महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,98,752

खांदेरीचा रणसंग्राम भाग १६

By Discover Maharashtra Views: 3758 6 Min Read

खांदेरीचा रणसंग्राम भाग १६

खांदेरीचा रणसंग्राम भाग १६ – खांदेरीवर कुमक पाठवणं सुरूच होतं. केंग्विन ती थांबण्यात अपयशी ठरत होता. आता त्याने नागावच्या तोंडावर आपली जहाज पेरून ठेवली. त्याने नागावच्या खाडीतून मराठी बोटी बाहेर निघण्यास अडथळा येत होता. अनेकदा बारीक चकमकी घडत पण त्यात नुकसान कोणाचेच नव्हते. नागावच्या खाडीत इंग्लिश आरमार उभे असल्याने आता थळच्या किनाऱ्यावरून रसद पुरवठा सुरू झाला. एकाच वेळी दोन्ही ठिकाणी नाकेबंदी करणं केंग्विनला शक्य नव्हतं. तो अधिकच्या जहाजांची मागणी मुंबईला करत होता. पण परिणाम शून्य असताना ह्या प्रकरणात वाढत जाणारा खर्चावर थेट इंग्लंड वरून बोट ठेवले जात होतं. त्यामुळे सुरतेवरून येणाऱ्या पत्रात सारखं तडजोड करावी हे सांगितले जात होते. इथे पावसाळ्यात सुरतेच्या आश्रयाला आलेला सिद्दी तिथेच अडकून बसला होता. शिवाजी महाराज खांदेरी वर किल्ला बांधतोय हे ऐकल्यापासून चडफडण्यापालिकडे तो काहीही करू शकला नव्हता. आधीतर इंग्रज मराठ्यांना हुसकावून लागतील ह्या विश्वासात तो विसावला असावा, पण आता मात्र त्याला आपली जहाज खांदेरीच्या दिशेने पाठवायची घाई झालेली. खांदेरीचा भौगोलिक महत्व त्यालाही माहीत होतं. पण हे तीन मास दर्या खवळलेला होता. मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर उसळत होत्या. शेवटी नोव्हेंबरमध्ये तो जरा विसावला तेव्हा त्यांनी सगळं आरमार समुद्रात काढलं. एका रेषेत आपली जहाज ठेवून खांदेरीच्या दिशेने तो चालतच होता.

१० नोव्हेंबरला सिद्दी मुंबईच्या जवळ पोचला, टोपीकरांनी त्याला पत्र पाठवून बघितलं. नंतर अंदाज घेण्यासाठी आपल्या दोन माणसांना त्याच्या जहाजावर पाठवलं. तिथे त्याने आपण लवकरच खांदेरी बेट घेणार असल्याचे सांगितलं. फक्त ह्यासाठी इंग्रजांनी मराठी आरमाराला नागावच्या खाडीत अडकवून ठेवावं म्ह्णूनही सांगितलं. अर्थातच ह्या नुसत्या बोलाच्या गोष्टी होत्या हे इंग्रजांना माहीत होतं. त्यांनी सिद्दीच स्वागत करावे आणि त्याच वेळी त्यावर बारीक लक्ष ठेवायचं आणि त्याचा फायदा करून घेण्याचे केंग्विन ला अगोदरच सांगितले गेले होते. मागच्या मोठ्या झटापटीत झालेलं नुकसान अजून भरून निघालेलं नव्हतंच. केंग्विन जास्तीच्या माणसांची व तोफा मागणी करत होता.

Captn. Richard keigwin to Mumbai, 16 Nov.
The Siddee about 3 of the clock
went about the Island with his galvetts to veiw the fortifications, He tould me the strength of theIsland was not great, and that they had 300 souldiers and300 bigdreens [?] upon the place, and that he intends to attacquethe Island suddenly

मुंबई पाठीमागे ठेवत १६ तारखेला सिद्दी आपली जहाज घेऊन खांदेरी च्या समुद्रात पोचला. तिथं पोचल्या पोचल्या खांदेरीला प्रदक्षिणा घालून सगळ्या कामच निरीक्षण करू लागला. कामाचा पसारा बघून काहीसा दचकलाच तो. त्याचा आगमनाची मायनाकाने देखील दखल घेतली असणारच. त्या वेगात काम सुरू होत त्याच वेगात काम सुरू राहिलं. गडाच्या सर्वोच्च ठिकाणावर भगवं निशाण दिमाखात फडकत होतं. बेटाला घिरट्या घालून झाल्यावर तो कॅंग्विन भेटला. आता पर्यंत घडलेल्या घडामोडी त्याला जाणून घेयची होत्या. आता ३०० सैनिक आणि ३०० काम करणारे असे मिळून फक्त ६०० माणसं बेटावर आहेत, आपण एकत्र अचानक हल्ला केला तर त्यानं सहजच हरवू शकतो आणि खान्देरी आपल्या ताब्यात घेऊ शकतो असं सिद्दी कॅंग्विनला म्हणाला. नंतर सिद्दीने बाकी गोष्टीवर चर्चा करण्यासाठी म्हणून कॅंग्विनला आपल्या जहाजावर आमंत्रित केलं आणि तो तिथून निघून गेला.

दौलतखानाशी झालेल्या झटापटीत डवचं जे झालं ते इंग्रज अजून विसरले नव्हते. डववरच्या तोफा आता इंग्रजांच्याच विरुद्ध मराठ्यांनी वापरल्या होत्या. त्यावरील माणसाची झालेली हानी अजून भरून नव्हती निघाली. पुन्हा हा प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त मदत म्हणून दुसरं शिबाड व एक तारू पाठवण्यात आलं. सुरतकर तोडजोडीची भाषा करत होते तरी मुंबईत इंग्रज वेगळीच भीती बाळगून होते. आपण आपल्याकडून तडजोडीसाठी इसम पाठवला तर मराठे खांदेरी न सोडता तिथे प्रबळ होऊन बसतील. आणि ते मुंबईसाठी त्रासदायक ठरेल. आणि एक दिवस हे बेट ओसाड पडेल ही भीती ते सुरतेकडे लिहून पाठवत होते.

पोर्तुगीज वरून तटस्थ राहतोय हे जरी दाखवत असले तरी इंग्रजांना लागणाऱ्या वस्तू ते कमी किमतीत पुरवत होते. आपल्या भागातून मराठी सैन्य जाऊ देण्याची परवाना देत नव्हते. आणि अजून वरून गोव्यावरून पोर्तुगीज सैन्य मदतीला येत आहे हे सुद्धा कळवत होते. पण विशेष म्हणजे ही बातमी स्वतः इंग्रजानादेखील विश्वसनीय वाटत नव्हती. तरी मुंबईवर हल्ला झालाच तर मुंबईहून खूण दाखवून खांदेरीवर असलेलं नाकेबंदी पथक माघारी बोलावण्याची तयारीसुद्धा झाली होती.

जास्तीत जास्त पुढील १० दिवसात बेट आपल्या ताब्यात येईल अशी आशा इंग्रज बाळगून होते. १७ नोव्हेंबरच्या पत्रात केंग्विनला मराठ्यांनी बेट आपल्या ताब्यात दिलंच तर काय करावं ह्याची बारीक माहिती दिलीय. त्यांनी बेटावर असलेल्या सुभेदाराच्या नावाने असलेलं पत्र केंग्विन ला पाठवून दिले होते. सर्वात आधी बेटावर असलेले ५० ते ६० मुख्य अधिकारी निशस्त्र करून गलबतावर बोलवून ओलीस ठेवावे. मग आपल्या १२ फाइल्स घेऊन बेटावरील सैनिकांना निशस्त्र करून गलबतावर पाठवावे. बेटावरील सर्वोच्च स्थानी इंग्लिश झेंडा फडकवा. सिद्दी काही गडबड करण्यास आला तर त्यालाही उत्तर देण्याचे अधिकार केंग्विन ला देण्यात आले. एकंदर संपूर्ण तयारी करून राहण्याचा सूचना इंग्रज करून होते.

पण नियतीला हे मान्य नव्हतं आणि मराठ्यांना तर हे कदापी मान्य नव्हतं. पण ह्या प्रकरणात आता अजून एक दावेदार वाढला होता. आणि त्याने खांदेरी साठी होत असलेली रस्सीखेच अजून वाढली होती. आता मराठी सत्तेला एकाच वेळी दोन तोंडावर लढत देणं भाग होत.

क्रमशः – खांदेरीचा रणसंग्राम भाग १६

संदर्भ ग्रंथ : शिवछत्रपतींचे आरमार
English record

माहिती साभार – स्वराज्याचे वैभव

खांदेरीचा रणसंग्राम भाग १५

Leave a Comment