वृद्धेश्वरचा म्हातारदेव

वृद्धेश्वरचा म्हातारदेव

वृद्धेश्वरचा म्हातारदेव –

ब्रह्मपुराणामध्ये उल्लेख असलेल्या वृद्धा नदीकाठी वसले आहे वृद्धेश्वर. नगर वरून पाथर्डीला जाताना करंजी घाट उतरला की देवराई गाव लागते. इथे उजवीकडचा रस्ता वृद्धेश्वरला जातो. अत्यंत रम्य ठिकाण असलेल्या या गावी आहे एक पुरातन शिव मंदिर. मंदिराच्या पाठीमागे आहे गर्भगिरी डोंगर. पार्वतीने इथे तपश्चर्या केल्यावर सर्व देवांना भोजन दिले. त्या प्रसंगी शंकर भगवान एका म्हाताऱ्याचे रूप घेऊन आले आणि त्यांनी सर्व देवतांना भोजन वाढले. त्यामुळे इथला देव हा वृद्धेश्वरचा म्हातारदेव अशी सुंदर आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. तसेच नवनाथ भक्तीसारामध्ये म्हातारदेव असा उल्लेख आहे.

परी गर्भाद्री पर्वतात, वस्तीस राहिला उमाकांत | तो अद्यपि आहे स्वस्थानात, म्हातारदेव म्हणती त्या || (२३.६५).

तीर्थक्षेत्र आले की त्याबद्दल दंतकथा सुद्धा आल्याच. वृद्धेश्वर शब्दाची उत्पत्ती सांगताना इथे असे सांगतात की दर वर्षी महाशिवरात्रीला इथली शिवपिंडी गव्हाच्या एका दाण्याएवढी वृद्धिंगत होते म्हणून हा वृद्धेश्वर. शिवपिंडीवर एक खळगा असून त्यात कायम पाणी असते. काशीची गंगा इथे प्रकट झाली आहे अशी भक्तांची गाढ श्रद्धा. मंदिराचा पेशवेकाळात जीर्णोद्धार झाला असावा. पश्चिमाभिमुख असलेल्या मंदिराला सूर्यप्रकाश थेट पिंडीवर पाडण्यासाठी तीन मोठे झरोके ठेवलेले आहेत. त्यामुळे सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन असले तरी शिवपिंडीवर सूर्यप्रकाश पडतो.

या रमणीय परिसरामध्ये एक बारव, ज्ञानेश्वर मंदिर, कपिलमुनी मंदिर अशी छोटी देवळे इथे आहेत. मंदिर परिसरात अनेक मूर्ती अवशेष तसेच काही सुंदर वीरगळ दिसून येतात. मंदिरात एक पंचधातूची घण्टा आहे. मूळच्या घंटेची ही प्रतिकृती असून मूळ घंटेवरील शिलालेख या घंटेवरही कोरला आहे. त्यानुसार ही घण्टा १२ व्या शतकातील कोणा प्राणदेवराजाने मंदिराला दान दिल्याचा उल्लेख दिसतो. श्रीशंकरमहाराज या सत्पुरुषांचे वास्तव्य याठिकाणी झाले होते असे ग्रामस्थ सांगतात. नगर वरून पाथर्डीकडे जाताना मुद्दाम वाट वाकडी करून गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेल्या या सुंदर वृद्धेश्वरला भेट द्यायलाच हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here