महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २

By Discover Maharashtra Views: 1359 6 Min Read

गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २ –

धाकटे छ.शाहू महाराज.सातारा गादी –

मराठ्यांच्या सातारा गादीचे प्रथम छत्रपती पुण्यश्लोक शाहू महाराज,उर्फ थोरले शाहू महाराज १५ डिसेंबर १७४९ रोजी निधन पावले.त्यांना पुत्ररत्न नसल्याने त्यांनी ताराराणी यांचा नातू रामराजास दत्तक घेतले होते.रामराजाची  कारकीर्द जवळपास २८ वर्षांची राहिली.छ.रामराजे ९ डिसेंबर १७७७ रोजी निधन पावले. त्यांना दोन पत्नी असून तीन मुली होत्या.त्यामुळे पुन्हा एकदा सातारा गादीसाठी दत्तक घेण्याची वेळ आली.छ.रामराजानच्या शेवटच्या दिवसातील महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती मराठे सरदार,मुत्सद्दी यांच्या स्वार्थीपणामुळे कमालीची अनाकलनीय झाली होती.रामराजानच्या दत्तकाच्या वेळी उद्भवलेल्या परिस्थितीचे नीट आकलन होण्यासाठी थोरल्या माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर मराठेशाहीत निर्माण झालेली राजकीय परिस्थिती माहित असणे आवश्यक आहे.(गाजलेली ऐतिहासिक दत्तक प्रकरणे २)

पानिपत संग्रामा नंतर मराठ्यांच्या लष्करी सामर्थ्याची ढासळलेली प्रतिमा माधवरावांच्या कारकिर्दीत पुनःस्थापित झाली,इतकी कि मोगल बादशहाला पण मराठ्यांच्या सामर्थ्याची खात्री पटून त्याने इंग्रजांपेक्षा मराठ्यांच्या संरक्षणात राहणे पसंत केले.माधवरावांचे १८ नोवेंबर १७७२ रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव पेशवा झाला ज्याची ३० ऑगस्ट १७७३ ला हत्त्या झाली.ह्या हत्त्येमागे नारायणरावाचा काका राघोबा दादा ह्यांचा हात होता.त्याची पेशवा होण्याची महत्वाकांक्षा खूप जुनी होती.राघोबादादांनी छ.रामराजान कडून

३१-१०-१७७३ ला पेशवाई ची वस्त्रे (अधिकार) मिळविले.राघोबादादा विरुद्ध मराठेशाहीतील बारा सरदार,मुत्सद्दी ह्यांचा बारभाई  नावाचा एक गट त्यावेळी निर्माण झाला ज्यात नाना फडणीस,हरिपंत फडके,सखाराम बापू बोकील,त्रिंबकराव पेठे,मोरोबा फडणीस,बापुजी नाईक,मालोजी घोरपडे,भवानराव प्रतिनिधी,रास्ते,पटवर्धन,महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर ह्यांचा समावेश होता.बारभाई नी छ.रामराजान कडून राघोबा दादास पेशवे पदावरून बडतर्फ करविले.(२८ फेब्रुवारी १७७४) नारायणराव पत्नी गंगाबाईला १८ एप्रिल १७७४ रोजी मुलगा झाला-सवाई माधवराव.छ.रामराजानी प्रारंभी काही दिवस गंगाबाई च्या नावाने पेशवाई ची वस्त्रे दिली.नंतर सवाई माधवराव चाळीस दिवसांचे झाल्यावर त्यांच्या नावाने अधिकारपत्रे बारभाई मंडळास अंमलबजावणीसाठी दिली.बारभाई मंडळाने २९ मे १७७४ पासून  वतीनेमाधवराव च्या वतीने कारभार बघण्यास सुरुवात केली.बारभाईनचा कारभार सहा वर्षे चालला.त्यानंतर मराठेशाहीची सूत्रे प्रामुख्याने नाना फडणीस आणि महादजी शिंदे यांच्या हाती एकवटली.  इकडे साताऱ्यास छ.रामराजाना राज्यकारभाराचा अजिबात अनुभव नव्हता.त्यांची जडण घडण सामान्य कुटुंबात झाल्याने त्यांचा राजकारणातील शह,काटशह,छक्केपंजे,कटकारस्थाने सारख्या गोष्टींशी कधी संबंध आला नव्हता.ते तख्तनशीन झाले (जानेवारी १७५०) त्यावेळी नानासाहेब पेशवा आणि तारा राणी ह्या दोन मुरलेल्या राजकारण्यांनी छत्रपतीना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचे बरेच प्रयास केले.परिणामी ते जवळपास नामधारी छत्रपती म्हणूनच राहिले.त्यामुळे छ.रामराजानच्या कारकिर्दी पासून‘ज्याच्या हाती छत्रपती तो राज्याचा मालक’ अशी स्थिती मराठेशाहीत निर्माण झाली.

छ.रामराजानच्या मृत्यू नंतर छत्रपती आणि पेशवा ह्या दोन्ही पदांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वार्थाने प्रेरित,नीतीशुन्य राजकारणे सुरु झाली.त्यासाठी राघोबा दादा,नागपूरकर जानोजी भोसले यांसारख्या,असंतुष्ट,महत्वाकांक्षी मंडळीनी आपल्या स्वार्थ सिद्धीसाठी हैदर अली,इंग्रज,निजाम आदी मराठेशाहीच्या शत्रूंशी पण संधान साधले होते.तत्कालीन ब्रिटीश गवर्नर जनरल वॉरन हेस्टीनग्ज्चा जानोजी भोसल्यांस सातारा गादीचा छत्रपती बनविण्याचा डाव होता.मुधोजी इंग्रजांना अनुकूल असून त्यांची छत्रपती बनण्याची इच्छा होती ज्यासाठी इंग्रजांचे मांडलिकत्व पत्करण्यास पण त्यांची तयारी होती.हेस्टीनग्जने तर बारभाईनचा त्यांच्या पसंतीचा छत्रपती सिंहासनारूढ करून मराठेशाहीची सूत्रे आपल्या हाती ठेवण्याचा डाव उधळण्यासाठी मुधोजी भोसल्यांस साताऱ्याला नेऊन छत्रपती बनविण्याची सिद्धता पण केली होती. मुधोजीस रामराजाने दत्तक घेतले असून तेच छत्रपतींचे खरे वारस असल्याचा प्रचार त्याने सुरु करून मुधोजीना साताऱ्यास करण्यासाठी आवश्यक ती मदत,साह्य देऊ केले.

दुसरीकडे राघोबा दादा पण मुंबईत बसून इंग्रजांच्या मदतीने आपले पेशवाईचे अपुरे राहिलेले स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी इंग्रजांना गळ घालत होते. ह्या दोघांसाठी तसेच बारभाई मंडळासाठी काम करून स्वार्थ साधणारे पण बरेच जण उजळपणे,गुप्तपणे कार्यरत होते. दरम्यान इकडे सातारा मुक्कामी छ.रामराजानची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागली.” कोणे समयी काय होईल भरवंसा नाही.तसे झाल्यास नवे खुळास जागा होईल.याजकरिता भोसल्यांचे वंशातील मुलगा पाहून महाराज जिवंत आहेत तों तख्तावर बसवावा,असा विचार बापू,नानांनी ठरवून ज्येष्ठात ते साताऱ्या स गेले.महाराजांचे विचारे,वावीकर त्र्यंबकजी राजे यांचे पुत्र तीन,विठोजी,परशुराम व चतुरसिंग,त्यांतले वडील विठोजी यांस भाद्रपद शु.१३ ता.१५ सप्टेबर रोजी विधीपूर्वक दत्तक घेतले.नांव धाकटे शाहूराजे ठेविले.पश्चात रामराजे यांनी मार्गशीर्ष शु.११

(९-१२-१७७७)रोजी कैलासवास केला.”

अशा प्रकारे बारभाई मंडळाने प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी(pre emptive move)करून त्यांचा आपल्या पसंतीचा दत्तक थोपवून सत्ता काबीज करण्याचा डाव उधळून लावला.ग्रहमान अनुकूल नसल्यामुळे धाकट्या शाहू महाराजांना राज्याभिषेक दत्तकविधान झाल्यांनतर सुमारे एक वर्षाने म्हणजे ११-१२-१७७८ रोजी साताऱ्यात मोठ्या थाटाने पार पडला.अमृतराव पेठे व बाबुराव आपटे ह्यांनी राज्याभिषेक समारंभाची धुरा सांभाळली होती.दत्तविधान समयी छत्रपती १८ वर्षांचे होते.छत्रपतींच्या खर्च,नोकर आदींची व्यवस्था लावून बारभाई कारभाऱ्यानी दौलतीचा सर्व बंदोबस्त आपल्या हातात ठेवला.धाकट्या शाहू महाराजांना कर्तृत्व दाखविण्यास कधी संधी मिळाली नाही.नाना फडणीसांनी छत्रपती आपल्या नियंत्रणात राहावेत म्हणून त्यांच्यावर अनेक अवाजवी बंधने लादली.नाना फडणीसांच्या कामगिरीचे मुल्यांकन करताना त्यांना ह्या बाबतीत मुल्यांकनकर्त्यांनी उणे गुणच  दिले आहेत.

धाकटे शाहूमहाराज उर्फ आबासाहेब ह्यांना तीन मुलगे होते.सर्वात वडील प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब,द्वितीय रामचंद्र उर्फ भाऊसाहेब आणि तृतीय अप्पासाहेब उर्फ शहाजी ह्यांचा अनुक्रमे इ.स.१७९३,१७९५,आणि १८०३ मध्ये जन्म झाला.धाकटे शाहूमहाराज इ.स.१८०८ मध्ये मृत्यू पावल्या नंतर त्यांचा वडील मुलगा प्रतापसिंह छत्रपती बनला.ते इंग्रजांनी पदच्युत करेपर्यंत म्हणजे ५ सप्टेंबर १८३९ पर्यंत छत्रपतीपदी विराजमान राहिले.त्यांच्या नंतर अप्पासाहेब उर्फ शहाजी ह्यांना इंग्रजांनी १८ नोवेंबर १८३९ ला सातारा गादीवर बसवले.अप्पासाहेब ५ एप्रिल १८४८ रोजी मरण पावले.मृत्युपूर्वी त्यांनी अम्बुजी भोसले शेडगावकर यांच्या व्यंकोजी ह्या मुलास दत्तक घेतले होते.पण तत्कालीन इंग्रज गव्हर्नर जनरल डलहौसीने ह्या दत्तकास मंजुरी देण्यास नकार देऊन १ मे १८४९ रोजी सातारा राज्य खालसा केले.अशा प्रकारे शककर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा त्यांच्या मृत्यु ( ३ एप्रिल १६८० ) नंतर १६९ वर्षांनी अस्त झाला.

संदर्भ:
१-मराठी रियासत-खंड ५ आणि ६.गो.स.सरदेसाई.
२ –मराठ्यांचा इतिहास-खंड पहिला आणि तिसरा.संपादक अ.रा.कुलकर्णी,ग.ह.खरे.
३-पेशवाई-कौस्तुभ कस्तुरे.
४-मंतरलेला इतिहास-हर्षद सरपोतदार.

— प्रकाश लोणकर.

Leave a comment