कुणकेश्वर किनारा

कुणकेश्वर किनारा

कुणकेश्वर किनारा…

कुणकेश्वर हे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेले असुन ते देवगडपासुन दक्षिणेस २० कि.मी.वर आहे. कुणकेश्वर हे एक प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. येथे श्री क्षेत्र कुणकेश्वर हे शिवमंदिर असुन या मंदिराची उभारणी १२ व्या शतकात यादव कालखंडामध्ये झाली असावी. मंदिरात जांभ्या दगडातील स्वयंभू शिवलिंग आहे. समुद्रकिनारी याची उभारणी झाली असल्याने सागराच्या लाटांना तोंड देण्यासाठी समुद्राकडील भाग अंदाजे १० मीटर उंचीच्या दगडी तटाने बांधून काढला आहे. २० मीटर उंचीचे भव्य मंदिर तटबंदीने वेढलेले असून आतील आवार जांभा दगडाच्या फरशीचे आहे. ३० फूट उंचीच्या चौथऱ्यावर सुमारे ५० फूट उंचीचे हे मंदिर आहे. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना म्हणून मंदिराच्या बांधकामाकडे पाहिले जाते.

महाशिवरात्रीला येथे प्रचंड मोठी यात्रा भरते. कुणकेश्वरचा समुद्र किनारा अत्यंत स्वच्छ असून सुरक्षितही आहे. येथे मोठया प्रमाणावर मासेमारी चालते. येथील संध्याकाळचा सूर्यास्त पाहण्यासाठी न चुकता थांबावे. धार्मिक आणि सहलीचे ठिकाण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्याने कुणकेश्वरची चांगलीच प्रगती झाली आहे. इथे राहण्याची आणि जेवणाची चांगली सोय होते. कुणकेश्वर ते मिठबाव साधारण १२ किलोमीटर अंतर आहे. मिठबाव येथे पांढ-या शुभ्र रेतीचा समुद्रकिनारा असून तो अत्यंत सुरक्षित आहे. मिठबावचा समुद्रकिनारा ६ किलोमीटर इतका लांब पसरलेला आहे. मिठबाव कुणकेश्वर या लांब पसरलेल्या समुद्रकिना-याने चालत जावे. किना-यावर जमलेल्या कोळयांची मासेमारी पाहावी. त्यांच्याकडून ताजे मासे विकत घेऊन कुणकेश्वरला ताज्या माश्यावर ताव मारावा. संध्याकाळी रम्य सूर्यास्त पाहावा व आपली सुट्टी सार्थकी लावावी.

@सुरेश निंबाळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here