काठीकार | चोपदार –
बऱ्याच वेळा इतिहासातील काही पदे दुर्लक्षित राहिलेली दिसतात. अशाच एका ऐतिहासिक पदाचा उल्लेख आजच्या काळात फारसा होत नाही, तो म्हणजे ‘काठीकार’ किंवा‘चोपदार’. अहिल्या नगर जिल्ह्यातील कामरगाव येथे सापडलेला एक विशेष वीरगळ हा या पदाच्या प्राचीनत्वाचा एक ठोस पुरावा आहे. या वीरगळावर काठीकाराचे शिल्प आढळते.
हा वीरगळ इतर सामान्य वीरगळांपेक्षा खूपच वेगळा आहे. हा वीरगळ तीन बाजूंनी कोरलेला आहे. प्रत्येक बाजूवर सैनिकांचे संचलन दाखवले आहे. यापैकी एका सैनिकाच्या हातात मोठी काठी (ध्वजासारखी किंवा छडी) दिसते. हे शिल्प पाहिल्यावर असे स्पष्ट होते की, घोड्यावर स्वार असलेल्या दंडनायक किंवा राजाच्या पुढे हा काठीकार चालत आहे. या वीरगळाचा काळ यादवकालीन म्हणजेच इसवी सनाचे बारावे किंवा तेरावे शतक असावा . या काळात काठीकारासारखा अधिकारी समाजात महत्त्वाचा होता, हे या शिल्पातून सिद्ध होते.
‘काठीकार’ हा शब्द दोन भागांत विभागता येतो – काठी आणि कार. येथे ‘काठी’ म्हणजे मोठी छडी, दंड, वेत्र किंवा ध्वजासारखी काठी, तर ‘कार’ म्हणजे धारण करणारा.
मध्ययुगीन काळात (सुमारे १२वे ते १८वे शतक) राजा, सेनापती, दंडनायक किंवा दरबारातील उच्च पदस्थ व्यक्ती जेव्हा चालत असे, तेव्हा त्यांच्यापुढे एक अधिकारी पुढे चालत असे. या अधिकाऱ्याच्या हातात एक मोठी, सजावटीची काठी असायची. लोकांना बाजूला करून राजा किंवा दंड नायक येत असल्याचे तो सांगत असे. तोच हा काठीकार.
मराठी साहित्यात काठीकाराचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो :
ज्ञानेश्वरी (स. १२९०) – अध्याय १७
कां पुढा सुनि काठीकारा । अक्षमु चाले ॥
येथे काठीकार हा पुढे चालणारा आणि मार्ग मोकळा करणारा दिसतो.
गुरुचरित्र (१६वे शतक) – अध्याय २९
काठीकर दोघे प्रबळ । उभे पार्श्वी असती देखा ॥
येथे काठीकर हे पार्श्वी सेवक म्हणून उल्लेखित आहेत.
रामविजय (श्रीधर स्वामी, १७वे शतक)
कनकवेत्रपीणी पुढें धांवत ॥ जन वारूनि समस्त ॥ वाट करिती चालावया ॥
येथे सोन्याची काठी हाती असणारा चोपदार स्पष्ट दिसतो.
फारसी प्रभावामुळे ‘चोब’ (काठी) + ‘दार’ (धारण करणारा) असे मिळून चोपदार हा शब्द प्रचलित झाला. बहमनी, आदिलशाही, निजामशाही, मराठा साम्राज्य आणि पेशवाईच्या काळात चोपदार हे पद वंशपरंपरागत होते. मानधाता नावचा बाजीरावाचा चोपदार होता. पेशवे कालीन काही चोपदारांना वर्षासने दिली जात.
एकदा एखाद्या कुटुंबाला हे पद मिळाले की ते पिढ्यानपिढ्या चालत राहायचे. त्यामुळे अनेक कुटुंबांचे आडनावच चोपदार झाले.
© सतीश भी. सोनवणे

