गोपाळबाग, पन्हाळा | Gopalbagh, Panhala

गोपाळबाग, पन्हाळा | Gopalbagh, Panhala

गोपाळबाग, पन्हाळा –

२०१६ मध्ये पहिल्यांदा पन्हाळ्यावर गेलो तेव्हा किल्ल्याविषयी वाचताना पन्हाळ्यावरचे एक ऐतिहासिक ठिकाण विशेष लक्षात राहिले. त्यावेळी ते बघता आले नाही. नंतर यावर्षी तीन महिन्यांपूर्वी दिवसभर पन्हाळा पाहिला तेव्हा खास ते ठिकाण बघण्यासाठी गेलो असताना जवळ जाऊनही ते बघता नाही आले. विशेष म्हणजे त्यावेळी सोबत पन्हाळ्याविषयीचे पुस्तक होते. अशी दोनदा हुलकावणी दिल्यानंतर ठरवले की आता पन्हाळ्यावर जाणे झाल्यावर पहिले ते ठिकाण बघायचेच. मागच्या आठवड्यात पन्हाळ्यावर गेल्यावर पहिले त्या ठिकाणी गेलो. हे ठिकाण म्हणजे गोपाळतीर्थ/गोपाळबाग (Gopalbagh).

तीन दरवाजाच्या पुढे झाडीत गोपाळबाग आहे. या गोपाळबागेत हे गोपाळतीर्थ आहे. गोपाळतीर्थ म्हणजे जुनी, शिवकालीन वाटावी अशी विहीर आहे. जवळच गोपाळेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या मागे चौथऱ्यावर दोन शिवलिंगे असलेल्या दोन समाध्या आहेत. या जागेविषयीचा इतिहास खूप कमी लोकांना माहीत आहे. शिवपुत्र राजाराम महाराजांचे व राजसबाईंचे पुत्र कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज दुसरे ह्यांच्या पदरी असलेल्या गायकवाड बंधूंच्या त्या समाध्या आहेत. दौलतराव गायकवाड आणि विश्वासराव गायकवाड.

सातारा आणि कोल्हापूर गादीच्या संघर्षाच्या काळात एकदा सातारा गादीकडून पेशव्यांचे सरदार पटवर्धन कोल्हापूरकरांवर चालून आले. तेव्हा या गायकवाड बंधूंनी पराक्रमाची शर्थ करून त्यांच्या सैन्याची दाणादाण केली व रणांगणावरून परत आले. कोल्हापूरच्या छत्रपतींना मुजरे करून आपल्या घरी गेले. घरी त्यांच्या मातोश्रीपुढे आले, अनवाणी पायाने. त्यांच्या आईने विचारले, “पायीच्या वहाणा कोठे आहेत ?” ते म्हणाले “त्या रणात पडल्या.” मातोश्रींनी त्यांना ऐकवले, “पायीच्या वहाणा संभाळवेना तर तुम्ही छत्रपतींचे राज्य कसे सांभाळणार ?” हे शब्द ऐकताच ते दोघे भाऊ पाच-सहा सहकाऱ्यांसह चपला आणायला पुन्हा रणांगणात गेले. तिथे पटवर्धनांच्या एका टोळीशी त्यांची गाठ पडली. तलवारी चालल्या आणि गायकवाड बंधू धारातीर्थी पडले. त्यांच्या ह्या समाध्या. या गोष्टीचा मूळ संदर्भ अजून माहीत नाही, पन्हाळ्याविषयीच्या पुस्तकांत हे वाचण्यात आले. गोपाळबागेची जागा गायकवाड घराण्याचीच.

अत्यंत रमणीय असे हे पुरातन स्थान आहे. वृक्षांनी, फुलांनी, पक्ष्यांनी समृद्ध असा. येथे दुर्मिळ अशी नागचाफ्याची झाडे आहेत. तीन दरवाजातून आत किल्ल्यात आल्यावर डावीकडे रस्ता संपतो तिथे एक रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमधून पुढे गेल्यावर हे स्थान आहे. रिसॉर्टमधल्या लोकांना विचारून जायचे. पन्हाळ्याविषयीच्या पुस्तकांत तीन दरवाजाच्या जवळ गोपाळतीर्थ आहे असे लिहिलेले असते. मात्र गोपाळतीर्थ तीन दरवाजापासून काहीसं लांब, आतमध्ये आहे. त्यामुळेच मला दोनदा हुलकावणी मिळाली.

Pranav Kulkarni

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here