मातीचा गणपती, पुणे

मातीचा गणपती, पुणे

मातीचा गणपती, पुणे –

जुने पुणे हे नदीकाठी वसलेलं होत आणि त्यामुळेच आत्ता पुण्यातील बरीच मंदिर ही नदीकाठी वसलेली आहेत. त्यापैकीच एक मातीचा गणपती. पुण्यातील केळकर रोडवर नारायण पेठ पोलिस चौकीच्या पुढे डाव्या बाजूला एक जुनी दगडी दीपमाळ दिसते. तेथेच या मातीच्या गणपतीचे सुंदर आणि छोटेस मंदिर आहे. या गणपतीला माती गणपती अशी ओळख आहे. परंतु पूर्वी हा मातीचा गणपती म्हणून ओळखला जात असे.

या मंदिराबद्दल फारसा इतिहास उपलब्ध नाही. परंतु एका आख्यायिकेनुसार जुन पुणे आणि नारायण पेठ, सदाशिव पेठ या पेठा आंबिल ओढ्यामुळे वेगळे झाले होते. सध्याच्या बाजीराव रस्त्याच्या आसपास हे ओढ्याचे पात्र होते. पुढे पेशवाईच्या काळात ओढ्याचा मार्ग बदलण्यात आला. त्यावेळेस तिथे मोठ्या प्रमाणात झाडी असल्यामुळे तेथे गुराखी गुर-ढोर चरण्यासाठी आणत असत. त्यापैकी काही लहान मुले जनावरांना चरायला सोडल्यावर फावल्या वेळेत खेळता खेळता तेथील माती जमा करून मातीचा गणपती बनवत आणि त्याची पूजा करत असत. नंतर संध्याकाळी खेळ संपला की ती मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करत.

अशाच एके दिवशी गणेशभक्त मोरया गोसावी तिथून जात असताना त्यांनी हा खेळ पाहिला आणि त्यांनी त्या मुलांना गणेशाची मातीची मोठी मूर्ती बनून तिची पूजा करायला सांगितली आणि ती मूर्ती विसर्जित करू नका असा उपदेश ही केला. मुलांना ही कल्पना आवडली आणि त्यांनी सुरेख अशी मातीची गणेशमूर्ती घडवली. तीच ही माती गणपतीची गणेश मूर्ती. या मूर्तीला शेंदुराच लेपन पुढे चढल आणि एकप्रकारे संरक्षण कवच निर्माण झालं. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार मुठा नदीतून वाहत आलेली एक गणेश मूर्ती शिवराम पंत श्रोत्रींना मिळाली तीच ही मूर्ती.

सध्या ही मूर्ती अतिशय सुंदर अशा पितळी देव्हाऱ्यात स्थापित आहे. सुमारे दीड मीटर उंचीची शेंदरी रंगाची आणि डाव्या सोंडेची ही मूर्ती असून तिने पंचधातूंचा मुकुट परिधान केलेला आहे. ही मूर्ती खूप सुरेख दिसते. गणेशाच्या मूर्तीचा उजवा हात मांडीवर, वरच्या उजव्या हातात फुल, वरच्या डाव्या हातात परशू आणि खालचा डावा हात गुडघ्यावर ठेवलेला आहे.

या मंदिराचा उल्लेख पेशवाईत हि मिळतो तो असा की श्रीमंत सवाई माधवराव पेशव्यांच्या जन्मानंतर पुण्याच्या अनेक देवळांमध्ये दक्षिणा ठेवल्या गेल्या त्यातीलच एक हे मंदीर. मंदिराच्या मागील बाजूस मारुतीचे एक छोटे मंदिर आहे. मंदिर सध्या एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारती मध्ये आहे. पानशेत पुरामुळे मंदिराचे नुकसान झाले होते. परंतु गणेश मूर्ती तेथील घंटा आणि शाळिग्राम हलले देखील नाही असे जुने लोक सांगतात. त्यानंतर हे मंदिर इथे हलवण्यात आले परंतु दीपमाळ आपल्याला अजुनही त्याच ठिकाणी बघावयास मिळते.

संदर्भ – मुठेकाठचे पुणे : प्र. के. घाणेकर.

पत्ता : https://goo.gl/maps/vHNeN9o4SfBt37nv9

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here