कला सरस्वती

कला सरस्वती

कला सरस्वती –

प्राचीन काळातील मूर्ती अविष्कार समोर ठेवत असताना आधुनिक काळातला शिल्पाविष्कार नोंद केला पाहिजे असे जाणवले. सरस्वतीची ही आधुनिक काळातील मूर्ती औरंगाबादच्या महागामी गुरूकुलात वटवृक्षाच्या छायेत विराजमान आहे. सरस्वती मूर्तीत वीणा दूय्यम स्वरूपाची किंवा लहान दाखवलेली असते. ही सरस्वती ठळकपणे लक्षात रहाते ती जवळपास सरस्वतीच्याच आकारातील उभ्या वीणे मुळे. सरस्वती विद्येची देवता तर आहेच. पण वीणावादनामुळे तीचं नातं संगीताशी अतिशय उत्कट असं आहे. या सरस्वतीच्या डाव्या खालच्या हातात पुस्तक आहे.(कला सरस्वती)

उजवा वरचा हात वरदमूद्रेत असून त्याच हातात अक्षमाला आहे. उजव्या खालच्या हातात पद्म आहे. डावा वरचा हात वीणेवर आहे. या वीणेच्या भोपळ्यावरही अप्रतिम अशी कलाकुसर आहे. महागामी नृत्यगुरूकुल असल्याने असेल कदाचित पण ही वीणाही कुशल नर्तकीसारखी डौलदार जाणवते. वीणेचा वरचा भाग मयुरमुखाच्या आकारात कोरलेला आहे. सरस्वतीच्या पायाशी मोर असून त्याची डौलदार मानही नृत्यमुद्रा सुचवते. ही सरस्वती कमळासनावर उभी आहे.

ही मूर्ती तब्बल साडेपाच फुट उंच आहे. शिल्पकला आधुनिक काळात जपणे, तिला प्रोत्साहन देणे यासाठी महागामी ला विशेष धन्यवाद. Mahagami Gurukul. या सरस्वतीला मी “कला सरस्वती” असे ठेवले आहे.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here