महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,74,498

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव

By Discover Maharashtra Views: 2116 15 Min Read

हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव –

खानदेशातील पाचोरा तालुक्यात अजिंठा पर्वत रांगेच्या पायथ्याशी वसलेले टुमदार गाव म्हणजे पिंपळगाव हरेश्वर. साधारणत: तीस हजार लोकवस्तीचे हे गाव व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. डोंगर पायथ्याची कसदार जमीन ,बऱ्यापैकी जलसाठा, पोषक वातावरण त्यामुळे फळबागा क्षेत्रात या गावाचा चांगलाच लौकिक आहे .बहुळा आणि डुब्बा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असल्याने या गावाला विशेष धार्मिक, ऐतिहासिक तसेच पौराणिक महत्त्व पण आहे.(हरिहरेश्वर मंदिर पिंपळगाव)

पुराणात भस्मासुराची एक कथा सांगितली जाते.ती अशी की, दररोज चितेचे ताजे भस्म मिळावे म्हणून शिवशंकरांनी एका बालकाची नियुक्ती केली होती. एकदा भस्म न मिळाल्याने चितेतले  निखारेच तो घेऊन आला .त्याचे हात पोळले. त्याच्या एकनिष्ठ पणावर शंकर प्रसन्न झाले व भस्म शोधण्यासाठी तुझी वणवण होणार नाही म्हणून तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचे भस्म होईल असा त्याला वर दिला. परंतु त्याचा दुरुपयोग करू नकोस असा सल्ला पण दिला.

काही दिवस सर्व व्यवस्थित सुरू असताना त्याच्या मनात अहंकार शिरला. त्याला त्याच्या शक्तीचा गर्व चढला आणि तो वाटेल त्याचे भस्म करू लागला. त्याच्या असुरी शक्ती जागृत झाल्या. तो भस्मासुर म्हणून कुख्यात झाला. त्याने भूतल त्राही त्राही करून सोडले. आपल्या शक्तीने आपण कुणालाही परास्त करू शकतो असा उन्मत्त भाव त्याच्या मनात जागृत झाला.

एके दिवशी तो शंकराच्या च्या पाठीमागे लागला. त्यांनी कैलास सोडला. भस्मासुराची व त्यांची दृष्ट भेट झाली ती पाचोरा येथील पाताळेश्वर परिसरात. शंकर तेथून उत्तरेकडे बहुळाच्या दिशेने निघाले .बहुळेच्या काठी त्यांनी भैरवांना वर दिला. खेड्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांना तिथेच थांबवले. ते स्थान वरखेडी म्हणून प्रसिद्ध झाले. सावखेड्याच्या पुढे गेल्यानंतर ते गुप्त झाले. ती जागा गुप्तेश्वर महादेव म्हणून ओळखली जाते.

येथील मंदिराचे वैशिष्ट्य असे की, येथे शिवपिंड नाही. पाषाणालाच शाळुंखेचा नैसर्गिक आकार असून त्यातून जिवंत पाण्याची धार सतत वाहत असते. पूर्वी ती झऱ्यासारखी वाहत असे. आता थोडाफार ओलावा दिसतो. भस्मासुर शंकराचा पिच्छा पुरवत तिथपर्यंत आला.

शंकर भोजे परिसरात रुद्रेश्वर येथे प्रकट झाले. येथील मंदिरात शंकराची भलीमोठी पिंड आहे. ही पूर्णपणे चिखल गाळात रुतलेली होती. मंदिर भग्न झालेले होते. गावकऱ्यांनी खोदकाम करून ती मोकळी केली व नवीन मंदिर निर्माण केले. या परिसरात प्राचीन शिवमंदिराचे अवशेष सापडतात.( येथील रुद्रेश्वर मंदिराविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)

भस्मासुर रुद्रेश्वर स्थानापर्यंत पाठलाग करत आला. त्यामुळे शंकरांनी पूर्वेकडे बहुळेच्या काठाने बहुळा व  डूबा या संगमावर विश्रांती घेतली. शंकरांचा पिच्छा पुरवत भस्मासुर तिथे जाऊन पोहोचला. शंकरांची अशी अवस्था पाहून विष्णूने मोहिनी रूप धारण केले व भस्मासुराला या संगमावर रोखून धरले .शंकर बहुळेच्या काठाने थेट अजिंठा पर्वत रांगेत तिच्या उगमापर्यंत जाऊन पोहोचले. तिथून त्यांनी मागे वळून पाहिले. म्हणून या जागेला मुरडेश्वर असे नाव प्राप्त झाले .

शंकरांनी मागे वळून पाहिले तर काय ,एक सुंदर ललना भस्मासुराला मोह पाशात अडकवण्याचा पूरेपूर प्रयत्न करत होती .मोहिनीने नृत्य प्रारंभ केले व आपल्या तालावर भस्मासुराला नाचायला भाग पडले. नृत्यात तल्लीन झालेल्या मोहिनीने आपला एक हात डोक्यावर ठेवला. तिचे अनुकरण करत भस्मासुराने देखील आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्या क्षणी तो धाडधाड पेटत जमिनीवर कोसळला. त्याचा अंत झाला.                               विष्णूने मोहिनी रूपाचा त्याग केला. ते  आपल्या मूळ स्वरूपात प्रकट झाले. शंकरांनी हर्षातिरेकाने त्यांना मिठी मारली. दोघांची कडकडून गळाभेट झाली.

हा प्रसंग जेथे  घडला ते स्थान म्हणजे हरिहरेश्वर मंदिर होय. आता या आख्यायिकेतील महत्त्वाचा भाग बघू .पाचोर्‍यातील पाताळेश्वर ते अजिंठा पर्वतरांगेतील मुर्डेश्वर असा शंकरांनी केलेला प्रवास हा मध्य काळापर्यंत व्यापारी मार्ग होता .मराठवाड्यातील व्यापारी घाटमाथ्यावरचा माल जोगेश्वरी मुर्डेश्वर येथील घाटातूनच खाली उतरवून खानदेशात प्रवेश करत असत.      आजही सावखेडा येथील भैरवनाथ यात्रेत मराठवाड्यातील गुळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

येथील भैरवनाथाला सव्वाच्या पटीत गुळाचा नैवेद्य देण्याची परंपरा आहे. मुर्डेश्वर ,हरिहरेश्वर, रुद्रेश्वर या मंदिरांचे प्राचीनत्व व तेथील दगडी शिल्पे इतिहासात डोकवायला भाग पाडतात.

या आख्यायिकेतील अजून महत्त्वाचा भाग म्हणजे  भस्मासुराचे मागे लागणे आणि शंकराचे पलायन ही प्रतीकात्मक रूपे आहेत. जीवनात अनावश्यक संकटे मागे लागली की प्रत्येकाला तोंड देत शक्ती विनाकारण वाया न घालवता त्यापासून माघार घ्यावी लागते .ही यशस्वी माघार असते. अनेक महापुरुषांनी अशी यशस्वी माघार घेतल्याचे दिसून येते.

कुवत नसताना प्रचंड शक्ती हाती आली की व्यक्ती किती पाशवी वर्तन करू शकते याचे उदाहरण म्हणजे भस्मासूर होय. व्यक्ती कितीही सामर्थ्यशाली असली तरी स्वतःचा विवेक गहाण ठेवून दुसऱ्या च्या तालावर नाचू लागली की त्याची फलनिष्पत्ती काय होते हे भस्मासुर कथेतून शिकायला मिळते.

अविवेकी अनिर्बंध वर्तनाला वेसण घालण्यासाठी शांत संयमी व विवेकशील बुद्धिने घेतलेला निर्णय म्हणजे विष्णूचे मोहनी रूप होय. मानवी वर्तनाच्या प्रत्येक निकषावर या कथा घासून पहिल्या तर त्यातील यथार्थता लक्षात येते. खुळचट आणि अनैतिहासिक म्हणून त्यांची हेटाळणी करण्यापेक्षा मानवी व्यवहाराचे ते एक निष्कर्ष आहे असे मानले तर या कथा त्रासदायक ठरत नाहीत.        हरी आणि हर यांची भेट म्हणजे शैव आणि वैष्णव या संप्रदायांचे मनोमिलन आहे .त्यांच्यातील समन्वय सांस्कृतिक इतिहासाला मोठी कलाटणी देणारी घटना आहे .त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक भाव धारेत आढळून येते. हा समन्वय प्राचीन भारताच्या सांस्कृतिक इतिहासात खूपच मोलाचा ठरला .

पिंपळगाव हरेश्वर येथील हरिहरेश्वर मंदिर निर्मितीचा कालखंड पूर्व पेशवाई कालीन असावा याबाबत मते मतांतरे आहेत. मंदिराच्या पायऱ्या व घाट निर्मितीचा कालखंड शके1841 म्हणजे 1919 असा आहे. येथील पायरी लेख हा जगातील सर्वात लांबीचा शिलालेख आहे .

या शिलालेखाचे वाचन, हस्तलिखित संशोधन विभाग ,दख्खन पुरातत्त्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र भारत सरकारचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील गांधी संशोधन केंद्राचे समन्वयक श्री भुजंगराव बोबडे यांनी केले आहे. या शिलालेखाची लांबी 15 मीटर नऊ इंच रुंदी 9 इंच आहे. शिलालेखांची भाषा मराठी असून लिपी देवनागरी आहे. भुजंगराव बोबडे व शेंदुर्णी येथील प्राध्यापक डॉक्टर प्रशांत देशमुख यांनी या शिलालेखाचे वाचन केले आहे.

ते पुढील प्रमाणे ….।। ओम श्री हरिहरेश्वराय नमः या फरशी चे काम शके१८४१ मध्ये झाले. त्यात मेहनत व लक्ष घालणारे सद्गृहस्थ मे. मामलेदारसो. श्रीधर आर.टी. देव जहागीरदार सीताभ्रतार श्रीधर यांच्यातर्फे मुखत्यार रामभाऊ रामचंद्र जोशी यांनी जहागिरीचे उत्पन्नातून खर्च रुपये २५००शे केला. जमाखर्च लिहिण्याचे काम रा नथू कुंता पाटील यांनी केला. बाकी कामात लागणारी सर्व सिद्धता व देखरेक देवराज मरडाजी पाटील यांनी केली. कारागीर कुऱ्हाडकर रामभाऊ, दगडू शिंपी, व. द. पंचाळ, ब्राह्मण व मंडळी, दगड पाडणारे पांडू गोविंदा माळी व मंडळी ।।  ।। देह त्यागिता किर्ती मागे उरावी, मना सज्जना हेचि क्रिया धरावी ।। श्री समर्था चे म्हणण्यावरून पुढे रा —केल्या कामास कोणी आश्रय देतील अशी आशा आहे. रा. त्यांनी वाड्यातील— फरशी चे प्रमुख खर्चाने केला. लेखक केशव दगडू मिस्त्री पतर दिले.

हा शिलालेख पायरीच्या अनेक दगडांवर कोरून एकाच रांगेत बसवला आहे. त्यामुळे याला पायरी लेख असे नाव दिले गेले. पायर्‍या चढून वर आले की उजव्या बाजूला एक सात फूट उंचीचा अखंड पाषाण रोवलेला आहे. त्यावर एक आकृती आसन घालून बसलेल्या अवस्थेत कोरलेली दिसते. या पाषाणाला भस्मासुर म्हणतात. तिथून मंदिराचा बाह्य परकोट सुरू होतो. त्याची उंची साधारण 28 फूट आहे. परकोटा चे बांधकाम चारही बाजूंनी बंदिस्त आहे. आत जाण्यासाठी एकच मुख्य दरवाजा आहे. त्या समोर घाट पायरीवर भला मोठा नंदी लक्ष वेधून घेतो.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला सुंदर दगडी महिरपीत कोरलेल्या छत्र्या नजरेत भरतात. पाटणादेवी येथील भास्कराचार्य व त्यांची कन्या लीलावती यांच्या समाध्या पिंपळगाव येथील हरेश्वर मंदिरात पाहिल्याने आश्चर्य वाटले.( याविषयी एक स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.) पिंपळगाव हरेश्वर येथील भास्कराचार्यांची समाधी पाच बाय पाच फूट उंचीच्या चौथर्‍यावर उभारली आहे. त्याला आधार देण्यासाठी चार फूट उंचीचा चौकोनाकृती ओटा बांधला आहे. सुंदर कोरीव काम केलेल्या चार दगडी स्तंभावरील नक्षीकाम साधे असले तरी महिरप सुंदर आहे .त्यावर दगडी छत आकर्षक रित्या बसवले आहे .छतावरील घुमटाकार कळस अलीकडे बसवला असावा.

या संपूर्ण मंदिराला स्थानिक गावकऱ्यांनी रंगरंगोटी करण्यापूर्वी सिमेंट व नर्मदा रेतीचे लिंपण केले आहे .त्यामुळे मंदिर पेशवेकालीन वाटण्याऐवजी अलीकडच्या काळातच बांधले याचा भास होतो. पाषाणावरील कोरलेली शिल्पे किंवा पानाफुलांच्या आकृती सिमेंटच्या अतिरेकी माऱ्यात धाराशयी पडल्याचे स्पष्टपणे दिसते .जीर्णोद्धार कर्त्यांनी फक्त मजबूतीकडे लक्ष दिले. त्यात एक समृद्ध वारसा आपल्याकडून कायमचा पुसला जातो याचेही भान मंडळींना राहिले नाही.

भास्कराचार्य यांच्या बाजूला असलेली लीलावती यांची समाधी मात्र अलीकडच्या काळात बांधली गेल्याचे स्पष्टपणे दिसते. या समाधीच्या शेजारी नंदीमंडप असून स्वतंत्र नंदीची मुर्ती त्यात सुशोभित आहे. नंदीच्या गळ्यातील घंटांची माळ पाठीवरून  शेपटीपर्यंत दर्शवली आहे. दोन बालिका आकृती नंदीच्या गळ्यातील घंटा वाजवताना चित्रित केल्या आहेत. नंदीमंडपाचे चारही खांब दगडी कोरीव कामाने सुशोभित केल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यावरील जोतरे व तुळया लक्ष वेधून घेतात. नंदी मंडपाला आधार देण्यासाठी अलीकडे सिमेंटचे बांधकाम करून मजबूत केल्याचे स्पष्टपणे जाणवते. येथे नंदीमंडप स्वतंत्रपणे उभारला आहे. मंदिराच्या सभागृहात प्रवेश करताना दोन दगडी स्तंभावरील कलश व पाने लक्ष वेधून घेतात. त्याच्या बाजूला अलीकडच्या काळात गणपती मंदिर बांधून त्यात सुबक श्री गणेशाची संगमरवरी मूर्ती प्रतिष्ठित केली आहे.

सभागृहात प्रवेश केल्यावर वितानाची उंची व गाभाऱ्याची भव्यता नजरेत भरते. अलीकडे केलेले सिमेंटचे काम व रंगकाम यामुळे आपण चित्रपटातील एखादा थर्माकोलचा सेट पाहतोय की काय असा भास होतो. सभागृहाच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत पण त्यातील मूर्ती मात्र नाहीशा झालेल्या आहेत. सभागृह व गर्भगृह यातील अंतरिक्ष आठ दगडी खांबांवर तोललेला आहे. सभागृहातून प्रवेश केल्यावर सुद्धा शिव पिंडी चे दर्शन होत नाही हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

महाद्वारा वरील नक्षीकाम पानाफुलांचे असले तरी पायथ्याला यक्ष किन्नर गंधर्व मूर्ती स्पष्टपणे दिसतात. अंतरिक्षाच्या उजव्या कोनाड्यात गणपती मूर्ती चटकन लक्षात येत नाही. ती फारच सुंदरआहे. महाद्वाराच्या उंबरठ्यावर आल्यावर गर्भगृहातील शिवपिंडीचे वरतून दर्शन होते. आठ ते नऊ पायऱ्या उतरून गर्भगृहात जावे लागते. येथील शिवपिंडी विलोभनीय आहे .संपूर्ण गर्भगृहाला आतून संगमरवरी बांधकाम केले असून पुरेशी विद्युत रोषणाई केली आहे. त्यामुळे दर्शन व्यवस्थित घेता येते. येथील गर्भगृहाची खोली अन्य शिवमंदिरापेक्षा अधिक आहे. येथील शिवपिंडीवर नित्य पूजाअर्चा व नैवेद्याचा मान गुरव घराण्याकडे सोपवला आहे.

येथील पिंडी चे वैशिष्ट्य म्हणजे शाळुंखे वरील लिंगाचे दोन भाग स्पष्टपणे दिसतात .त्यापैकी अर्धा भाग विष्णू स्वरुप तर अर्धा शिव स्वरूप मानला जातो. विष्णू स्वरूपाला तुळस तर शिव स्वरूपाला बेलपत्र वाहण्याचा प्रघात आहे. एकाच पिंडीवर शिव आणि विष्णू यांची पूजा एकाच वेळी केली जाते. अशी ही खानदेशातील आगळीवेगळी परंपरा येथे पाहायला मिळते. कारण भस्मासुर वधानंतर याच ठिकाणी शिव आणि विष्णू यांची गळाभेट झाली होती. म्हणून शैव आणि वैष्णव परंपरांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो.

आषाढी व शिवरात्रीला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते .चार वर्षांपूर्वी या पिंडीवर वज्रलेप चढवण्यात आला. गर्भगृहात रिकामे देव कोष्टक आहे. त्या वरील दगडी नक्षीकाम वाघळी येथील मुधाईदेवी मंदिरातील देव कोष्टकांत सारखेच आहे. गर्भगृहाचे वितान सुमारे पंचवीस फूट उंचीची असून त्यावर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे व पंख्यांची सोय केल्याने वायुविजनाची सोय झाली आहे.

बाहेरच्या बाजूला गणपती मंदिरा शेजारी एक गोलाकार दगडी बाणा बसवलेला दिसतो. शेगावचे संत श्री गजानन महाराज येथे दर्शनासाठी आल्यावर याच ठिकाणी ध्यान मुद्रित आसनस्थ होते असे सांगितले जाते. मंदिर गर्भगृहाचे बाह्य काम नागर शैलीतील आहे. त्यावर उडीसा मंदिर शैलीचा स्पष्टपणे प्रभाव जाणवतो. शिखरावरील कळस मात्र चौकोनी असून त्यावर गोलाकार घुमट चढवला आहे. त्याची रचना केदारनाथ मंदिर शिखर सदृश्य असल्याचा भास होतो. मंदिराच्या बाह्य भागावर तीनही बाजूंनी देवकोष्ठके आहेत परंतु त्यात मूर्ती मात्र नाहीत. कदाचित त्यांची झीज झाली असावी.

पाठीमागे नरसिंह प्रकट व हिरण्यकश्यपूचा वध अशी दोन स्वतंत्र शिल्पे आढळतात. त्यावर कीर्तिमुख कोरलेला आहे तर उजव्या बाजूला महिषासुरमर्दिनीची आकृती स्पष्टपणे दिसते. त्या खालील मूर्तीची पूर्णपणे झीज झाल्याने मूर्ती ओळखता येत नाही. मंदिर पाठीमागे सुंदर कमळ फुले मन वेधून घेतात. त्यासाठी खास पुष्करणी तयार केलेली आहे. त्यात गुलाबी, पांढरे ,गर्द निळे, जांभळे अशा विविधरंगी कमळ फुलांचा ताटवा डोळ्यांचे पारणे फेडतो.

पिंपळगाव गावापासून साधारणता दीड किलोमीटर अंतरावर असलेले हरिहरेश्वर मंदिर हे खानदेशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे .त्याला पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ आहेत. संत गोविंद महाराज यांची समाधीदेखील याच गावात आहे.( त्यांचे विषयी स्वतंत्र लेख लवकरच प्रकाशित करतो.)

गावातून मंदिरापर्यंत जाण्यासाठी अलीकडे स्वतंत्र सिमेंटचा रस्ता बनवल्यामुळे भाविक तसेच पर्यटकांना जाणे सुलभ झाले आहे. पावसाळ्यात हा परिसर फारच रम्य भासतो. लोकप्रतिनिधींनी व इतिहास अभ्यासकांनी या मंदिरातील सर्वात लांबीच्या शिलालेखाची गिनीज बुक मध्ये नोंद होईल यासाठी प्रयत्न करावेत ही कळकळीची विनंती.

श्री गोविंद महाराज यांच्या समाधी मंदिरापासून हरिहरेश्वर मंदिराकडे जातांना डाव्या बाजूला एक सुंदर गणपती मंदिर डोळ्यांचे पारणे फेडते. मराठा शैलीतील या मंदिराला कैची पाषणांचा वापर करून मजबुती दिली आहे. शिखरावर चुन्याचे अप्रतिम काम करून सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या कदाचित अष्टसिद्धी असाव्यात असे वाटते. चारही बाजूला ऑइल पेंट ची रंगरंगोटी केल्याने त्या मूर्तीतील सूक्ष्म तरल भाव ओळखता येत नाहीत परंतु मंदिर फारच रेखीव सुबक आहे.     पेशवेकालीन असलेल्या या मंदिराला आवर्जून भेट द्यावी असेच हे मंदिर आहे. मंदिरातील गणेश मूर्ती चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी, मुधाईदेवी, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळे येथील संगमेश्वर मंदिरातील गणेश मूर्तीची विलक्षण साधर्म्य दर्शवते  त्यामुळे ही मूर्ती परिसरातील एखाद्या मंदिरातून येथे प्रतिष्ठापित केली असावी का असाही प्रश्न निर्माण होतो.

काही असो,  हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या सानिध्यात असल्याने एका दिवसाच्या सहलीसाठी फारच सुंदर आहे. येथून जवळच सह्याद्रीच्या अजिंठा पर्वत रांगेत मुर्डेश्वर आचे प्राचीन मंदिर आहे. पावसाळ्यात पर्यटनाची हौस असणाऱ्या गिरी प्रेमींनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. पर्यावरणप्रेमी, निसर्ग वेडे पक्षीप्रेमी चातक, धार्मिक आस्थावान व इतिहास अभ्यासक या सर्वांना हे स्थान निश्चितच भरपूर आनंद देईल असे आहे. दिवाळीच्या सुट्टीत एका दिवसाच्या सहलीसाठी अतिशय योग्य असे हे स्थान आहे.

संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

1 Comment