मंडपेश्वर

manpeshwar caves

मंडपेश्वर…

भारतामध्ये सुमारे बाराशे कोरीव गुंफा आहेत. त्यापैकी हजार गुंफा एकट्या महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. सह्याद्रीचा दगड हा गुंफा कोरण्यासाठी आदर्श होता. मुंबई या शहरालाही प्राचीन इतिहास आहे. मुंबईतील उत्तर भागात कान्हेरी, मंडपेश्वर, मागाठणे,महाकाली, जोगेश्वरी गुंफा आढळतात. मुंबईतील अनेक लेण्यापैकी एक सर्वात लहान लेणी म्हणजे बोरिवली-दहिसर जवळील मंडपेश्वर लेणी. कान्हेरी व महाकाली लेणी या बौद्ध लेण्यांसाठी तर मंडपेश्वर लेणी शिवलेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. या गुंफा सहाव्या शतकात माउंट पोयसर या नावानं ओळखल्या जाणा-या टेकडीच्या पूर्वेकडील पायथ्याशी खोदण्यात आल्या आहेत. बोरिवली व दहिसर स्थानकावरून आपण रिक्षाने तेथे जाऊ शकतो.

कान्हेरीच्या दगडापेक्षा मंडपेश्वराच्या दगडाचा दर्जा जास्त चांगला आहे. लेण्यासमोर एखाद्या मैदानाप्रमाणे मोकळी जागा दिसते. या मोकळ्या जागेच्या कोप-यात या गुंफा नजर टाकली की समोरच्या भग्नावस्थेतील मंडपेश्वर गुंफा आपलं लक्ष वेधतात. त्या गुंफांच्या परिसरात मुलं खेळताना दिसतात. जोगेश्वरी लेण्यांच्या मानानं ही लेणी बरीच लहान आहेत. मात्र या लेण्यांसमोर मोठं पटांगण आहे. येथील सभामंडपाची लांबी ५१ फूट तर रुंदी २१ फूट आहे. लेण्यांच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. ते घारापुरी लेण्यांप्रमाणेच प्रथम दर्शनी दिसत असले तरी त्यावर खूप कोरीव काम केलेलं आहे. यावरून ही लेणी घारापुरीनंतर खोदली गेली असावीत असं म्हटलं जातं. सभामंडपानंतर अंतराळ आणि त्यानंतर गर्भगृह अशी रचना आहे. या लेण्याच्या आतमध्ये मध्यभागी शिव मंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूस दोन लहान गुंफा आतून जोडलेल्या असून त्यालाच जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत.

गर्भगृहात अलीकडच्या काळात स्थापना केलेले शिवलिंग आहे. या गुंफेत शिवतांडव, लकुलिश यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत. नृत्य करत असलेल्या शिवाचं आणि त्यासोबत विविध संगीत वाद्य वाजवणा-यांचं भव्य शिल्प सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर पाहायला मिळतं. नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव, गणपती, विष्णु असुन नटेशाचं नृत्य सुरू आहे आणि बाकीचे त्याचा आनंद घेत आहेत. या खोलीला जोडून आत आणखी दोन खोल्या आहेत. पोर्तुगीजांनी या भागाचा सामानसुमान ठेवण्यासाठी वापर केला होता. व्यापाराच्या हेतुनं आलेले पोर्तुगीज सोबत धर्मही घेऊन आले. या भागात पोर्तुगीजांनी आपले चर्च सोळाव्या शतकात स्थापन केल्यानंतर पी. अन्टौनिओ डी. पोरटो या रोमन कॅथलिकानं या शिवमंदिराचं रूपांतर चर्चमध्ये केलं. त्याकरिता त्यानं लेण्यांच्या समोर मोठी भिंत खोदली. नटेशाच्या दालनाच्या उंबरठ्यावरचे दोन खांब काढून टाकले आणि नटेशाच्या दालनाचं अल्टारमध्ये रूपांतर केलं गेलं. जागोजागी लाकडी तुळई लावण्यासाठी चौकोनी खोबण्या खोदल्या.

काही खोबण्यांत लाकडाचे अवशेष अजूनही शिल्लक आहेत. गाभाऱ्याबाहेर नंदीवरल्या छतावर एक वर्तुळ कोरण्यात आले. बाहेर डावीकडच्या दगडात कोरलेल्या एका मूर्तीच्या जागी क्रॉस कोरला आणि उजवीकडच्या मूर्तीचं काही करता येईना म्हणून ती सोडून दिली. मूर्ती फोडून क्रॉस कोरलेल्या ठिकाणी शेजारी बाहेरच्या बाजूला आणखी दोन मोठी दालनं होती. आतली जमीन आणि भिंती सगळंच ओबडधोबड होतं. पण ही दालनं मात्र प्रशस्त होती. आतील काही शिल्पांपुढे भिंती बांधल्या व फरशींवर गिलावा केला. त्यामुळे येथील शिल्प सुरक्षित राहिली. त्या भिंती पाडल्यानंतर व गिलावा काढल्यावर तिथली सुंदर शिल्प दृष्टीसमोर आली. पंधराव्या शतकानंतर या गुंफांकडे लोकांचे दुर्लक्ष झाले. पुढे पेशव्यांनी पोर्तुगीजां कडून वसई जिंकून घेतल्यावर मंडपेश्वरही ताब्यात घेतलं आणि ते ज्या दिवशी ताब्यात घेतलं त्याचा तपशील मांडणारा शिलालेख गुंफेत आहे. कान्हेरीप्रमाणेच इथेही पाण्याची नीट नीट व्यवस्था करून ठेवल्याची दिसते. पोर्तुगीजांनी कोरलेल्या क्रॉसच्या पायथ्याशी एक मोठं टाकं सुद्धा आहे. मुळात हिंदू पण नंतर ख्रिश्चनांच्या ताब्यात असलेल्या या मंडपेश्वर गुंफांची देखभाल सध्याच्या काळातही फारशी होत नाही.

त्रिपुरी पोर्णिमेला या मंडपेश्वर गुंफांमध्ये दीप प्रज्वलनाचा सोहळा पार पडतो. त्यानंतर तेथे वर्षभर अंधारच असतो. या लेण्यांमध्ये शिवलिंग असल्याने या ठिकाणी कित्येक भाविक दर्शनासाठी येतात. हे स्मारक १९५८ च्या २४व्या प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्वीय स्थळ व अवशेष अधिनियमा प्रमाणे राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या लेण्या भर रस्त्यात असल्या तरी त्यांच्याकडे फारसं कोणाचंच लक्ष नाही. लेण्यामध्ये प्रवेश केल्यावर समोरच्या बाजूने गुफांच्या वरच्या बाजूस पोर्तुगीजांच्या कालखंडात अस्तित्वात आलेल्या चर्चचे अवशेष पाहायला मिळतात. लेण्यांच्या आवारातुनच हे चर्चचे अवशेष पहायला जाता येते. भर शहरात असलेल्या या लेण्यांना एकदा तरी भेट द्यायला हवी.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर

सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here