महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,29,562

हरगौरी आणि सुरसुंदरी, निलंगा

By Discover Maharashtra Views: 2443 4 Min Read

हरगौरी आणि सुरसुंदरी, निलंगा –

मराठवाडा हा मंदिरस्थापत्याने बहरलेला आहे. गावोगावी आपल्याला देखणी मंदिरे आणि त्यावर केलेली सुंदर शिल्पकला बघायला मिळते. लातूरच्या दक्षिणेला अंदाजे ४७ कि.मी. अंतरावर असलेल्या निलंगा या तालुक्याच्या ठिकाणी इ.स. च्या १२ व्या शतकाच्या अखेरीस बांधलेले एक सुंदर शिवमंदिर उभे आहे. नीलकंठेश्वर मंदिर हे त्याचे नाव. कल्याणी चालुक्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या या मंदिरावर एकापेक्षा एक सुंदर, सुडौल अशा सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. खूपच प्रमाणबद्ध आणि विविध अशा या सुरसुंदरींनी हे मंदिर नटलेले आहे. नुसत्या सुरसुंदरीच नव्हे तर या मंदिराची अजूनही काही वैशिष्ट्ये दिसून येतात. हे मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. मंडपातून या तीनही गाभाऱ्यात जाण्यासाठी प्रवेशमार्ग आहेत. प्रत्येक गाभारा आणि मंडप याच्यामध्ये अंतराल आहे. पूर्वाभिमुख मुख्य गाभाऱ्यात शिवलिंग असून दक्षिणाभिमुख गाभाऱ्यात विष्णूची केशव रूपातली अत्यंत सुंदर मूर्ती उभी आहे. या गाभाऱ्याच्या ललाटावर कोरलेली भूवराह प्रतिमा खूप सुंदर. इथल्या तिसऱ्या म्हणजेच उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यात एक आगळीवेगळी आणि सर्वांगसुंदर अशी मूर्ती दिसते. ती आहे उमामहेश्वर आलिंगनमूर्ती. इथे शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. यांच्या पायाशी एका बाजूला मोरावर बसलेला कार्तिकेय तर दुसरीकडे गणपती दिसतो. पण हिला म्हणायचे हरगौरीची मूर्ती. त्याला कारणही तसेच आहे.हरगौरी आणि सुरसुंदरी, निलंगा.

पार्वती ही कधी उमा असते तर कधी ती गौरी असते. तिच्या ह्या रूपांतील फरक मूर्तिकारांनी अतिशय कौशल्याने आणि नेमकेपणाने दाखवलेला आहे. जेव्हा पार्वती ही गौरी रूपात दाखवायची असते तेव्हा तिच्या पायाशी तिचे वाहन म्हणून गोधा किंवा घोरपड आवर्जून दाखवली जाते. घोरपड चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोरातील कठोर तप करण्याचे सामर्थ्य हे घोरपडीच्या रूपाने दाखवले जाते. पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठी अत्यंत तीव्र आणि कठोर तपश्चर्या केली होती. तिची शिवप्राप्तीची इच्छा अत्यंत प्रबळ होती. तिची अवस्था एखाद्या पर्णहीन वृक्षाप्रमाणे झालेली होती या वरूनच तिला अपर्णा असेही नाव मिळालेले आहे. तिचा हा चिवटपणा, गोधेच्या रूपात दाखवला जातो. हेच वैशिष्ट्य निलंगा इथल्या मूर्तीत आहे. इथे शिव आणि पार्वती ज्या पीठावर पसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. ‘गोधासना भवेदगौरी’ असे तिचे वर्णन रूपमंडन या ग्रंथात केले असल्यामुळे ह्या निलंग्याच्या प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी प्रतिमा असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. ह्या हरगौरी प्रतिमा खूपच दुर्मीळ आहेत. या अत्यंत देखण्या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. हिंदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा विधी प्रामुख्याने केला जातो. त्याचा संदर्भ याच संकल्पनेशी जोडलेला आहे.

मंदिराच्या मंडपात एका देवकोष्ठात महिषासुरमर्दिनी तर दुसऱ्या देवकोष्ठात  अजून एक दुर्मिळ अशी अनंतविष्णूची स्थानक प्रतिमा पाहायला मिळते. कल्याणी चालुक्यांच्या मंदिरात दिसणारे अजून एक शिल्प म्हणजे सप्तमातृका. या मंदिरात सप्तमातृकांचा पट बघायला मिळतो. या सात मातृकांच्या सोबत गणपती कोरलेला आहे. मंदिराच्या बाह्यांगावर विविध सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. त्यात डालमालिका, दर्पणा, नुपूरपादिका, कर्पूरमंजरी, शुकसारिका सारख्या नितांत देखण्या सुंदरी दिसून येतात. यांच्याचबरोबर, मदन, विष्णू, चामुंडा, गौरी यांच्याही मूर्ती मंदिराच्या बाह्यांगावर कोरलेल्या आहेत. मंदिराला शिखर नाही. आणि सध्या या मंदिराला ऑइल पेंट दिलेला आहे. तरीसुद्धा इथल्या मूर्ती आणि त्यांचे सौंदर्य यात कुठेही कमीपणा आलेला नाही. देखणे शिल्पसौंदर्य आणि सुडौल अशा मूर्तींची मांदियाळी या मंदिरावर बघायला मिळते. लातूरच्या जवळ असलेले इतके सुंदर मंदिरस्थापत्य वेळ काढून बघावे असे आहे.

– आशुतोष बापट

Leave a comment