महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,722

नरनाळा किल्ला…

By Discover Maharashtra Views: 3781 3 Min Read

नरनाळा किल्ला…

अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर नरनाळा किल्ला पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानूर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्यापासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही.

भौगोलिक माहिती…

गड जमिनीपासून ३१६१ फूट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकराचा असून गडाच्या कोटाची (तटबंदीची) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुधा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरिदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखला जात असून तेलियागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत.

किल्ल्याबद्दल….

गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानूर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेला महाकाली दरवाजा, असे करीत आपण गडावर पोहचतो. गडाच्या मध्यावर सक्कर तलाव नावाचा विर्स्तीण जलाशय आहे. याला बारमाही पाणी असते. हा तलाव याच्या औषधी गुणांकरिता पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्रा चावल्यास त्याने या तलावात स्नान करून येथील दर्ग्यावर गूळफुटाणे वाहावे व तडक गड उतरावा. तसेच गड उतरताना मागे वळून पाहू नये, असे मानतात.

पाहण्यासारखी ठिकाणे….

गडावर आजही राणी महाल व बाजूची मशीद अस्तित्वात आहे. त्या समोरचा सभामंडप आता नसला तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराचे भान करून देतात. सरळ पुढे गेल्यास तेला- तुपाच्या टाक्या लागतात. या टाक्या खोल असून त्यांत विभागणी केलेली आहे; युद्धकाळात तेल-तूप साठवण्यासाठी त्या वापरल्या जात असे.
गडाच्या तटाच्या बाजूने फिरत गेल्यास थोड्या अंतरावर ‘नऊगजी तोफ’ दिसते. ही तोफ अष्टधातूची असून इमादशहाच्या काळात गडावर आणली गेल्याचे बोलले जाते. तोफेवर पारशीत लेख कोरलेला आहे. तोफेचे तोंड गडपायथ्याच्या शहानूर गावाकडे रोखलेले आपणास लक्षात येते. बाजूला खूप खोल असे चंदन खोरे आहे. या खोऱ्यात चंदनाच्या व सागाच्या झाडांची फार दाट पसरण आहे.

ऐतिहासिक महत्त्व……

गड नेमका कुणी आणि कोणत्या काळात बांधला या बाबत नक्की माहिती नाही पण स्थापत्य व ऐतिहासिक पुराव्यांवरून हा गड ‘गोंड राजांनी’ बांधला असल्याचे बोलले जाते. गडावर नागपूरकर भोसले कालीन तुळशी वृंदावन व हनुमान मंदिर आहे. गडावर राम तलाव व धोबी तलाव यांसहित २२ तलाव आहेत. गडाला ६४ बुरूज आहेत. भक्कम तटबंदी व दुर्गम पहाडी यांच्या सहित हा दुर्ग सातपुड्याच्या दारावर उभा राहून उत्तरेकडून विशेषतः माळव्यातून येणाऱ्या आक्रमणांना तोंड देत झुंजला असेल. या गडावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या किल्ल्याला ७ जून, इ.स. १९१६ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

माहिती साभार – Wikipedia

Leave a comment