केळवे कस्टम १

केळवे कस्टम १

केळवे कस्टम १

केळवे कस्टम १ – पश्चिम रेल्वेवर असलेल्या केळवेचा समुद्रकिनारा मुंबईकरांमध्ये प्रसिध्द आहे. केळवे स्थानकात उतरुन ६ आसनी रिक्षाने केळवे गावात यावे. केळवे शितलादेवी मंदिरा वरुन बाजाराकडून पुढे जाणाऱ्या दांडाखाडी मार्गावरच उजव्या बाजुस केळवे कस्टम कोट-१ आहे. या कोटाशेजारीच हनुमान मंदिर व केळव्यामधील १०० वर्षे जुनी मराठी शाळा आहे. हा कोट म्हणजे पंचकोनी आकाराचा टेहळणीचा एकांडा बुरूज.

केळवे कस्टम कोटाचे इतिहासातील नाव माहित नसल्याने, हा कोट शेजारील कस्टम कार्यालयाच्या नावाने व याच्या शेजारीच समांतर अजून दुसरा कोट असल्याने कस्टम कोट-१ म्हणूनच ओळखला जातो. कधीकाळी खाडीकिनारी असणारा हा बुरूज भौगोलिक व मानवी हस्तक्षेपामुळे याचे स्थान पुर्णपणे जमिनीवर आलेले आहे. बुरूज स्वरुपात असणाऱ्या या बांधकामाच्या आजुबाजूस तटबंदी अथवा तत्सम स्वरूपाचे कोणतेही बांधकाम दिसत नाही म्हणजेच याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि जकातनाका म्हणुन होत असावा. बुरूजावर चढण्यासाठी शिडीचा वापर करावा लागतो व हि शिडी कोटाशेजारील घरात उपलब्ध आहे. शिडीचा वापर करून बुरुजावर शिरण्यासाठी उत्तर दिशेला एक कमानीच्या आकाराची खिडकी आहे.

बुरुजावर चढल्यावर आपल्याला चौकोनी आकाराच्या भिंतीरूप कार्यालयाच्या अवशेषांचे दर्शन होते. केळवे कस्टम कोटाचे म्हणजेच या बुरुजाचे स्थान दांडाखाडीच्या मुखाशीच आहे. २२ फुट उंचीच्या या बुरुजाच्या वरील कठड्याची उंची 5 फुट आहे. बुरुजावरील कार्यालयाच्या अवशेषाच्या मध्यभागी एक बांधीव चौथरा असुन भिंतीवरील नक्षीकाम,दिवे लावण्याची सोय व रंगकाम चांगल्या स्थितित आहे. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या कोटाचा वापर जकात नाक्याच्या कार्यालयासाठी करण्यात आला असावा असे तेथील एकंदरीत अवशेषावरून वाटते.

इ.स १७३९च्या वसई मोहिमेत माहिम किल्ल्यावरील विजयानंतर १० जानेवारी १७३९ रोजी केळवे किल्ला परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला. किल्ला छोटेखानी असून १० मिनीटात पाहून होतो. किल्ला पाहण्याच्या हेतुने येणाऱ्याचा येथे हिरमोड होण्याची शक्यता आहे पण ज्याला प्राचीन सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी. डॉ. श्रीदत्त राउत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘किल्ले वसई मोहिमे’ अंतर्गत या कोटावर संवर्धनाचे काम केले जाते.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here