सातचौक निवासिनी जगदंबा माता, बीड

सातचौक निवासिनी जगदंबा माता, बीड

सातचौक निवासिनी जगदंबा माता, बीड –

पूर्वीच्या काळी राज्याचा महसूल गोळा करण्यासाठी गाव पातळीवर देशपांडे देशमुख यांना वतनदारी देण्याची प्रथा होती. हे वतनदार राज्याचा महसूल गोळा करून राज्याच्या तिजोरीत जमा करत व प्रसंगी राजाला युद्धासाठी सैन्य बाळाचा पुरवठा करण्याचे काम करत असत. हे वतन वंशपरंपरागत चालू असून या वतनदाराला स्वतःची उपजीविका करण्यासाठी काही जमिनी इनाम म्हणून दिलेल्या असत. त्या जमिनीच्या उत्पन्नावर ते स्वतःची उपजीविका करीत असतात.(सातचौक निवासिनी जगदंबा माता)

याच पद्धतीने बीड गावचे वतनदार देशपांडे यांचा बीड गावच्या मध्यभागी एक मोठा सात चौकी वाडा होता. या वाड्याला एकंदर सात चौक असल्यामुळे त्याला सात चौकी वाडा असे म्हणतात. या वाड्यात जाण्यासाठी दोन तीन वेशी होत्या. रयतेचे चे काम करण्यासाठी दिवाणखाना व रयतेचे वाहन बांधण्यासाठी घोड्याची पागा सुद्धा या सातचौक वाड्यामध्ये दिसून येते. पण साडेचारशे वर्षांपूर्वीची परंपरा असलेला हा वाडा आता भग्नावस्थेत गेलेला असून त्यामध्ये त्यांच्या वंशजांनी वेगवेगळ्या प्रकारचे बांधकाम केलेली आहेत.

या वाड्याचा मूळ पुरुष हा तुळजाभवानीचा निस्सीम भक्त होता. तो दरवर्षी नवरात्रामध्ये तुळजापुरला पायी वारी करीत असे. पण वृद्धापकाळामुळे त्याला तुळजापूरला पायी वारी करणे शक्य झाले नाही. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन तुळजाभवानीने त्यांना दृष्टांत दिला व सांगितले मी तुझ्या वाड्यातील आडा मध्ये आहे मला वर काढ व माझी पूजा कर. तेव्हा त्यांनी आडातून मूर्ती काढण्यास सुरुवात केली. एकामागोमाग एक तीन सुबक अष्टभुजा देवीच्या मूर्ती आडातून वर काढण्यात आली. त्यापैकी सर्वात मोठी मूर्ती ही सातचौक वाड्याच्या माजघरात स्थापन करण्यात आली व इतर दोन मूर्ती अनुक्रमे देशपांडेचे नातेवाईक व देशपांडे यांचे पुजारी यांच्या कडे स्थापन करण्यात आल्या.

तुळजाभवानी देवीची ही मूर्ती शाळिग्राम शिळेची असून तिच्या डोक्यावर महादेवाची पिंड आहे. मूर्तीला आठ हात असून मूर्ती सिंहावर विराजमान झालेली आहे तर मूर्तीच्या पायाशी महिषासुराची प्रतिमा असून देवी महिषासुराचा वध करताना दिसत आहे. अत्यंत सुबक आखीव-रेखीव अशी ही एक सर्वांग सुंदर मूर्ती आहे.

नवरात्रोत्सवात या देवीचा एक मुख्य उत्सव असून तो म्हणजे संध्याकाळी देवीसमोर वेदमंत्रोच्चार युक्त महा आरतीचा कार्यक्रम असतो. या महा आरतीला देशपांडे यांचे नातेवाईकासह समाजातील लहानथोर मंडळी उपस्थित असतात. आरती नंतर उपस्थित ब्रह्म वर्ग मंत्रोच्चारात मंत्र पुष्पांजली अर्पण करतात ‌ हा या देवस्थानचा एक प्रमुख वार्षिक उत्सव असून तो नवरात्रात अश्विन शुद्ध द्वितीयेपासून अष्टमीपर्यंत अखंडित चालू असतो.

Shashikant Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here