी सांगा .घामाने डबडबलेल्या माझ्या मळवटाची तरी तुम्हाला भीड वाटू दे ! पार्वतीबाईंना काहीच कळत नव्हते .सर्वांग आक्रोशत होते .एक मन म्हणत होते. अशी परवड ,अशी घालमेल होण्यापेक्षा मरण आले असते तरी बरे .ईकडच्या स्वारींनी नेमलेला तो विसाजी कृष्ण जोगदंड कुठे गेला ? त्याने कर्म का उरकले नाही ? त्यानेही कुठे दडी मारली ? रणमैदानावरच त्याने गर्दन छाटली असती तर निदान ही अशी घालमेल तरी झाली नसती ! सांगा ना चांदण्यांनो ,माझा चांद कुठे गेला ? तुमचा चांद उगवायला थोडासा उशीर झाला तर तुमच्या जिवाची कशी घालमेल होते ? कितीदा लुकलुकत इकडे तिकडे नाचून आकाशपाताळ एक करता ! आणि माझ्या सौभाग्याचा चांद , माझ्या हृदयाचा देठ कुठे आहे ते तुम्हाला सांगवत नाही ?

पार्वतीबाईंचे डोळे रडून रडून आटले होते .एवढा आसवांचा अभिषेक करूनही बाजूचा निसर्ग चिडीचूप होता. पानिपतावर शेवटी शेवटी मोठी हुल्लड माजली तेव्हा, अनेक सरदारदरकदार दिल्लीच्या दिशेने पळू लागले.त्यांच्या लोंढ्याकडे बघून बावरलेल्या पार्वतीबाई भाऊंना शोधत होत्या.तेवढ्यात कोणीतरी पार्वतीबाईंना सांगितले, ‘ भाऊ दिल्लीकडे कूच झाले ! पार्वतीबाईंना ते खरे वाटले .एवढे सरदार ,कारकून ,पंडित सारे दक्षिणेकडे धावताहेत ,ते उगाच कसे ? इकडची स्वारी पुढे गेली म्हणूनच बाकीचे मागून धावत असतील. स्वारींना असे रणांगणावर एकटे दुखटे टाकून एवढे मोठे मोठे सरदार पळतीलच कसे?

पार्वतीबाई ह्याच विचाराने धावत्या गर्दीतून दिल्लीकडे चालल्या होत्या. चांदण्यात पंधरा-वीस मैलांची दौड झाली तरी भाऊंची खरी बातमी त्यांना लागत नव्हती .स्वारींना आम्ही बजावून सांगितले होते ,आम्हाला टाकून तुम्ही कुठे कुठे जायचे नाही ! जीवण असू दे नाही तर मृत्यू ! जिथे तुमची पावले तिथेच माझेही पाय. तुमच्या पाउलखुणांवर फुले वहात वहात मला धावू दे …तुमची सांगातीण होईन. पार्वतीबाईंच्या पोटात अन्नाचा कण नव्हता. अंधारातून धावत असताना  पार्वतीबाईंना घेरी येऊ लागली होती.

पार्वतीबाई मनातल्या मनात म्हणाल्या काही झाले तरी स्वारी एखाद्या गावात थांबेलच .आम्हाला टाकून ते दक्षिणेत जातीलच कसे ? त्यांचा स्वभाव आम्हाला माहित आहे .सर्वांच्या करिता असतील ते कडक,कर्तव्यकठोर धनी ! पण मी एखाद्या दिवशी आजारामुळे जेवले नाही तर त्यांचा जीव किती तीळ तीळ तुटतो ! लहानग्या लेकराप्रमाणे मुद्रा करून कसे बसतात ते आम्हाला विचारा ना !….डोळ्यात पाणी आणून स्वारी आमची वाट बघत कोणा झाडाबुडी खडी असेल ऽ ! ?

सदाशिवराव भाऊ यांचे निधन मराठा साम्राज्याने व पार्वतीबाईने पाहिले. पानिपतावर मराठ्यांचा पराभव झाला असला तरी वीर म्हणून सदाशिवराव भाऊ पेशवे यांचे नाव सर्वज्ञात आहे .परंतु पानिपतावर जिचे सर्वस्व हरवले त्या पार्वतीबाई मात्र आष्यभर एक ओली जखम हृदयाशी बाळगून पुढे बावीस वर्ष शनिवार वाड्यात वावरल्या.

पार्वतीबाईंच्या डोळ्यासमोर पेशवे गादीवर

बसत होते. विजयोत्सव  साजरे करीत होते , मोठमोठ्या मोहिमा तडीला नेल्याच्या फुशारक्या मारीत होते. राजकारणाचा झंझावात सुरूच होता. ती आणि तिच्या सारख्या अनेक व्यक्ती त्यात फरफटत होत्या.कित्येक स्रीया आणि पुरुष यांची आयुष्ये होरपळली गेली पण कुणाला दाद ना  फिर्याद.

आपले पती भाऊसाहेब हे कधीतरी पानीपतावरून परत येतील या भाबड्या आशेवर विधवा आणि सधवेच्या सीमारेषेवर पार्वतीबाईंची चातकी होरपळ आयुष्यभर मनाचा ठाव घेणारी ठरली.

पार्वतीबाईंनी मराठा साम्राज्यात अनेक चढ-उतार पाहिले .न्युमोनिया मुळे २५ सप्टेंबर १७८३ मधे पार्वती बाईंचे निधन झाले. सदाशिवराव भाऊंची सती म्हणून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सदाशिवराव भाऊंच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहणाऱ्या,पानिपतच्या कोलाहलात शत्रूच्या हाती लागू नये म्हणून व जर लागलोच तर स्वतःची शाखा करू पाहण्यासाठी जवळ जंबिया बाळगणार्या पार्वतीबाई  आपल्या पतीला म्हणते,” एकदा क्षत्रिय व्रत स्वीकारले की शाका नाकारण्यात काही अर्थ?…. मी तुमची सांगातीन होईन.” असे वचन देणारी पार्वती, पानिपतच्या युद्धानंतरही संपूर्ण आयुष्यभर भाऊसाहेबांची वाट पाहत असणार्या,तोतयाच्या बंडालाही सामोरे जाणार्या अशा या अत्यंत प्रेमळ ,भाबड्या, भावनाशील , करारी,क्षत्रिय धर्माचे पालन करणाऱ्या पार्वतीबाई पेशवीन.

लेखन –  डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर

Leave a comment