मराठा वॉर मेमोरियल, कॅम्प

मराठा वॉर मेमोरियल, कॅम्प

मराठा वॉर मेमोरियल, कॅम्प –

कॅम्प परिसरात जिथे डॉ.कोयाजी रोड आणि मोलेदिना रोड एकत्र होतात. त्या चौकात मध्यभागी एका त्रिकोणी बेटावर एक स्मारक आहे. ते मराठा वॉर मेमोरियल.

पहिल्या महायुद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या मराठा वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे स्मारक उभारले आहे. याची  कोनशिला दि. १९ नोव्हेंबर १९२१ रोजी छ. शाहूमहाराज यांच्या पुढाकाराने शनिवारवाडा येथे प्रिन्स ऑफ वेल्स युवराज एडवर्ड यांच्या हस्ते बसविली होती. त्यानंतर इ.स.१९३१ मध्ये हा स्मृतिस्तंभ कॅम्प मधल्या सध्याच्या ठिकाणी हलविला. सदर स्मृतिस्तंभ चौकोनी असून वर पारंपारिक छत्री आहे. समोरच्या बाजूला एक शिलालेख कोरलेला असून त्यावर,

IN MEMORY OF THOSE MEN OF MAHARASHTRA WHO LAID DOWN THEIR LIVES IN THE WAR OF 1914-18

THIS MONUMENT HAS BEEN ERECTED BY THE OFFICERS & MEN OF THEIR REGIMENTS & THE PRINCES, RULERS & PEOPLE OF THEIR RACE

“THEIR NAME LIVETH FOR EVERMORE”

हे कोरलेले आहे. तर खालच्या उजव्या कोपऱ्यात हा स्तंभ बनवणाऱ्या कारागीर आणि अभियंत्यांची नावे आहे.

ACOTT BHUTA & CARPENTER ARCHITECTS

KRISHNAJI RAMKRISHNA & CO CONTRACTORS

तर पायाशी,

THIS FOUNDATION STONE WAS LAID BY HIS ROYAL HIGHNESS THE PRINCE OF WALES WHEN HE VISITED INDIA ON 19TH NOVEMBER 1921

हे कोरलेले आहे. डाव्या बाजूला ज्या सैनिकी तुकड्या/ पलटणीमधील सैनिक धारातीर्थी पडले त्यांची नावे कोरलेली आहे.

31ST PCO LANCERS, 3RD ROYAL BOMBAY SAPPERS & MINERS, THE 101ST GRENADIERS, 103RD MAHRATTA LIGHT INFANTRY, 105TH MAHRATTA LIGHT INFANTRY, 107TH PIONEERS, 108TH INFANTRY, 109TH INFANTRY, 110TH MAHRATTA LIGHT INFANTRY, 114TH MAHRATTAS, 116TH MAHRATTAS 117TH ROYAL MAHRATTAS, 121ST PIONEERS, 128TH PIONEERS.

तर हीच माहिती मराठीमध्ये स्मृतीस्तंभाच्या मागच्या आणि उजव्या बाजूला अनुक्रमे कोरलेली आहे.

या स्मारकाच्या आवारात ३ मध्ययूगीन तोफा आहेत.या तोफांवर फारसी भाषेत लेखन केले आहे. इतिहास संशोधक कै. डॉ. ग. ह. खरे ह्यांनी ह्या तोफांवर अभ्यास करुन लेखन केले होते. ह्यातली एक तोफ मुघल बादशाह औरंगजेबाच्या तोफखान्यातली आहे. या तोफेचे वजन ३ टन ९०२ किलोग्रॅम आहे. या तोफेचे नाव #फतेह_कुशा आहे. इतिहास संशोधक कै. डॉ. ग. ह. खरे यांच्या म्हणण्यानुसार इ.स. १९५७ सालापासून तोफा दुर्लक्षित आहेत. ही स्थिती आजही बदललेली नाही. अलीकडच्या काळात या तोफांना रंग दिला असल्यामुळे आपल्याला त्या फारशा जुन्या वाटत नाहीत. पण या तोफांचा इतिहास आकर्षक आहे. या स्मारकाच्या बरोबर मागील बाजूस असणारी एक तोफ ऐतिहासिकदृष्ट्या बऱ्याच अपरिचित असणाऱ्या गोष्टी आपल्याला सांगते. ही तोफ मुघल बादशाह औरंगजेब याच्यासाठी तयार करण्यात आली होती. या तोफेवर एकूण ५ फारसी भाषेतील लेख असून, या ५ लेखांमधून तोफेचे नाव, तोफ कुणी बनवली, कुणासाठी बनवली, कोणत्या वर्षात बनवली आणि तोफ चालवायची कशी या गोष्टी कळतात.

पहिल्या लेखात औरंगजेबाचे संपूर्ण नाव, त्याच्या सर्व पदव्यांसोबत लिहिले आहे.

अबुल जफ़र मुहम्मद मूहिउद्दीन औरंगजेब बहादूर आलमगिर बादशाह गाझी सना १०

दुसऱ्या लेखात तोफेच्या निर्मितीचा काळ आहे.

समान सीतेन व आलफ सना

पहिल्या आणि दुसऱ्या लेखात आलेल्या कालगणनेचा विचार करता, सदर तोफेची निर्मिती औरंगजेबाच्या राज्यारोहणानंतर १० वर्षांनी म्हणजेच इ.स. १६६७-६८ च्या दरम्यान करण्यात आली असावी.

तिसऱ्या लेखात तोफेचे नाव आहे.

तुप ए फतेह कुशाह

चौथ्या लेखामध्ये तोफ तयार करणाऱ्या कारागिराचे नाव आहे.

अमल ए मुहम्मद अली अरब

असे लेखाचे वाचन असून, तोफ तयार करणाऱ्या कारागिराचे नाव मुहम्मद अली अरब असल्याचे समजते.

तोफेच्या सर्वात खालील बाजूस, जिथून तोफेला बत्ती देण्यात येते त्या ठिकाणी लिहिलेल्या लेखात तोफेमध्ये किती दारू भरावी, याविषयीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या लेखाचे वाचन,

गोला ए आहनी दवाजदाह आसार बारुत चहार आसार बे वजने अकबरी

म्हणजे, अकबरी वजनाप्रमाणे १२ शेर वजनाचा तोफगोळा आणि ४  शेर वजनाची दारू ही तोफ उडवायला लागत असे.

या लेखाचे वाचन सर्वात पहिल्यांदा इतिहास संशोधक ‘ग. ह. खरे’ यांनी केले होते. अलीकडच्या काळात फारसी भाषेचे अभ्यासक Nikhil Paranjape सर यांनी तोफेचा इतिहास नव्याने लोकांसमोर आणला आहे.

संदर्भ:
केतन पुरी – https://www.facebook.com/ketan.puri.5/posts/pfbid02YAd4mpwmcXMPZXSDAonHvY7XBqyYxuQhscZ8ehNqUMecnZPmUgY16qbDgUKNtt57l

पत्ता :
https://goo.gl/maps/9gqv1h92FzL28mYq6

आठवणी_इतिहासाच्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here