गोफण…
शेतातील पिकांना पक्षी किंवा प्राणी यांचा उपद्रव होऊ नये यासाठी गोफण या यंत्राचा वापर पूर्वापार काळापासून केला जात आहे. गोफणीचा शेतातील उपयोग मानव शेती करू लागला तेव्हापपासून केला जात असावा. मात्र पूर्वी गोफण प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरली जात असे.
गोफण हे हाताने फेकण्याच्या अस्त्रांमध्ये सर्वात प्राचीन अस्त्र आहे. ते अश्मयुगापासून चालत आले असल्याचे पुरावे उपलब्ध आहेत. अश्मययुगात वापरल्या जाणाऱ्या गोफणीचे दगड दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणि कच्छमधील धोलाविरा येथे पाहण्यास मिळतात.
गोफणीचे स्वरूप दोन दोरींच्या मध्यभागी अडकवलेला कातड्याचा पट्टा असे असते. ती गोफासारखी विणलेली असते. शिकार करण्यासाठी किंवा पक्ष्यांना हुसकावण्यासाठी जो दगड वापरायचा असतो, तो गोफणीच्या कातडी पट्ट्यामध्ये ठेवला जातो. त्यानंतर दोरीच्या एका टोकाला असलेल्या फासामध्ये हाताचे मधले बोट अडकावले जाते आणि दोरीचे दुसरे टोक हाताचा अंगठा आणि तर्जनी बोट यामधील बेचक्यात घट्ट धरून ठेवले जाते. त्यानंतर गोफण हातात धरून वेगाने स्वतःच्या डोक्याभोवती चक्राकार आणि जमिनीस समांतर अशी फिरवली जाते. गोफणीमधील कातडी पट्टा व त्यातील दगड चक्राकार गतीने गरगरा फिरू लागतात. पुरेसा वेग आल्यानंतर योग्य क्षणी अंगठा व तर्जनी यांमध्ये पकडलेले दोरीचे टोक सोडून दिले, की मधल्या कातडी पट्ट्यात ठेवलेला दगड वेगाने नेम धरलेल्या जागेवर जाऊन पडतो. गोफणीतील दगड कुठे जाऊन पडावा वा कुठे लागावा यासाठी कौशल्याची आणि सरावाची गरज असते. हाताने दगड दूर फेकता येईल त्यापेक्षा कितीतरी जास्त गतीने व दूर अंतरापर्यंत गोफणीने दगड फेकता येतो.
गोफणीचे दोन प्रकार असतात. एक चामड्याच्या पट्ट्याला दोन दोऱ्या बांधलेली गोफण आणि दुसरी काठीच्या डेलक्याला बांधलेली गोफण. अनेक आदिवासी जमाती गोफणीचा वापर करतात.
गोफण प्राचीन काळापासून वापरली जात असल्याचा आणखी एक पुरावा आहे. गोफणीचा उल्लेख महाभारतातही आढळतो. महाभारतात चक्राश्म व भृशुण्ड्यू असे दोन शब्द आले आहेत.
अर्थ – चक्राश्म म्हणजे मोठे दगड अतिदूर फेकण्याचे लाकडी यंत्र आणि भृशुण्ड्यू म्हणजे दगड फेकण्याकरता कातडे व दोऱ्या यांनी बनवलेले साधन.
सुश्रृतसंहितेत व कौटिल्याच्या अर्थशास्त्रात देखील गोफणीचा उल्लेख आहे.
Credit – Yogesh Bhorkar