महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मराठ्यांच्या नर्मदास्वारीची मुहूर्तमेढ

By Discover Maharashtra Views: 1267 3 Min Read

मराठ्यांच्या नर्मदास्वारीची मुहूर्तमेढ –

मराठ्यांच्या राज्यस्थापनेच्या काळापासून मराठ्यांची उत्तर पादक्रांत करण्याची मनिषा होती. ‘काशीचा विश्वेश्वर सोडवा’ हे थोरल्या छत्रपतींचे स्वप्न! मराठ्यांची ही उत्तरेची मनिषा ऐन शिवकाळात कधीही पूर्ण होऊ शकली नाही. थोरल्या महाराजांनी दक्षिण दिग्विजय करून दक्षिण जिंकली, मात्र महाराजांना उत्तर व्यापणे शक्य झाले नाही. महाराजांची ही उत्तर दिग्विजयाची इच्छा पुढे थोरल्या बाजीरावांनी आणि इतर पेशव्यांनी पूर्ण केली. मराठ्यांच्या उत्तरेच्या ह्या दिग्विजयाची मुहूर्तमेढ मात्र राजारामकाळात झाली.(मराठ्यांच्या नर्मदास्वारीची मुहूर्तमेढ)

एकीकडे औरंगजेब आपल्या लाखोंच्या सैन्यासह महाराष्ट्रात थैमान घालत होता. त्याला मराठे प्राणपणाने तोंड देत होते. त्याच काळात राजाराम छत्रपतींनी दिल्ली जिंकण्याची महत्वाकांक्षा व्यक्त केली. राजाराम महाराजांनी ४ जून १६९१च्या पत्रात हणमंतराव घोरपडे यांना २ लाख ५० हजार आणि कृष्णाजी घोरपडे यांना ५० हजारांचे इनाम जाहीर केले होते.

“आहे तितुके जतन करावे । पुढे आणिक मेळवावे ।
महाराष्ट्रराज्य करावे । जिकडे तिकडे॥”

ह्या समर्थोक्तीनुसार आणि “महाराष्ट्रधर्म पूर्ण रक्षावा” ह्या राजाराम महाराजांच्या आज्ञेवरुन सारे मराठे औरंगजेबाशी झुंजत होते. ह्याच काळात, राजाराम महाराज कर्नाटकातून महाराष्ट्रात आल्यावर, भविष्यात अनेकदा मराठ्यांनी केलेल्या उत्तरेच्या स्वाऱ्यांची मुहूर्तमेढ रोवली गेली. उत्तरेत छत्रसाल बुंदेला ह्याने स्वातंत्र्यासाठी बंड केले. तो माळव्याकडे झेपावला. त्याच सुमारास   इ.स. १६९९-१७०० मध्ये, मराठ्यांनी पहिल्यांदा उत्तरेची स्वारी केली. संपुर्ण महाराष्ट्र दक्षिणेत औरंगजेबाशी लढत असतांना मराठ्यांच्या एका तुकडीने माळव्याला धडक दिली, तेथील धामुणीचा  प्रदेश लुटला. कृष्णा सावंत नावाच्या मराठा सरदाराने आपल्या १५ हजार स्वारांसह हा पराक्रम गाजवला. पुढे मराठ्यांनी माळव्यावर केलेल्या राजकारणाची आणि स्वाऱ्यांची ही मुहूर्तमेढ होती, जणू हा मराठ्यांच्या दिल्ली दिग्विजयाचा आरंभ होता. जदूनाथ सरकार म्हणतात, “जो मार्ग ह्यावेळी सुरू झाला, तो माळवा मराठ्यांच्या ताब्यात येईपर्यंत अव्याहतपणे सुरूच राहिला.” ह्या बद्दल भीमसेन सक्सेना आपल्या तारीखे दिलकुशा ह्या ग्रंथात म्हणतो,

“During the time of Krishna Savanta, the Marratta general at the head of 15000 cavalry, crossed the Narmada, ravaged some places near Dhamoni and returned. From the time of early Sultans till now, the Marathas had never crossed Narmada. ”

“प्रारंभीच्या सुलतानांपासून आजपर्यंत मराठे कधीच नर्मदापार झाले नव्हते”, भीमसेन सक्सेनाच्या ह्या एका विधानाने मराठ्यांच्या ह्या स्वारीचे महत्व लक्षात येते.

संदर्भ-

१. शिवपुत्र छत्रपती राजाराम – डॉ. जयसिंगराव पवार
२. मराठी रियासत खंड २ – गो. स. सरदेसाई
३. श्री छत्रपती राजाराम – वा. सी. बेंद्रे
४. औरंगजेब – जदूनाथ सरकार
५. मालवा मे युगांतर – रघुबीर सिंह
६. मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध – डॉ. जयसिंगराव पवार

©अनिकेत वाणी

Leave a comment