लोणी भापकरचे मंदिरशिल्प

By Discover Maharashtra Views: 1429 4 Min Read

लोणी भापकर चे मंदिरशिल्प –

पुण्यापासून एक दिवसाच्या अंतरावर बघण्यासारखी अशी वारसास्थळे कोणती असा प्रश्न जर विचारला तर मी आवर्जून लोणी भापकरचे नाव सांगतो! सरदार भापकरांच्या या गावात बघण्यासारखे बरेच काही आहे. पुण्यापासून साधारण ९० किमी अंतरावर लोणी भापकर हे गाव वसलेले आहे. पुणे-सासवड-जेजुरी-मोरगाव असे करत आपण लोणी भापकरला येऊन पोहोचतो. या रस्त्यावर असणारी मोरगाव आणि जेजुरी ही पर्यटकांनी गजबजलेली ठिकाणे. पण इथूनच अवघ्या २० किमी अंतरावर असणाऱ्या लोणी भापकर येथे मात्र फारशी मंडळी फिरकत नाहीत. लोणी भापकर हे ठिकाण मंदिरांचा अभ्यास करणाऱ्यांना तसेच इतिहास अभ्यासकांना कधीच निराश करत नाही. गावातील भैरवनाथाचे मंदिर, त्यासमोर असणारी पोर्तुगीज घंटा, गावाच्या थोडे बाहेर असणारे प्राचीन विष्णू मंदिर, त्यासमोरची पुष्करणी, वराहाची सुंदर मूर्ती तसेच गावात आढळणारे असंख्य विरगळ हे गावातील इतिहासाची साक्ष देतात.

गावात प्रवेश केला की डाव्या हातालाच भैरवनाथाच्या मंदिराची तटबंदी दिसते. मंदिराच्या भव्य परिसरात एक महत्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे सन १६८५ साली बनवलेली एक पोर्तुगीज घंटा. सन १७३७ ला वसईतून पोर्तुगीजांना हाकलल्यानंतर सर्व मराठा सरदारांनी तिथल्या चर्चवरील चर्च बेल्स काढून आपापल्या देवतांना अर्पण केल्या होत्या. यातील एक घंटा ही भैरवनाथाच्या मंदिरात दिसून येते. कदाचित सरदारन भापकरानी ती येथे अर्पण केली असावी असे दिसते. या घंटेवर IHS अशी अक्षरे कोरलेली आपल्याला दिसून येतात. भैरवनाथाचे मंदिर बघून झाले की आपला मोर्चा आता वळवावा प्राचीन विष्णू मंदिराकडे. येथे जाण्यासाठी गावातील कुणालाही दत्त मंदिराचा रस्ता विचारावा.

भैरवनाथाच्या मंदिरापासून साधारणपणे २-२.५ किमी अंतरावर एका शांत स्थळी हे प्राचीन विष्णू मंदिर बांधलेले दिसून येते. सध्या जरी त्यात शिवपिंडी असली तरी मंदिरातील शिल्पांवरून हे मंदिर पूर्वी विष्णू मंदिर असण्याची शक्यता तज्ञांच्या मते आहे. अंबरनाथ, सिन्नर या मंदिरांना सार्धम्य असणारा भाजक्या विटांचा कळस या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. बाकीचे सर्व मंदिर हे दगडी बांधणीतले आहे. मंदिरात प्रवेशकेल्यावर सभामंडपात आपल्याला दिसते ती भली मोठी रंगशिळा. रंगशिळेचा उपयोग प्राचीन काळी कलाप्रदर्शन करण्यासाठी होत असे. मंदिरात अनेक शिल्पे कोरलेली दिसून येतात. कृष्णाच्या अनेक कथा येथे कोरलेल्या आपल्याला दिसून येतात. पैकी कंसाला सिंहासनावरून खेचणारा कृष्ण, कालिया मर्दन शिल्प, ताक घुसळणारी यशोदा इत्यादी शिल्पे अगदी पाहण्यासारखी आहेत.

मंदिरातील शिल्पांचे कौतुक करत आपण बाहेर येतो आणि समोर दिसते ती मंदिराची भलीमोठी पुष्करणी आणि त्याच्या शेजारी असणारा दगडी मंडप.

पुष्करणीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेल्या आपल्याला दिसून येतात. अत्यंत सुबक बांधणीची ही पुष्करणी आपले मन मोहून टाकते. पुष्करणीमध्ये अनेक देवकोष्ठे आहेत. सध्यातरी या देवकोष्ठांमध्ये कोणतीही मूर्ती आढळून येत नाही. पुष्करणीसमोरच एक दगडी मंडप आपल्याला आढळून येतो. पूर्वी या मंडपात कदाचित सध्या बाहेर ठेवलेले वराहाचे शिल्प असावे. दगडी मंडपाचे बारकाईने निरीक्षण केले असता आपल्याला बाहेरच्या बाजूला अनेक मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. यामध्ये वामनावतार, कल्की अवतार, कृष्णावतार, रामावतार, वराह अवतार, कुर्मावतार इत्यादींचा समावेश होतो. तसेच मारीच वध, रावण्युद्ध, वाली सुग्रीव युद्ध इत्यादी रामायणातील प्रसंग सुद्धा येथे कोरलेले आपल्याला दिसून येतात.

मंडप बघून झाल्यावर आपण येतो ते मंदिराच्या आवारात ठेवलेल्या भल्या मोठ्या वराह शिल्पाकडे! मंदिराच्या आवारात प्रवेश करताना उजव्या हाताला हे शिल्प सध्या ठेवलेले दिसून येते. महाराष्ट्रात अशी वराहाची शिल्पे फार मोजक्या ठिकाणी आहेत. काही जण याला यज्ञवराह सुद्धा म्हणतात. चाकण जवळील चक्रेश्वर, नागपूरजवळील रामटेक, पुण्यातील आंबेगावमधील पिंपरी दुमाला मंदिर इत्यादी ठिकाणी असे वराह आढळून येतात. या वराहाच्या पाठीवर १४२ विष्णू मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. पुढच्या डाव्या पायाजवळ चक्र, मागच्या डाव्या पायाजवळ शंख, पुढच्या उजव्या पायाजवळ गदा आणि मागच्या उजव्या पायाजवळ कमलकलिका कोरलेली दिसून येते.

ही सर्व स्थळे पाहून झाल्यावर परतीच्या वाटेवर डाव्या हाताला असेच एक प्राचीन छोटे मंदिर लागते. या मंदिरातील आवारात गावात सापडलेले अनेक विरगळ उभे करून ठेवले आहेत. त्यावर व्यवस्थित क्रमांक घालून त्यांचे जतन सुद्धा केले आहे.विरगळ म्हणजे युद्धात मरण पावलेल्या योद्ध्यांच्या स्मरणार्थ उभारलेली शिळा. कदाचित लोणी भापकर मधील अनेक जण युद्धांमध्ये धारातीर्थी पडले असण्याची शक्यता इथे आढळणाऱ्या अनेक अशा विरगाळांवरून वाटते.

एकंदर लोणी लोणी भापकर येथील सफर ही ५-६ तासात संपूर्ण होते. भूमिज पद्धतीमध्ये बांधलेले हे मल्लिकार्जुनाचे हे मंदिर प्रेक्षणीय असेच आहे.

– शंतनू परांजपे

Leave a comment