महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

पतंगाचा इतिहास व माहिती

By Discover Maharashtra Views: 4064 8 Min Read

आनंदाची पतंगबाजी !

( पतंगाचा इतिहास व माहिती – मकरसंक्रांत विशेष )

नवीन इंग्रजी वर्षाची सुरुवातच मकर संक्रांतीसारख्या हिंदू सणाने होते. स्त्रियांचे एकमेकींना वाण देणे, तिळगुळाचे आदान प्रदान करणे हा एक धार्मिक सांस्कृतिक प्रघात ! सुगड, तिळगुळ, हलवा, हलव्याचे दागिने, गुळपोळी, काळ्या साड्या / कपडे इत्यादी वस्तूंनी बाजारपेठा ओसंडून जातात. वातावरणातील थंडीशी मुकाबला करण्यासाठी आहारामध्ये उष्ण पदार्थांचा समावेश असतो. काळ्या रंगामध्ये सर्वात जास्त उष्णता शोषली जाते त्यामुळे काळे कपडे मुद्दाम वापरले जातात. दक्षिण भारतामध्ये सबरीमालाला जाणारे अय्यपास्वामींचे लाखो भक्त या पर्व काळात फक्त काळे कपडेच परिधान करतात.पतंगाचा इतिहास.

महाराष्ट्रात दिवाळीला पाठविली जातात तशीच पूर्वी मकरसंक्रांतीलासुद्धा ग्रिटिंग कार्ड्स पाठविली जात असत. त्याला संक्रांतीचे भेटकार्ड असे म्हटले जात असे. त्यामध्ये छानशा रंगीत चित्राबरोबर मराठीतून संक्रांतीच्या काव्यमय शुभेच्छा आणि छोट्याशा पुडीमध्ये हलव्याचे दाणे असत. एकमेकांना तिळगुळ देऊन ” तिळगूळ घ्या, गोड बोला ” असा प्रेमळ आग्रह केला जातो. महाराष्ट्रात या सणामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे एक इवलासा ” तीळ ” ! तिळाच्या छोट्याशा दाण्यात काय काय सामावले आहे हे वाचले तर थक्क व्हायला होते. तांबे, मँगेनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १ आणि बी ६, थायामीन फॉलेट, नायासिन, झिंक, मॉलिब्डेनम, सेलेनियम तसेच सिसॅमिन व सिसॅमोलीन हे दोन अत्यंत महत्वाचे दुर्मीळ पोषक घटक या तिळाच्या टीचभर दाण्यात असतात.

सिसॅमिन व सिसॅमोलीन हे लिग्नन्स म्हणून ओळखले जातात आणि ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे तसेच इ व्हिटॅमिन देणारे आहेत. अत्यंत महत्वाच्या घटकयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे नियंत्रण करायला मदत होते. या शिवाय कॅन्सरचा धोका कमी करणे, हाडांची शक्ती वाढवणे, सूज प्रतिबंध, पचनक्रिया सुधारणे, पचनक्रियेत सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टीदेखील हा इवलासा तीळ करतो. हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, उच्च रक्तदाब कमी करणे, स्नायू आणि केसांची ताकत वाढविणे, अकाली वृद्धत्व टाळणे, इत्यादी गोष्टींसाठी तीळ फार उपयुक्त आहे.

याच मकर संक्रांतीला सर्वात महत्वाचा Socio Religious Sport भारतात अस्तित्वात आला आहे तो म्हणजे ” पतंगबाजी ” ! हा खेळ तसा खूप खूप जुना आहे.

इंडोनेशियातील मुना बेटावरील एका गुहेतील सुमारे १२००० वर्षांपूर्वीच्या चित्रामध्ये पतंग पाहायला मिळतो. चीनमध्ये सुमारे ७००० वर्षांपूर्वी पतंग अस्तित्वात आला. तेथे पतंगाचा वापर दोन ठिकाणांमधील अंतर मोजणे, वाऱ्याची दिशा पाहणे, सैन्याला गुप्त संदेश पाठविणे अशा कामांसाठी केला जाई. न्यूझिलँड आणि पॉलीनेशियन बेटांमध्येही पतंगांची माहिती होती. रोमनांना वाऱ्याच्या दिशा दाखवणारे फुग्यासारखे लांब पट्टे माहिती होते पण पतंगाविषयीची माहिती मार्को पोलो याने प्रथम युरोपात नेली आणि नंतर बोटीवरील खलाशांनी पतंग नेले. अफगाणिस्तानात गुडीपरन बाजी म्हणून तर पाकिस्तानमध्ये गुडी बाजी ( किंवा पतंगबाजी ) म्हणून हे पतंग उडविणे प्रसिद्ध आहे. या दोन्हीही शब्दांचा, गुढी आणि पतंग या शब्दांशी जवळचा संबंध वाटतो. ब्राझील, चिली,कोलंबिया, गयाना येथे देखील पतंगबाजी चालते. बर्म्युडा बेटांवर येशू ख्रिस्ताच्या उत्थानाचे प्रतीक म्हणून ईस्टरला पतंग उडविले जातात.

बेंजामिन फ्रँकलिन याने १७५२ मध्ये, वीज चमकणे हे विद्युत शक्तीमुळे घडते हे सिद्ध करण्यासाठी पतंगाचा केलेला वापर हा वैज्ञानिक प्रयोगांमध्ये सर्वात प्रसिद्ध प्रयोग आहे. वाऱ्याची दिशा, हवामानाचा अंदाज, रेडियो लहरींसाठी अँटेना वाहून नेणे अशा अनेक प्रयोगांमध्ये पतंगांचा वापर करण्यात आला आहे.

जगभर विविध सैन्य दलांकडून हेरगिरी, गुप्त संदेश पाठविणे, छायाचित्रण करणे, कांही हलक्या प्रकारची शस्त्रे पाठविणे अशासाठी केला जात असे. गाझा पट्टीतील पॅलेस्टाईनच्या सैनिकांनी इस्राएलव्याप्त गाझा प्रदेशात पतंग बॉम्ब वापरून तेथील पिके जाळली होती. त्यामुळे इस्राएलचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते.

भारतात पतंग कधी आला हे निश्चित सांगणे कठीण आहे. पण देशभरातील पूर्वीच्या अनेक संतकवींच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आणि उल्लेख आढळतात. संत एकनाथ, संत तुकाराम, वैष्णव कवी नानदास यांच्या रचनांमध्ये पतंगाचे वर्णन आहे. १२७० ते १३५० या काळातील संत नामदेव यांनी लिहिलेल्या मराठी आणि व्रज भाषेतील काव्यामधील पतंगाचा उल्लेख महत्वाचा आहे. त्यांनी लिहिले आहे — ” आणिले कागद साजीले गुडी,आकाशमंडल छोडी, पाचजनासो बात बाताडवो, चितसो दोरी राखिला ।।” भारतात पतंग या शब्दाचा प्रथम वापर कवी मंझर ( मंझ ) याने १५४२ मध्ये लिहिलेल्या मधुमालती या रचनेमध्ये आढळतो. त्याचे शब्द असे आहेत — ” पांती बांधी पतंग उराई,दियो तोहि ज्यों पियमहं जाई ।।” पतंगाचे उंच आकाशात विहरणे आणि तरीही जमिनीशी धाग्याने बांधलेले असणे, कापला गेल्यास अकाशातच गटांगळ्या खात भरकटत जाणे या गोष्टी साहित्य क्षेत्राला खूपच भावल्या ! त्यामुळे अगदी आजसुद्धा भारतीय भाषांमधील वाङ्मयात, चित्रपटात, कविता, गीते यामध्ये पतंगाची उपमा फार लोकप्रिय आहे.

भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, बिहार,पंजाब या राज्यांमध्ये पतंगबाजी खूप प्रसिद्ध आहे. अगदी एखादा सक्तीचा धार्मिक विधी असल्यासारखे मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याचे सामूहिक सोहोळे साजरे होतात. अत्यंत वैविध्यपूर्ण पतंग, त्यांचे आकार — रंग, एकमेकांचे पतंग काटण्याची चढाओढ, त्यात भाग घेणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे या सर्व गोष्टी एखाद्या मोठया खेळाला शोभतील अशा असतात. आता तर त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामुळे पर्यटन व्यवसायामध्ये वाढ होत आहे.

गुजरातमध्ये सरकारी पातळीवरून आंतरराष्ट्रीय पतंग स्पर्धांचे आयोजन केले वाजते. तेथे विविध ठिकाणी अनेक वेगळ्या गोष्टी अनुभवता येतात . रस्त्यातच ठिकठिकाणी नानारंगी, नाना आकाराच्या असंख्य पतंगांचे स्टॉल लागतात. . ताजा खाद्य पदार्थ बनवून द्यावा तसा तेथेच ताजाताजा मांजा बनवून दिला जातो. तेथील स्टॉलचे स्वरूप पाहून असे वाटले की येथील लोक पतंग आणि मांजा बहुधा किलोच्या हिशेबात घेत असावेत. तेथे अनेक व्यापारी आस्थापनांमध्ये,कंपन्या, ऑफिसे यांच्यामध्ये पतंगांची सजावट केली जाते. इतकेच काय पण मंदिरांमध्येही पतंग पाहायला मिळतात. स्वामी नारायण मंदिरामध्ये तर देवांच्या मूर्तीभोवतीसुद्धा छोट्यामोठ्या आकारातील रंगीबेरंगी पतंग आणि त्याबरोबर अनेक फिरक्या यांची सजावट पाहायला मिळते .

पतंग बनविण्यासाठी प्रामुख्याने कागद, बांबूच्या पट्ट्या,रेशमी कापड, दोरा, नैसर्गिक रंग या परंपरागत गोष्टींचा सर्वाधिक वापर होतो. सिंथेटिक कापड, धातुच्या तारा, वॉटरप्रूफ कापड, नायलॉनचा दोरा या पासून ते बॅटरी सेल, छोटे विद्युत पंखे, रिमोट कंट्रोल यंत्रणा अशा अनेक गोष्टींचा वापर आता होऊ लागला आहे. पण या गोष्टींमुळे अपघातांचे प्रमाणही वाढते आहे. मोटारसायकल,स्कुटर, सायकल अशा वाहनांवरून प्रवास करणाऱ्यांच्या गळ्यात अचानक मांजा अडकून अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याच कारणावरून पंजाबमध्ये पतंग उडविण्यावरच बंदी घालण्यात आली होती. आकाशात उडणारे शेकडो निरपराध पक्षी या मांज्यामध्ये अडकून आपला जीव गमावतात. अशा गोष्टी मात्र प्रकर्षाने टाळायलाच हव्यात. एकाचा आनंद हा दुसऱ्याचे जीवघेणे दु:ख असता कामा नये.

सर्वात महत्वाचा उपाय ****रस्त्यातून स्कूटर किंवा बाईकवरून वेगाने जाताना, गळ्यात मांजा अडकून देशभर अनेकांना आपला जीवही गमवावा लागलेला आहे. हे टाळण्यासाठी एक सोपी युक्ती गुजरातमध्ये अंमलात आणलेली आहे. अशा वाहनाच्या पुढे, दोन हॅण्डल्सना जोडणारी एक उंच लंबवर्तुळाकार ( इंग्रजी उलटे यु अक्षर ) जाड तार बसविली जाते. ( कृपया छायाचित्र पाहावे ) तारेची उंची वाहनावर बसलेल्या माणसाच्या उंचीपेक्षा अधिक असते. ती तार अशा व्यक्तीच्या अगदी जवळ असते. त्यामुळे तुटलेल्या पतंगाचा मांजा अचानक जरी समोर आला तरी तो थेट गळ्याला न भिडता या तारेवर अडकून मागे टाकला जातो. बेजबाबदार पणामुळे किंवा अनभिज्ञपणे घडणारा एक जीवघेणा अपघात यामुळे टळू शकतो. जिथे अशा अपघाताची शक्यता आहे अशा ठिकाणी हा उपाय करायला हरकत नाही.

” तिळगुळ घ्या, गोड बोला ” !!

( कांही संदर्भ – अहमदाबादचे पतंग संग्रहालय आणि गुगल )

 

माहिती साभार – Makarand Karandikar | मकरंद करंदीकर[email protected]

Leave a comment