कंदुकधारिणी किंवा कंदुकावती

कंदुकधारिणी किंवा कंदुकावती

कंदुकधारिणी किंवा कंदुकावती –

मंदीराच्या बाह्यांगावर आढळणाऱ्या स्त्रीशिल्पांना सुरसुंदरी, देवांगना किंवा अप्सरा म्हणतात. क्षिरार्णवात 32,शिल्पप्रकाशात 16तर काही शिल्पशास्त्रीय ग्रंथात 24 देवांगणाचे प्रकार आहेत. मात्र या व्यतिरिक्त ही अन्य सुरसुंदरी दिसून येतात, त्यापैकीच एक हातात कंदुक(चेंडू) घेऊन खेळत नृत्य करणारी स्त्री म्हणजेच “कंदुकधारिणी किंवा कंदुकावती”….

कंदुक हा मूळात “संस्कृत” शब्द असून,त्याचा अर्थ चेंडू असा आहे ज्यास हिंदीमध्ये गेंद किंवा गेंदू म्हणतात. बोलीभाषेमूळे कंदूचा गेंदू, चेंडू असा अपभ्रंश झाला असावा. प्राचीन काळातील अनेक उत्सवांपैकीच एक “कंदुकोत्सव”.कंदुक खेळण्याचे साधन तर होतेच, शिवाय ते नृत्य करताना ही वापरले जात, तत्संबंधी चे नियम तंत्र, गतीचे नियमन, चूणीक्रिया, क्षयपद, चंक्रमण,मध्यम गती इ. बाबत वर्णन दंडीने केले आहे.

प्रत्येक महिन्याच्या “कृतिका नक्षत्रात” विंध्यवासिनी देवीच्या पूजनार्थ राजकुमारी कंदुकावती कंदुकनृत्य करत असल्याची माहिती दंडीने दिली आहे. तसेच हरिवंशात श्रीकृष्णाच्या कंदुकक्रिडेचे संदर्भ आहेत. उपरोक्त शिल्पाकृती खजुराहो येथील कंदारिया महादेव मंदिराच्या बाह्यांगावरील असून, तिने स्वत:चा चेहरा डाव्या बाजूस किंचीत वळवून, ती उजव्या हाताने चेंडू फेकत आहे, तिच्या पायाशी सेविका असून ती चेंडू पुरवत आहे. याशिवाय खजुराहो येथील जावरी मंदिर, लक्ष्मण मंदिर येथे ही कंदुकधारिणी शिल्प आढळते. येथील एका स्त्रीच्या हातात फळीसदृश्य वस्तू असून त्यावर तिने कंदुक(चेंडू) तोलला आहे. मात्र हे शिल्प भग्न असून तिच्या चेहर्याचा पाषाण फुटलेला आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील अंभई येथील वडेश्वर मंदिरावर दोन कंदुकधारिणी असून मार्कंडी, नागदा इ. ठिकाणी ही आढळतात.

मंदिर हे जरी अध्यात्माचे प्रतिक असले तरी, मंदिरावरील प्रत्येक शिल्पाचा अर्थ अध्यात्माशीच संबंधित नसतो. त्यापैकी अनेक शिल्पे सामाजिक, सांस्कृतिक परंपरेची साक्ष देतात.

PC : late Prakash Manjrekar sir.

 – Shrimala K. G.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here