कसबा संगमेश्वर

कसबा संगमेश्वर

कसबा संगमेश्वर –

महाराष्ट्राचे भौगोलिक दृष्ट्या प्रामुख्याने दोन भाग पडतात ते म्हणजे कोकण व देश.या राज्याला ७२० किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे.या किनारपट्टीच्या लगतचा सर्व भूप्रदेश भरपूर पर्जन्यमान व घनदाट वनश्रीने नटलेला आहे यालाच कोकण म्हणून संबोधण्यात येते.कोकणात आंब्याच्या राया,काजू,सुपारी ,नारळ ,कोकम,केळी,फणस इत्यादींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.उर्वरीत महाराष्ट्र हा देश म्हणून परिचित आहे.हिंदुस्थानातील व्यापार हा प्राचीन काळापासून प्रामुख्याने सागरी मार्गाने होत असे.परकीय आक्रमक मात्र खुष्कीच्या म्हणजेच जमिनी मार्गाने हिंदुस्थानात आले आहेत.मात्र १६ शतकात फ्रेंच ,इंग्रज ,पोर्तुगीज,डच हे सागरी मार्गाने हिंदुस्थानात आले.(कसबा संगमेश्वर)

कोकणातील समाज जीवनावर प्राचीन काळापासून विविध देशातील व्यापारी लोकांच्या रूढी,चाली,बोली भाषा,संस्कृतीचा विशेष प्रभाव राहिला आहे.निसर्गाने भरभरून दिले असल्याने संपूर्ण कोकण प्रेक्षणीय आहे.अनेक एतदेशीय व परकीय राजसत्तांनी हा भूभाग आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी अनेक लढाया झालेल्या इतिहासाने पाहिल्या आहेत.प्रत्येक राजसत्तेला कोकण किनारपट्टी आपल्या अमलात हवी होती कारण अनेक देशाशी व्यापार उदीम व शस्त्रास्त्र आयात करणे सुलभ होते.कोकणी जीवन व देशावरचे जीवन यात मह्तअंतर आहे.निसर्ग पूजा ही कोकणी माणसाच्या रक्तात आहे.

मुंबई -गोवा महामार्गावर अनेक ऐतिहासिक व प्रेक्षणीय ठिकाणे आहेत,जी पर्यटकांना नेहमीच भूरळ घालीत असतात.सह्याद्रीच्या भटक्यांना येथील गिरीशिखरे,किल्ले  व घाटवाटा म्हणजे पर्वणीच असते.डोंगर द-या,धबधबे,इवल्याशा वेडीवाकडी वळणे घेऊन वाहणाऱ्या कोकणाच्या जीवन वाहिन्या (नद्या )आपले निखळ सौंदर्य भूमीपुत्रांना व भटक्यांना प्रामाणिकपणे देत आहेत.रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा संगमेश्वर हे असेच ऐतिहासिक निसर्ग संपन्न ठिकाण आहे.सोनवी,अलखनंदा व शास्त्री नदीचा जेथे संगम होतो ते ठिकाण म्हणजे कसबा संगमेश्वर होय.या दोन्ही नद्यांच्या संगमामुळेच या कसब्या(गावाला) संगमेश्वर नाव मिळाल्याची शक्यता आहे.

छ.शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सुरवात पुणे जिल्ह्यातील बारा मावळातून केली होती.स्वराज्य विस्तार करीत असताना दूरदृष्टी असलेल्या छत्रपतींची नजर कोकणी मुलूखावर होतीच.चंदरराव मोरेचे पारिपत्य करून जावळीचे खोरे व रायरीचा(रायगड )किल्ला स्वराज्यात घेऊन कोकणात प्रवेशाची सुरवात केली.छ.शिवाजी महाराजांनी शृंगारपूर घेतल्यानंतर म्हणजे १६६१ सालानंतर संभाजी महाराजांचा विवाह पिलाजी शिर्के यांच्या कन्ये बरोबर झाला,तिचे नाव “येसूबाई” ठेवण्यात आले.शिर्के हे दाभोळ मामले रायरीचे देशमुख होते.त्यांना रायरी-शिरकाण येथील सरदेशमुखीचे वतन होते.शिर्केंचे कुलस्वामिनी शिर्काई म्हणून त्यांच्या ताब्यातील प्रदेशास ” शिरकाण” म्हणून संबोधण्यात येत होते. याच शृंगारपूर मध्ये १८/५/१६८२ रोजी छ.संभाजी महाराज व येसूबाई यांना मुलगा झाला ज्याचे शिवाजी असे ठेवण्यात आले.मात्र तेच पुढे छ.शाहू या नावाने ओळखण्यात येऊ लागले.

शृगारपूर व संगमेश्वर दोन्ही ठिकाणे जवळजवळ एकच आहेत.छ.शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून छ.संभाजी महाराज कारभार पाहू लागले.छ.संभाजी महाराजांची अनेक कसोट्यावर निकराचा संघर्ष सुरू होता.सिद्दी,इंग्रज,पोर्तुगेज फिरंगी,मुघल,आदिलशाही,कुतुबशाही आणि गृहकलहाशी छ.संभाजी महाराज यशस्वी लढा देत होते. मुघल बादशाह औरंगजेब लाखों सैन्यानिशी दक्षिणेत आला होता.त्याने दिडशे वर्षे राज्य करणारी आदिलशाही व कुतूबशाही नष्ट केली होती.आता मुघल बादशाहचे लक्ष शिवप्रभूंने निर्माण केलेल्या स्वराज्यावर होते.

राज्य कारभारात कवी कलशाचे असलेले महत्त्व इतरांच्या नजरेला खूपत होते आणि विशेषतः छ.संभाजी महाराजांना अडचणीत आणण्यासाठी जवळचे कौटुंबिक सदस्य व नातेवाईक वेगवेगळ्या छुप्या कुलूप्त्या आखित होते.छ.संभाजी महाराजांना मात्र मोलाची साथ “श्री सखीराज्ञी जयति” म्हणजेच महाराणी येसूबाई या खंबीरपणे देत होत्या.छ.संभाजी महाराजांची मुद्रा अशी होती,

“श्री शंभोः शिवजातस्य मुद्राद्यौरिवराजते !
यद् कसेविनी लेखा वर्तते कस्यनो परि !!”

(ही मुद्रा सूर्याच्या प्रभेप्रमाणे शोभते आणि त्या मुद्रेचा आश्रय करणारी लेखासुद्धा कोणावरही सत्ता चालविते.ती ही शिवाजीचा पुत्र शंभूची-संभाजीची मुद्रा प्रकाशित होत आहे.)

छ.संभाजी महाराजांनी पराकोष्ठीचे प्रयत्न करून स्वराज्याचे रक्षण केले होते.मात्र त्याचवेळी शिर्के मंडळीच्या बंडाळी चालू होत्या.कविकलशशी शिर्केंनी भांडण उकरून काढल्याने छ.संभाजी महाराजांना लक्ष घालावे लागले.औरंगजेबाचे सैन्य मराठी राज्याच्या नाशासाठी अनेक कुलुप्त्या करीत होते आणि नाराज मंडळी शत्रूच्या बाजूला जात होते.शेख निजाम हा खेळणा(विशाळगड)घेण्यासाठी वेढा देण्याच्या तयारीत होता.छ.संभाजी महाराज खेळण्याहून रायगडला जाण्यासाठी संगमेश्वर आले होते.तेथील कलह थांबविण्याचे महत्त्वाचे काम होते.मोजके सैन्य सोबतीला होते कारण इतक्या दुर्गम ठिकाणी मुघल सैन्य कधी येईल ही अपेक्षा नसावी.फितुरांनी आपली कामगिरी अगदी चोख बजावली म्हणजे शेख निजामाला छ.संभाजी महाराजांच्या हालचालींची सविस्तर माहिती दिली.

इ.स.१६८९ च्या जानेवारीत आलेले छत्रपती व कविकलश विविध सनदा देणे किंवा काढून घेणे इत्यादी महत्त्वाची कामे करीत होते.शेख निजाम (मुकर्रबखान) आपले सैन्य घेऊन घनदाट डोंगरातून संगमेश्वरला पोहोचला.मराठी सैन्याला ज्याची अपेक्षा नव्हती तेच घडले होते.जोराचा प्रतिकार सुरू झाला पण तो अपुरा होता.सरदेसाईच्या वाड्याच्या परिसरात घनघोर हातघाई झाली.या युद्धात जेष्ठ सेनानी म्हालोजी घोरपडेंना वीर मरण आले तर कविकलश पकडला गेला.साकी मुस्तैदखानाने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना कैद केले.अशाप्रकारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुघलांच्या कैदेत गेले यांच्या दुःखद स्मृती आजही मनाला वेदना देतात.देव,देश आणि धर्माला सर्वोच्च प्राधान्य देणारा मराठ्यांचा राजा शत्रूच्या कैदत गेला ती हीच भूमी.कसबा संगमेश्वरने जसे म्हालोजी सारख्या पराक्रमी पुरूषाचे शौय पाहिले तसे वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या राजा विरूध्द स्वकीयांनी केलेली फितूरी पाहिली.अशा फितूरांना अंगा खांद्यावर वाढविल्याचे दुःख ही संगमेश्वरची भूमी कशी विसरू शकेल ?

कसबा संगमेश्वर म्हणजे प्राचीन व स्थापत्य शैलीच्या अजोड नमुना असलेल्या मंदिरांचे गाव.मंदिराची निर्मिती निश्चित केव्हा झाली याची माहिती उपलब्ध नाही मात्र शिलाहारांच्या काळात जिर्णोध्दार झाल्याचे कोकणातील जाणकार सांगतात.कर्णेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहे.पूर्वाभिमुखी मुख्य प्रवेशद्वारावर “शिव पंचायन ” सुबक पद्धतीने कोरलेले आहे तर डाव्या बाजूच्या दरवाज्यावर नरकासुर व उजव्या बाजूच्या दरवाजावर किर्तीसुर मूर्ती कोरलेल्या आहेत.मुख्य मंडपात भव्य असे भगवान शंकराचे वाहन नंदी आहे तर त्यानंतर शंकराची मूर्ती आहे.याच मंडापात डाव्या बाजूस श्री महालक्ष्मीची मूर्ती तर उजव्या बाजूस शेषशायी विष्णूची मूर्ती आहे.

कर्णेश्वर मंदिरात देव,दानव,नृत्यांगना,किन्नर,यक्ष-यक्षिणी आदिंच्या सुंदर मूर्ती जागोजागी दृष्टीपथास येतात.अनेक शतकापूर्वी हिंदुस्थानातील स्थापत्य शास्त्र किती प्रगत होते याची साक्ष देणाऱ्या अनेक मंदिरे,वास्तू यापैकी हे मंदिर एक उदाहरण होय.मंदिराच्या बाहेरील उत्तर बाजूस  सुर्यमूर्ती व समोर प्रेक्षणीय गणेश मंदिर आहे.महाराष्ट्रात तशी तुलनेने नृसिंह मंदिराची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे मात्र कर्णेश्वर मंदिर परिसरात अतिशय सुरेख असे नृसिंह मंदिर आपणांस पाहावयास मिळते.या शिवाय अनेक वैशिष्ट्यपूर्ण मंदिराची साखळी येथे दिसून येते.मूर्ती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी माहितीचा खजिना असलेली कसबा संगमेश्वरची शिल्प वैभव नेहमीच स्वागतास सज्ज आहे.

कोकणातील लाल माती,कुडाच्या भिंतीची इवलीशी घरे,अंगणात फुलझाडे,बांबूच्या बेटात असलेल्या वस्त्या,प्रेमळपणाने स्वागत करणारे कोकणी रहिवासी,आणि खूप काही अनुभवयास नक्कीच येथे आले पाहिजे.कसबा संगमेश्वर पाहताना छ.संभाजी महाराजांचे राष्ट्रा प्रती दिलेले बलिदान आठवून मन व्याकूळ होते.अशा भूमीत आपल्या पराक्रमी राजाचे यथोचित स्मारक नसल्याचे भावना मराठी मनाला वेदना देते.

© सुरेश नारायण शिंदे,भोर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here