महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,626

औरंगाबाद

By Discover Maharashtra Views: 2489 4 Min Read

औरंगाबाद – Aurangabad

पाण्याच्या दाबाचा वापर करून दगडी जाते फिरविण्याची कल्पना आजच्या काळात कुणाच्या डोक्यातही येणार नाही, मात्र सुमारे ४०० वर्षांपूर्वी हेच तंत्र वापरून दळण दळले जात होते. हे ठिकाण आहे पाणचक्की Aurangabad. जुन्या काळात अभियांत्रिकीचे सखोल ज्ञान आत्मसात केलेली मंडळी होती, हेच पाणचक्की सांगत आहे…

मलिक अंबर याने औरंगाबादेत नहरींच्या माध्यमातून पाणी आणले. त्यासाठी सायफन पद्धतीचा वापर केला. ‘नहर-ए-अंबरी’ या नावाने ही तत्कालीन पाणी पुरवण्याची योजना ओळखली जाते. १७व्या शतकाच्या सुरुवातीला मलिक अंबरे नहर-ए-अंबरीचे बांधकाम केले. त्यानंतर १७व्या शतकाच्या उत्तरार्धात ‘नहर-ए-पाणचक्की’ची बांधणी करण्यात आली. पाण्याच्या प्रवाहातून निर्माण झालेल्या उर्जेचा वापर करून चक्की (दळणाचे जाते) फिरविण्यात आली. त्यातून धान्य दळण्यात येत असे. पाणचक्कीत बाबा शहा मुसाफीर राहात. हे सुफी संत राहात होते. त्यावेळी तेथे पाणी नव्हते. त्यांचे शिष्य बाबा शहा महमूद यांनी पाणचक्कीचे बांधकाम केले.

पाणचक्कीसाठी सुमारे चार मैलांवरून नहरीच्या माध्यमातून पाणी आणण्यात आले आहे. नहरीचे पाइप खापरी आहे. हे ठिकाण औरंगाबाद शहराच्या उत्तरेला आहे. सायफन पद्धतीने हे पाणी भिंतीवर नेण्यात आले. तेथून हे पाणी खाली हौदात पडते. भिंतीवरून पडणाऱ्या पाण्याचा धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक सतत येत असतात.

हा हौद सुमारे १६२ फूट लांब, ३१ फूट रुंद व सुमारे चार फूट खोल आहे. हौदाच्या मधोमध कारंजे आहेत. या हौदाची पाणी साठ‍वण्याची क्षमता एक लाख २८ हजार ५०० गॅलन एवढी आहे. पाणचक्कीच्या शेजारून खाम नदी वाहते. हौदात पडलेल्या पाण्याचे आऊटलेट खाम नदीमध्ये सोडण्यात आले आहे. हौदाच्या मागील बाजूला उद्यान, दोन मोठे हॉल आहेत. तेथे आता औकाफ बोर्डाचे कार्यालय आहे. तेथे एक मशीद आहे. ही मशीद बंगाली इस्लामी वास्तुशास्त्राचा एक अप्रतिम नमुना आहे.

मुख्य हौदाच्या उत्तर-पश्चिमेला मोठे दगडी जाते आहे. हे जाते पूर्वी पाण्याच्या प्रवाहाच्या दाबामुळे फिरत असे. तेथे धान्य दळण्यात येत होते. जाते फिरविण्यासाठी आवश्यक असलेले पाणी पाइपद्वारे वळविण्यात आले आहे. उर्वरित पाणी भिंतीवरून खाली पडते.

औरंगाबाद – Aurangabad

मक्का, मदिना यांच्या यात्रेबरोबरच बंगाल, ओडिशा, आणि हैदराबादकडे जाणारे यात्रेकरू पाणचक्कीत थांबत असत. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था पाणचक्कीत करण्यात येत असे. दगडी जात्यावर तयार करण्यात आलेले पीठ त्यासाठी वापरले जात होते.मुघल सम्राट औरंगदेब हे बाबा शहा मुसाफिर यांना मानत होते. तुर्क ताज खान आणि औरंगजेबाचे दिवाण जमील बेग यांनी पाणचक्की येथे निवासस्थान (खानका) बांधले. त्यासाठी त्यावेळी सुमारे नऊ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. तेथे विद्यार्थी राहात असत. पाणचक्की येथे त्याकाळी अशियातील एक मोठे ग्रंथालय होते. तेथे धार्मिक शिक्षणासाठी विद्यार्थी येत असत. त्यांची व्यवस्था या निवासस्थानात करण्यात आली होती. तेथे विविध धर्मांची दुर्मिळ ग्रंथसंपदा होती. त्यात अरेबी व पर्शियन ग्रंथांचाही समावेश होता.

जलव्यवस्थापन आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून आजही या पाणचक्कीकडे पाहिले जाते. बाबा शहा महमूद यांनी नहरीच्या कामावर स्वतः लक्ष पुरविले होते. हे सर्व काम दोन वर्षांत पूर्ण करण्यात आले. हर्सूलच्या परिसरात खाम नदीच्या उगमाजवळ पाणी अडविण्यासाठी तलाव बांधला आहे. तेथे १५ ते २० फुटांची भिंत बांधली आहे. भिंतीचे काम विटा आणि चुन्यात करण्यात आले आहे. नहर मकबऱ्यापर्यंत आणण्यात आली आहे. तेथून ती पुढे पाणचक्कीपर्यंत आणली आहे. ही लांबी सुमारे चार मैल आहे. पाणचक्कीपर्यंत आणलेले पाणी गोड आणि शुद्ध होते.

Leave a comment