कृष्णामाई, एक विष्णू मंदिर

कृष्णामाई

कृष्णामाई, एक विष्णू मंदिर –

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी बत्तीस पॉईंट्स आहेत. परंतु क्षेत्र महाबळेश्वरमध्ये असलेली पंचगंगा मंदिर, महाबळेश्वर- अतिबळेश्वर मंदिरं, दत्त मंदिर, समर्थ रामदास स्वामींचा मठ अशी काही ठिकाणे हमखास पाहण्यासारखी आहेत. यामध्ये महाबळेश्वरच्या पूर्व टोकाला ‘कृष्णामाई’ मंदिर हे मंदिर आहे. पण या मंदिराची अधिकृत माहिती कोणाकडे नाही. खरेतर या मंदिराकडे अभ्यासकांचे सुद्धा म्हणावे तसे लक्ष देखील गेलेले नाही.

या मंदिराला समजून घेण्यासाठी त्याचे आवार आणि त्यामध्ये असणारे घटक; माहात्म्य आणि त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी; मंदिराची बांधणी आणि त्यावरील शिल्पे आणि; या सर्वांचा सांगोपांग विचार म्हणजे मीमांसा असे वर्गीकरण केलेले आहे.

मंदिर आवार-

मुख्य मंदिर, आवाराच्या मध्यभागी बांधलेले आहे. मंदिराच्या पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे दगडांचे, आवाराचे बांधकाम केलेले आहे. त्याच्या बाजूनेच ओढा वाहतो. त्याला कृष्णा नदीच म्हणतात. मुख्य मंदिराच्या उत्तरेला एक टेकडीवजा भाग आहे. त्याच्या पुढे, दरीच्या बाजूला भग्नावस्थेतील गणेशाचे एक मंदिर देखील आहे. या गणेश मंदिराच्या समोर एक बांधीव कुंड आहे. ते अलीकडच्या काळात बांधले असल्याचे स्थानिक सांगतात. असेच कुंड कृष्णामाई मंदिर आणि त्याच्या दक्षिणेकडे असलेल्या समाधीवजा बांधकामाच्या बाजूला आहे. (हे देखील नंतरच्या काळातील आहे). या सगळ्यांची रचना एकसारखी असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. समाधीचे बांधकाम सोळाव्या शतकाच्या सुमारास केलेले असावे. पण ती समाधी कोणाची आहे याची माहिती उपलब्ध नाही. मुख्य मंदिराचा भाग हा इथे पडणाऱ्या पावसामुळे आणि त्याकाळात होणाऱ्या मातीच्या धूपेमुळे काहीप्रमाणात जमिनीखाली जातो.

मुख्य मंदिरासमोर असलेल्या कुंडाच्या अलीकडेच/ आधीच एक लहान गोलाकार आणखी एक कुंड आहे. कृष्णेचे लुप्त होऊन येणारे पाणी पहिल्यांदा त्याच कुंडात येते आणि त्याला जोडून असलेल्या गोमुखातून ते मुख्य कुंडात पडते.

माहात्म्यातील भाग-

महाबळेश्वरच्या संदर्भात दोन माहात्म्य आजमितीला उपलब्ध आहेत. दोन्हीही ओवीबद्ध असून मूळ संस्कृत श्लोकावरून त्यांची बांधणी झाली असल्याचे दोघेही ग्रंथकार सांगतात. त्यातील पाहिले माहात्म्य आहे ते ‘अथ श्रीमहाबळेश्वरक्षेत्रमाहात्म्यम्’ नावाचे आणि दुसरे आहे ते ‘अथ श्रीकृष्णामाहात्म्य’ नावाचे. दोन्हीही ग्रंथांमध्ये काही गोष्टी सामायिक दिलेल्या आहेत त्या म्हणजे- ही दोन्ही माहात्म्ये स्कंदपुराणांतर्गत असल्याचे सांगतात. शिवाय काही कथांच्या आधाराने शिव हा वेण्णारूप, विष्णू कृष्णारूप आणि ब्रह्मा कोयना (ककुद्मती) रूप झाला. महाबळेश्वर माहात्म्यामध्ये या नद्यांची कथा ब्रह्मदेवाच्या यज्ञाशी जोडलेली आहे तर कृष्णा माहत्म्यामध्ये विष्णूच्या शरीरापासून कृष्णेची उत्पत्ती आणि तिचे सह्यपर्वतावर आगमन झाल्यानंतर तिच्या काठाने निर्माण होणारी तीर्थक्षेत्रे याचा अत्यंत उपयुक्त तपशील दिला आहे. या कथा वाचल्या म्हणजे माहात्म्यकारांनी त्याची सांगड स्कंदपुराणाशी सुंदररित्या गुंफल्याचे जाणवल्याशिवाय राहत नाही. परंतु त्यामध्ये महाबळेश्वरमध्ये असलेल्या मंदिरांचा आणि त्याच्याशी निगडित असलेल्या वास्तूंचा उल्लेख दिलेला नाही. तरीही एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे हा सगळा विषय हा एका किंवा पाच नद्यांच्या भोवतीचा आहे. म्हणजे प्रामुख्याने इथे पाण्याचा आणि त्याच्या अनुषंगाने ‘कुंडांचा’ विषय महत्त्वाचा मानला गेला आहे. तो समजल्यास काही गोष्टी कळण्यास आणखीनच सोपे होईल. महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरापासून सुरू केल्यास कृष्णामाईच्या मंदिरासमोरील कुंडापर्यंत येताना आठ कुंडे आहेत. ती अनुक्रमे ब्रह्मकुंड, विष्णूकुंड, रुद्रकुंड, हंसकुंड, आरण्यक कुंड, मलापकर्ष कुंड आणि मुक्ती किंवा पितृमुक्तीकुंड ही आठ कुंडे लागतात. यापैकी कृष्णामाईच्या मंदिरासमोर मुक्तीकुंड आहे. इथले स्थानिक सांगतात की, हे मंदिर पुरातत्त्व विभागाने ताब्यात घेण्यापूर्वी आणि काही काळानंतरही या मंदिराच्या भागामध्ये दहनभूमी होती आणि मंदिरासमोरच्या कुंडात तिसऱ्या दिवशी अस्थी विसर्जनाचा विधी केला जात असे. त्यामुळे अर्थातच हे खराब झाले होते. शासनाने मंदिर ताब्यात घेतल्यानंतर त्याची यथायोग्य काळजी घेणे सुरू झाले त्यामुळे आजचे हे कुंड चांगल्या अवस्थेत पाहायला मिळते. तरी यामध्ये विचार केल्यावर एका गोष्टीचा उलगडा होत नाही की या मंदिराचा आणि या कुंडांचा एकमेकांशी काय संबंध आहे? त्यासाठी पुन्हा माहात्म्य उपयोगी पडते. आजच्या पंचगंगा मंदिरामध्ये उगम पावलेल्या नद्या त्याच्या समोर असलेल्या कुंडात पडतात आणि तेथूनच त्या पुढे एका कुंडात एकत्र येऊन पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी महाबळेश्वरवरून खाली कोसळतात. कृष्णा ज्या कड्यावरून खाली जाते त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. पण आश्चर्याचा भाग म्हणजे कृष्णामाईचे हे मंदिर इथे जुने असून सुद्धा त्याचा कोणत्याच माहात्म्यात उल्लेख देखील नाही; परंतु त्याच्या समोर असलेल्या ‘मुक्ती’ कुंडाचा मात्र उल्लेख येतो. त्यामुळे मंदिराची रचना आणि त्याची माहिती घेताना या कुंडाचा आणि मंदिराचा परस्पर संबंध आणि दोन्हीही माहात्म्यकारांना या मंदिराचे नसलेले महत्त्व याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे. कृष्णा माहात्म्यामध्ये महाबळेश्वर सोडून इतर बऱ्याच तीर्थांची आणि त्यांच्यामधील कुंडांची नावे दिलेली आहेत. प्रस्तुत विषयात आपल्याला फक्त ‘पितृ’मुक्ती/ मुक्तीतीर्थाशी संबंध पाहायचा आहे. माहात्म्यकाराने केवळ याचा उल्लेख केला असला तरी कृष्णेच्या तीरावरील आणखी एका स्थानास त्याने पितृमुक्ती तीर्थ म्हणलेले आहे. आणि ते स्थान आहे नृसिंहवाडीजवळ पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमामध्ये. याठिकणी देखील पाण्यामध्ये ‘आठ’ तीर्थे आहेत. त्यापैकी एक पितृतीर्थ नावाचे देखील तीर्थ आहे. शिवाय या भागामध्ये पिंडदान विधी सारखे विधी देखील केले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे महाबळेश्वरमधील पितृमुक्ती तीर्थ आणि नृसिंहवाडी येथील पितृ तीर्थाचा काहीअंशी संबंध लागतो. त्यामुळे महाबळेश्वरमधील या कुंडाचे महत्त्व लक्षात घेण्यासारखे आहे. तरी एक प्रश्न शिल्लक राहतो की या मंदिराचा उल्लेख कोणत्याच माहात्म्यात का नाही? त्यासाठी आधी हे मंदिर नक्की कोणाचे आहे ते समजून घेतले पाहिजे. म्हणून त्याच्या बांधकामाचा आणि त्यावरील शिल्पांचा विचार करणे आवश्यक आहे.

मंदिर स्थापत्य आणि शिल्पे-

मंदिराला दोन्ही पुढच्या बाजूस ओसऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये, पुढच्या बाजूस असलेल्या पूर्ण खांबांची संख्या दहा आहे तर त्याच ओळीमध्ये दोन अर्धस्तंभ देखील आहेत. त्याच्यामधल्या प्रत्येक खांबावर एकसारखेच नक्षीकाम केलेले आहे. शिवाय खांबांच्या मागील बाजूस, भिंतीमध्ये देखील तितकेच अर्धस्तंभ आहेत. त्यावर मात्र नक्षीकाम नाही. त्या दोन्ही खांबांना जोडणारी महिरप आहे. याच्या छताच्या भागामध्ये एकूण दहा शिल्पे घडविलेली आहेत. ती खालीलप्रमाणे

1) कमळ

2) नागशिल्प

3) कमळ

4) कमळ

5) कमळ

6) कालियामर्दन

7) कमळ

8) तीन मासे असलेले शिल्प

9) कमळ

10) (कृष्ण-विरहित) गोप- खेळ

या सगळ्या शिल्पांचा विष्णुशी निःसंशय संबंध आहे. शिवाय मंदिराच्या बाह्यांगावर असलेल्या शिल्पांपैकी उत्तरेला गरुडाचे शिल्प आहेच; शिवाय पश्चिमेस एक नाग शिल्प आहे. याच्या कमरेपासून वरचा भाग मानवाचा असून हा चतुर्भुज आहे. त्याच्या हातामध्ये अनुक्रमे चक्र, दंड/ गदा, शंख आणि पुष्प ही लांछने आहेत. शिवाय डाव्या- उजव्या बाजूच्या शेपटीमधून एक एक नाग फणा दिसतो. मुख्य मूर्तीच्या डोक्यावर सुद्धा एका फण्याचा नाग आहे. मुख्य मूर्तीचे कान मोठे आहेतच परंतु याला मिशा देखील आहेत. त्यामुळे या शिल्पांचा संबंध देखील विष्णुशी येतो. मंदिराच्या खांबाच्या वरच्या भागामध्ये उजव्या बाजूच्या पहिल्या खाचेमध्ये पुरुष शिल्प बसवलेले आहे. त्यानंतर समोरासमोर व्यालांची शिल्पे आहेत. म्हणजे एकूणच या शिल्पांमध्ये समानता साधलेली असावी असे वाटते. परंतु ही सगळीच शिल्पे आज जागेवर नाहीत.

मंदिराच्या समोर पुष्करणी आहे. त्यात उतरण्यासाठी पूर्वेच्या बाजूने पायऱ्या आहेत. मंदिराकडे पाठ करून त्यात पाणी पडण्यासाठी संपूर्ण गाईसहित गोमुख असल्याचे दिसते. त्याच्यामागे एक लहान कुंड आहे. पंचगंगेच्या मंदिरातून लुप्त होणाऱ्या कृष्णेचे पाणी भूमिगत होऊन पहिल्यांदा याच लहान कुंडात येते आणि पुढे गोमुखातून मोठ्या कुंडात पडते.

शिखराच्या रचनेमध्ये महाबळेश्वर मधील काही मंदिरांच्या शिखरांची रचना कृष्णामाईच्या मंदिराच्या शिखरासारखी आहे. अर्थात त्यांचा जीर्णोद्धार झाला आहे. छ. शिवाजी महाराजांनी महाबळेश्वराच्या मंदिरात जिजाबाईंची सुवर्णतुला केली आणि मंदिराचा जीर्णोद्धार देखील केला. परंतु त्यांनी त्या मंदिराच्या शिखरामध्ये बदल केला नाही. त्याची बांधणी जुन्याच पद्धतीची ठेवली. जी आज पाहायला मिळते. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार ही मंदिरे चौदाव्या- पंधराव्या शतकात बांधली गेली आहेत. मला कृष्णमाईचे मंदिर यादव कालावधीमध्ये बांधले असावे असे वाटते; कारण महाबळेश्वर मधील मुख्य बहुतांशी मंदिरे ही यादव काळातच बांधलेली आहेत. कालांतराने त्यावर जीर्णोद्धाराचे संस्कार होत आजची मंदिरे पाहायला मिळतात. परंतु कृष्णामाईच्या मंदिरावर असे दीर्घ संस्कार झालेले दिसत नाहीत. मात्र या मंदिरावर दोन वेळा सामान्य संस्करणे झाली असावीत. कारण याच्या आत्ताच्या शिखरावर यादवकाळाची छाप दिसतेच परंतु त्याच्या कुंडाभोवती आलेल्या, पुढच्या भागावर एक दंडगोलाकार लोखंडी दांडा (बार) दिसतो. जो नक्कीच फार पूर्वीच्या काळातील नाही.

मंदिराच्या समोर असलेल्या ओवरीच्या भागामध्ये चौकोनी आकाराची रंगशिळा आहे. त्याचे बांधकाम देखील अलीकडच्या काळातच केले गेले असावे. इथल्या गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर कोणतेही शिल्पांकन नाही. मंदिराचा गाभारा चौकोनी असून त्याचा मध्यभाग पाव मीटर खड्यामध्ये आहे. त्यात मध्यभागी शिवलिंगसारखे ‘पीठ’ तयार केलेले दिसते. त्याची रचना शिवलिंगाशी इतकी मिळतीजुळती आहे की प्रथमदर्शनी हे शिवलिंग असल्याचा भास व्हावा. परंतु हे शिवलिंग नसून मूर्तीच्या खाली असतो तो ‘चौथरा’ म्हणजेच पीठ आहे.

पीठाच्या रचनेमध्ये त्याचा आकार डमरूसारखा आहे. त्याच्या मध्यभागी दगडात घडविलेल्या रुद्राक्षमाळा आहेत. खालच्या; आणि वरच्या बाजूला देखील फणा काढलेली नागशिल्पे आहेत. हे पीठ एकसंध नसून ते तीन भागात एकरूप केलेले आहे. पीठाच्या पन्हळ काढलेल्या भागाखाली कमळाचा वळवलेला दांडा आहे. त्याला पाहताना नद्यांच्या पूजेसाठी आजही वापरात असलेल्या ‘पंचारती पात्राची’ आठवण होतेच. हे लक्षात घेतले पाहिजे की आत्ता पीठावर एक शिवलिंग बसविलेले आहे. शिवाय काही वर्षापूर्वी यावर संगमरवरी एक राधा-कृष्णाची मूर्ती होती. (जी आज तिथे नाही). जर तिथे आधीच शिवलिंग होते तर त्यावर आत्ताचे शिवलिंग का बसवले गेले? आणि त्यावर उपरोल्लेखित मूर्ती का बसविली गेली? त्यावर विचार करता असे जाणवते की पूर्वीचे हे विष्णू मंदिर आहे. माहात्म्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास याच्याआधी नमूद केल्याप्रमाणे विष्णू हा कृष्णारूप झाला आणि त्यासोबत बाकीच्या सगळ्या नद्यांचा संगम झाल्यावर त्यांना शापातून मुक्ती मिळाली. म्हणजे हे कृष्णेचे आणि त्यामुळेच माहात्म्यांतर्गत विष्णूचे मंदिर ठरते. शिवाय मंदिराच्या बाजूंवर देखील तशी शिल्पे घडवलेली आहेत. त्यामळे हे शिव मंदिर नसून विष्णूचे मंदिर आहे याला आधार मिळतो.

सरतेशेवटी विषय येतो तो या मंदिराचे उल्लेख कोणत्या जुन्या ग्रंथात किंवा अगदी माहत्म्यकाराने देखील का केला नाही त्याचा. तर महाबळेश्वर हे शैव ठिकाण आहे. स्वाभाविकच इथे शिवाशी निगडित मंदिरे आणि वास्तू आहेत. तर कृष्णा ही एकमेव विष्णुशी निगडित नदी इथे आहे. त्यामुळे अशा शैव ठिकाणी विष्णूचे महत्त्व कमी होणे अगर कमी करणे हे अस्वाभाविक नाही. त्यामुळेच कोणत्याही ग्रंथात या मंदिराचे उल्लेख आलेले नाहीत. केवळ याच्याशी निगडित असलेल्या कुंडांचा उल्लेख दिला आहे. त्यामुळे या मंदिराला निश्चितच आता विष्णू मंदिर म्हणता येऊ शकते.

©️-आदित्य फडके, सातारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here