लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती

लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती

लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती –

औंढा नागनाथ मंदिर ज्योतिर्लिंग मंदिर आहे तेंव्हा स्वाभाविकच शिवाच्या मूर्तींचे प्रमाण अधिक आहे. याच मंदिराच्या मंडोवरावरील ही एक सूंदर लक्ष्मी नारायण अलिंगन मूर्ती लक्ष वेधून घेते.

विष्णुच्या हातातील गदा स्पष्ट दिसते. दूसर्‍या हातात काय आहे स्पष्ट दिसत नाही. ही मूर्ती निवडण्याचे मुख्य कारण विष्णुचा लक्ष्मीच्या कमरेवरचा डावा हात आणि लक्ष्मीचा विष्णुच्या खांद्यावरचा उजवा हात. लक्ष्मीची उंचावलेली मान. तिच्या डाव्या हातात कमळाची कळी आहे. विष्णुला सखा मित्र सोबती मानणारी ही मूद्रा फार मोहक आहे. विष्णुचा उजवा पाय गुडघ्यात जरा वाकला आहे. लक्ष्मीचा डावा पाय असाच गुडघ्यात वाकुन मग खाली आला आहे. हा पाय भंगला असून परत खाली तळव्यापाशी जरा दिसतो आहे. तिच्या कानातले वर्तूळाकार कुंडल आणि त्यात परत एक फुल मोठं मोहक आहे.

विष्णुच्या बाजूने खाली गरूड हात जोडून मांडी टेकवून बसला आहे. त्याचे पंख मागे दिसत आहेत.

आपल्याकडे “लक्ष्मी नारायणा” सारखा जोडा म्हणायची पद्धत आहे. या म्हणीचं हजार वर्षांपूर्वीचे हे शिल्पांकित देखणं दृश्यरूप. इथे दोघांची उंचीही जवळपास समान दाखवली आहे. विष्णु जरासा डावीकडे झुकलेला आणि लक्ष्मीही त्या बाजूने जराशी झुकलेली आहे. अतिशय लालित्यपूर्ण अशी ही मूद्रा आहे. त्याचा डावा आणि तिचा उजवा पाय ठामपणे जमिनीवर रोवलेले आहेत. तर विष्णुच्या उजवा तळव्याची बोटंच जमिनीवर टेकतात. लक्ष्मीचा डावा तळवाही असाच अधर आहे. चार पैकी दोन पाय भक्कम आणि बाकी दोन ललित या कल्पनेला दाद दिली पाहिजे. सुखी संसाराचे रहस्यच शिल्पकाराने मांडलय.

दोघांचेही चेहरे समोर असले असते तर हे शिल्प सपाट वाटले असते. पण लक्ष्मीच्या संपूर्ण मूर्तीला ३० अंशाचा जरासा कोन देवून शिल्पकाराने जो ३ डि परिणाम साधलाय त्याला तोड नाही. कमाल आहे. लक्ष्मी नारायणाच्या स्थानक मूर्ती (उभ्या असलेल्या) फार कमी आहेत. याच मंदिरावर अशी अजून एक मूर्ती आहे. लोणारला दैत्यसुदन मंदिरावर पण एक आहे. पण ही सर्वात लालित्यपूर्ण.

छायाचित्र सौजन्य – Travel Baba.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here