महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १३ | सविनय कायदेभंगाचे दुसरे पर्व

By Discover Maharashtra Views: 2375 4 Min Read

खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १३ | सविनय कायदेभंगाचे दुसरे पर्व –

काँग्रेस खेड्यातून भरली पाहिजे असा गांधीजींचा आग्रह होता, तेव्हा खेड्यातील पहिली काँग्रेस भरविण्याचा मान फैजपूर सारख्या गावाला मिळाला, तो धनाजी नाना चौधरी यांनी केलेल्या त्या परिसरात राजकीय जागृती आणि ग्रामीण कार्यकर्त्यांच्या निवडक सेनानी मुळे होय. एरवी शेतकरी समाज कामात गुंतलेला असतो, एक संपले की दुसरे अशा रहाटगाडगे चालू असते. या परिसरातील काही काही शेतकऱ्यांनी आयुष्यात पंचक्रोशी सोडून आयुष्यात कधीही कुठेही गेलेले नव्हते. कधीतरी पंढरपूर ची वारी नाही तर फार साहसी लोक चारधाम यात्रेसाठी जात असत. पण त्यातही ,”गया बदरी, रहा उधरही” अशीच परिस्थिती होती. लग्नही दोन-चार गावांच्या पलिकडे होत नसत. भालचंद्र नेमाडे यांच्या,”हिंदू” तसेच दिवाकर चौधरी यांच्या “झपुर्झा” मध्ये इथली वास्तविक परिस्थिती समोर येते.(खानदेश स्वातंत्र्यसंग्राम भाग १३ – सविनय कायदेभंगाचे दुसरे पर्व)

ग्रामीण काँग्रेसला अभुतपुर्व यश मिळाले आणि नंतर धनाजी नाना प्रचंड मतांनी विधानसभेवर निवडून आले. आश्रमाचे रूपांतर १९३८ मध्ये जनता शिक्षण मंडळाच्या स्वरूपात केले गेले. शिक्षण हेच परिवर्तनाचे खरे माध्यम आहे, ही जाणीव झाली होती. चार जानेवारी १९३२ ला गांधीजींना मणिभवनावर अटक झाली आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या सहमतीने गांधीजींनी देशाला करबंदीसह कायदेभंग करण्याचा आदेश दिला. विनोबा भावेंना जळगावला अटक करून धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली आणि साने गुरुजी भुमिगत झाले.

पहिल्या पर्वापेक्षा दुसऱ्या पर्वात सरकार निर्दयी आणि आक्रमक झाले होते १८३२ चा कायदेभंग सुनियोजित नसून उत्स्फुर्त होता. सरकारने काँग्रेस समित्यांची कार्यालये ताब्यात घेतली होती आणि स्वातंत्र्य सैनिकांना बेड्या घालून दंडांना दोरखंड बांधून पोलिस चौकीवर नेत असत. दास्ताने, देवकीनंदन, धनाजी नाना, बा. र. देशपांडे, मोतीराम ओंकार चौधरी, डॉ.कोठारी, रामनारायण काबरे, रामकृष्ण काबरे इत्यादिंना सक्तमजुरीची शिक्षा झाली. खिरोदा आश्रम, पिंपराळे आश्रम, जळगाव आणि अमळनेरच्या सूतशाळा, डांगरीचा आश्रम, चोपडा चहार्डीची खादी कार्यालये या सर्वांना बेकायदेशीर ठरवून कुलूपे ठोकली.

जळगाव जिल्ह्यात काम करणे कठीण असल्याने बऱ्हाणपूरच्या सत्याग्रह छावणीत जी “बाईसाहेब यांची हवेली” म्हणून ओळखली जात होती, तिथून जळगावातील आंदोलनाची सूत्रे हलवण्यात आली.

१७ जुलै १९३२ मध्ये मुंबईचा गव्हर्नर सर फ्रेडरिक साइक्स भुसावळला पुलाचे उद्घाटन व एका सरकार धर्जिण्या व्यक्तीला रावसाहेब ही विभूषण बहाल करण्यासाठी येणार होता. त्याचा निषेध म्हणून भुसावळचे अण्णासाहेब रिसवूड वकिल व जोशी गुरूजींच्या प्रेरणेने रामभाऊ भोगे, स.ज्ञना. भालेराव, सुभानराव पाटील, राम मोहाडीकर भालचंद्र मांजरेकर, देव, हनुमान मारवाडी, गेनू मराठे, बन्सी कुलकर्णी, विठ्ठल वाणी इत्यादिंनी

” साईक्स गो बॅक” अशा घोषणा देत पत्रके उधळली.

धुळे कारागृहात विनोबा भावे, जमनालाल बजाज, गुलजारीलाल नंदा, बाळुभाई मेहता, खंडुभाई देसाई, मणीलाल कोठारी, दास्ताने, आपटे गुरूजी, साने गुरुजी, धनाजी नाना, शंकरभाऊ काबरे, लोढूभाऊ फेगडे, ही मंडळी असल्याने राष्ट्रीय आश्रमाचे स्वरूप आले होते. सुभान पाटील त्यावेळी धुळे कारागृहात असलेल्या बंदीवानांपैकी सर्वात लहान वयाचा होता. सविनय कायदेभंगाचा जोर ओसरल्यावर विधायक कार्यावर जोर देण्यात आला. एकत्र राहण्यामुळे एकमेकांवर प्रभावही पडला. स्वातंत्र्योत्काळानंतर विनोबांच्या भूदान चळवळीला खानदेशात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. गावागावांतील लोक काम करू लागले. खेडोपाडी हायस्कूल व शाळा सुरू झाल्यात.

आंदोलन स्थगित झाल्यावर डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी खानदेशात दौरा केला आणि काँग्रेसचा प्रसार झाला आणि आगामी सुवर्ण महोत्सवी काँग्रेसचे अधिवेशन फैजपूर येथे भरवण्यास पोषक वातावरण निर्माण झाले.

संदर्भ: महाराष्ट्र राज्य गॅझेटियर जळगाव जिल्हा १९९४.

माहिती साभार  –

चित्रकार प्रकाश तांबटकर, ललितकला भवन, खिरोदा
Leave a comment