महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,02,265

कामातून गेलेल्या वस्तू भाग ५

By Discover Maharashtra Views: 3919 6 Min Read

स्वयंपाकाच्या भांड्यांचा महासागर आणि शब्दकोश ! ( भाग ५ वा )
( एक अजब संग्रह )

आपल्या देशामध्ये विविध प्रकारांनी, हजारो ठिकाणी बहरलेली खाद्य संस्कृती म्हणजे एक अजब सांस्कृतिक लेणे आहे. पूर्वी असे म्हटले जात असे की ” Indian cookery begins where western cookery ends “! आता जरी बदल होत असले तरी पाश्चात्य पाककला जेथे संपते तेथे भारतीयांची सुरुवात होते, असे म्हटले जात असे. पूर्वी तिकडे अन्नपदार्थ एकदा उकडले की स्वयंपाक झाला. मग त्यावर मीठ, तिखट, मसाले, सॉस घालून ते सर्व्ह करायचे. आपल्याकडे पदार्थ शिजवले की मग स्वयंपाकाला खरी सुरुवात होते. त्यानंतर भाजणे, फोडणी घालणे, तळणे , परतणे, कोरडे मसाले- ओले वाटण घालणे अशा विविध क्रियांनी असंख्य चवींचे हजारो पदार्थ तयार केले जातात. या बरोबरच आपल्या देशातील आणखी एक पारंपरिक वैशिष्ठय म्हणजे अनेक कारणांमुळे होणारे सार्वजनिक किंवा गावजेवण !

साखरपुडा, लग्न, बारसे असे कौटुंबिक धार्मिक विधी, शुभ – अशुभ प्रसंग, गावागावातील देवळांमधून साजरे होणारे उत्सव आणि महाप्रसादाचे जेवण, अन्नदान अशा अनेक कारणांमुळे शेकडो माणसांचा स्वयंपाक, अनेकदा करावा लागत असे. साहजिकच विविध अन्नसंस्कारांसाठी खास घडविलेली भांडी आणि अशा जेवणावळींसाठी भांड्यांचा प्रचंड आकार हे आपल्या देशाच्या खाद्य संस्कृतीचे खास वैशिष्ठय म्हणावे लागेल ! याच्या खुणा आपल्याला हजारो वर्षे आणि भारतभर पाहायला मिळत असल्या तरी त्यातील अनेक भांडी, अवजारे, वस्तू कालौघात नष्ट झाल्या. देशभर विविध वस्तुसंग्रहालयांमध्ये या वस्तू जतन करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. पुण्याच्या राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालयात अशा अनेक अजब चिजा पाहायला मिळतात.

अहमदाबादमध्ये श्री. सुरेंद्र पटेल यांनी स्वयंपाकाच्या भांड्यांचेच एक प्रचंड संग्रहालय उभे केले आहे. सुमारे ४५०० हून अधिक भांडी आणि वस्तू या संग्रहालयात पाहायला मिळतात. अशा प्रकारचे हे जगामधील एकमेव संग्रहालय आहे. हे सुरेंद्र पटेल एकदा भावनगर जिल्ह्यातील सिहोर येथे भांडी खरेदीला गेले असता त्यांना त्यांच्या नजरेसमोर एक सुंदर जुना नक्षीदार तांब्या तेथील भट्टीत वितळवतांना पाहावा लागला. हे त्यांच्या मनाला इतके लागले की त्यांनी अशी जुनी भांडी वाचविण्याचा, त्यांचा संग्रह करण्याचा निश्चय केला. त्यांच्या या झपाटलेपणामुळे अशा भांड्यांचा एक महासागरच तयार झाला. ‘ विचार धातुपात्र संग्रहालय ‘ हे अहमदाबादमध्ये एपीएमसी मार्केट समोर, वासना टोलनाक्यानजीक एका मोठ्या जागेत अगदी परंपरागत पद्धतीने उभारले आहे. जुन्या घरांना असतात तशा खूप मोठ्या कौलारू पडव्या बांधून त्यात ह्या सर्व वस्तू मांडल्या आहेत. अगदी छोट्या चमच्यांपासून ते अत्यंत अजस्त्र अशा कढया, हंडे, पेटारे, रांजण अशा हजारो वस्तू पाहतांना आपल्याला आजच्या मोबाईल युगातून थेट द्वापार युगात गेल्यासारखे वाटते.

येथे मांडलेल्या कांही वस्तूंचे अगणित प्रकार आहेत. मात्र महाराष्ट्रात सर्वत्र दिसणारी पातेली मात्र येथे दिसत नाहीत. चमचे, पळ्या, झारे, कालथे / उलथणे, ओगराळे, चिमटे / सांडशी, हंडे, तपेली, कळश्या, घागरी, लोटे, रांजण, चौफुला, तांब्ये, लोटे, गडू, काथवट, कावळे ( jug ), परात, ताटे, तबके, थाळे, कासंड्या, बंब, अप्पेपात्र, मोदकपात्र, सुरया, पेले, फुलपात्रे, वाट्या, वाडगे, बरण्या, रव्या, घंगाळी, चरव्या, तसराळी, शिंकाळी, तस्त, फिरकीचे तांब्ये, खलबत्ते, विळ्या, किसण्या, चाकू, सुऱ्या, लाकडी भांडी, विविध प्रकारचे चौरंग अशी थोडीशी यादी आठवते. ७०० हुन अधिक अडकित्ते, तसेच पानाचे डबे, चुनाळी, कातगोळीच्या डब्या, हुक्के, चिलीम, कलमदाने, दौती, बोरू, टाक, पूजेची ताम्हने, निरांजने, दिवे, अभिषेक पात्रे, देव्हारे, पळ्या – भांडी – पंचपात्री, घंटा, कुंकवाचे करंडे, कचोळी, आरत्या, धुपदाण्या अशा अगणित वस्तू तेथे आहेत. घोड्याच्या रिकिबी, हत्यारे, तलवारी, ढाली, बर्ची , बिचुआ अशा हत्यारांच्या विभागात विराजमान असलेली आणि अत्यंत सुयोग्य अशी फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांची चित्रे पाहून आनंद होतो.

या संग्रहालयात अत्यंत वेगळी आणि दुर्मीळ अशी काही भांडी आणि वस्तू आहेत. माझ्या या आधींच्या लेखात माहिती दिलेले ढींचणिया, हुंड्याचे हंडे, गुलाबजल पात्र, मद्य निर्मिती पात्र, सासूचे लाटणे या वस्तू येथे आहेत. १००० वर्षांपूर्वीचे धातूचे मोठे भांडे, अत्यंत कलाकुसरीची चुंबळ ( हंड्याखाली ठेवायची गोल अडणी ), विविध प्रकारची शिंकाळी, ट्रकच्या टायर एवढे मोठे पसरट भांडे, ४ माणसे आतमध्ये उभी राहिली तरी दिसणार नाहीत इतके मोठे हंडे, ज्यामध्ये ५ माणसे मांडी घालून बसू शकतील एवढ्या मोठ्या कढया, ३ ते ५ फूट उंचीची कुलुपे, पक्षांना दाणे घालायची कलात्मक दाणेघरं अशा अनेक अजब वस्तू येथे आहेत. कोकणामध्ये काळ्या दगडांमध्ये कोरलेले पाणी साठविण्याचे द्रोण ( डोणी, द्रोणी ) सर्वांनी पहिले असतील. या संग्रहालयात कोरीव नक्षीची अष्टकोनी संगमरवरी द्रोणी पाहायला मिळते. हत्ती एकाजागी उभा राहावा म्हणून त्याच्या पायात घालायचे मोठे काटेरी कडे, अंकुश, गोमुख तसेच हत्तीचे मुख असलेला नळाचा कॉक, रंग उडविण्याचा पिचकाऱ्या अशा असंख्य वेगळ्या वस्तू येथे मांडून ठेवल्या आहेत.

आणखी एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे भांड्यांची नावे आणि चित्रे दर्शविणारा ” पात्र शब्दावली ” हा गुजराती भाषेतील शब्दकोश प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात विविध भांड्यांची व वस्तूंची गुजरातच्या विविध भागातील नावे, अर्थ आणि रेखाचित्रे देण्यात आली आहेत. आता याच्या जीर्ण अवस्थेतील अगदी मोजक्या प्रति शिल्लक आहेत त्यातील एक प्रत मला मिळाली. महाराष्ट्र म्हणजे खाद्य पदार्थ आणि त्यासाठी लागणाऱ्या भांडी आणि वस्तूंनी भरलेलं एक श्रीमंत कोठार आहे. मराठीतही असा कोष यायलाच हवा.

पुढे पुढे सरकणारा काळ कुणालाही थांबवता येत नाही. पण गत काळाच्या खुणा थांबवून ( साठवून ) ठेवता येतात. त्यांच्या आधारे पुन्हा जुना काळ अनुभवता येतो. याचा प्रत्यय हे संग्रहालय पाहतांना येतो.

माहिती साभार – Makarand Karandikar
 

 

 

Leave a comment