महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,19,599

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ८ | भुसावळ बाॅम्ब खटला

By Discover Maharashtra Views: 2452 4 Min Read

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ८ | भुसावळ बाॅम्ब खटला –

हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी पंजाब मधील क्रांतीकारक घटनांचा तपास चालू असताना पंजाब कटातील चंद्रशेखर आझाद, सदाशिव रघुनाथ मलकापूरकर वय फक्त २१ वर्ष, भगवान दास तुलसीदास माहौल इत्यादि क्रांतीकारक भूमिगत झाले होते. उत्तर भारतात पोलिसांनी व्यापक जाळे पसरल्यामुळे क्रांतीकारकांचे ग्वाल्हेरचे भुमिगत बाॅम्ब निर्माण केंद्र असुरक्षित झाले. म्हणून बाॅम्ब केंद्र अकोला येथे हलवण्याचा विचार चंद्रशेखर आझाद यांनी केला. तेव्हा शिवराम हरी राजगुरू अकोल्यात होते. आझादांच्या सुचनेनुसार मलकापूरकर आणि माहौर ग्वाल्हेर केंद्रातील बाॅम्ब निर्मितीची साधनसामग्री दोन जिवंत बाॅम्ब, काडतुसे, आणि स्फोटक रसायने घेऊन अकोला येथे राजगुरू कडे निघाले. प्रथम झाशीला जाऊन विश्वनाथ गंगाधर वैशंपायन यांचेकडे जाऊन लागणारी सामग्री घेऊन रेल्वेने भुसावळ येथे आले. गाडी बदलून अकोला येथे जाण्यासाठी भुसावळ येथील फलाटावर उतरवल्या मुळे सीमा शुल्क विभागाच्या तपासनीसाला शंका आली आणि हमालाजवळील मोठी जड ट्रंक तपासायला सुरुवात केली.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग ८ – भुसावळ बाॅम्ब खटला)

भगवानदास यांनी कुशलतेने भरलेले पिस्तूल खिशात घातले पण ट्रंकमधील काडतुसाचे पुडके खाली पडले आणि त्यांनी शिटी फुंकून पोलीसांना बोलवले. गुप्त सामानाची ट्रंक उचलून रेल्वे लाईन वर पळतांना मलकापूरकरांचा पाय सिग्नलच्या वायरमध्ये अडकला आणि ते खाली पडले.खिशातील पिस्तुलाने गोळ्या झाडत निसटण्याचा प्रयत्न करत भगवान दासराव यांचा उद्देश असफल झाला आणि ते पकडले गेले. ११ सप्टेंबर १९२९ रोजी चंद्रशेखर आझाद यांचे साथीदार पकडले गेले. दोघांवर जळगाव सत्र न्यायालयात राजद्रोहाच्या आरोपाखाली खटला भरला. त्यांचे दोन साथीदार जयगोपाळ आणि फणिंद्र घोष त्यांना लाहोर बाॅम्ब ‌प्रकरण आणि पंजाब कटातील गुन्हेगार असल्याचे सिध्द करण्यासाठी माफीचे साक्षीदार म्हणून सरकारच्या मदतीला धावून आले. ही बातमी दोघांना म्हणजे मलकापूरकर आणि माहौल यांना कळताच त्यांनी धुळे कारागृहात या देशद्रोही दोघांचा वध करण्यासाठी निर्धार केला.

खटल्यासाठी जळगावात आणल्यावर घरून डबा मागवण्याची परवानगी मागितली आणि सदाशिव मलकापूर कर यांचे ज्येष्ठ बंधू शंकरराव यांनी जेवणाच्या डब्यातून भरलेले पिस्तूल पुरवले. भगवान दास यांनी दोघांवर गोळ्या झाडल्या पण वर्मी न लागल्याने ते फक्त जखमी झाले आणि पिस्तुल पुरवले म्हणून देवकीनंदन आणि दहा खानदेशातील जणांवर घटला भरण्यात आला. पिस्तूल कुणी पुरवले याचा पत्ता लागला नाही मात्र १९८६ मध्ये एका जाहिर सभेत शंकरराव यांनी आपणच पिस्तूल पुरवल्याचा गौप्यस्फोट केला. मलकापूर कर आणि माहौर यांना पंधरा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड ठोठावला गेला. सक्कर आणि नंतर अहमदाबाद कारागृहात ठेवण्यात आले होते.

१९३७ मध्ये काँग्रेस मंत्रीमंडळ अधिकार रूढ झाल्यावर या प्रकरणी पुनर्विचार झाला आणि दोघा क्रांतीकारकांना मार्च १९३८ मध्ये मुक्त करण्यात आले.

पांडुरंग सदाशिव खानखोजे, लाला हरदयाल आणि भाई परमानंद यांनी अमेरिकेत स्थापन केलेल्या इंडियन इंडिपेंडंट पार्टीत कार्यरत असलेले आबाजी नांदेडकर हे आणखी एक क्रांतीकारक ते एरंडोल तालुक्यातील नांदेड या गावातील होते. १९१३ मध्ये गदर पार्टी हे नाव दिले होते तर इंग्लंडच्या आग्रहाखातर अमेरिकन सरकारने सक्त नजर ठेवली होती. पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभापासून गदर क्रांतीकारकांनी इंग्रज विरोधात लढा उभारण्यासाठी जर्मनीची मदत घेतली होती. जर्मन सरकारच्या मदतीने गदर क्रांतीकारक पश्चिम आशिया, पर्सिया, अफगणिस्तानात आणि बलुचिस्तान येथे गेले. अशा क्रांतीकारकांचे साथीदार असलेले नांदेडकर मात्र भारतात पुन्हा परत आले नाहीत. या सर्व क्रांतीकारकांबद्दल सखोल अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणजे खानदेशातील क्रांतीकारकांचा नीट इतिहास मांडता येईल.

संदर्भ:
नंदलाल अग्रवाल, “स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतीकारक घटना: जळगाव कोर्टात गोळीबार”.
होम डिपार्टमेंट स्पेशल ब्रॅंच, फाईल क्रमांक ७४२,बी.आय.१९३७-३८, दुरदर्शन केंद्र.
जळगाव जिल्हा गॅझेटियर १९९४.

माहिती साभार –

Leave a comment