ऐतिहासिक म्हणी व त्यांचा अर्थ

कन्टेन्ट | गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २ ३ ४ ५ ६ ७ | मौर्य सत्तेचा उदय | गड कसे पाहवे | संभाजी कावजी व कावजी कोंढाळकर | जावळी मोहीम ६

ऐतिहासिक म्हणी व त्यांचा अर्थ…

संस्क्रुती व सामाज ह्यावर आपल्या इतिहासाचा खूप प्रभाव असतो. ऐतिहासिक घटनांमधून अनेक म्हणी वाक्प्रचार त्या त्या समाजाच्या बोलभाषेत प्रचलित होतात व भाषा समृद्ध होते. ह्या म्हणी व वाक्प्रचार म्हणजे लोकांनी त्या घटनेला किंवा त्या ऐतिहासिक व्यक्तींना दिलेला मान असतो. त्या वाकप्रचारांच्या रूपाने ती घटना ते नायक शब्दशः सुर्यमंडल भेदून अजरामर होतात. आपली मराठी देखील त्यास अपवाद कशी असेल त्यात आपल्या महाराष्ट्राला प्रखर राष्ट्रभक्तीचा वैभवशाली इतिहास लाभला आहे तेव्हा आपल्या भाषेत देखील ऐतिहासिक घटनांवर आधारित खूप म्हणी आहेत.
चला तर मग आज पाहूया आज अशाच काही अनोख्या काही प्रसिध्द म्हणी

१) होता जीवा म्हणून वाचला शिवा

प्रतापगड च्या विख्यात युद्धात शिवरायांवर सय्यद बंडा ह्या अफजलखानचा शरीर रक्षकाने केलेला वार स्वतः वर घेऊन त्यास ठार करणाऱ्या जीवा महाला ह्या शूर मराठा वीरांच्या सन्मानार्थ ही म्हण मराठी भाषेस लाभली
जिवा महाला नसता तर शिवछत्रपतींचे प्राण धोक्यात होते जिवाने आपल्या जीवावर उदार होऊन शिवरायांचे प्राण वाचवले म्हणून ही म्हण प्रचारात आली

२) एकट्याने खिंड लढवणे

पन्हाळगडच्या वेढ्यातून शिवराय सुटले व विशाळ गडाकडे अवघ्या ६०० बांदल मावळ्यानीशी दौडत निघाले मागावर २५०० ची विजापुरी फौज घेऊन सिद्दी मसऊद दौडत पाठलागावर येत होता गाजापुर जवळच्या घोड खिंडीत विजापुरी फौजेने राजांच्या फौजेला जवळ जवळ गाठले तेव्हा बांदल मावळ्यांचे सरदार बाजीप्रभूंनी जबरदस्तीने ३०० मावळ्यांबरोबर शिवरायांना पुढे पाठवले व ३०० मावळ्यानीशी स्वतः घोड खिंडीच्या तोंडावर विजापुरी फौजेला अडवून धरले व शौर्याची कमाल केली २०तास धावून विश्रांती न घेता तसेच पुढे अजून ७-८ तास अवघे ३०० वीर २५०० शत्रूशी बेभान होऊन लढले. बाजींनी खिंड लढवली म्हणून शिवराय निसटू शकले ह्या घटनेतून खिंड लढवणे हा वाक्प्रचार मराठीस मिळाला
अतिशय कठीण परिस्थितीस धीराने तोंड देऊन यश मिळवणे किंवा दुसर्यास वाचवणे ह्यासाठी हा वाक्प्रचार योजतात

३) लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे.

ह्याच घोडखिंडीत जेव्हा विजापुरी फौज फारच जवळ आली तेव्हा निर्वाणीचा प्रसंग बघून बाजीप्रभूंनी शिवरायांस विनवले की तुम्ही निम्मी तुकडी घेऊन पुढे व्हा मी खिंडीत चिंचोळ्या वाटेवर शत्रूस रोखतो वाट चढू देत नाही तेव्हा राजे ह्यासाठी तयार न्हवते, राजे बाजींना म्हणाले की आपण मिळुन मसूद ला तोंड देऊ त्याक्षणी बाजीप्रभूंनी राजास सांगितले की स्वतः पेक्षा ह्या बांदल मावळ्यांपेक्षा राजे महत्वाचे आहेत ते सुखरूप राहिले तर स्वराज्य राहील म्हणून लाख लोक शहीद झाले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगाव्यास हवा
त्यांचे हेच उदगार म्हणीच्या स्वरूपात अमर झाले

४) कात्रज चा घाट दाखवणे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी लालमहालात शाहिस्तेखानाची बोटे कापल्यानंतर मागे लागलेल्या मोघल सैन्याला चकवा देण्यासाठी कात्रज घाटात शे-दीडशे बैलांच्या शिंगांना बांधलेल्या मशाली पेटवून देवविल्या. त्या पलित्यांच्या धावत्या ज्वाला पाहून पुण्यातील मोघल सैन्याला ते मशाली घेऊन पळून जाणारे मावळेच वाटले! ते सैन्य त्या बैलांच्या दिशेने धावले. मोगलांना शिवाजी महाराज त्यांच्या मावळ्यांसह अशा रीतीने चकवा देत दुसऱ्या मार्गाने सुखरूपपणे सिंहगडावर पोचले. शत्रूला अनपेक्षित धक्का देऊन थक्क करणे व भानावर येईपर्यंत स्थिर विजय मिळवणे म्हणजेच ‘कात्रजचा घाट’ दाखवणे ही म्हण जगभर प्रसिद्ध झाली,

५) आधी लगीन कोंढण्याचे मग माझ्या रायबाचे

शिवाजी राजांनी कोंढाण्याची मोहीम काढली त्याचवेळी तानाजी सुभेदारांनी त्यांच्या मुलाचे लग्न ठरवले होते जेव्हा तानाजी स्वतः राजांना आमंत्रण देयला आले तेव्हा त्यास ह्या मोहिमेविषयी समजले त्यावेळी रायबाचे लग्न पुढे ढकलून तानाजीने स्वतः मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले ह्या घटनेची आठवण जागवत आजही ही म्हण आपल्या भाषेचे वैभव वाढवत आहे.
स्वतःचे कितीही महत्वाचे खाजगी काम असले तरी कर्तव्यापुढे सर्व दुय्यम मानून कर्तव्य प्रथम करणाऱ्याच्या संदर्भात ही म्हण योजली जाते

६) गड आला पण सिंह गेला.

नरवीर तानाजी मालुसरे ह्यांनी जीवाचे मोल देऊन शिवरायांचे सिंहगड जिंकायचे स्वप्न साकार केले जेव्हा शिवरायांना समजले की तानाजीने युद्ध करून सिंहगड जिंकला पण स्वतः युद्धात तो विरगतीस प्राप्त झाला तेव्हा भावनावष होऊन शिवरायांच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले व म्हणीच्या स्वरूपात अजरामर झाले अशी मान्यता आहे
जेव्हा काही गोष्ट मिळवताना आपली तेवडीच किंवा थोडी जास्तच महत्वाची गोष्ट गमवावी लागते तेव्हा ही म्हण वापरतात

७) पेडगावचा शहाणा

बहादूरखान कोकलताश याच्या पेडगावची मराठ्यांनी लूट केली. सुमारे १ कोटीची लूट रायगडावर जमा झाली.
राजाभिषेकानंतर पुन्हा एकदा मराठ्यान्नी मुघल भागात छापे मारून लुट मिळवणे सुरु केले. पेडगावमध्ये मोठ्या प्रमाणात मुघल फौज होती मात्र मराठ्यान्नी त्यांना मुर्ख बनवून लुट मिळवली. काही हजारांचे सैन्य आधी पेड़गाववर चालून गेले आणि जेंव्हा मुघल फौज समोर उभी ठाकली तेंव्हा मात्र मागे फिरून पळू लागले. मुघल फौजेला वाटले मराठे घाबरुन मागे पळत आहेत. मात्र डाव वेगळाच होता. ज्याक्षणी मुघल फौज मराठा सैन्याचा पाठलाग करत-करत पेड्गावच्या हद्दीपासून दूर गेली त्याक्षणी दुरवर लपून बसलेल्या इतर मराठा फौजेने पेड़गावमध्ये प्रवेश केला आणि संपूर्ण पेड़गाव लुटले. अर्थात मुघल फौजेला जेंव्हा जे समजले त्यावेळी ते मागे फिरले मात्र मराठा सैन्याने तोपर्यंत आपले काम चोख केले होते. ह्यालुटीने राजाभिषेकाचा बराचसा खर्च शिवरायांनी भरून काढला व मराठी भाषेस अजून एका म्हणीची देणगी दिली.

८ ) एक बाजी बाकी सब पाजी.

पेशवे बाजीराव ह्यांच्या शौर्याची तारीफ करताना हायद्राबाद च्या निजामानी वरील उदगार काढले होते
एक बाजीराव सोडले तर दक्खनच्या दौलतीत कोणीही त्यांच्याऐवढे शूर नाहीत असे त्यास म्हणायचे होते
एखाद्या व्यक्तीच्या कर्तबगारीची प्रशंसा करताना वरील वाक्प्रचार वापरला जातो

९) अटकेपार झेंडे लावणे.

बाजीराव पुत्र रघुनाथराव पेशव्यांनी लाहोर जिंकून मराठा फौजेस सतलज व सिंधू नदीच्याही पार पेशावर पर्यंत विजयी घोडदौड करत नेले सरदार मानाजी पायगुडे ह्यांच्या नेतृत्वाखाली मराठा फौज अटकेचा किल्ला जिंकून पार खैबरखिंडीच्या टोकाशी पोहोचली. मुहम्मद गझनी च्या आक्रमणानंतर इसवी सनाच्या ९व्या शतकांनंतर पार अठराव्या शतकात अदमासे ८०० वर्षांनी कुठल्यातरी हिंदू राज्यसत्तेने सिंधू नदी ओलांडण्याचा भीमपराक्रम केला. हाच पराक्रम अटकेपार झेंडे लावणे ह्या म्हणीच्या स्वरूपात मराठी भाषेत मनाचे स्थान राखून चिरस्थायी झाला. कुणीही केलेल्या मोठ्या पराक्रमाला अटकेपार झेंडे लावणे म्हणतात

१०) बाचेंगे तो और भी लडेंगे.

दिल्ली जवळ उत्तरेस यमुनेच्या तीरावर बुराडी घाट जवळ सरदार दत्ताजीराव शिंदे व दुवाबातील रोहिला नवाब नजीबखान व कुतुबशाह ह्यांच्या फौजेत भीषण लढाई झाली ह्यात दत्ताजीस गोळी लागून ते पडले व जखमी अवस्थेत कुतुबशाहच्या हाती कैद झाले जखमी दत्ताजीच्या छातीवर बसुन क्रूर कुतुब ने त्यास विचारले क्यू पाटील और लडोगे तेव्हा वीर दत्ताजी त्वेषाने उत्तरले क्यू नही , बाचेंगे तो और भी लडेंगे ह्या उत्तराचा राग येऊन कुतुबशाहने त्यांचे शीर धडावेगळे केले व मराठ्यांच्या ह्या वीर सरदाराच्या बलिदानाने अजून एक म्हण अस्तित्वात आली
अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा न डगमगता कोणी अडचणींना तोंड देयची तयारी ठेवत असेल त्या संदर्भात हा वाक्प्रचार योजतात

११) पानिपत होणे.

मराठा साम्राज्याचा विजयी वारू पानिपतच्या महायुद्धात रोखला गेला सबंध मराठी मुलखातील एक पिढी देशासाठी पानिपतावर धारातीर्थी पडली मराठा साम्राज्याला एक जबरदस्त पराभव झेलावा लागला. ह्याचा धसका मराठ्यांनी एव्हडा घेतला की कोणाचे मोठे नुकसान झाले किंवा हार झाली तर पानिपत झाले असे लोक म्हणू लागले.

१२) बरभाईचे कारस्थान.

सवाई माधवराव पेशव्यांना रघुनाथरावापासून वाचवून मराठा राज्य स्थिर करण्यासाठी नाना फडणीस व महादजी शिंदे ह्यांनी मराठेशाहीतील १० महत्वाच्या सरदारांना एकत्र करून एक मंडळ बनवले व त्यांचे कडून एकनिष्ठतेची शपथ घेतली हे मंडळ रघुनाथरावची व साथीदारांची कपटी राजकारणा उधळून लावत असे ह्या गुप्त मंडळास बारभाई (१२ भाई) म्हटले जाई त्यावरूनच बारभाईचे कारस्थान हा वाक्प्रचार आला

अश्या ह्या ऐतिहासिक संदर्भावर आधारित काही म्हणी ज्यांनी मराठी भाषेचे वैभव वाढविले

तुमच्या पहाण्यात वाचनात अश्या अजून काही ऐतिहासिक संदर्भ असणाऱ्या म्हणी आल्या तर आम्हास नक्की शेअर करा

लेख – तेजस खंडाळेकर © (Tejas Khandalekar)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here