श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ

श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ

श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ –

पुणे-सातारा महामार्गावर नीरा नदी ओलांडल्या नंतर शिरवळ सोडले की उजव्या हाताला ही प्राचीन हेमाडपंथी शैलीची दगडी वास्तू दृष्टीस पडते. ही अतिशय सुप्रसिद्ध वास्तु आहे . ‘सीतेची पानपोई’ या नावाने स्थानिक ओळखत असले तरी ही तेराव्या शतकातील यादवकालीन पाणपोई आहे. यासारख्या इतर अनेक प्राचीन वास्तू शिरवळ परिसरात आहेत. शिवकालातील ‘पाच सुभे आणि बारा मावळ’ यापैकी शिरवळ हा एक स्वतंत्र सुभा होय. शिरवळचे प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व या व अशा अनेक वास्तूने सिद्ध होते. शिरवळच्या पश्‍चिमेस पांडव धरा भागातील लेणी ही शिरवळ च्या प्राचीनत्वाचा पुरावा देतात.(श्री केदारेश्वर मंदिर, शिरवळ)

अतिशय प्राचीन पण आज मोडकळीस आलेला ‘सुभान मंगल’ (सुभानमंगळ) हा गढीवजा भुईकोट किल्ला त्याची पडझड झालेली दगडी भिंत व कसाबसा उभा असलेला दगडी बुरुज त्याच्या लगतच्या दोन ‘वीरगळी’ आणि दुर्गा देवी मंदिरा सह इतिहासाची साक्ष देत उभा आहे.

गावात नीरा नदीच्या किनाऱ्यावर केदारेश्वराचे तितकेच प्राचीन हेमाडपंथी दगडी मंदिर आहे. मंदिरासमोरील पायऱ्यांची चौकोनी बारव म्हणजे हेमाडपंती शैलीचा उत्तम नमुनाच. या बारवेत उतरण्यासाठी मंदिराच्या समोरून हे एक छोटासा पायऱ्यांचा रस्ता आहे. बारवेच्या समोरच श्री केदारेश्वराचे मंदिर आहे.  मुख्य मंदिरापासून स्वतंत्र असणारा चौकोनी दगडी नंदीमंडप हे या मंदिराचे वैशिष्ट्य. नंदीमंडपात च दोन अतिशय सुंदर ‘नागशिळा’ दृष्टीस पडतात. तसेच डाव्या हाताची दगडी दीपमाळ हे आपले लक्ष वेधून घेते. मुख्य मंदिरातील सर्वात बाहेरच्या सभामंडपात चौकोनी दगडी खांब अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले आहेत. त्यावर आधुनिक काळात केलेल्या तेल रंगाची रंगरंगोटी मात्र त्याचे मूळचे प्राचीन सौंदर्य झाकून टाकतात.

मंदिराचा विस्तीर्ण परिसर आणि इतर छोट्या देवळ्या हाही अधिक अभ्यासाचा विषय आहे.  मंदिराच्या बाहेर चुन्याच्या घाण्याची 2 प्रचंड दगडी चाके आहेत. गावकऱ्यांनी सांगितलेली आणखी एक कुतूहलाची गोष्ट अशी कि – या मंदिरापासून सुभानमंगळ किल्ल्यापर्यंत जाणारा एक चोर दरवाजा आहे.  या दरवाजाची खूण मंदिराच्या प्रवेशद्वाराशी दाखवली जाते. याचे दगड हे सुट्टे असून ते बाहेर काढले असता इथून जाणारा चोर दरवाजा दिसतो असे गावकरी सांगतात. अर्थातच अधिक संशोधन व अभ्यास करून याची सत्यासत्यता पडताळून पाहण्याची गरज आहे.

Charulata Indore-Londhe

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here