बिवलीचा लक्ष्मीकेशव

बिवलीचा लक्ष्मीकेशव

बिवलीचा लक्ष्मीकेशव –

गर्द झाडी, शांत समुद्रकिनारे आणि कौलारू घरे अशा निसर्गश्रीमंतीनी कोकण प्रांत बहरलेला आहे. परंतु त्याच सोबत  मोठ्या प्रमाणावर शिल्पश्रीमंतीसुद्धा या प्रदेशाला लाभलेली आहे. मात्र ही शिल्पश्रीमंती, हे शिल्पवैभव हे त्याच गर्द झाडीमधे कुठेतरी आतमध्ये लपलेले दिसते. ते पहायचे, अनुभवायचे तर नुसती वाट वाकडी करून चालत नाही, तर त्या ठिकाणाची नेमकी माहिती आणि इतिहास हा सुद्धा जाणून घ्यावा लागतो. तरच या अनमोल शिल्पठेव्याचे सौंदर्य आपल्याला पुरेपूर अनुभवता येते. कोकणातला प्रवास म्हणजे वळणावळणाचाच प्रवास. सहजगत्या कोणत्या ठिकाणी जाऊ असे कधी इथे होतच नाही. पण जेव्हा आपण इप्सित स्थळी पोचतो तेव्हा मात्र निसर्ग नाहीतर शिल्पं आपली नजर खिळवून ठेवतात. असेच एक अत्यंत देखणे आणि तेवढेच अपरिचित शिल्प म्हणजे चिपळूणजवळ असलेल्या बिवली गावचा बिवलीचा लक्ष्मीकेशव.

कोकणात विष्णूमूर्तींचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात दिसते. एकाहून एक सरस अशा विविध विष्णू प्रतिमा इथे बघायला मिळतात. त्यातही केशव आणि लक्ष्मीकेशव यांची अनेक देवस्थाने आढळतील. इतक्या विपुल प्रमाणात केशवाच्या मूर्ती या प्रदेशात विखुरलेल्या आहेत. विष्णूमूर्तीच्या हातातील आयुधक्रम हा पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्यामुळे या मूर्ती केशवमूर्ती या प्रकारात मोडतात. अनेक आडगावांतून या विष्णुमूर्ती वसलेल्या आहेत. अशीच एक मूर्ती आपल्याला बिवली या गावी बघायला मिळते. चिपळूण करंबवणे मार्गे बिवलीपर्यंतचे अंतर हे अंदाजे २५ कि.मी. भरते. पेशवाईतील कर्तबगार न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्या नंतर नीळकंठशास्त्री थत्ते हे मराठी राज्याचे न्यायमूर्ती झाले. हे नीलकंठशास्त्री या बिवली गावचे होत. परकीय मूर्तीभंजकांपासून वाचवण्यासाठी अनेक सुंदर मूर्ती त्याकाळी विहिरीत, कुंडात, डोहात टाकून दिल्या जायच्या. किंवा कधीकधी जमिनीत लपवून ठेवून वाचवल्या जायच्या. अशीच एक मूर्ती नीलकंठशास्त्री थत्ते यांना सापडली आणि त्यांनी ती मूर्ती बिवली या आपल्या गावी  वसवली. या मंदिराचा जीर्णोद्धार सन १८३० मधे केला गेला.

इ.स.च्या ११-१२ व्या शतकात याठिकाणी शिलाहार राजांची राजवट होती. त्याकाळातली अतिशय सुंदर कोरीव काम केलेली आणि प्रभावळीत परिवार देवता असलेली ही विष्णूमूर्ती निव्वळ देखणी आहे. विष्णूच्या डाव्या हातातील कमळाचे देठ आणि त्याच्या पाकळ्या यांची रचना इतकी वैशिष्ट्यपूर्ण आहे की एका बाजूने पाहिल्यास ते कमळ नसून कोणा स्त्रीची मूर्ती वाटते. स्थानिक लोक त्यालाच लक्ष्मी असे संबोधतात, आणि त्यामुळे हा देव झाला लक्ष्मी-केशव. देवाच्या डाव्या पायाजवळ श्रीदेवी असून उजव्या पायाशी नमस्कार मुद्रेत गरुड बसलेला आहे. त्यांच्या बाजूला चवरीधारी सेविका कोरलेल्या आहेत. देवाच्या अंगावरील दागदागिने अत्यंत नाजूक आणि कलात्मक आहेत.

देवाची बोटे अत्यंत सुबक असून सर्व बोटांमध्ये अंगठ्या दिसतात. डोक्यावर शोभिवंत करंड मुकुट असून समृद्धीचे प्रतिक असलेला त्रिवलयांकित गळा शोभून दिसतो. गळ्यात असलेल्या तीन माळांपैकी एका मालेतील पदकात आंबे कोरलेले आहेत. यावरून अभ्यासक असे सांगतात की ही मूर्ती स्थानिक मूर्तीकारानेच घडवलेली आहे. उदरबंध, वैकक्षक, मेखला, दंडात केयूरमणी अशा अनेक दागिन्यांनी मढवलेली ही विष्णुमूर्ती निव्वळ देखणी आणि अप्रतिम आहे. शांतरम्य अशा ठिकाणी हे मंदिर वसलेले आहे. मंदिरापर्यंत जाणारी दगडी पाखाडी, आणि मंदिराचा चिऱ्याच्या दगडांनी बांधलेला प्रासाद अतिशय सुंदर आहे. सगळा परिसर गर्द झाडीचा आणि त्यात असलेले हे टुमदार मंदिर आणि त्यातली लक्ष्मी-केशवाची मूर्ती आवर्जून पाहायला हवी.

आशुतोष बापट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here